Wednesday, Feb 21st

Headlines:

गृहनिर्माण संस्थांनी फेडरेशनच्या बॅनरखाली संघटीत व्हावे : ऍड. दीपक पटवर्धन

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः नवा कायदा दुरुस्तीने दिलेली स्वायत्तता अनुभवण्यासाठी सहकार कायद्याचा अभ्यास करावा. यातून आपल्या संस्थेच्या व्यवहारांना पूरक ठरतील, असे उपविधी गृहनिर्माण संस्थांनी तयार करावेत, असे प्रतिपादन गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी केले. जिल्हा नगर वाचनालयात आयोजित केलेल्या गृहनिर्माण सदस्यांच्या मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी गृहनिर्माण संस्था प्रतिनिधींनी आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी फेडरेशनच्या बॅनरखाली संघटीत व्हावे, असे आवाहन केले.
विकासकांकडून होणारी अडवणूक, सदोष सेवा याविरुध्द आवाज उठवण्यासाठी संघटीत होण्याची गरज आहे, असेही ऍड. पटवर्धन यांनी सांगितले. गृहनिर्माण संस्थेच्या विविध नियमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. नव्याने दुरुस्त झालेला सहकार कायदा जसाच्या तसा हाऊसिंग सोसायट्यांना लावणे योग्य ठरणार नाही. यासाठी संघटक होऊन काम करुया, असे आवाहनही ऍड. पटवर्धन यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेअर फंडातून कोकण विद्यापीठाच्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

E-mail Print PDF
rashtrawadi-congress-partyदापोली (प्रतिनिधी) ः राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील ९८ विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. १ लाख ९६ हजार रुपयांचा धनादेश कुलगुरु डॉ. किसन लवांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. राष्ट्रवादी वेल्फेअर फंडातून आलेल्या मदतीचे ऋण प्रत्येकाने नोकरीला लागल्यावर आपल्या उत्पन्नातून इतरांना मदत करुन फेडावे, असे आवाहन कुलगुरुंनी केले.
१ लाख ९६ हजार रुपयांचा धनादेश कुलगुरुंच्या परिषद दालनात झालेल्या कार्यक्रमात देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, नगराध्यक्षा सौ. विनिता शिगवण, उपनगराध्यक्षा सौ. संचिता जोशी, जि.प. सदस्या सौ. सुजाता तांबे, नगरसेविका सौ. विद्या बुरटे, विद्यापीठ शिक्षण संचालक डॉ. उत्तम महाडकर, सहयोगी अधिष्ठाता प्रा. दिलीप महाले, डॉ. केशव पुजारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

कोणतीही परवानगी नसताना कोकण रेल्वेकडून गेल्या २० वर्षांपासून वाशिष्टी पाण्याची चोरी

E-mail Print PDF
konkan-railway_newsleaksचिपळूण (प्रतिनिधी) ः वाशिष्टी नदीतून दिवसाला दीड लाख लीटर पाणी उचलण्याची मागणी कोकण रेल्वेने महसुल विभागाकडे केली आहे. कोकण रेल्वेला पाणी द्यायचे असेल तर ही कोकण रेल्वे कोकणासाठीच आहे हे प्रत्यक्ष कृतीने सिध्द झाले पाहिजे. चिपळूण स्थानकावर कोकण रेल्वेच्या सर्व १७ गाड्या प्रवाशांसाठी थांबतील. फक्त पाणी भरण्यासाठी नव्हे, असे आश्‍वासन दिल्यानंतर वाशिष्टीचे पाणी कोकण रेल्वेला द्यावे, अशी लेखी सूचना ५ हजाराहून अधिक नागरिकांनी महसुल विभागाला सादर केले आहे. परंतु गेली २० वर्षे कोणतीही परवानगी न घेता आणि एक पैसाही न भरता कोकण रेल्वे ५ लाख लीटरहून अधिक पाणी वाशिष्टी नदीतून खेचून घेत आहे, त्याचे काय? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
चिपळूण तहसीलदारांनी कोकण रेल्वेला वाशिष्टीतून रोज दीड लाख लीटर पाणी द्यायचे आहे. याबाबत कोणाचा आक्षेप असेल तर लेखी कळवावे, असे आवाहन केले. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा जाधव, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, चिपळूणचे सर्व नगरसेवक, नागरिक, ग्रामपंचायती, विविध संस्था आणि संघटना यांनी ५ हजार सह्यांच्या ७५ हरकती तहसीलदारांना सादर केल्या आहेत.
वाशिष्टी नदीतील लाखो लीटर पाणी रेल्वेच्या मोठमोठ्या टाक्यांमध्ये खेचून घेत असल्याचा प्रकार जागरुक नागरिकांनी उघडकीस आणला. याचा रेल्वे अधिकार्‍यांना जाब विचारण्यात आला, तेव्हा त्यांना परवानगी घेतल्याबाबत किंवा गेल्या २० वर्षांत कररुपाने एक रुपयाही भरलेला नाही हे मान्य करावे लागले. गेल्या २० वर्षांत हजारो कोट्यावधी रुपयांचा धंदा करणार्‍या कोकण रेल्वेवर पाणी चोरल्याची कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

