Tuesday, Jan 23rd

Headlines:

महाराष्ट्र

भाजपचे गैरव्यवहार गावोगावी पोहचवण्याचे शिवसैनिकांना आदेश

मुंबई - भाजप सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त होत असतानाच सत्तेतील भागीदार शिवसेना यापासून दूर आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांची बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. भाजपने केलेल्या गैरव्यवहारांची माहिती गावोगावी पोहचवण्याचे आदेश ठाकरे यांनी या वेळी दिले. या वेळी पदाधिकार्‍यांना एक पुस्तिकाही देण्यात आली.
पक्षबांधणीवर भर देण्याचे आदेशही ठाकरे यांनी बैठकीत पदाधिकार्‍यांना दिले. पदाची गुर्मी बाजूला ठेवून स्वत:च्या कुटुंबाप्रमाणे कार्यकर्त्याला जपा. बूथ स्तरापर्यंत गावागावात पक्षाची बांधणी करा. कोणत्याही निवडणुका कधीही येतील. त्यासाठी तयारीला लागा, असे आदेश त्यांनी दिले. भाजपच्या गैरव्यवहारांविषयीची ही पुस्तिका घेऊन गावागावात आतापासूनच प्रचार सुरू करा, असेही त्यांनी पदाधिकार्‍यांना सांगितले.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला शिवसेनेने विरोध केला आहे. त्यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर झालेली ही बैठक आणि पुस्तिका महत्त्वाची ठरते. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या शहरी भागातील आमदारांनी सत्तेतून बाहेर पडण्यास संमती दर्शवली होती. ग्रामीण भागातील आमदारांनी आताच्या परिस्थितीत निवडणुका लढवणे अवघड असल्याचे ठाकरे यांच्या लक्षात आणून दिले होती. त्यानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची चर्चा मागे पडली. आता ठाकरे यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

अरबी समुद्रातील शिवस्मारकाची उंची वाढवण्यास परवानगी

मुंबई - अरबी समुद्रात उभ्या राहणार्‍या शिवस्मारकाची उंची १९२ मीटर्स वरून २१० वर नेण्यास महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन परिषदने (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऍथोरिटी) परवानगी दिली आहे. या परवानगीमुळे शिवस्मारक जगातील सर्वांत उंच पुतळा ठरणार आहे.
चीन येथे सध्या सर्वांत उंच पुतळा असून, शिवछत्रपती आता सर्वाधिक उंचीवर विराजमान झालेले उत्तुंग नेते ठरतील. महाराष्ट्र सरकारने छत्रपतींचा पुतळा जगात सर्वांत उंच ठरावा यासाठी उंची वाढविण्याची परवानगी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाकडे मागितली होती. त्यांनी यासंदर्भात सागरी व्यवस्थापन परिषदेला काही आक्षेप आहेत काय, असे विचारले होते. त्यांनी उंची वाढविण्यास परवानगी दिली आहे. आता अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल. ८४ मीटर उंचीच्या चबुतर्‍यावर १२६ मीटर उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला जाणार आहे. एकत्रित उंचीमुळे हा पुतळा जगातील सर्वांत उंच पुतळा ठरेल. अरबी समुद्रातले शिवस्मारक पर्यावरणस्नेही असेल याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

सरकारी रुग्णांची गैरसोय रोखण्यासाठी १०४ क्रमांकाची टोल फ्री सेवा

मुंबई - प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने १०४ क्रमांकाची  टोल फ्री सेवा सुरू केली आहे. १ नोव्हेंबरपासून (बुधवार) ही सेवा राज्यभरात सुरू होत असून राज्यातील सरकारी रुग्णालयांत उपचार घेणार्‍या रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण करता येणार आहे.
सरकारी रुग्णालयात आलेल्या गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते. त्या महत्त्वाच्या वेळेत डॉक्टर उपलब्ध नसल्यास रुग्णांच्या जिवाला धोका पोहोचू शकते. अशा परिस्थितीत नातेवाईकांचीही धावपळ होते. सरकारी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने १०४ टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे.

महाराष्ट्र राज्याचा विकास दर १२.५ टक्क्यांवर!

