Tuesday, Jan 23rd

Headlines:

महाराष्ट्र

किटकनाशक फवारणीची विषबाधा होऊन १९ शेतकर्‍यांचा मृत्यू

यवतमाळ - कीटकनाशक फवारणीने विषबाधा होऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या एका शेतक र्‍याच्या मेंदूवर विपरीत परिणाम झाला असून तो वेड लागल्यासारखा वागू लागला. वेडाच्या झटक्यात त्याने दुसर्‍या माळ्यावरून त्याने खाली उडी घेतली. या घटनेने रुग्णालयात खळबळ निर्माण झाली. मंगळवारी आणखी एका शेतक र्‍याचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून बळींची संख्या १९ झाली आहे. फवारणीच्या विषबाधेने २५ शेतक र्‍यांना कायमचा दृष्टिदोष निर्माण झाला आहे. तर ७५०  च्यावर शेतकरी उपचार घेत आहेत.
दिग्रस तालुक्यातील वडगाव येथील इंदल राठोड असे या शेतक र्‍याचे नाव असून त्याने शेतातील बीटी कपाशीवर आलेल्या बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी अतिजहाल विषारी कीटकनाशक फवारले होते. लगेच त्याला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे तो वेडयासारखा वागू लागला. तो कुणालाही आवरण्याच्या स्थितीत नव्हता, त्याला एका खाटेवर बांधण्यात आले. झोपेचे इंजक्शन देऊन सलाईन लावण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या महाविद्यालयात रोज  ३० ते ३५ फवारणीने विषबाधा झालेल्या  दाखल करण्यात येत  असल्याचे यापूर्वीच महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. अशोक उईके यांनी म्हटले आहे. प्रसार वाहिन्यांचे प्रतिनिधी यवतमाळात तळ ठोकून बसले आहेत.

राज ठाकरेंचं मोदींवर पुन्हा टीकास्त्र

मुंबई - महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त मनसेप्रमुख राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढले आहे. विशेष म्हणजे या व्यंगचित्रातूनही राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान धादांत खोटे बोलतात, अशी टीका राज ठाकरे यांनी शनिवारी केली होती. त्या टीकेला धरुन राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढत मोदींना पुन्हा लक्ष्य केले. राज यांनी त्यांच्या व्यंगचित्राला ‘एकाच मातीतील दोघे,’ असे शीर्षक दिले आहे.
राज ठाकरेंनी गांधी जयंतीनिमित्त रेखाटलेल्या छायाचित्रात महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी दिसत आहेत. यामध्ये गांधींच्या हातात ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. महात्मा गांधींच्या बाजूला उभ्या असलेल्या मोदींच्या हातातही राज ठाकरेंनी एक पुस्तक दिले आहे. राज ठाकरेंनी या पुस्तकाला ‘माझे असत्याचे प्रयोग’ असे नाव दिले आहे. ‘पंतप्रधान मोदी धादांत खोटे बोलतात. इतक्या मोठ्या प्रमाणात खोटे बोलणारा पंतप्रधान मी आजपर्यंत पाहिला नाही,’ अशी टीका राज यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मोदींच्या हातात राज यांनी ‘माझे असत्याचे प्रयोग’ हे पुस्तक दिले आहे. मोदी खोटे बोलतात. त्यामुळे त्यांनी आत्मचरित्र लिहिल्यास त्याचे नाव ‘माझे असत्याचे प्रयोग’ असेल, असे राज यांना सुचवायचे आहे.

