Saturday, Jan 20th

Headlines:

मुंबई

मटकाकिंग पंकज गांगरला अटक

E-mail Print PDF
ठाणे - देशाच्या आर्थिक राजधानीवर पकड ठेवणार्‍या डी कंपनीने अलीकडच्या काही वर्षांमध्ये आपला मोर्चा मुंबईबाहेरही वळवला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार खंडणी वसुलीचे जाळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यासह पुणे, नाशिक, दिल्ली तसेच लखनऊपर्यंत पसरल्याचे समजते. तर या प्रकरणात बोरीवलीतून मटकाकिंग पंकज गांगरला गुरुवारी अटक करण्यात आली.
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये ठाणे पोलिसांनी इक्बाल कासकरसह तिघांना १९ सप्टेंबर रोजी अटक केली होती. छोटा शकील या टोळीचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यालाही आरोपी केले. पुणे, नाशिक, दिल्ली आणि लखनऊ या शहरांमधूनही डी कंपनीने खंडणी वसुली केल्याचा संशय पोलिसांना आहे.
व्यापार्‍यांकडून खंडणी वसूल करण्यासाठी या डी कंपनीकडून परराज्यांतील गुंडांना पोसले जाते. खंडणीसाठी गोळीबार केल्याच्या घटना घडल्या असून, त्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
इक्बाल कासकरला फंडिंग करत असल्याच्या संशयातून बुधवारी रात्री ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने नागपाड्यातून अस्लम हाजी लकडावालाला ताब्यात घेतले. लकडावाला हा कंत्राटदार आहे. जे.जे. मार्ग परिसरात सुरू असलेल्या एसबीयूटीकडून क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत काही इमारतींचे काम त्याने हाती घेतल्याचे समजते.

आर. के. स्टुडिओची एनओसी’ रद्द

E-mail Print PDF
मुंबई - चेंबूर येथील प्रसिद्ध आर. के. स्टुडिओत अग्निसुरक्षेसंबंधी उपाययोजना न केल्याचे आढळल्यामुळे मुंबई अग्निशामक दलाने या स्टुडिओला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) रद्द केले. पालिकेने याप्रकरणी स्टुडिओ व्यवस्थापनाला कारणे दाखवा’ नोटीसही बजावली आहे.
या स्टुडिओला १६ सप्टेंबरला आग लागली होती. अग्निशामक दलाने केलेल्या चौकशीत अग्निसुरक्षेसंबंधी उपाययोजना न केल्याचे आढळले होते. याप्रकरणी अग्निशामक दल संबंधितांवर खटलाही दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अग्निशामक दलाने या स्टुडिओला २०१४ मध्ये एनओसी’ दिली होती; पण त्यातील सूचनांनुसार स्टुडिओच्या मालकांनी आणि व्यवस्थापनाने महत्त्वाच्या बाबींची पूर्तता केली नव्हती, असे चौकशीत आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला.

सरकारमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाबाबत शिवसेना मते आजमावतेय

E-mail Print PDF
मुंबई - नारायण राणे यांना प्रवेश देण्याचा विचार सुरू होताच भाजपविरोधात रान उठवणार्‌या शिवसेनेने राणे यांचा प्रवेश लांबणीवर पडत असल्याचे पाहून सत्तेतून बाहेर पडण्याबाबत सबुरीने घेण्याचे ठरवले आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू असतानाच, उद्धव ठाकरे यांनी आता विभागवार आमदारांच्या बैठका घेऊन याबद्दल मते आजमावण्यास सुरुवात केली आहे. आज पहिल्याच बैठकीत मराठवाड्यातल्या आमदारांनी सरकारमधून बाहेर पडणे सध्यातरी योग्य ठरणार नाही, असे रोखठोक मत मांडल्याचे कळते. मात्र, मंत्र्यांना बदलण्याची जोरदार मागणी या आमदारांनी केली असून, त्यावर विचार करण्याचे आश्‍वासन पक्षप्रमुखांनी दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडण्याऐवजी आमदारांच्या विरोधाची दखल घेऊन आपले मंत्री बदलण्याचा विचार उद्धव ठाकरे यांनी सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या शिवसेनेने महागाईचे निमित्त करून आपल्याच सरकारविरोधात मोर्चे काढून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन घोषणाबाजी केली होती. प्रत्यक्षात राणे यांना प्रवेश देण्याचा भाजपने सुरू केलेला विचार हाच सेनेच्या या पवित्र्यामागचे कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राणे यांना प्रवेश द्याल, तर  पाठिंबादेखील काढू, अशी अप्रत्यक्ष धमकीच शिवसेनेकडून दिली गेली होती. सेनेने पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार टिकवावे लागेल आणि त्याचा जनमानसात उलटा परिणाम होईल, याची जाणीव राज्यातल्या नेत्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला करून दिल्यानंतर राणे यांचा प्रवेश लांबणीवर टाकला गेला आणि  शिवसेनेनेही आपला विचार बदलला. आता विभागवार बैठका घेऊन आमदारांची मते जाणून घेतली जात असली, तरी बहुसंख्य आमदारांचा सत्तेबाहेर पडण्यास विरोधच असल्याचे समजते. विशेषतः, ग्रामीण भागातल्या आमदारांनी सरकारमधून बाहेर पडण्याऐवजी आत राहूनच आपली मते ठामपणे मांडण्याची सूचना केली आहे.
मराठवाड्यातल्या आमदारांनी आज सुभाष साबणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करू नका, अशी विनंती या आमदारांनी ठाकरे यांना केली. आपण सरकारमधून बाहेर पडल्याने निवडणुका लागल्या, तर पुन्हा निवडणुका लढवण्यासाठी पुरेशी ताकद नाही, भाजपकडे मात्र मोठ्या प्रमाणात पैसा आणि बळ असल्याचे मत या आमदारांनी उद्धव यांच्यासमोर मांडले.

