Tuesday, Jan 23rd

Headlines:

महाराष्ट्र

मुसळधार पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ

मुंबई - राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने मुंबई, ठाण्यासह प्रमुख शहरांतील पाण्याची चिंता मिटली आहे. राज्यातील बहुतांश धरणे पूर्ण भरल्याने त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू  करण्यात आला असून त्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना, खडकवासला, उजनी आदी धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू  करण्यात आला आहे. विदर्भातील धरणांत मात्र म्हणावा तसा पाणीसाठा झालेला नाही. अमरावतीत ३२ तर नागपूर विभागात ४१ टक्के पाणीसाठा आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्‌या धरणक्षेत्रात चांगलाच पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोडक सागर धरण पूर्णपणे भरले असून, त्यामध्ये १२८.९३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. तानसा धरणदेखील जवळपास पूर्णपणे भरले आहे. सध्या तानसा धरणात १४४.५९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. भातसा धरण क्षेत्रात ९८.६९ टक्के म्हणजेच ९२९.७७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. ठाणे आणि कल्याणला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्ण भरले आहे.
मुंबई लगतच्या वसई, विरार, मिरारोड आणि भाईंदरचीही पाण्याची चिंता मिटली असून या महापालिकांसाठी महत्वाचे असलेले पालघर जिल्ह्यातीलो धामणी धरणदेखील १०० टक्के भरले आहे. धामणी धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी आणि कवडास धरण मिळून एकूण १८,८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत केला जात आहे. कडसा बंधरा धरण पूर्ण भरले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरण ९९ टक्के भरले आहे.

मुंबई, कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर काम

औरंगाबाद - मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असताना कोकण किनारपट्टीवरही पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या तुफान पाऊस सुरु आहे. याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीतही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जबरदस्त पाऊस झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळवारी सकाळपासूनच पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे माणगाव खोर्‍यातील २७ गावांचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यातील पावसाचा जोर अद्याप कायम आहे. याशिवाय रायगड आणि रत्नागिरीतही पावसाची संततधार सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात कालपासूनच जोरदार पाऊस बरसतो आहे. दापोलीतील पाजच्या समुद्र किनारी काही बोटी बुडाल्याची घटना घडलीदेखील काल घडली आहे.
पुण्यातही काल दिवसभर मुसळधार पाऊस झाला. मात्र आज पावसाचा जोर ओसरला आहे. काल झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणातून २३ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीतही जोरदार पाऊस झाला आहे. कोल्हापुरात तुफान पाऊस झाल्याने राधानगरी धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले. त्यामधून १२ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सातार्‍यावरही वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. त्यामुळे पाचगणी, महाबळेश्वर, कोयना परिसरात दमदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा दीड टीएमसीने वाढला आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करणार : मुख्यमंत्री

औरंगाबाद - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. याबाबत मराठवाडयात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी रविवारी सांगितले. मात्र, हा विस्तार केव्हा होणार याबाबत मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्तार काही दिवसांपूर्वी केला. यामध्ये काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आला तर काही मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्यात आले. तसेच नव्या चेहऱयांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत चर्चा सुरु होत्या. यावर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ लवकरच होणार असल्याचे संकेत दिले. या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱयांना संधी मिळणार का ? यावर स्मितहास्य करत विस्तार होणार हे नक्की असल्याचे ते म्हणाले.