दुष्काळग्रस्तांचा अवमान करणार्‍या उपमुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन

E-mail Print PDF
ajit-pawarरत्नागिरी (प्रतिनिधी) ः दुष्काळात सापडलेल्या नागरिकांना मदत करायची सोडून त्यांच्या जखमेवर अश्‍लाघ्य भाषेत विधाने करुन मीठ चोळणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या या असभ्य वर्तनाबद्दल राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. जिल्हा शिवसेनेनेही आठवडा बाजार येथे ना. पवार यांच्या पुतळ्याचे दहन करुन मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, जि.प. उपाध्यक्ष विश्‍वास सुर्वे, सभापती भगवान घाडगे, पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत, उपनगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी, उपतालुकाप्रमुख सुकांत ऊर्फ भाई सावंत, उपतालुकाप्रमुख राजेंद्र शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

आम. उदय सामंत यांनी आश्‍वासन देऊन फसवल्याचा सोमेश्‍वर ग्रा.पं. सदस्याचा आरोप

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी सोमेश्‍वर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी तीन स्वतंत्र ग्रा.पं. सदस्यांचा पाठिंबा घेतला. अडीच वर्षांनंतर सरपंच पदाचे आश्‍वासन देऊन त्यांनी आमचा पाठिंबा मिळवला होता. अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आमदारांना वारंवार विनंती करुन आश्‍वासनाची आठवण करुन देण्यात आली. परंतु त्यांनी दुर्लक्ष करुन सोमेश्‍वरातील मुस्लिम मोहल्ल्याची फसवणूक केली असल्याचा आरोप नाझिया मुकादम, साबीर पटेल, सुलतान हुश्ये यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे तालुकाध्यक्ष बाबा बाईंग, मुस्लिम मोहल्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते आतिक गडकरी उपस्थित होते.
आश्‍वासन विसरणार्‍या आम. उदय सामंत यांना आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांची गरज नसल्याचे दिसून येत आहे. यापुढे आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असे आव्हान आतिक गडकरी यांनी दिले आहे. सोमेश्‍वर ग्रा.पं.वर राष्ट्रवादीचे चार सदस्य निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्या मुस्लिम मोहल्ल्यातील नाझिया मुकादम, साबीर पटेल, सुलतान हुश्ये यांनी आमदारांच्या आश्‍वासनानुसार राष्ट्रवादीच्या दीपश्री पाटील यांना सरपंच पदासाठी पाठिंबा दिला आहे. वेळ पडल्यास शिवसेनेच्या सदस्यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीच्या सरपंचांवर अविश्‍वास ठराव आणू, असा इशाराही दिला आहे.

अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे परस्पर अंत्यसंस्कार करणार्‍या वडीलांसह ५जणांवर गुन्हा

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी) ः करंजाणी येथील चिरेखाणीवर डंपर मागे घेत असताना दोन वर्षांचा मुलगा चाकाखाली सापडून मृत्यू पावला. हा अपघात पोलिसांपासून लपवून ठेवून बालकाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी मुलाच्या वडीलांसह ५जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अभिमन्यू जाधव असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव असून, मोहन जाधव असे या मुलाच्या वडीलांचे नाव आहे.
चिरेखाणीवर सुधीर महाडकर हा चालक डंपर घेऊन आला होता. दोन वर्षांचा अभिमन्यू पाण्यासाठी जाणार्‍या आईच्या पाठोपाठ चालत जात असताना मागे येणार्‍या डंपरखाली सापडला. हा प्रकार खाण मालक अंतोश कालेकर, विलास राठोड, रमेश जाधव, मंक्या जाधव, मुलाचे वडील मोहन जाधव, डंपर चालक सुधीर महाडकर यांनी पोलिसांना न कळवता बालकाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन परस्पर विल्हेवाट लावली होती.अनधिकृत इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे पालकमंत्री भास्कर जाधव यांचे आदेश
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील अनधिकृत इमारतींचे त्वरीत सर्वेक्षण करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने आपला अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे द्यावा, असे आदेश पालकमंत्री भास्कर जाधव यांनी दिले आहेत. मुंब्रा- शीळफाटा येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री भास्कर जाधव यांनी अनधिकृत इमारतींची गंभीर दखल घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व अनधिकृत इमारतींच्या सर्वेक्षणाची जबाबदारी संबंधित यंत्रणांसह पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाकडे सोपवली आहे.

Page 2712 of 2732