Wednesday, Feb 21st

Headlines:

महाराष्ट्र

संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंविरोधात गुन्हा दाखल

मुंबई- संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटेंविरोधात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

देशभरातील डॉक्टरांनी पुकारलेल्या संप मागे

मुंबई : सकाळपासून देशभरातील डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे बंद असलेल्या खाजगी रुग्णालयांतील सेवा तात्काळ सुरु करण्याचे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशन केले आहे. मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया बरखास्त करुन त्याजागी नॅशनल मेडिकल कमिशन आणण्यासंबंधी विधेयकावर लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. आज देशातील डॉक्टर संघटनांनी याचाच निषेध करण्यासाठी बारा तासांचा बंद पुकारला होता. हा संप मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नियोजित होता. पण दुपारी तीनच्या सुमारास हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर खाजगी रुग्णालयातील बंद असलेल्या सेवा त्वरित सुरु करण्याचे आवाहन आयएमएकडून सर्व खाजगी रुग्णालयांना करण्यात आले. मुंबई आणि ठाण्यातील डॉक्टरांनी काळा दिवस पाळला. ठाणे जिल्ह्यातील सुमारे ६०० पेक्षा जास्त डॉक्टर संपावर गेले. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत आपत्कालीन व्यवस्था सुरु राहण्याची खबरदारी डॉक्टर घेणार होते.

गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार

पुणे :गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचे भाकित भाजपचेच खासदार संजय काकडे यांनी वर्तवले आहे. कारण यापूर्वी संजय काकडे यांनी पुणे महापालिकामध्ये वर्तवलेले भाकित शंभर टक्के खरे ठरले होते. संजय काकडे म्हणाले, भाजपला गुजरातमध्ये बहुमत मिळणार नाही, काँग्रेसच सरकार बनवेल, तिथे २२ वर्षांच्या सत्तेमुळे भाजपच्या विरोधात अॅन्टीइन्कबन्सी तयार झाली होती. काँग्रेससोबत मुस्लिम, पाटीदार, दलित हे प्रमुख समाज गेले आहेत. आनंदीबेन, रूपानी यांनी काहीच काम न केल्यामुळे गुजरातमध्ये भाजप जिंकलेच तर तो फक्त आणि फक्त मोदींचा करिश्मा असेल, आणि नेहरू-गांधी यांच्यापेक्षा मोदी हे मोठे नेते ठरतील पण तसे होणार नाही, मी वस्तुस्थिती मांडत आहे, मी सर्वेक्षण करूनच माझा हा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात कुठेही पक्ष विरोध नाही किंवा मी पक्षावर नाराजही नाही, पण वस्तुस्थिती मांडणे म्हणजे पक्षाशी गद्दारी नाही. मोदींएवढा सक्षम नेता गुजरातमध्ये गेल्या तीन वर्षापासून मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाला मिळू शकलेला नाही. हार्दिक पटेलची ‘सेक्स सीडी’ ज्या प्रकारे आली तेही चुकीचे होते. तसेच निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारादरम्यान विकासाचा मुद्दा प्रमुख बनलाच नाही. या सर्व मुद्द्यांचा विचार करता आपण काही जणांना सर्वेक्षणासाठी पाठवले होते. निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसेल असं सर्वेक्षणातून निष्पन्न होत असल्याचे संजय काकडे म्हणाले.

नागपूर हिवाळीअधिवेशन आजपासून सुरू

नागपूर :-आजपासून येथे सुरू होणारेे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गाजण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला मिळणारा कमी भाव आणि शेतकरी आत्महत्या आणि राज्यातील खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून अधिवेशनात विरोधक आक्रमक राहतील, अशी शक्यता आहे.

सरकारी नोकरीत ३० टक्के कपात

मुंबई :-सरकारी नोकरीत ३० टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . त्यामुळे सुमारे साडेपाच लाख पदे रिकामी होणार आहेत . अधिक मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करत ३० टक्के पद संख्या कमी करुन नवे आकृतीबंध सादर करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत .

विधिमंडळ सचिवालय आजपासून सुरू होणार

नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. यानिमित्ताने प्रशासन डेरेदाखल झाले असून २ डिसेंबरपासून विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सुरू होणार आहे. तर, सोमवारपासून विधानसभा व विधानपरिषद सदस्यांकडून ऑनलाइन लक्षवेधी स्वीकारण्यात येणार आहेत. संयुक्त महाराष्ट्रात विदर्भ सामील झाला, त्यावेळी नागपूर करार करण्यात आला. या करारानुसार राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले आहे. यंदा हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अधिवेशनादरम्यान नेहमीप्रमाणे सहाशे ते सातशे कर्मचारी नागपुरात दाखल होत असतात. शुक्रवारी (१ डिसेंबर) अनेक कर्मचारी नागपुरात आले. २ डिसेंबरपासून विधिमंडळ सचिवालयाचे ग्रंथालय, प्रश्न शाखा सुरू होत आहेत. विधानसभा व विधानपरिषद सदस्यांकडून ऑनलाइन लक्षवेधी सोमवारपासून स्वीकारण्यात येतील, अशी माहिती विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी दिली.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता

मुंबई -माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नव्याने स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. पक्षाची नोंदणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र कालच प्राप्त झाले. दरम्यान, पक्षाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता पक्षाचा अधिकृत ध्वजही लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसमुक्त झाल्यानंतर राणे यांनी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केली होती. त्याचवेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष नोंदणीसाठी अर्जही सादर केला होता. पक्ष नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून आयोगाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मान्यता दिल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करताना राणे यांनी आपण लवकरच राज्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पक्ष नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याने त्यांचे राज्यव्यापी दौरे सुरू झाले नव्हते. निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी झाल्यानंतर लवकरच ध्वजही जाहीर केला जाणार असून त्यानंतर राणे आपला राज्याचा दौरा करणार आहेत. त्याचाच भाग म्हणून येत्या ८ ते १० डिसेंबर दरम्यान ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर जाणार आहेत. आता राज्यभरात दौरे, बैठका व सभा घेऊन सभासद नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

देशी दारुची दुकाने, बिअर बारला महापुरुषांचे नाव देता येणार नाही

मुंबई - राज्यातील देशी दारुची दुकाने आणि बिअर बारला महापुरुष, देवी- देवता तसेच गडकिल्ल्‌यांचे नाव देता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
मार्चमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे देशी दारु, बिअर बारला महापुरुषांचे नाव न देण्याची मागणी केली होती. राज्यातील बिअर बार, दारुचे दुकाने आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच गडकिल्यांची नावे दिल्याचे दिसते, हा महापुरुषांचा अवमान असून राज्याच्या संस्कृतीला शोभणारे हे चित्र नाही असे त्यांनी म्हटले होते. अमरसिंह पंडित यांच्या सूचनेनंतर उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामगार विभाग आणि उत्पादन शुल्क खात्यातील अधिकार्‍यांशी चर्चा केली. यानंतर कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार या समितीची गेल्या आठवड्यात बैठक झाली. बैठकीत देशी दारुची दुकाने, बिअर बार आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच देवी- देवता आणि गडकिल्ल्‌यांची नावे देता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. याबाबत कामगार विभाग कायद्यात सुधारणा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई प्रोव्हिजन ऍक्टमध्ये बदल केले जातील.
राज्यातील उत्पादन शुल्क विभागालाही याबाबत परिपत्रक जारी करण्याची सूचना देण्यात आली आहे. राज्यातील बिअर बार, देशी दारुच्या दुकानांना उत्पादनशुल्क विभागाकडून परवाना दिला जातो. त्यामुळे त्यांनाही याबाबत परिपत्रक काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपी दोषी

अहमदनगर - कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी शनिवारी दोषी ठरविले आहे.
जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५), संतोष गोरख भवाळ (वय ३०) नितीन गोपीनाथ भैलुमे (वय २६) अशी आरोपींची नावे आहेत. कट रचून मुलीवर अत्याचार करणे, तिचा खून करणे, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपींना दोषी ठरवले आहे.

Page 1 of 153

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »