Saturday, Jan 20th

Headlines:

मुंबई

दादरमध्ये ७० लाखांची लूट

E-mail Print PDF
मुंबई - दादरच्या गजबजलेल्या भागात गावठी कट्‌ट्याच्या धाकावर एका फायनान्स कंपनीची तब्बल ७० लाख रुपयांची रोख रक्कम लुटण्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. दादर येथील भादाणी ब्रदर्स फायनान्स कंपनीमध्ये दिवसभरात जमा झालेले ७० लाख रु. कंपनीच्या कर्मचार्‍यांनी दादर-नायगावला राहणारे प्रकल्प व्यवस्थापक केतन तिंबाडिया आणि धर्मेंद्र तिंबाडिया यांच्याकडे मंगळवारी पोहोचवले होते. बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास हे पैसे घेऊन कंपनीचा अकाऊंटंट अश्विन राठोड, शिपाई कल्पेश मिठबावकर आणि चालक सतीश दरजी ही रक्कम घेऊन हुंडाई मोटारीतून पुन्हा ऑफिसच्या दिशेने जात होते. नायगाव क्रॉस रोडवर एक गाडी वेगाने पुढे आली व रस्ता अडवला. त्या मोटारीतून चार जण हातात गावठी कट्टा, चॉपर आणि तलवार घेऊन उतरले व त्यांनी ’हुंडाई’च्या काचा फोडल्या. गाडीतील तिघांना काही सुचण्याच्या आतच पैशांच्या बॅगा हिसकावून लुटारूंनी पळ काढला.

मनपाच्या रुग्णालयांमध्येच उपलब्ध होणार सर्व औषधे

E-mail Print PDF
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांबाहेर सुरू असलेली मेडिकलची दुकानदारी बंद करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यासाठी रुग्णालयांतच सर्व औषधे उपलब्ध करून देण्याबरोबरच औषधांची यादी ठिकठिकाणी लावण्यात येणार आहे. सर्व पालिका रुग्णालयांत उपचारांसाठी लागणारी १५०० औषधे आणि १५०० उपकरणे यांच्या एकत्रित निविदा काढून खरेदी केली जाते. त्यासाठी पालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र अनेक वेळा रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णांना बाहेरून महागडी औषधे विकत घेण्यास सांगितले जाते. यावरून नगरसेवकांनी वेळोवेळी प्रशानसाला धारेवर धरले; मात्र भविष्यात अशी वेळ येणार नाही. कारण प्रत्येक रुग्णालयात शून्य औषधप्रणाली राबविण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले.

रिक्षा परवान्यांत आरक्षण नको! : शरद राव

E-mail Print PDF
मुंबई - राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत येत्या चार महिन्यांत आरक्षणानुसार परवाने देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाला शरद रावप्रणित ’मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन’ने मंगळवारी जोरदार विरोध केला. या धोरणाविरोधात कोर्टात जाण्याचा तसेच राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही युनियनने दिला आहे. राज्यातील शहरांसह विविध भागांत रिक्षांसाठी नवे परवाने देण्याची घोषणा सरकारने विधानसभेत सोमवारी केली. मात्र, नव्या परमिटसाठी महिला, अपंग, निवृत्त कर्मचारी, गिरणी कामगार या वर्गास आरक्षण दिले जाईल, असेही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यास ’मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन’चा विरोध असून या आरक्षणामुळे सध्याच्या साडेचार लाख बॅजधारक रिक्षाचालकांवर अन्याय होणार असल्याचे संघटनेचे पदाधिकारी शशांक राव यांचे म्हणणे आहे.

वानखेडे स्टेडियममध्ये रोज २६ हजार लि. पाण्याचा वापर

E-mail Print PDF
मुंबई - आयपीएल सामन्यांसाठी दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होण्याची भीती व्यक्त होत असताना, वानखेडे स्टेडियमला रोज फक्त २६ हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्याव्यतिरिक्त लागणारे पाणी स्टेडियम व्यवस्थापन खासगी टँकरद्वारे मागवित असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. आयपीएलचे मुंबईत वानखेडे स्टेडियमवर आठ सामने होणार आहेत. राज्यातील काही भाग दुष्काळाने होरपळत असताना या सामन्यांसाठी पाण्याची नासाडी करू नये अशी मागणी राजकीय व सामाजिक वर्तुळातून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वानखेडेला पालिकेतर्फे दररोज किती पाणीपुरवठा केला जातो, याचा तपशील सामाजिक कार्यकर्ते शरद यादव यांनी माहितीच्या अधिकाराखाली मागवला होता. पालिकेच्या ए वॉर्ड ऑफिसमार्फत वानखेडे स्टेडियमला केवळ पिण्याच्या पाण्यासाठी ८० मिमी व्यासाची जलजोडणी दिली असून रोज २५ ते २६ हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्यासाठी प्रति हजार लिटर ४० रुपये असा व्यावसायिक दर आकारला जातो. या दराप्रमाणे प्रत्येक महिन्याला साधारणतः ५० ते ५५ हजार रुपये पाणीबिल स्टेडियमला येते.

‘आदर्श’ प्रकरणातून अशोक चव्हाणांचे नाव वगळण्यास सीबीआयचा विरोध

E-mail Print PDF
मुंबई - आदर्श प्रकरणातून अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्यास सीबीआयने मुंबई हायकोर्टात सोमवारी विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री पदावर असताना चव्हाण यांनी या सोसायटीवर मेहेरनजर केली. त्याच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना फ्लॅट मिळाल्याचे सीबीआयने कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. आदर्श सोसायटी प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून नाव वगळण्याच्या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेची पुढील सुनावणी सोमवारी न्या. पी. व्ही. हरदास व न्या. ए. आर. जोशी यांच्या खंडपीठापुढे झाली. या याचिकेवरील गेल्या सुनावणीत सीबीआयला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. सोसायटीतील फ्लॅट युध्दात शौर्य गाजवलेल्यांसाठी राखून ठेवलेले असताना , या सोसायटीतील चाळीस टक्के सदस्य म्हणून सर्वसामान्य नागरिकांना सामावून घेण्याच्या सूचना चव्हाण यांनी केल्या होत्या. आदर्शप्रकरणात चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती , असे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

आयपीएलचे उत्पन्न दुष्काळग्रस्तांसाठी वापरण्याची महापौर सुनील प्रभू यांची मागणी

E-mail Print PDF
मुंबई - आयपीएलच्या मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात होणार्‍या सामन्यांतून सरकारला मिळणारे उत्पन्न दुष्काळग्रस्तांसाठी वापरावे, अशी मागणी महापौरांनी आज येथे केली. आयपीएल क्रिकेट स्पर्धा ३ तारखेपासून सुरू होणार आहे. त्यातील काही सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील स्टेडियमवर होणार आहेत. यातून राज्याला सुमारे २० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. ते सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी वापरावे, अशी मागणी महापौर सुनील प्रभू यांनी केली.

Page 168 of 168