स्वस्त धान्य दुकानांतून आता गरीबांना साखर बंद

मुंबई - केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने राज्यातील दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) सुमारे ४५ लाख कुटुंबांना रास्तभाव दुकानांतून मिळणारी साखर बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. आता फक्त अंत्योदय योजनेतील गरिबातील गरीब कुटुंबांना साखर मिळणार आहे. मात्र त्याचाही दर पाच रुपयांनी वाढविण्यात आला आहे. साखरेचा कोटा कमी केल्यामुळे या योजेनीतील कुटुंबांना महिन्याला फक्त एकच किलो साखर मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून बीपीएल व अंत्योदय कुटुंबांना स्वस्त दरात साखर वितरित करण्यासाठी अनुदान मिळत होते, परंतु केंद्राने आता फक्त अंत्योदय योजनेतील कुटुंबांनाच अनुदान दिले जाईल, असे राज्य सरकारला कळविले. केंद्र सरकारने अनुदान बंद केल्याने त्याचा ४५ लाख बीपीएल कुटुंबांना फटका बसला आहे. त्यांना रास्तभाव दुकानांतून आता साखर मिळणार नाही.
अंत्योदय योजनेतील कुटुंबांची साखरही महागली आहे. त्यांना आता प्रति किलो १५ रुपयांऐवजी २० रुपये मोजावे लागणार आहेत. खुल्या बाजारात सध्या साखरेचे भाव ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो आहेत. त्यामुळे गरीब कुटुंबांना २० रुपये दराने साखर खरेदी करणे परवडणारे नाही. दुसरे असे की, पूर्वी दरमहा माणशी ५०० ग्रॅम साखर मिळत होती. त्यातही कपात करण्यात आली आहे. आता एका कुटुंबाला एका महिन्याला फक्त एक किलो साखर दिली जाणार आहे. म्हणजे पूर्वी एका महिन्याला एका कुटुंबाला किमान दोन ते अडीच किलो साखर उपलब्ध व्हायची, ती आता फक्त एकच किलो मिळणार आहे. दसरा, दिवाळी अशा मोठया सणाच्या तोंडावरच गरिबांची साखर बंद करण्याचा व दर वाढविण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
साखरेवरील अनुदान कमी करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने १२ मे २०१७ रोजी राज्य सरकारला पत्र पाठवून कळविले होते. त्यानुसार १४ जून २०१७ रोजी राज्य सरकारने बीपीएल व अंत्योदय कुटुंबांना रास्तभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार्‍या साखरेबाबत निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रिमंडळ समितीने घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे रास्तभाव दुकानांमधून फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच साखर देण्याचा शुक्रवारी आदेश काढण्यात आला आहे.

आयकर विभागाचे छापे; कांद्याचे दर ३५ टक्क्यांनी घसरले

नाशिक - नाशिकमधील कांदा व्यापार्‍यांची घरे आणि गोदामांवर गुरुवारी सकाळी आयकर विभागाने छापे मारल्यानंतर घाऊक बाजारात कांद्याचे दर तब्बल ३५ टक्क्‌यांनी घसरले. आयकर विभागाने नाशिक जिल्ह्यातील सात व्यापार्‍यांची घरे, कार्यालये आणि गोदामांवर छापे मारले होते. या छापेमारीमुळे घाऊक बाजारातील कांद्याचे दर घसरले.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक बाजारात कांद्याचे दर ३५ टक्क्‌यांनी घसरले. बुधवारी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल १४०० रुपये होता. तो दुसर्‍या दिवशी सरासरी ९०० रुपयांपर्यंत पोहोचला. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये तर कमाल १३३१ रुपये भाव मिळाला. नाशिकमधील सात कांदा व्यापार्‍यांच्या घरांवर आयकर विभागाने छापे मारले. त्यांची घरे, कार्यालये आणि गोदामांची झाडाझडती घेतली. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापार बाजारात एकच खळबळ उडाली. त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला. घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरले, अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सूत्रांनी दिली. घाऊक बाजारातील कांद्याचे दर घसरल्याने शेतकर्‍यांनी कमी किंमतीत उत्पादित माल विकण्यास नकार दिला. त्यामुळे लिलाव बंद पडला.
दरम्यान, कांद्याचा साठा करून पैसे कमावल्याच्या संशयावरून आयकर विभागाने नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापार्‍यांवर छापे मारल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पिंपळगाव, लासलगाव, सटाणा, कळवण, उमराणा, येवला, चांदवड येथील कांदा व्यापार्‍यांवर आयकर विभागाने ही कारवाई केली. त्यांची कार्यालये आणि गोदामांची झाडाझडती घेण्यात आली. महिनाभरातील कांद्याच्या खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे. व्यापार्‍यांच्या कार्यालयांतील महत्त्वाची कागदपत्रे अधिकार्‍यांनी जप्त केली आहेत. तसेच कांदा साठवणुकीची माहितीही घेतली जात आहे.

कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ, २० दुचाकी, ८ चारचाकी गाड्या वाहून गेल्या

