Saturday, Jan 20th

Headlines:

मुंबई

भांडुपमध्ये भाजपाच्या जागृती पाटील पोटनिवडणुकीत विजयी

E-mail Print PDF
मुंबई - अत्यंत चुरशीने झालेल्या मुंबई महापालिका प्रभाग क्र. ११६ भांडुप येथील पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभाव केला. जागृती पाटील यांना १११२९ मते मिळाली. तर, मिनाक्षी पाटील यांना ६३३७ मते मिळाली आहेत.
या निवडणुकीत आपणच बाजी मारावी यासाठी भाजपच्या नेत्यांनी प्रभागामध्ये चांगलाच जम बसवला होता. तर शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. या पोटनिवडणुकीनंतर आकड्यांचे गणित बदलण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे येथे विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती.
कॉंग्रेस पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर बुधवारी पोटनिवडणूक घेण्यात आली.

पंजाब मेलच्या इंजिनात बिघाड; मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत

E-mail Print PDF
मुंबई - कसारा-उंबरमाळी स्टेशनदरम्यान पंजाब मेलचे इंजिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान पंजाब मेल कसार्‍याहून मुंबईकडे येत होती. त्याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे कसारा-मुंबई लोकल सेवा ठप्प झाली आहे. कार्यालयीन वेळेदरम्यानच रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने नोकरदारांची मोठी गैरसोय झाली आहे. इंजिन दुरूस्त करण्याचा प्रयत्न सुरू होते. दरम्यान, कसार्‍याहून दुसरं इंजिन मागवून पंजाब मेल रूळावरून हटवण्यात आली आहे. पण अजूनही वाहतूक विस्कळीत आहे. कसार्‍याहून काही अतिरिक्त लोकल सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिली. चाकरमन्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लोकल सेवेला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. लांब पल्ल्‌याच्या गाड्याही काही प्रमाणात अडकल्या आहेत. त्यांना टप्प्या टप्प्याने लवकरच सोडण्यात येईल, असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, आज सकाळी साडेसातच्या दरम्यान पंजाब मेल कसार्‍याहून मुंबईकडे येत असताना अचानक इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे या मार्गावरून मुंबईकडे जाणार्‍या सर्व मेल-एक्स्प्रेस जागच्या जागी थांबल्या. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून इंजिन दुरूस्तीसाठी त्वरीत प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे.

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

E-mail Print PDF
मुंबई - हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. पनवेल रेल्वे स्टेशनजवळ रुळाला तडे गेल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेस हा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ६.२० वाजताच्या ठाण्याकडे जाणा-या लोकलच्या मोटरमनला रेल्वे रुळाला तडे गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर प्रसंगावधान दाखवत या मोटरमननं वेळीच लोकल थांबवली व रेल्वे प्रशासनाला याची माहिती दिली. दरम्यान, रुळ दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.  
पनवेलजवळील खान्देश्वर येथे रेल्वे रुळाला तडे गेल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक खोळंबली आहे. यामुळे पनवेल स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. ही गर्दी कमी होण्यासाठी किमान तासभर लागेल, अशी माहिती समोर आली आहे.