मुंबईतून डी गँगची सूत्रे हलविणार्‍या अहमद लंगडा याला अटक

E-mail Print PDF
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार फारुक याचा भाऊ अहमद मन्सूर उर्फ लंगडा (६५) याला सोमवारी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह सना नावाच्या महिलेलाही एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पथकाने अटक केली आहे.
मुंबईच्या जे.जे. मार्ग येथील टिमकर मोहल्ला परिसरात अहमद लंगडा (६५) हा कुटुंबीयांसोबत राहतो. अहमद अंकल म्हणून तो प्रसिद्ध आहे. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला राहत्या घरातून ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाचे प्रदीप शर्मा यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. इक्बाल कासकरच्या चौकशीतून अहमदचे नाव समोर आल्यानंतर ही कारवाई केल्याचे समजते. अहमद याचा भाऊ कराचीमध्ये दाऊदसोबत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
२०१३ मध्ये छोटा शकीलच्या नावाने कॉंग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांना धमकाविल्याप्रकरणी अहमद मन्सूर उर्फ लंगडा याला मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती. १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी त्याला अटक करण्यात आली, पण त्याला निर्दोष ठरवण्यात आले होते. चांद मदार हत्येप्रकरणीही तो साक्षीदार आहे. तसेच त्याने डिझेल माफिया मोहम्मद अली याच्याविरोधात साक्ष दिली होती. हाच मुंबईतून डी गँगची सूत्रे हलवित असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्यासह सना नावाच्या महिलेलाही शर्मा यांच्या पथकाने अटक केली.
मूळची मुंब्रा येथील रहिवासी असलेली सना सोमवारी तिच्या प्रियकराच्या तारखेसाठी शिवडी कोर्टात आली असताना ही कारवाई करण्यात आली. मुंबईच्या माझगाव येथील एका हॉटेलमधून तिचे व्यवहार चालायचे अशीही माहिती समोर येत आहे. दोघांचे डी गँगशी कनेक्शन समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अनेक जण अंडरग्राउंड होत आहेत.

इक्बाल कासकरच्या अटकेनंतर दाऊद गँग भूमिगत

E-mail Print PDF
मुंबई - गेल्या काही वर्षांत निर्भीडपणे वावरणारे डी कंपनीचे शूटर इक्बाल कासकरच्या अटकेनंतर रातोरात अंडरग्राऊंड झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या चौकशीतून पुढे येत आहे. मुंबईतील संपूर्ण डी गँग इक्बालच्या अटकेनंतर हादरली आहेच; परंतु खुद्द दाऊदने देखील भीतीपोटी आपले पाकिस्तानातील ठिकाण बदलेले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान इक्बालच्या चौकशीतून उघड झालेल्या बाबींची माहिती थेट केंद्राने मागितल्याचे वृत्त आहे.
कुठल्याही गुन्ह्यात सहभाग उघड होत नसल्याने आणि अनेक काळे कारनामे सुरू असताना देखील तक्रारदार पुढे येत नसल्याने गेल्या काही वर्षांत डी गँग निर्ढावली होती. मात्र अचानक थेट दाऊदच्याच भावावर गुन्हा दाखल होऊन त्यास अटक झाल्यामुळे संपूर्ण डी कंपनी हादरली असून मुंबईतील अनेक शूटर रातोरात अंडरग्राऊंड झाले आहेत. अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या आणि सतत नशेत चूर राहणार्‌या इक्बालच्या तोंडून कधीही कुठलाही खुलासा होऊ शकतो अशी दाट भीती संपूर्ण डी कंपनीला आहे. त्यामुळेच खुद्द दाऊदने देखील आपले पाकिस्तानातील बस्तान पाकअंतर्गतच इतर ठिकाणी हलवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्यामुळे ही चारही ठिकाणे दाऊद सोडून जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान इक्बालने अटकेनंतर तपासात ज्या गोष्टींचा खुलासा केला आहे त्याची संपूर्ण माहिती केंद्र सरकारने मागितल्याचे वृत्त असून ही माहिती घेऊन एक अधिकारी रविवारी दिल्लीत दाखल झाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली. इक्बालच्या चौकशीतून ठाणे बिल्डर खंडणीप्रकरणात आणखी चार जणांची नावे समोर आली आहेत. या चारही जणांना पोलिसांनी जवळपास हेरले असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. त्यासाठी ठाणे पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या राज्यात रवाना झाली आहेत.

