Saturday, Jan 20th

Headlines:

मुंबई

२५ टक्के शाळकरी मुले तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी

E-mail Print PDF
मुंबई - मुंबई शहरातील शाळांमधील दहा ते १९ वयोगटातील प्रत्येक चार मुलांमधील एकजण (२५ टक्के) धूम्रपान तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेला असल्याचे एका सर्व्हेक्षणातून उघड झाले आहे. मणिपाल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने प्रिन्स अली खान हॉस्पिटल माझगाव यांच्यातर्फे हे सर्व्हेक्षण करण्यात आले.
माझगाव आणि परिसरातील विद्यार्थी संख्या ही आठ ते दहा हजाराच्या घरात असून ३० महापालिका तसेच खासगी शाळांतील एक हजार मुलांमध्ये हे सर्व्हेक्षण करण्यात आले. तंबाखुजन्य पदार्थ व त्याच्या परिणामांसंदर्भात डॉक्टरांनी एक प्रश्‍नावली तयार केली होती. सदर प्रश्‍नावलीचे पाचवी ते नववीमधील विद्यार्थ्यांमध्ये वितरण करण्यात आले. यातील प्रश्‍नांची विद्यार्थ्यांनी जी काही उत्तरे दिली आहेत त्यावरुन सर्व्हेक्षणाचा अहवाल तयार करण्यात आला.  या अहवालानुसार, दहा ते १९ या वयोगटातील प्रत्येक चार मुलांमधील एकजण धुम्रपानाच्या आहारी गेल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.
तोंडाच्या कर्करोगाचे तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन हे मुख्य कारण आहे.  यामध्ये असलेले निकोटीन हे धोकादायक असते याबाबत अनेक विद्यार्थी अनभिज्ञ असल्याचे या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. शहरातील विविध कर्करोगाच्या हॉस्पिटलमध्ये तरुण रुग्णांची संख्या का वाढत आहे, यावर या सर्व्हेक्षणामुळे जोरदार प्रकाश पडला आहे.

डॉ. मगरे यांची मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी नियुक्ती

E-mail Print PDF
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी किर्ती कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू मगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज डॉ. मगरेंच्या नियुक्तीचे आदेश कुलपतींनी दिले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ संजय देशमुखांच्या हकालपट्टीनंतर कुलपतींनी ही नियुक्ती केली आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी धीरेन पटेल यांची ऑगस्टमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. धीरेन पटेल हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान महाविद्यालय म्हणजेच व्हीजेटीआयचे संचालक आहेत. आता व्हीजेटीआयची धुरा सांभाळताना त्यांना मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदाची जबाबदारी सांभाळावी लागत होती. अडीच वर्षांपासून मुंबई विद्यापीठाचं प्र-कुलगुरूपद रिक्त असल्यामुळं प्रशासनावर जोरदार टीका होत होती.
वारंवार डेडलाईन देऊनही निकाल वेळेवर न लावल्याने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ही कारवाई केली.
मुंबई विद्यापीठाचा निकाल लावण्यासाठी झालेली दिरंगाई ही गंभीर विषय बनला होता. संजय देशमुख यांची हकालपट्टी केली जाईल, अशी यापूर्वीही चर्चा होती. मात्र अखेर राज्यपालांनी त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे.
संजय देशमुख यांना यापूर्वीच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. तेव्हाच त्यांची हकालपट्टी केली जाईल, असा अंदाज लावला जात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्यपाल यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतही या विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर चर्चा झाली होती. मुंबई विद्यापीठाने निकालासाठी तीन ते चार वेळा डेडलाईन दिली होती. मात्र तरीही निकाल लावण्यात विद्यापीठ प्रशासनाला अपयश आलं. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.