नारायण राणे यांची महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा

मुंबई - आपल्या राजकीय कारकिर्दीची इनिंग शिवसेनेतून सुरू केल्यानंतर कॉंग्रेससोबत एक तप संसार केलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर रविवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा करून नवा राजकीय सारिपाट टाकला आहे. नव्या पक्षाची घोषणा करताना शिवसेनेच्या नेतृत्वावर टीका करणार्‌या राणे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे समर्थन करत आपला राजकीय प्रवास कोणत्या दिशेने असेल, हेही स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अहमदाबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसशी काडीमोड घेतलेल्या राणे यांनी आपला पुढील राजकीय इरादा जाहीर केला होता. दिल्लीतही त्यांनी शहा यांची भेट घेतली होती; पण भाजपाकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे राणे यांनी आपल्या निवडक साथीदारांना सोबत घेऊन रविवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केली.मोदी, फडणवीस यांचे कौतुक मनसे आणि शिवसेनेला विकासाची दृष्टी नसल्यामुळे हे पक्ष बुलेट ट्रेनला विरोध करत असल्याचे सांगत राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले. आपल्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीएत) सहभागी होण्याचे निमंत्रण आल्यास त्याचाही विचार करू, असे सांगत त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा जाहीर केला.
राणे म्हणाले, अल्पसंख्याक, महिला आणि गोरगरिबांच्या हिताचे संरक्षण करण्यावर आपला पक्ष भर देईल. देऊ तो शब्द पूर्ण करू, हे आपल्या पक्षाचे ब्रीदवाक्य असेल. राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसमध्ये अशोक चव्हाण सोडून शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षात आपले मित्र आहेत. मात्र, नव्या राजकीय वाटचालीत शिवसेना हा आपला कायमस्वरूपी प्रतिस्पर्धी राहील. पक्षाच्या बांधणीसाठी लवकरच आपण काही आमदारांच्या भेटीगाठी घेणार आहोत. आपण विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पुढे ही निवडणूक लढवायची की नाही, ते ठरवू. तोपर्यंत अनेक आमदार आपल्या संपर्कात येतील. आज दुकान उघडले आहे. माल हळूहळू येईल, अशी मिश्किली राणे यांनी केली.

माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सबनीस यांना धमकीचे पत्र

पुणे - माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना धमकीचे पत्र आल्याने त्यांच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे. कार्यक्रमांच्या ठिकाणी जाताना त्यांच्याबरोबर तीन बंदूकधारी पोलीसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. यापूर्वीच एका पोलीस कर्मचार्‍याची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आली होती.
दहा-बारा दिवसांपूर्वी सबनीस यांना ’तुम्हाला पाकिस्तान दर महिन्याला ठराविक रक्कम पुरवत असल्याने तुम्ही मोघलांची बाजू मांडत आहात, हिंदू धर्माबाबत द्वेष पसरवत आहात. हे खपवून घेतले जाणार नाही.’ अशा आशयाचे निनावी पोस्टकार्ड मिळाले. त्यावर स.प. महाविद्यालयजवळील पोस्टाचा शिक्का आहे.
काही दिवसांपूर्वी सबनीस यांनी मोघलांचा इतिहास पुस्तकातून वगळला जात असून सत्य इतिहास दडपून ठेवला जात असल्याची खंत व्यक्त केली होती. याबाबत सोशल मिडियावरूनही सबनीस यांच्यावर विखारी आणि अश्लील भाषेत टिका करण्यात आली होती. याबाबत सबनीस यांनी सायबर सेलकड़े तक्रार केली होती. त्यांनंतर हे पत्र आल्याचेही त्यांनी पोलिस प्रशासनाला कळवले तसेच पत्राची प्रतही दिली. याबाबत त्यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला तसेच राज्याच्या पोलिस महासंचालकांशी सम्पर्क साधला. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