मुंबईहून गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प

E-mail Print PDF
मुंबई - मुंबईहून गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. स्लीपर बदलायला उशीर झाल्याने वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बोईसर, डहाणू, वापीला जाणार्‍या प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली आहे. गुजरातकडे जाणारी वाहतूक दीड तास उशिराने सुरू आहे.
पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाच्या ११८ नंबर वरील भागात देखभाल दुरूस्तीसाठी शुक्रवारी उशिरा रात्री २ ते ४ वाजण्याच्या सुमारास गुजरातच्या दिशेने जाणाऱया रेल्वे रूळाचे व स्लीपरचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम वेळीच पूर्ण न झाल्याने गुजरातच्या दिशेने जाणाऱया ट्रकवर गाडयांच्या लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईहून गुजरातला जाणार्‍या आणि येणार्‍या सर्व गाडया ठप्प झाल्या आहेत. या खोळंब्यामुळे गुजरातला जाणार्‍या गाडया दीड ते दोन तास उशिराने धावत आहेत. काही गाडया रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लांब पल्ल्याच्या गाडया उशिराने धावत आहेत. परिणामी चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

एसीमध्ये स्फोट होऊन इमारतीला आग

E-mail Print PDF
मुंबई - भिवंडीतील एका इमारतीला आग लागली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात आज सकाळी ही घटना घडली आहे. इमारतीमध्ये असलेल्या एसीमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही इमारत भिवंडीतील उद्योजक निजामुद्दीन अन्सारी यांची आहे.
या आगीतून आठ ते दहा जणांना सुरक्षित बाहेर काढले जात आहे. या इमारतीच्या शेजारी दोन पेट्रोलपंप आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही पेट्रोल पंप बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंगचे काम सुरु आहे.

पहिल्या वातानुकूलित लोकलची चाचणी सुरु

E-mail Print PDF
मुंबई - एक वर्षांहून अधिक कालावधी होऊनही मुंबईत दाखल झालेली वातानुकूलित लोकल अद्याप प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली नाही. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर या लोकलच्या चाचण्या घेण्यात येत असून साधारणपणे डिसेंबपर्यंत वातानुकूलित लोकल दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही लोकल सुरू होताच त्याच्या सुरुवातीला चारच फेर्‍या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटिग्रल कोच फॅक्टरीत) बनलेली वातानुकूलित लोकल साधारण एक वर्षांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. ही लोकल बनवण्यासाठी ५४ कोटी रुपये खर्च आला. बारा डब्यांची असलेल्या या लोकलच्या सुरुवातीला कुर्ला कारशेडमध्ये आणि कारशेडबाहेर कर्जतदरम्यान चाचण्या करण्यात आल्या. सहा ते सात महिने चाचण्या झाल्यानंतर वातानुकूलित लोकलची जादा असलेली उंची आणि सीएसटी ते कुर्लादरम्यान कमी उंचीचे पूल पाहता मध्य रेल्वेने एसी लोकल चालवण्यास नकार दिला. त्यामुळे वातानुकूलित लोकल चालवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. ही लोकल चालवण्यासाठी पश्चिम रेल्वेने रुची दाखवली आणि साधारण गेल्या तीन महिन्यांपासून वातानुकूलित लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर चाचण्या घेण्यात येत आहेत. चाचण्या घेतानाच रेल्वेच्या आरडीएसओकडून (रिसर्च डिझाइन ऍण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन)काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्याची माहिती देतानाच दुसरीकडे चाचण्या घेण्याचे काम सुरूच आहे. चाचण्या पूर्ण होताच त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येईल आणि त्याची मंजुरी मिळताच डिसेंबपर्यंत वातानुकूलित लोकल चालवण्याचा प्रयत्न आहे.  यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले की, सुरुवातीला वातानुकूलित लोकलच्या चारच फेर्‍या चालवण्याचे नियोजन आहे. या लोकलला स्वयंचलित दरवाजे असल्याने ती स्थानकात थांबताच त्यासाठी वेळही लागू शकतो. तसेच प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊनच  फेर्‍या वाढवण्यावर भर दिला जाईल.

चेंबूर स्थानकात प्रवाशांचा रेल रोको!

E-mail Print PDF
मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसाने आज थोडी विश्रांती घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. हार्बर मार्गावरील लोकलचे वेळापत्रक गेल्या तीन दिवसांपासून बिघडल्याने प्रवाशांना याचा खूपच मनःस्ताप सहन करावा लागत आहेत. त्यातच आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी चेंबूर रेल्वे स्थानकातून सुटणारी चेंबूर - सीएसटी लोकल रद्द केल्याने संतप्त प्रवाशांनी चेंबूर रेल्वे स्थानकात रेल रोको केले.
चेंबूरहून सीएसटीकडे जाणार्‍या सर्व लोकल पटरीवर उतरून संतप्त प्रवाशांनी थांबल्याने रेल वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. रेल्वे पोलिसांनी संतप्त प्रवाशांना शांत करून रेल्वे वाहतूक पूर्वव्रत सुरू केली. सध्या हार्बर मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

Page 9 of 168