उध्दव ठाकरे यांनी शरद पवारांची निवासस्थानी भेट घेतल्याने नव्या चर्चेला सुरुवात

E-mail Print PDF
मुंबई - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या आधी उद्धव यांनी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याच्या बातम्या प्रसृत झाल्या आहेत. नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुखांनी पवारांची भेट घेतल्यामुळे या भेटीची चर्चा सुरू झाली आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी पदाधिकार्‌यांच्या  बैठकीच्या अखेरच्या दिवशी पवार-उद्धव भेटीची बातमी वृत्तवाहिन्यांनी दिली. पवार यांनीही या भेटीला दुजोरा दिला.
शिवसेनेने सरकारमध्ये सामील झाल्यापासूनच भाजपवर टीका करायला सुरुवात केली होती. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सेनेच्या टीकेची धार अधिकच तीव्र झाली आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडून भाजपविरोधात आघाडी उघडणार असल्याचे बोलले जात असतानाच उद्धव-पवार भेट झाल्याने राजकीय अंदाजांना ऊत आला आहे.  कर्जत येथे बोलताना पवारांनी उद्धव यांची सत्तेत राहण्याची मानसिकता नसल्याचे सांगितले.
शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी काय करणार? असे उद्धव यांनी पवारांनाच विचारल्याचे समजते. पवारांनी तुम्ही बाहेर पडा, मग पाहू, असे उत्तर उद्धव यांना दिल्याचे समजते. यावेळी शिवसेनेचा एक बडा नेता उपस्थित होता, तसेच पवारांचाही एक सहकारी उपस्थित होता, असे समजते. शरद पवार यांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली होती. त्याहीवेळी शिवसेनेच्या पवित्र्यासंदर्भात उभयतांत चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. उद्धव-पवार भेटीबद्दल सेना नेते संजय राऊत यांनी मौन पाळले आहे. ज्यांची भेट झाल्याचे बोलले जाते त्यांनाच विचारा, तेच काय ते सांगू शकतील, इतकेच काय ते राऊत या संदर्भात बोलू शकले.

मुंबईत ११ वर्षांनंतर होणार सर्कस

E-mail Print PDF
मुंबई - मुंबई शहरात ११ वर्षांनंतर पुन्हा सर्कस होणार आहे. दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदान सर्कससाठी देण्यास महसूल विभागाने सोमवारी (ता. ६) परवानगी दिली. हे मैदान ओव्हल ट्रस्टकडून महसूल विभागाने पुन्हा ताब्यात घेतले आहे.
राज्य सरकारने क्रॉस मैदान डागडुजी आणि देखभालीसाठी ओव्हल ट्रस्टकडे सोपविल्यानंतर तेथे सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई करण्यात आली होती. याविरोधात वेस्टर्न इंडिया सर्कस असोसिएशनने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानुसार क्रॉस मैदानावरील होमगार्डची जागा वगळता सर्कस, प्रदर्शनांसाठी ‘रुल्स फॉर द अलॉटमेंट ऑफ प्लॉटस् ऑन क्रॉस मैदान १९८८’च्या नियमावलीनुसार देण्याचा निर्णय दिला. राज्य सरकारने या आदेशाची अंमलबजावणी करत याबाबतचा आदेश आज जारी केला. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात प्राधान्याने सर्कससाठी हे मैदान देण्यात येणार आहे; तर जानेवारीत विविध प्रदर्शनांसाठी ते देण्यात येईल.
हे मैदान सर्कस आणि इतर कार्यक्रमांसाठी द्यावे, या मागणीसाठी सर्कस असोसिएशनने अनेक वर्षे न्यायालयीन लढाई केली. राज्य सरकारकडे पाठपुरावाही केला. असोसिएशनचे अनिल तांडेल म्हणाले की, क्रॉस मैदानात १९७० पासून सर्कस होत होत्या. जिल्हाधिकार्‍यांनी हे मैदान देखभालीसाठी ट्रस्टला दिल्यानंतर त्याला कुंपण घालून ते बंद करण्यात आले. त्याच्यावर बांधकामही केले. सर्कस व प्रदर्शनांना परवानग्याही नाकारल्या. ओव्हल ट्रस्टला हे मैदान सुशोभीकरण आणि जॉगिंग ट्रॅक करण्यासाठी दिले होते; पण ट्रस्टने अटींचे उल्लंघन केले. उपनगरात बोरिवली, वांद्रे व पवई येथे सर्कस होत असल्या तरी मुंबई शहरातील सर्कसप्रेमी मात्र वंचित होते. आता मुंबई शहरात ११ वर्षांनंतर सर्कस होईल.

डॉन एजाज लकडावालाही मुंबईत परतण्याच्या तयारीत?

E-mail Print PDF
मुंबई - कुख्यात मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊदइब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर अंडरवर्ल्डमध्ये आणखी एक मोठा धमाका होण्याची तयारी सुरू झाली आहे. छोटाराजनचा खास हस्तक एजाज लकडावालायाला मुंबईत आणण्याची तयारी मुंबई पोलिसानी सुरू केली असून त्याच्या ताब्यासाठीच डी. के. राव याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
पूर्वाश्रमीचा दाऊदचा खास हस्तकअसलेल्या एजाजने दाऊदशी फारकत घेत, राजेंद्र सदाशीव निकाळजे उर्फ छोटाराजनच्या मदतीने आपली टोळी तयार केली. राजनसोबत राहून मलेशिया, केनिया, कॅनडा, स्वीत्झर्लंड आणि अरब देशांमध्ये त्यानेआपले प्रस्थ निर्माण केले. २००० साली बँकॉकमध्ये राजनवर करण्यात आलेल्या हल्ल्यावेळी एजाज त्याच्यासोबत होता. हल्ल्यातून आश्‍चर्यकारक बचावलेल्या राजनचे फोन तोच घ्यायचा, अशी माहिती गुन्हे शाखेकडून मिळते.
खंडणीसाठी धमकावल्याच्या २० पेक्षा अधिक गुन्ह्यांसह हत्या, हत्येचा प्रयत्न,धमकावणे अशा गंभीर गुन्ह्यांची जंत्रीअसलेल्या एजाज विरोधात मुंबई पोलिसांनीरेड कॉर्नर नोटीस बजावली. याच नोटिसीच्याआधारे कॅनडातील रॉयल कॅनेडीयन माऊंटेड पोलिसांनी एजाजला अटक केली. दोन्हीदेशांचा प्रत्यार्पण करार नसल्याने एजाजला सोडून देण्यात आले. छोटा राजनला ऑक्टोबर २०१५ मध्ये इंडोनेशियात अटककरत त्याला भारताच्या हवाली करण्यात आले. राजनच्या अटकेनंतर एजाज हा त्याचाविदेशातील कारभार सांभाळत आहे.
छोटा राजनपाठोपाठ एजाजलाही भारतात परतायचे असून त्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र खात्यात परतलेल्या चकमक फेम अधिकारीप्रदीप शर्मा यांनी ठाणे पोलीस दलात रुजू होताच इक्बाल कासकरला बेड्या ठोकून मुंबई पोलिसांना झटका दिला. शर्मा यांच्या कारवाईनंतर एजाजला परत आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी कारवाईचा वेग वाढविला. सायन कोळीवाड्यातील झोपू योजनेतील प्रवर्तकाला ५० लाखांच्या खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्षाने(सीआययू) छोटा राजनचा खास हस्तक रवीमल्लेश वोरा उर्फ डी. के. राव (४७) याला ११ ऑक्टोबरच्या रात्री अटक केली.
राव याच्या अटेकवरुन पोलिसांनी ही कारवाई पुढे सुरू करत एजाजला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एजाजला सिंगापूरमध्ये अटक करुन मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती मिळते. यासाठी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी केंद्रासोबत संपर्कात असून लवकरच ही कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाकडून पुन्हा उत्तरपत्रिकांची ऑनस्क्रीन तपासणी करण्याचे धाडस

E-mail Print PDF
मुंबई - ऑनस्क्रीन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळामुळे विद्यापीठ अद्याप सावरले नसताना द्वितीय सत्रच्या ४८१ परीक्षांचे निकालही ऑनस्क्रीन उत्तरपत्रिका तपासूनच जाहीर केले जाणार आहेत. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाची पुन्हा एकदा कसोटी लागणार आहे.  या परीक्षांच्या संगणकाधारीत मूल्यांकनाच्या पद्धतीत तब्बल २० ते २५ मोठे बदल केले असून यासाठी मास्टर प्लान तयार केल्याची माहिती प्रभारी
कुलगरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी खास पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुर्न घाटुळे, कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे उपस्थित होते. प्रथम सत्र २०१७ च्या परीक्षांमध्ये आढळून आलेल्या चुकामुळे मुंबई विद्यापीठ होरपळून गेले आहे. विद्यार्थ्यांना झालेला त्रास, निकालाचा गोंधळ, मूल्याकंनातील त्रुटी यामुळे ऑनलाईनला विरोध झाला तरीही या परीक्षांचे निकालही ऑनस्क्रीन उत्तरपत्रिका तपासणी करूनच जाहीर केले जाणार आहेत. कलिना कॅम्पस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले,  पुन्हा निकालांचा गोंधळ होवू नये म्हणून संगणकाधारीत मूल्यांकन पद्धतीमध्ये बदल केले आहेत. ज्या चुका मागच्या परीक्षेत झाल्या त्या पुढे होणार नाहीत याची दक्षता घेऊन  नियोजन केले आहे.

लष्कराची प्रतिमा उंचावण्यासाठी रेल्वे पुलांच्या उभारणीचं काम स्वीकारलं- लष्करप्रमुख

