Tuesday, Jan 23rd

Headlines:

महाराष्ट्र

मालमत्तेवरील बोजाची माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार

पुणे - मुद्रांक व नोंदणी शुल्क विभाग (आयजीआर) आपल्या वेबसाईटवर मालमत्तेवरील बोजाची माहिती उपलब्ध करुन देणार आहे. यासंदर्भातील रेकॉर्ड येत्या तीन महिन्यात स्कॅन करण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी व मुंद्राकचे आयुक्त अनिल कवडे यांनी दिली.
नोंदणी व मुंद्राक विभाग आता संपूर्ण राज्यातील महसूल विभागाचे रेकॉर्ड ऑनलाईन उपलब्ध करुन देणार आहे. येत्या तीन महिन्यात मुंबई पाठोपाठ सर्वच जिल्ह्यातील मालमत्तेचा तपशील एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.  जमिनीचे रेकॉर्ड आधीपासून उपलब्ध आहे. मात्र केवळ हे रेकॉर्ड विभागाकडेच मर्यादित होते. हे रेकॉर्ड उपलब्ध केल्यामुळे मालमत्तेवरील बोजा सहज समजणार आहे. यामुळे मालमत्ता खरेदी विक्री करताना होणारी फसवणूक टळली जाणार आहे.
विभागाने सुरुवातीला महसूल प्रकरणी ई-सर्च सुविधांचा समावेश केला होता. मात्र आता ऑनलाईन सुविधेमध्ये  न्यायालयीन खटल्यांसह कायदा व न्यायव्यवस्थेची माहिती अगदी सहजपणे उपलब्ध होणार आहे.
अनिल कवडे म्हणाले, वेबसाइट आता ई-सर्च, ई-कोर्ट सुविधा पुरविणार आहे. यामुळे पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. एका लिंकवर कागदपत्र उपलब्ध व्हाव्यात या मागाचा शासनाचा उद्देश असल्याचे कवडे यांनी सांगितले. नवीन खरेदीदाराचे रक्षण करण्याच्या योग्य दिशेने ही पहिली पायरी आहे. ज्याला खरेदीच्या वेळी मालमत्ता विवादांची जाणीव नसू शकते. त्यांनी या वेबसाईटवर पाहणी करावी असेही त्यांनी सांगितले. कर्ज घेतलेल्या व्यक्तीसह बँका, नॉन-बँकिंग फायनान्शियल कॉरपोरेशन आणि वित्तीय संस्थांची माहिती वेबसाइटवर देण्यात येणार आहे.

१ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कर्जमाफीच्या प्रक्रियेला सुरुवात : सहकारमंत्री

मुंबई - येत्या १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. कर्जमाफीसाठी उपसमितीची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक आज पार पडली. त्यानंतर देशमुख यांनी ही माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱयांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून, २२ ऑगस्टपर्यंत २२ लाख ४० हजार ९४३ शेतकऱयांची नोंदणी झाली आहे. तसेच १८ लाख ८५ हजार ४५७ शेतकऱयांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान, कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

राज्यात नोव्हेंबरमध्ये सैन्य भरती; इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नाव नोंदणीचे आवाहन

मुंबई - राष्ट्रसेवेमध्ये आदराने आणि शौर्याने सहभागी होण्यासाठी राज्यातील तरुणांना लष्करात भरती होण्याची संधी मिळणार आहे. यासाठी १ ते ११ नोव्हेंबर १०१७ या कालावधीत सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, रायगड आणि पालघर जिल्ह्यातल्या इच्छूक उमेदवारांसाठी मुंब्र्यातील अब्दुल कलाम आझाद क्रीडा मैदान येथे ही भरती प्रक्रीया होणार आहे. इच्छूक उमेदवारांनी संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असे आवाहन लष्कराकडून करण्यात आले आहे.
लष्कराचा पुणे विभाग, महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय मुख्यालय क्षेत्र आणि गोवा तसेच गुजरात उपविभाग यांच्यासाठी ही भरती केली जाणार आहे. लष्करामध्ये भरती होऊ इच्छिणार्‍यांनी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नाव नोंदणी प्रक्रिया साधारणपणे १ किंवा २ सप्टेंबर २०१७ पासून सुरू होणार असून १६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत चालू राहणार आहे. सैन्य भरती मेळाव्याची प्रक्रिया सुलभतेने पार पडावी यासाठी आधी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर १७ ऑक्टोबर २०१७ पासून भरती मेळाव्यासाठी उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्जावर नमूद केलेल्या ई-मेल पत्त्यावर प्रवेशपत्र उमेदवारांना पाठवली जाणार आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करून भरती मेळाव्याला उपस्थित राहताना ते सोबत बाळगणे आवश्यक आहे. सैन्य भरतीची प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक आहे. या मेळाव्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच सैन्यभरती पूर्णपणे मोफत आहे. मेळाव्याच्या कालावधीत दरदिवशी अंदाजे पाच ते सहा हजार उमेदवार उपस्थित राहतात. त्यामुळे होणारा गोंधळ आणि गैरसोय टाळण्यासाठी नियोजित कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.

