Saturday, Jan 20th

Headlines:

यंदा आंबा उत्पादनात भरघोस वाढ

E-mail Print PDF
प्रतिनिधी ः केंद्र सरकारने सकल घरेलू उत्पादन म्हणजे जीडीपी घसरण्याचा अंदाज व्यक्त केला असला तरी येत्या हंगामात फळफळावळ विशेषतः आंब्याचे उत्पादन चांगले वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५ टक्के एवढी वाढ होईल. काजू व नारळ उत्पादन मात्र गतवर्षी एवढेच येईल. एकूण फलोत्पादन क्षेत्राचा विचार करता यावर्षी देशात विक्रम प्रस्थापित होईल, असेही केंद्र सरकारला वाटत आहे.
यावर्षी झालेल्या चांगला पाऊस आणि फलोत्पादनामध्ये येणारे नवनवे तंत्रज्ञान यामुळे फलोत्पादन वाढण्याची शक्यता आहे. ९४.९ दशलक्ष टन एवढे फळांचे उत्पादन होणार असून ती वाढ २ टक्के एवढी नोंदवली जाण्याची शक्यता आहे. भाजीपाले उत्पादन १८०.७ दशलक्ष टन होणार असून त्यात १ टक्का वाढीची अपेक्षा आहे. केंद्रीय कृषी सचिव एस. के. पटनायक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शेतकरी उच्च किंमतीच्या पिकांकडे वळले आहेत. चांगली जीवनसत्वे असणार्‍या पिकांच्या अधिक उत्पादनाची मागणी वाढत आहे. शेतकर्‍यांकडून त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शेतकर्‍यांनी विचार करून पिकांची निवड केली असून शेतकरी पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात पीक संरक्षणासाठी जागृत राहत आहेत. किड व रोग प्रतिबंधासाठी शेतक़र्‍यांकडून वेळीच पाउले उचलण्यात येत असल्याने उत्पादन वाढ अपेक्षित आहे, असेही सांगण्यात आले.

एस. टी. च्या गणवेश वाटपाचा उडाला बोजवारा

E-mail Print PDF
रत्नागिरी ः कोटयवधी रूपये खर्चून एस. टी. महामंडळाने तयार केलेल्या नव्या ड्रेस वाटपाचा संपूर्ण राज्यामध्ये पुरता फज्जा उडाला आहे. प्रत्येक विभागीय मंडळनिहाय शनिवारी कर्मचार्‍यांना नव्या गणवेशाचे वाटप करण्यात आले, मात्र कार्यक्रम संपताच कर्मचार्‍यांनी हे गणवेश परत केले आहेत. गणवेशाचे माप न जुळल्याने हा फज्जा उडाला आहे. ज्या संस्थेने या गणवेशाचे कंत्राट घेतले होते, त्या कंपनीला गणवेशाच्या मापाविषयी यादी देण्यात आली होती. मात्र याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही. धक्कादायक बाब म्हणजे या गणवेशाच्या कापडाचा दर्जाही चांगला नसल्याची तक्रार कर्मचार्‍यांमधून करण्यात आली आहे.
नवीन वर्षात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गणवेश बदलाबाबतची अंमलबजावणी ६ जानेवारीला केली खरी, परंतु हा गणवेश कोणी घेतलाच नाही. राज्यभर शनिवारी एकाचवेळी गणवेश वाटप कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रम संपताच नंतर गणवेश परत करण्यात आले. हा प्रकार रत्नागिरी विभागीय कार्यक्रमातही घडला. मापाचे गणवेश नसल्याने हे गणवेश परत करण्यात आल्याची माहिती विभागातील कर्मचा़र्‍यांनी बोलताना दिली.
४ हजार कर्मचारी असलेल्या रत्नागिरी विभागात फक्त ९० गणवेश प्रातिनिधीक स्वरूपात पाठवण्यात आले होते. मेकॅनिक, चालक-वाहक, वाहतूक नियंत्रक आदींसह विविध प्रकारचे गणवेश येणार होते. मात्र काही ठराविक प्रकारचे गणवेश आले. उर्वरित नंतर टप्याटप्प्याने पाठवण्यात येणार असल्याची माहिती एस. टी. महामंडळाने प्रत्येक विभागाला दिली होती.
एस. टी. महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिले जात असे. ते कापड पसंत न पडल्याने आपल्या सोयीने कर्मचारी गणवेशाचे कापड खरेदी करीत व गणवेश स्वत: शिवून घेत होते. त्यामुळे या गणवेशात सुरळीतपणा आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र या गणवेशाच्या बाबतीत फज्जा उडाला आहे. केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारित येणा़र्‍या राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थान या संस्थेला एसटी कर्मचार्‍यांचे नवीन गणवेश डिझाईन तयार करण्यासाठी पाचारण केले. या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रातील एस.टीच्या कर्मचा़र्‍यांशी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधून त्यांचे कामाचे स्वरूप, त्याच्या गरजा, स्थानिक हवामान यांचा विचार करून नवीन गणवेशाचे प्रारूप तयार केले गेले होते. तरीदेखील गणवेश नीट मापात शिवून न आल्याने कर्मचार्‍यांची निराशा झाली आहे.