कोल्हापूर - कोल्हापूर शहरात काल रात्री मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. रात्री साडेबारा वाजता पडलेल्या मुसळधार पावसामुळं उपनगरातील अनेक वाहने जयंती नाल्यात वाहून गेली आहेत. तर पाऊस आणि नाल्याचं पाणी घरात घुसल्यामुळं ४०हून अधिक कुटुबांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने सर्वांचीच दाणादाण उडाली. पावसाचा जोर रात्री १ वाजल्यानंतर वाढल्याने, शहरातून जाणार्‍या जयंती नाल्याचं पाणी रस्त्यावर येण्यास सुरवात झाली. रस्त्यावर ८ फूट पाणी आल्याने ८ चारचाकी, २० हून अधिक दुचाकी, तर ३ रिक्षा वाहून गेल्या आहेत.
रामानंद नगर, जरगनगर, रेणूका मंदिर परिसर, शास्त्रीनगर या परिसरातील नाल्यामधील पाणी अनेक घरांमध्ये घुसल्याने, या परिसरातील नागरिकांना स्थानिक नागरिकांनी सुखरुप बाहेर काढलं. अनेकांचे प्रापंचिक साहित्य वाहून गेलं. या परिसरात असणार्‍या अनेक अपार्टमेन्टच्या बेसमेंटमध्ये पाणी घुसल्याने असंख्या गाड्या पाण्यात बुडाल्या.
आज सकाळपासून महापालिक आणि अग्नीशमन दलाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी जाऊन वाहून गेलेल्या गाड्याचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.

गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंदी : रामदास कदम

मुंबई - गुढीपाडव्यानंतर संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक कॅरीबॅगवर बंद घालण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी याबाबत माहिती दिली. प्लॅस्टिक कॅरीबॅग बंदी संदर्भात मंत्रालयातएका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी प्रधान सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाचे सदस्य सचिव पी. एन. अनबलगन हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्लॅस्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणून कोणत्या प्रकारच्या पर्यावरणपूरक पिशव्या बाजारात वापरता येतील, याबाबत अनेक संस्थाकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. शिवाय महिला बचत गटांना अनुदान देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्याचाही सरकारचा प्रस्ताव आहे.
महिला बचत गटांना यासाठी सबसिडी देण्यात येणार आहे. टप्प्याटप्याने राज्यातील महानगरपालिकांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांनाही प्लॅस्टिकवर बंदी घालण्याबाबत सांगण्यात येणार आहे. तर पालकमंत्र्यांना नाविन्यपूर्ण योजनेसाठी दिलेल्या निधीतून काही निधी पर्यावरणपूरक गोष्टीसाठी खर्च करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असं रामदास कदम यांनी सांगितलं.

राज्यात तात्पुरत्या भारनियमनास सुरुवात

कोल्हापूर - वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या पुरवठ्यात अडचणी येत असल्यामुळे राज्यात तात्पुरते भारनियमन करण्यात येत आहे. हे भारनियमन विजेची जादा हानी असलेल्या ई, एफ, जी या गटांतील वाहिन्यांवर गरजेनुसार केले जात आहे.
विजेची उपलब्धता वाढविण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करत असून, लघु निविदेद्वारे खुल्या बाजारातून ३९५ मे.वॅ. वीज खरेदी केली आहे. ती वीज एक ते दोन दिवसात उपलब्ध होईल. तसेच पॉवर एक्स्चेंजमधूनही वीज खरेदीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सांगण्यात आली.

शिवसेना आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी बोलावली बैठक

मुंबई - शिवसेना पक्षातील अंतर्गत वाद टाळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता सरसावले आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार पक्षात नाराज असल्याची चर्चा लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी आमदारांची नाराजी जाणून घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचं समजतं आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांची १८ सप्टेंबरला बैठक बोलावली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे. पक्षामध्ये काही आमदार नाराज असल्याने भविष्यात आमदारांची फाटाफूट होऊ शकते, तसं होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे पावलं उचलत असल्याचं समजतं आहे.
शनिवारी चेंबूर अणुशक्ती नगर येथील शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. शिवसेना आज राज्यात, केंद्रात आणि महापालिकेत सत्तेमध्ये आहे. पण सत्तेत राहूनही कामं होत नसतील तर, निश्चितच दु:ख होतं, अशा शब्दात तुकाराम काते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.  
शिवसेनेच्या मंत्र्यांकडून कामं होत नाहीत. मी आज शिवसेनेमध्ये नाराज आहे, अशी स्पष्ट कबुलीच त्यांनी दिली. मी पक्षावर नाराज असलो तरी, शिवसेना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं. मी भाजपामध्ये जाणार असल्याच्या वावडया उठवल्या जात आहेत. पण मी शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही.
नारायण राणेंनी मला संपवण्याची धमकी दिली तेव्हाही मी शिवसेना सोडली नव्हती. सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कठिण काळात मला मदत केली. त्यांनी मला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेशाची ऑफर दिली होती. पद देण्याचा शब्द दिला होता पण त्यावेळी सुद्धा मी शिवसेना सोडली नाही असं तुकाराम काते यांनी सांगितलं.

Page 6 of 153