राणे भाजपात प्रवेश करीत असतील तर स्वागतच! : महसुलमंत्री पाटील

सावंतवाडी - नारायण राणे यांचा भाजपा प्रवेशाचा मुहूर्त अद्यापि ठरलेला नाही, पण राज्याचा कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री भाजपात प्रवेश करीत असेल तर त्याचे स्वागतच आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पक्षासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याचा त्याग करण्यास तयार असल्याचे सूचक उद्गारदेखील त्यांनी काढले.
आंबोली, सावंतवाडी, कुडाळ ते खारेपाटण असा राज्य हायवेची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आले असता विश्रामगृहावर ते बोलत होते. राज्याचे बांधकाम सचिव आशीषकुमार सिंग, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता सुरेश बच्चे पाटील उपस्थित होते. या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, तालुकाध्यक्ष महेश सारंग, जिल्हा उपाध्यक्ष मनोज नाईक, नगरसेवक आनंद नेवगी आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. नारायण राणे यांच्या कथित भाजपा प्रवेशाबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, भाजपात प्रवेश करण्याबाबतच्या राणे यांच्या धोरणाबाबत मला काहीच कल्पना नाही, पण राज्याचा माजी मुख्यमंत्री भाजपात प्रवेश करीत असेल तर स्वागतच आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या स्तरावर नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत धोरण ठरेल. राणेंचा भाजपा प्रवेश आणि त्यांच्या अटींबाबत मला कल्पना नाही, असे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम खाते मला नको, असे पक्षाकडे स्पष्ट केले आहे. राणे भाजपात प्रवेश करतील आणि बांधकाम खाते त्यांना दिले तर माझी त्यावर कोणतीही तक्रार नसेल, पण भाजपाचे नेतृत्वच राणे यांच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

पुणे - राज्यातील काही भागात पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता  आहे. रविवार दि. २० रोजी कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर शनिवारी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
राज्यातील काही ठिकाणी हवेचा दाब कमी होत आहे. त्यामुळे शनिवारी विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. रविवारी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, तर सोमवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. दरम्यान, अरबी समुद्र व कोकणच्या काही भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्याच्या काही भागात, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस शुक्रवारी पडला आहे.

सदाभाऊ खोत शेतकर्‍यांसाठी नवी संघटना काढणार

कोल्हापूर - ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’तून हकालपट्टी केल्यानंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वेगळी चूल मांडणार असल्याचं जाहीर केलं आहे. येत्या दसर्‍याला सदाभाऊ नव्या पक्षाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
शेतकर्‍यांसाठी नवी संघटना काढून आयुष्यभर शेतकर्‍यांसाठी लढत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. नव्या संघटनेचं नाव मात्र सदाभाऊंनी अद्याप ठरवलेलं नाही. राज्यभरातील शेतकर्‍यांची मतं जाणून संघटनेचं नाव ठरवलं जाणार आहे. नवीन संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी नावं सुचवली असल्याचंही खोत म्हणाले.
सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता राजू शेट्टींवरही जोरदार टीकास्त्र सोडलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करताना मला चक्रव्यूहात गोवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
सदाभाऊंनी स्वाभिमानी संघटनेच्या विरोधात भूमिका घेतल्याचा आरोप करत गेल्याच आठवड्यात त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र स्वाभिमानीच्या कोट्यातलं मंत्रिपद अद्याप सदाभाऊंनी सोडलं नाही. त्यामुळे नवी संघटना स्थापन करण्यापूर्वी सदाभाऊ मंत्रिपद सोडतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. सोबतचा राज्य मंत्रिमंडळातील खांदेपालटाची जोरदार चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. अनेकांना मंत्रीपद गमवावे लागण्याची तर नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची जोरदार चर्चा आहे. मात्र अद्याप भाजपकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
फडणवीस  सरकारला दिवाळीत ३ वर्षे पूर्ण होत आहेत. लोकसभेसोबत विधानसभा झाली तर फक्त दीड वर्ष हातात आहे. अशावेळी दानवे, मेहता, सावरा, देसाईंसारख्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून मतदारांना सामोरे जाणे लज्जास्पद ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ

मुंबई - केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्य शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना तूर्तास महागाई भत्तावाढीवर समाधान मानावे लागणार आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता मंत्रालयातील सूत्राकडून व्यक्त करण्यात आली.
केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांसाठी १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्या प्रमाणात सुधारित वेतनश्रेणीनुसार त्यांना महागाई भत्तावाढ दिली जाते. राज्य कर्मचार्‍यांचीही सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी आहे; परंतु राज्य सरकारने त्यासाठी वेतन सुधारणा समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल डिसेंबरअखेपर्यंत सादर होण्याची शक्यता आहे. त्यानंतरही लगेचच त्यावर निर्णय होईलच असे नाही. त्यामुळे राज्य कर्मचार्‍यांना आणखी आठ-दहा महिने त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
केंद्राप्रमाणे राज्य कर्मचार्‍यांना जानेवारी व जुलैमध्ये महागाई भत्ता देण्यातही अलीकडे खंड पडत चालला आहे. जुलै २०१६ ची महागाई भत्त्याची वाढ देण्यात आली; परंतु त्यानंतर केंद्र सरकारने जानेवारी २०१७ मध्ये जाहीर केलेली वाढ अद्याप राज्य कर्मचार्‍यांना मिळालेली नाही. या संदर्भात कर्मचारी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर आता ही महागाई भत्तावाढ देण्याचे सरकारने ठरविले आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहीहंडी उत्सव आयोजकांचा उत्साह थंडावला; मात्र गोविंदांचा कसून सराव

मुंबई - उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीवरील नियम शिथिल केल्याने गोविंदा पथकांचा उत्साह वाढला असून ते कसून सरावालाही लागले आहेत. मात्र, आयोजक यावर्षी कशाप्रकारे नियोजन करतात याबाबत गोविंदांना उत्सुकता आहे. यंदा बरेचसे आयोजक दहीहंडी स्पर्धेऐवजी केवळ दहीहंडी उत्सव स्वरुपात साजरा करणार आहेत. त्यामध्ये सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आश्वासन आयोजकांनी दिले असून यामुळे गोविंदा पथकांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ असे वातावरण आहे. दरम्यान, आयोजकाकडून बक्षिसांबाबत स्पष्टीकरण मिळत नसल्याने गोविंदा पथकांमध्ये नाराजी आहे.
यंदा जोगेश्वरी येथे रवींद्र वायकर यांच्याकडून दहीहंडीचे आयोजन होणार नाही; तसेच, जितेंद्र आव्हाड यांचीही दहीहंडी नाही. तर ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानचे  रवींद्र फाटक म्हणाले की, गोविंदा पथकांनी सुरक्षित थर लावावेत. यंदा आम्ही स्पर्धा घेणार नाही. केवळ पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून आयोजनामध्ये गोविंदांच्या सुरक्षेचा पूर्ण विचार केला आहे. तसेच, सुरक्षेची सर्व साधने गोविंदा पथकांना पुरवण्यात येतील. थर लावण्यावर बंधने नसली तरी गोविंदांनी आपल्या सुरक्षेचा प्रथम विचार करावा, असे त्यांनी आवाहन केले. गेली तीन वर्षे जशी दहीहंडी उत्साहात साजरी केली, तशीच यंदाही साजरी होईल. पण बक्षीसे नंतर जाहीर केली जातील, अशी माहिती राम कदम यांनी दिली. याविषयी सचिन अहिर म्हणाले की, यंदा संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडीचे आयोजन होणार नसून पक्षाच्यावतीने दहीहंडी आयोजित केली आहे. पण दहीहंडी हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाईल; यंदा खेळ, स्पर्धा म्हणून आयोजन केले जाणार नाही.
तसेच, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गोविंदांच्या सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल. सेफ्टी बेल्ट, हार्नेस, मॅट या सुविधा पुरवल्या जातील. गोविंदांनी सुरक्षित थरच लावावेत. न्यायालयाचा निकाल उशीरा लागल्याने यंदा दहीहंडी उत्सव भव्य-दिव्य नसेल, असेही त्यांनी सांगितले.

Page 8 of 153