ग्रामीण पोलीस ठरतोय ‘पोलीस मॅन ऑफ द मन्थ’

E-mail Print PDF
रत्नागिरी ः कायदा-सुव्यवस्था राखताना पोलीस यंत्रणा हायटेक होत आहे. हायटेक कारभार करत असतानाच तो जनताभिमुख होण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने पोलिसांच्या प्रशासकीय कामकाजासाठी ‘सीसीटीएसएल’ प्रणालीचा वापर केला जात आहे. त्याद्वारे उत्कृष्ट काम हाताळणाऱया पोलीस कर्मचा़र्‍यांचा दर महिन्याला ‘पोलीस ऑफ द मन्थ’ किताबाने गौरव केला जात असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितले.
रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात ‘रेजिंग डे’ व पत्रकार दिन या कार्यक्रमांच्या अनुषंगाने शनिवारी कायदा-सुव्यवस्थेचा प्रशासकीय कारभार व शस्त्रसाग्री यांची पत्रकारांना माहिती व प्रात्यक्षिक देण्यात आले. ग्रामीण पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनिल विभुते यांनी या ‘हटके’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रेजिंग डे निमित्त पोलिसांचा प्रशासकीय कारभार जनतेपर्यंत पोहचवून पोलीस व जनता यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.
ग्रामीण पोलीस स्थानक अलिकडच्या काळात ‘आयएसओ’ झाले आहे.याठिकाणी येणार्‍या कोणत्याही नागरिकाच्या मनात येथील कारभाराबाबत आदर निर्माण होईल असा प्रयास पोलिसांमार्फत केला जात असल्याचे विभूते यांनी सांगितले. संपूर्ण पोलीसस्थानक सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आलेले आहे. त्यामुळे याठिकाणी भेटी देणारे नागरिक, येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी व त्याठिकाणचा कारभारातही पारदर्शकता निर्माण झाली आहे.
पोलीस स्थानकात आल्यानंतर नागरिकांची स्वागत कक्षाच्या माध्यमातून आवश्यक कामकाजासाठी त्या-त्या विभागांची माहिती दिली जाते. त्यामुळे नागरिकांच्या मनात निर्माण होणारी संभ्रमावस्था दूर होते. पोलीस स्थानकातील कारभार देखील हायटेक ‘सीसीटीएसएल’ प्रणालीद्वारे हाताळला जात आहे. या प्रणालीद्वारे उत्कृष्ट कार्य करणाऱया पोलीस कर्मचा़र्‍याचा दर महिन्याला ‘पोलीस मॅन ऑफ द मन्थ’ किताबाने गौरव केला जात आहे. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांची काम करण्याचे मनोबलही उंचावले जात आहे. येथील संपूर्ण कारभार ऑनलाईन असून वायरलेस कक्ष, ठाणे अंमलदार कक्षातील तक्रार दाखल करून घेण्याची कार्यवाही, पासपोर्ट विभागातील गतीमान कारभार यामुळे नागरिकांच्या तक्रारींचाही तत्काळ निपटारा करण्याचे प्रयत्न होत आहेत.