E-mail Print PDF
मुंबई - लोकांच्या मनात असणारी लष्कराविषयीची प्रतिमा उंचावण्यासाठी रेल्वे पुलांच्या उभारणीचे काम स्वीकारले, असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले. ‘लोकांना ज्यावेळी गरज असते, त्यावेळी लष्कर धावून येते, हा संदेश देण्यासाठी आम्ही एल्फिन्स्टन, करीरोड आणि आंबिवली येथील पूल बांधणार आहोत,’ असे रावत म्हणाले. रेल्वेच्या अखत्यारितील पूल लष्कराकडून का बांधून घेतले जात आहेत, असा सवाल करत विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर रावत यांनी लष्कराची बाजू मांडली.
‘आम्ही अनेकदा शहरी भागांमध्ये ‘नो युअर आर्मी’ नावाने कॅम्पचे आयोजन करतो. देशवासीयांच्या मनातील लष्कराबद्दलचा अभिमान आणखी वाढावा, या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरु असतात. मात्र यासोबतच जेव्हा देशातील नागरिकांना आमची गरज असते, त्यावेळी पूर्ण ताकदीने आम्हाला त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करायला आवडेल,’ असे लष्करप्रमुखांनी म्हटले. ते ‘बिझनेस स्टँडर्ड’ या वृत्तपत्राशी बोलत होते.
मुंबईत पूल बांधायला येणार्‍या जवानांच्या प्रशिक्षणात खंड पडणार नाही, असे लष्करप्रमुखांनी स्पष्ट केले. ‘लष्कराचा अभियांत्रिकी विभाग युद्ध प्रसंगात जवानांना वेगाने पुढे सरकता यावे, यासाठी अनेक भागांमध्ये पुलांची उभारणी करतो. याबद्दलचा सराव अभियांत्रिकी विभागाकडून कायम केला जातो. मुंबईत उभारले जाणारे पूल हा याच सरावाचा भाग असेल. पुण्यातील मुळा, मुठा नदीवर पूल उभारणीचा सराव करण्याऐवजी जवान हा सराव मुंबईत येऊन करतील. त्यात फार काही फरक नसेल. दोन्हीकडे कौशल्याची आवश्यकता असते. यामुळे जवानांचे कौशल्य देशवासीयांच्या कामी येईल,’ अशी भावना रावत यांनी व्यक्त केली.
सामान्य नागरिकांमध्ये जाऊन शहरांमध्ये काम केल्याचा अनुभव जवानांना निवृत्तीनंतर उपयोगी ठरेल, असे लष्करप्रमुखांनी म्हटले. ‘निवृत्तीनंतर आमच्या अधिकारी आणि जवानांना चांगली नोकरी मिळवायची असल्यास शहरांमधील पूल उभारणीचा अनुभव त्यांना फायदेशीर ठरु शकतो. काही भागांमध्ये पूल उभारणीचे वेगाने पूर्ण करायचे असल्यास रेल्वे मंत्रालय निवृत्त अधिकारी आणि जवानांच्या एक-दोन बटालियन तयार करु शकते. यामुळे रेल्वेला शिस्तबद्धपणे काम करणारे चांगले कर्मचारी मिळतील. याशिवाय कमीतकमी वेळेत रेल्वेची कामे पूर्ण होतील,’ असेही लष्करप्रमुखांनी म्हटले.

मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलणार्‍या तरुणाला अटक

E-mail Print PDF
मुंबई - चोरीच्या मोबाईलचे आयएमईआय’ क्रमांक बदलणार्‍या शाहरूख अब्दुल्ला कयूम खान या तरुणाला दक्षिण मुंबईतील मुसाफिरखाना येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना आरोपीचा मोबाईल चोरांशी संबंध असल्याचा संशय आहे.
मुसाफिरखाना येथील एका मोबाईल दुरुस्तीच्या दुकानात एक तरुण मोबाईलचे मूळ आयएमईआय’ क्रमांक संगणकातील सॉफ्टवेअरच्या मदतीने बदलतो, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) प्रवीण पडवळ यांना मिळाली होती. त्यानुसार डीबी मार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पाटील व त्यांच्या पथकाने छापा घातला. त्या वेळी शाहरूख आयएमईआय’ क्रमांक बदलत असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली.

एल्फिन्स्टनचा पूल लष्कराचे जवान बांधणार

E-mail Print PDF
मुंबई - मुंबईतील एल्फिन्स्टन पूल लष्कराकडून बांधला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह एल्फिन्स्टनला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ही घोषणा करण्यात आली. ३१ जानेवारी २०१८ पर्यंत लष्कराचे जवान एलफिन्स्टन पूल बांधणार आहेत. एल्फिन्स्टनसोबतच करीरोड आणि आंबिवलीतील पूलही लष्कराकडून उभारले जाणार आहेत.
एल्फिन्स्टनचा पूल कमीतकमी वेळात बांधला जावा, यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी रेल्वे आणि संरक्षण मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार केला होता. या पाठपुराव्याला यश आल्याचे शेलार यांनी ट्विट करुन म्हटले होते. यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आणि संरक्षण मंत्र्यांसह एलफिन्स्टन पुलाची पाहणी केली. यानंतर एल्फिन्स्टन पूल लष्कराकडून बांधला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले होते. यासोबतच शेलार यांनी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आल्याचे ट्विट शेलार यांनी केले होते. मोदी सरकारने अतिशय तत्परता दाखवल्याचेही शेलार यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते.

Page 6 of 168