कुर्ला स्थानकातील सहा पुलांपैकी तीन पुलांचा कमी वापर

E-mail Print PDF
मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील जास्त गर्दीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे कुर्ला रेल्वे स्थानकावर तब्बल सहा पूल असूनही मधल्या पुलावरील गर्दी तापदायक ठरत आहे. उत्तरेसह दक्षिणेकडील पुलांचा वापर होत असला तरी तुलनेने तो कमी असून, मधल्या पुलावरील गर्दीचे व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेनंतर मधल्या पुलावर केवळ दोन आरपीएफ जवान तैनात करण्यात येत असून, संबंधितांना ही गर्दी आवरणे आवाक्याबाहेर आहे. परिणामी उर्वरित पुलांचा वापर वाढविणे, गर्दीचे व्यवस्थापन करणे आणि यासाठी येथे प्रवाशांमध्ये जनजागृती करणे हे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर असून, येथे प्रशासन कमी पडले तर मात्र एल्फिन्स्टनची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे.
कुर्ला रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेचे एकूण सहा फलाट असून, हार्बर रेल्वेचे दोन फलाट आहेत. फलाट क्रमांक १ ते ६ मध्य रेल्वेसाठी तर फलाट क्रमांक ७ आणि ८ हार्बर रेल्वेसाठी आहे. रेल्वे प्रशासनाने आठ फलाटांना जोडण्यासाठी तब्बल सहा पूल बांधले आहेत. मात्र मधले तीन पूल वगळले तर उर्वरित तीन पुलांचा तुलनेपेक्षा कमी वापर होत आहे. मधला एक पूल सर्वात जुना असून, या पुलाचे जिने अरुंद आहेत. फलाट क्रमांक ४, ६, ७ आणि ८ वर सकाळी भरून येणाजया लोकलमधील गर्दी उतरत असते. तर फलाट क्रमांक १, ५ आणि ७ वर सायंकाळसह रात्री भरून येणाजया लोकलची गर्दी उतरते. मुळात या सर्व फलाटांवर उतरत असलेले प्रवासी सातत्याने अरुंद असलेल्या मधल्या जिन्याचा वापर करतात. परिणामी येथील गर्दीत भर पडते आणि एक गाडी आल्यावर जिन्यावर झालेली गर्दी किमान दहा मिनिटे कायम असते.
मुळातच मधल्या जिन्यासह लगतच्या आणखी एका जिन्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने येथे उर्वरित नव्या पुलांची निर्मिती केली आहे. यातील एक नवा पूल ठाणे दिशेकडे आहे. दुसरा नवा पूल मध्यभागी आहे, तर तिसरा पूल सायन दिशेकडे आहे. ठाणे आणि सायन दिशेकडील दोन्ही नवे पूल उत्तम असले तरी एका कोपर्‍यात त्यांची जागा असल्याने घाईगडबडीत असलेले रेल्वे प्रवासी याचा वापर करणे टाळतात. मध्यभागी असलेल्या एका नव्या पुलाचा वापर वाढत असला तरी त्याचे प्रमाण कमी आहे.
परिणामी जुन्या पुलाचा वापर कमी व्हावा. येथील गर्दीला उर्वरित पुलांकडे वळते करता यावे; यासाठी फलाटांवरच आरपीएफचे जवान तैनात करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र आरपीएफचे जवान पुलावर तैनात असतात. या कारणाने फलाटावर सकाळी आणि सायंकाळी झालेली गर्दी हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे.

मध्य रेल्वेवर ५९ पादचारी पूल अत्यंत अरुंद

E-mail Print PDF
मुंबई - एल्फिन्स्टन रोड येथील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मुंबई, ठाणे आणि आसपासच्या शहरांतील मध्य रेल्वेच्या स्थानकांची पाहणी करणार्‍या समितीला एकूण ५९ पूल हे तीन मीटरपेक्षाही कमी रुंदीचे असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठी कोंडी होते व प्रसंगी चेंगराचेंगरी होते, असे आढळून आल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
परळ- एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांना नाहक प्राण गमवावे लागले होते. अरुंद पुलामुळे बहुतेक ठिकाणी तसाच अपघात होण्याची शक्यता असल्याने खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने पुलांची डागडुजी, विस्तारीकरण तसेच नवे पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या एका पाहणीतून मध्य रेल्वेवर तब्बल पन्नासहून अधिक पुलांवर मृत्यूचे सापळे असल्याचे आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  मुंबईतील ३७ तर ठाण्यापुढील विविध रेल्वे स्थानकांमधील २२ पुलांची रुंदी ही तीन मीटरपेक्षाही कमी आहे. विशेष म्हणजे, मुलुंड, बदलापूर, अंबरनाथ, कोपर, गोवंडी, आंबिवली, उल्हासनगर या स्थानकांची प्रवासीसंख्या ही लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे या स्थानकांतील पुलांची रुंदी प्राधान्याने वाढण्यात येईल, असेही सूत्रांकडून समजले.

नायगाव स्थानकात रेलरोको; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

E-mail Print PDF
मुंबई - पश्चिम रेल्वेने लोकल ट्रेनचे नवे वेळापत्रक अंमलात आणले आहे. या वेळापत्रकानुसार नायगाव स्थानकातून सकाळी ७.५० ला सुटणारी वसई-अंधेरी लोकल ऐन वेळेस रद्द करण्यात आली.
पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकात शनिवारी सकाळी प्रवाशांनी रेलरोको आंदोलन सुरू केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. मात्र, काही वेळापूर्वीच रेल्वे पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे प्रवाशांनी आपले आंदोलन मागे घेतले. परंतु, तासभर सुरू असलेल्या या गोंधळामुळे विरारहून चर्चगेटच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. आता ही वाहतूक पुन्हा सुरू झाली असली तरी ती पूर्ववत होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेने आजपासून जुनं वेळापत्रक रद्द करून नवीन वेळापत्रक लागू केलं आहे. या वेळापत्रकानुसार नायगाव स्थानकातून सकाळी ७.५० ला सुटणारी वसई-अंधेरी लोकल ऐन वेळेस रद्द करण्यात आली होती. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना तशी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. नायगाव स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांना ही ट्रेन रद्द झाल्याचे कळले. या प्रकारामुळे त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यांनी थेट रूळांवर उतरत रेलरोको आंदोलन करण्यास सुरूवात केली. प्रवाश्यांनी रेल्वे रूळावर ठाण मांडून रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सध्या विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. या गोंधळामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमन्यांना त्रास सहन करावा लागला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग पोलीस येथे पोहोचले आणि त्यांनी प्रवाशांची मनधरणी केली. अखेर तासाभरानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि आंदोलक ट्रॅकवरून बाजूला झाले.