वेडा झालेला ‘विकास’ देशाला परवडेल का?: उद्धव ठाकरे

मुंबई - राहुल गांधींपाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील ‘विकासा’वरुन भाजपवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलेट ट्रेनचे स्वप्न बघत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाचे स्वप्न बघत आहेत. पण आमच्या माता भगिनींची झोप उडवून तुम्ही स्वप्न रंगवतायं. देशाला वेडा झालेला ‘विकास’ परवडेल का असा खोचक प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.
राज्यातील अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मानधनवाढ व पोषण आहारशुल्क मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी या आंदोलनात सहभागी होत उद्धव ठाकरे अंगणवाडी सेविकांना पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर तोंडसूख घेतले. आम्ही सत्तेत असलो तरी आमचे मन मेलेले नाही. मी आंदोलन बळकवायला आलेलो नाही. मी या आंदोलनाला ताकद देण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी सांगितले.
देशाचे पंतप्रधान बुलेट ट्रेनचे स्वप्न बघतात, मुख्यमंत्री समृद्धी महामार्गाचे स्वप्न बघतात. स्वप्न बघण्यात गैर काही नाही. पण आमच्या माता-भगिनींची झोप उडवून तुम्ही स्वप्न बघत आहात. अंगणवाडी सेविकांनी चुलीवर काय शिजवायचं हे आधी सांगा, असे त्यांनी सांगितले.
मी कुपोषणग्रस्त भागात गेलो असून या भागात अंगणवाडी सेविकांनी मोलाचे काम केले आहे. या सेविका म्हणजे माताच आहेत. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही हे भाजपच्या लक्षात आले. आता भाजपही शिवाजी महाराजांचे नाव घेते. पण महाराजांचे नाव घेता, मग ते मातृभक्त होते हे कसे विसरलात. तुम्ही या मातांचे शाप घेत असून हे शाप तुम्हाला भोवणार असे ठाकरे म्हणालेत.

कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजटंचाईचे संकट

मुंबई - देशभरात वीज प्रकल्पासाठी कोळशाच्या साठ्याची स्थिती सुधारली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौभाग्य योजना उद्घाटनाच्या निमित्ताने केले आहे; परंतु महाराष्ट्रात या उलट स्थिती आहे. राज्यातील सगळ्याच वीज प्रकल्पाच्या ठिकाणी कोळशाचा ठणठणाट आहे. काही वीज प्रकल्पांना अवघा अर्ध्या दिवसच कोळसा पुरेल एवढा साठा आहे. तर काही ठिकाणी सरासरी दोन दिवस पुरेल इतका कोळसा आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोळसा साठ्याची स्थिती आणखी चिंताजनक आहे. ऑक्टोबर हीटच्या विजेच्या मागणीमुळे कोळसा टंचाईत आणखी भर पडणार आहे.
कोळसा उपलब्ध नसल्याने राज्यातील १४ वीज संच बंद आहेत. त्यामध्ये सरकारी कंपनी महानिर्मिती आणि खासगी वीज संचांचाही समावेश आहे. काही संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहेत; तर काही वीज संच हे महागड्या विजेच्या कारणानेही बंद आहेत. गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या पावसामुळे राज्यातील विजेची मागणी कमी झाली. परिणामी विजेचे भारनियमन गेल्या काही दिवसांमध्ये कमी झाले आहे. पण राज्यात अपेक्षित कोळसा मात्र अजूनही मिळत नाही. कोळशाबाबतच्या नव्या धोरणामुळे वीजनिर्मिती कंपन्यांना १५ दिवसांचा कोळसा साठा करणे अपेक्षित आहे; पण महाराष्ट्रात मात्र काही वीज संचाच्या ठिकाणी अर्ध्या दिवसाचा कोळसा शिल्लक आहे.
पुरवठादार कंपन्यांकडून राज्याला ३० वॅगॉन्स कोळसा पुरवणे अपेक्षित आहे; पण राज्याला सध्या १८ ते २० वॅगॉन्स कोळसा मिळत आहे. राज्यातील सध्याची विजेची गरज १४ हजार मेगावॉट आहे; पण अल्प मुदतीच्या वीज खरेदीमुळे गेल्या काही दिवसांत भारनियमनाचे संकट टळले आहे.