चिपळूण टप्पा चौपदरीकरण पंधरा दिवसांपासून ठप्प

E-mail Print PDF
चिपळूण ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला असला तरी पेढे ते खेरशेत या टप्प्याचे काम पंधरवडयापासून ठप्प झाले आहे. चौपदरीकरणात बाधित वृक्षांची तोड करणारा ठेकेदार व राजकीय पदाधिकार्‍याच्या वादात हे काम रखडले आहे. या संदर्भात महामार्ग विभागाने थेट बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अहवाल पाठवला असल्याचे वृत्त आहे.
चिपळुण तालुक्यातील पेढे-सवतसडा ते खेरशेत या ३७ कि.मी.च्या पट्टयातील काम करणा़र्‍या परशुराम-आरवली हायवे प्रा. लि. या कंपनीने गेल्या महिन्यात जमीन सपाटीकरणासह वृक्षतोडीस प्रारंभ केला. मात्र खेरशेत, असुर्डे दरम्यान वृक्षतोड करताना या ठेकेदाराला एका राजकीय पदाधिका़र्‍याने धमकी दिल्याने गेल्या २० डिसेंबरपासून वृक्षतोड करण्याचे काम बंद ठेवण्यात आले आहे. वृक्षतोड बंद असल्याने आणि ते काम पूर्ण न केल्यामुळे सपाटीकरणालाही सुरूवात करणे अशक्य झाले आहे. या संदर्भात काम बंद असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनीही या मार्गाची पाहणी करून त्या संदर्भातील अहवाल थेट बांधकाम मंत्री पाटील यांच्याकडे पाठवला आहे. येत्या चार दिवसात यावर अपेक्षित निर्णय होईल, अशी माहिती महामार्गाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

ट्रेलर, मॅक्सच्या धडकेत चालकाचा मृत्यू

E-mail Print PDF
संगमेश्वर ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली ते बावनदी या अपघातप्रवणक्षेत्रात संगमेश्वरजवळच्या गोळवली येथे टेम्पो व कंटेनरची समोरासमोर धडक बसल्याने टेम्पोचालक जागीच ठार झाला असून टेम्पोमधील ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. दाट धुक्यामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा अपघात रविवारी सकाळी ७.१५ वाजण्याच्या दरम्यान घडला.
टेम्पोचालक प्रकाश गुणाजी जाधव (५५,रा. पालू ता. लांजा) हे अपघातात जागीच ठार झाले तर विशाल गणपतराव अवसरे (२३, रा.मुंबई मूळ राहणार पालू-लांजा), प्रवीण चंद्रकांत नामे (२२, रा. पालू ता. लांजा), मयांक योगेश जाधव (६, रा. मालाड मूळ राहणार देवरुख), मनोज मनोहर जाधव (३५, रा. मुंबई अंधेरी), महेश गंगाराम खाके (२३, रा. पालू-लांजा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे.
पालू येथील मेव्हणा प्रवीण नामे यांचे घरगुती सामान घेवून प्रकाश जाधव हे मुंबईहून शनिवारी सायंकाळी ८ वाजता निघाले होते. स्वतःच्या मालकीचा टेम्पो असल्याने त्यांनी आपल्या सोबत मुंबईस्थित असलेले व मुळचे पालू ता.लांजा येथील विशाल अवसरे, मनोज जाधव, प्रवीण नामे, मयांक जाधव, महेश खाके यांना घेवून निघाले होते. ते संगमेश्वरजवळच्या गोळवली येथे रविवारी सकाळी ७.१५ वा. आले असता दाट धुक्यामुळे पुढील गाडी न दिसल्याने पुढील बाजूने येणार्‍या कंटेनरवर आदळले. यावेळी समोरासमोर धडक होवून ते रस्त्याच्या बाजूला असलेल्या दरीत जावून कोसळले. टेम्पो व कंटेनरची एकमेकांना बसलेली धडक एवढी मोठी होती की, टेम्पोची पुढील बाजू चेपली जावून गाडीचे पत्रे बाहेर उडाले. या अपघातात प्रकाश जाधव हे गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले तर अपघाताचे वृत्त समजताच ग्रामीण रुग्णवाहिकेचे चालक व १०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर शहाजी मोटे हे घटनास्थळी दाखल झाले.

निवळी गणपतीपुळे मार्गावर अपघातaa

E-mail Print PDF
रत्नागिरी : निवळी गणपतीपुळे मार्गावर एक टँकर पलटी झाल्याने रस्ता बंद झाला आहे. टँकर हटविण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होईल. या अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत www.konkantoday.com

Page 9 of 2712