मुंबई - कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात कृषी आणि उद्योग क्षेत्रात राज्याची पीछेहाट सुरू झाली होती. आपल्या तीन वर्षांच्या काळात या दोन्ही क्षेत्रांत केलेली प्रगती ही राज्याचा लौकिक परत मिळविणारी ठरली. तीनपैकी दोन वर्षे दुष्काळाचे भीषण संकट असतानाही राज्याने कृषी क्षेत्रात दोन आकडी विकासदर गाठला. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार देशात एकूण विदेशी गुंतवणुकीपैकी एकट्या महाराष्ट्रात ५० टक्के विदेशी गुंतवणूक आली आहे. डॉएच बँकेच्या आकडेवारीनुसार आजमितीला सर्वाधिक मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प हे महाराष्ट्रातच सुरू आहेत. त्यामुळे विविध क्षेत्रांत महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पुढील दोन वर्षांत नव्या घोषणा टाळून सुरू केलेली कामे पूर्ण करण्यावरच आपला भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी मागील तीन वर्षांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करतानाच पुढील दोन वर्षांतील कामाची दिशाही स्पष्ट केली. ते म्हणाले, आपल्या सरकारने गेल्या तीन वर्षांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यातून राज्याचा विकासदर वाढला आहे. तीनपैकी दोन वर्षांच्या काळात राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असतानाही कृषी विकासाचा दर १२.५ टक्क्यांवर नेण्यात सरकारला यश आले. मागील काही वर्षात शेती विकासाचा दर सातत्याने उणे राहिला. राज्य सरकारने शेतीमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळेच कृषी क्षेत्र पूर्वपदावर आले. सन २०१६-१७ मध्ये ५६ हजार ५७६ कोटी, तर चालू वर्षी शेतीत ७३ हजार ४४० कोटींची गुंतवणूक केली. कृषी क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. जलयुक्त शिवार योजनेतून शाश्‍वत सिंचन क्षेत्रात वाढ झाली असून ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
कृषी क्षेत्राप्रमाणेच उद्योग क्षेत्रातही राज्य प्रगतिपथावर आहे. नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात जी एकूण विदेशी गुंतवणूक आली, त्यापैकी ५० टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे. २०१६-१७ या एकाच वर्षात महाराष्ट्रात १ लाख २९ हजार कोटींची विदेशी गुंतवणूक आली. २०१३-१४ चा विचार केला, तर ही गुंतवणूक सहा पटींनी वाढली आहे. १ हजार २०८ नवीन उद्योग महाराष्ट्रात आले आहे. मोठ्या उद्योगांतून २ लाख ४० हजार नवीन रोजगार तर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतून ६९ हजार ५७७ कोटींची गुंतवणूक व २२ लाख नवीन रोजगार मिळाल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी गनिमी काव्याने सरकारविरोधात लढा देणार

औरंगाबाद - मराठा आरक्षण आणि इतर अनेक प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्रात मराठा समाजाने मूक मोर्चे काढले. लाखोंच्या संख्येने येणारे मराठा बांधव आणि त्यांचे शिस्तबद्ध मोर्चे हा सगळ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय होता. मात्र हे मोर्चे काढूनही कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळेच आता यापुढे मोर्चे नाही तर गनिमी काव्याने सरकारविरोधात लढा देऊ अशी गर्जनाच मराठा महासभेने केली.
औरंगाबाद शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात मराठा महासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आता मोर्चे बस झाले गनिमी काव्यानेच लढा द्यायचा असा निर्धार करण्यात करण्यात आला. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील पीडित तरूणीला न्याय मिळालाच पाहिजे आणि मराठा आरक्षणासह इतर मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. अशा मागण्या मोर्चाच्या वेळी करण्यात आल्या. मराठ्यांचा मूक हुंकार सगळ्या महाराष्ट्राने अनुभवला मात्र सरकारने आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही. त्याचमुळे यापुढे ‘गनिमी कावा’ हीच लढ्याची पद्धत असल्याचे जाहीर करण्यात आले.
सरकारने दिलेल्या आश्वासन पूर्तीसाठी आणखी दोन महिन्यांचा अवधी मराठा महासभेने दिला आहे. मराठा समजाने घेतलेल्या महासभेला मराठवाडा आणि इतर विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या मागण्या मान्य होणार नसतील तर मतदानावर बहिष्कार, सरकारसोबत असहकार आणि आक्रमक होणे ही त्रिसूत्री वापरा असा संदेश यावेळी देण्यात आला. ही त्रिसूत्री वापरली तरच मागण्या मान्य होतील असेही मत काहींनी मांडले.

अकार्यक्षम मंत्र्यांना वगळणार : मुख्यमंत्री

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मंत्रिमंडळातील फेरबदल अखेर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या फेरबदलात काही अकार्यक्षम मंत्र्यांना घरी पाठवून त्यांच्या जागी नव्या चेहर्‌यांना संधी दिली जाईल, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यास दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानांमुळे आता कुणाला वगळणार आणि नवे चेहरे कोण, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चांना दुजोरा देताना काही जणांना वगळले जाईल, अशी माहिती दिली. मंत्र्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आला असून खराब कामगिरी असलेल्या मंत्र्यांबद्दलचा निर्णय दिल्लीतूनच होईल, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मात्र केवळ कामगिरी नव्हे, तर प्रादेशिक समतोलासह अन्य गोष्टींचाही फेरबदल करताना विचार केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. नुकतेच स्वाभिमान पक्षासह एनडीएमध्ये सामील झालेल्या नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असले, तरी त्यांना कोणते खाते दिले जाईल, याबद्दल काहीही सांगण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला.