शिवसेना राज्य सरकारमधून बाहेर पडणार नाही

मुंबई - दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजप सरकारमधून बाहेर पडतील, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये असली तरी तूर्तास उद्धव ठाकरे हे सीमोल्लंघन करण्याच्या तयारीत नसल्याचे समजते. सत्तेतून बाहेर पडण्यापेक्षा सत्तेत राहून सरकारवर अधिक प्रखर हल्ला चढविण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. त्यामुळे तूर्त तरी सरकारला कोणताही धोका नाही.
उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर नुकतीच पक्षाच्या आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत सरकारमधून बाहेर पडण्याचा आग्रह काहींनी धरला, तर काही आमदार, खासदारांनी या निर्णयाला विरोधदेखील केला. या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे हे सरकारचा पाठिंबा काढून घेणार असल्याची चर्चा सध्या शिवसैनिकांमध्ये आहे. शनिवारी शिवसेनेने महागाईच्या मुद्यावर केलेली आक्रमक निदर्शने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दिलेल्या घोषणा पाहता उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबाबत उत्सुकता अधिक वाढली आहे. मात्र, उद्धव ठाकरे हे सत्तेतून बाहेर पडण्याची तूर्तास घाई करणार नाहीत, असे शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांकडून समजते.
राज्य सरकारचा आणखी दोन वर्षांचा कालावधी बाकी आहे. लगेच सत्ता सोडण्यापेक्षा सत्तेत राहूनच सरकारवर टीकेची झोड उठविण्याची शिवसेनेची रणनीती आहे. महागाईच्या विरोधात शनिवारी हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणाही देण्यात आल्या. या घोषणांमुळे युतीतील संबंध आणखी ताणले गेले आहेत. मात्र, अशाच पद्धतीने सरकारला यापुढेही टार्गेट केले जाणार आहे.
यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावाही वादळी ठरू शकतो. सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा करण्यापेक्षा उद्धव ठाकरे हे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडतील. महागाई, कर्जमाफी, नोटा बंदी, बुलेट ट्रेन आदी मुद्यांवरून ते भाजपला टार्गेट करतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे फेसबुक पेजच्या माध्यमातून पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनीही पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय बोलतात, याची उत्सुकता आहे.

पंढरपूर शहराच्या विकासासाठी कॅनडा सरकार करणार आर्थिक सहाय्य

पंढरपूर - पंढरपूर शहराच्या विकासासाठी चक्क कॅनडा सरकारने आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केली आहे. कॅनडा सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परदेशी शहराच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याला तत्वतः मंजुरी देण्यात आली.
कॅनडा सरकारचे प्रतिनिधी आणि मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले, राज्य सरकार प्रशासन अधिकार्‍यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर पंढरपूर शहराचा विकास करण्याची घोषणा करण्यात आली. ३ ऑक्टोबरला काऊन्सिल जनरल ऑफ कॅनडा पंढरपुरात येणार आहेत.
या योजनेसाठी कॅनडा सरकार आणि मंदिर समिती, नगरपरिषद यांच्यात करार होणार आहे. पंढरपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कॅनडा सरकार करणार आहे. कॅनडा ट्रेड कॉर्पोरेशनच्या वतीने हे काम हाती घेतलं जाणार आहे.

राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ

मुंबई - राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांसाठी घटस्थापनेचा मुहूर्त फलदायी ठरला आहे. राज्य सरकारकडून गुरूवारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्‌यांची वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. १ जानेवारी २०१७ पासून ही पगारवाढ लागू होणार आहे. यापैकी ऑगस्टपासूनचा वाढीव महागाई भत्ता कर्मचार्‍यांना रोख स्वरूपात दिला जाईल. तर त्यापूर्वीच्या ७ महिन्यांमधील वाढीव महागाई भत्ता कर्मचार्‍यांना कशाप्रकारे द्यायचा, याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यातही राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात सात टक्क्‌यांची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी महागाई भत्ता १३२ टक्क्‌यांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता त्यामध्ये आणखी चार टक्क्‌यांची भर पडली आहे. राज्य सरकारचे तब्बल १६ लाख कर्मचारी आणि ६ लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त वेतनाधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये १ टक्क्‌याने वाढ करण्यात आली होती. ५० लाख केंद्रीय कर्मचार्‍यांना आणि ६१ लाख निवृत्त वेतनधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

Page 5 of 153