पश्‍चिम रेल्वे २३ नव्या लोकल सेवेत दाखल करणार

E-mail Print PDF
मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावर सध्याच्या घडीला १०० लोकल गाडया आहेत. यामध्ये सिमेन्स कंपनीच्या १३ , बम्बार्डियर ७२ लोकल, दोन मेधा लोकल, ९ रेट्रोफिटेड तर ४ अलस्टॉम कंपनीच्या लोकल आहेत. १०० लोकलपैकी ८६ लोकल प्रत्यक्षात सेवेत असतात. तर अन्य लोकल या देखभाल-दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये जातात. ८६ लोकलच्या दररोज १,३२३ फेर्‍या होत होत्या. २ ऑक्टोबरपासून या फेर्‍यातही अतिरिक्त ३२ फेर्‍यांची भर पडली आहे. वाढीव फेर्‍यांमुळे लोकल गाडयांच्या देखभाल दुरुस्तीचाही प्रश्नही उद्भवणार आहे. पुढील काही वर्षांत आणखी काही अतिरिक्त फेर्‍यांची भर पडल्यास नवीन लोकलची गरजही भासू शकते. एकंदरीत सर्व कारणांचा विचार करून पश्चिम रेल्वेने २३ नवीन लोकल दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ८ नवीन लोकल घेण्यात येतील. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील १५ लोकल यांची कालमर्यादा उलटली असून त्या बदल्यात या लोकल आणल्या जातील.

एकविरा देवीच्या मंदिरातील सोन्याच्या कळसाची चोरी

E-mail Print PDF
मुंबई - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिराला नव्याने बसवण्यात आलेल्या सोन्याच्या कळसाची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.
सोमवारी रात्री ही चोरी झाली आहे. कुलस्वामीनी एकविरा देवीच्या मंदिराला तीन वर्षांपूर्वी एका भाविकाने सोन्याचा कळस मंदिराला अर्पण केला होता. दोन दिवसांपूर्वी देवीची नवरात्र यात्रा व महानवमी होम संपन्न झाला होता. त्यानंतर मंगळवारी ही घटना उघडकीस आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
विशेष म्हणजे मंदिराच्या कळसावर सीसीटीव्ही यंत्रणा आहे. तसेच दोन पोलीस कर्मचारी व देवस्थानचा एक कर्मचारी रात्रभर तेथे सुरक्षेसाठी तैनात असताना ही चोरी झाली आहे.

इक्बाल कासकरसह तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

E-mail Print PDF
ठाणे - खंडणीप्रकरणी अटकेत असलेला दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याचे साथीदार मुमताज शेख व इसरार सय्यद या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. चार दिवसांची पोलीस कोठडी रविवारी संपल्याने त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
ठाण्यातील बिल्डर सुरेश जैन यांच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर आणि त्याच्या मुमताज शेख व इसरार सय्यद या दोघा साथीदारांना १९ सप्टेंबर रोजी ठाणे पोलिसांनी नागपाडा येथून अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने या तिघांना ८ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. तर आठ दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिघांना पुन्हा चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. दरम्यान चार दिवसाची पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपल्याने इक्बाल व त्याच्या दोघा साथीदारांना रविवारी विशेष हॉलिडे कोर्टासमोर हजर करण्यात आले. यावेळी तपासतील सर्व बाबी पूर्ण झाल्याचे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आल्याने या तिघांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर इक्बाल कासकर व त्याच्या दोघा साथीदारावर ज्वेलर्सकडून खंडणी उकळल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल असल्याने त्या गुन्ह्यात पोलिसांनी मागणी केल्यास तिघांना पुन्हा पोलीस कोठडी होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Page 8 of 168