यावर्षी मान्सूनचा राज्यात सर्वाधिक काळ मुक्काम

मुंबई - राज्यभर आपली कृपा दाखवल्यानंतर अखेर मान्सूनराजा परतला आहे. मात्र यंदाच्या वर्षी मान्सूनराजानं सर्वाधिक काळ महाराष्ट्र मुक्काम केला. १९ ऑक्टोबरला म्हणजेच तब्बल २३ दिवस उशीरानं मान्सूननं महाराष्ट्रातून एक्झिट घेतली आहे.
गेल्या ६ वर्षातली ही सर्वात उशीराची एक्झिट आहे. यंदा मान्सूननं राज्यभर आपली कृपादृष्टी दाखवली आणि महाराष्ट्राला ओलचिंब केला. यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. तब्बल ९ वर्षांनंतर जायकवाडी धरण १०० टक्के भरलं. तर दुष्काळी मराठवाड्यातलीही सगळी धरणं भरली आहेत. त्यामुळं मान्सूनचा हा लांबलेला मुक्काम महाराष्ट्राच्या फायद्याचाच ठरला असं म्हणावं लागेल.

बक्कळ पैशांवर भाजपचे फुटकळ राजकारण : शिवसेना

मुंबई - मुंबई महापालिकेतील फोडाफोडीच्या राजकारणावरुन तक्रार करणार्‍या भाजपवर शिवसेनेने पलटवार केला आहे. बक्कळ पैशांवर फुटकळ राजकारण करणार्‍यांना शिवसेनेचा काटा टोचत असून त्यांनी सेनेवर कितीही तीर सोडले तरी ते त्यांच्यावरच उलटतील, अशा शब्दात शिवसेनेने भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून शिवसेनेने पाच कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडले, असा आरोप मनसे आणि भाजपने केला. दोन्ही पक्षांनी याप्रकरणी तक्रार देखील दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ च्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले. शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी, महाराष्ट्रवादी पक्षाचा काटा भाजपला सलत असून सेनेला बदनाम करण्यासाठीच ते तीर सोडत असले तरी ते त्यांच्यावर उलटतील. शिवसेनेचे बळ वाढल्याचे दुःख कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांना झाले नाही, पण बक्कळ पैसेवाल्यांना ते झाले, असे सांगत सेनेने भाजपला चिमटा काढला. आमच्याविरोधात तक्रारी केल्या तरी मुंबईवर मराठी अस्मितेचा भगवा झेंडा फडकतच राहणार, असेही अग्रलेखात म्हटले आहे.
राजकारण साधूसंतांचे राहिले नसून एकमेकांवर पाय देऊनच राजकारणात टिकाव धरावा लागतो. पण शिवसेनेने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण केलेले नाही असेही अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आले. मनसेचे नगरसेवक भाजपतील महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात शिवसेनेच्या झेंड्याखाली एकवटले असून हे फोडाफोडीचे राजकारण नाही, असा दावा शिवसेनेने केला आहे. पैशांसाठी नगरसेवक शिवसेनेत आल्याचा आरोप म्हणजे मराठी अस्मितेचा अपमान असल्याचे सेनेने म्हटले आहे. सध्या राजकारणात एकाच पक्षाकडे पैसा असून त्याच पैशांचा वापर करुन शिवसेनेचे पाय खेचण्याचे प्रयत्न सुरु असून याविरोधात एकही भामटा ‘ईडी’कडे तक्रार करत नाही, याकडेही शिवसेनेने लक्ष वेधले.

एसटी कर्मचार्‍यांचा संप आज मिटणार?

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या संपात मध्यस्थी केली आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप आज मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा आज चौथा दिवस आहे. ऐन दिवाळीच्या दिवसांमध्ये सुरु असलेल्या संपामुळे राज्यभरात प्रवाशांचे हाल सुरु आहेत.
एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल (गुरुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांकडून आज संप मागे घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा संप मिटल्यावर एसटी संघटनांचे कर्मचारी तसेच नेते मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेणार असल्याचे समजते आहे. याशिवाय संघटनांचे कर्मचारी ‘मातोश्री’ बंगल्यावर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावरुन सरकारला धारेवर धरले होते. माता-भगिनींचे मानधन वाढवा, अशी मागणी त्यावेळी ठाकरेंनी केली होती. त्यामुळे माता-भगिनींसाठी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका करणारे उद्धव ठाकरे एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबद्दल गप्प का, असा प्रश्न निर्माण झाला होता. परिवहन खाते शिवसेनेकडे असल्याने उद्धव ठाकरे शांत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर काल उद्धव ठाकरेंनी संपाबद्दल मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांशी संवाद साधत मध्यस्थी केली.

Page 3 of 153