Saturday, Jan 20th

Headlines:

रायगड

विमानतळबाधित १० गावांमध्ये शेवटचा गणेशोत्सव

E-mail Print PDF
पनवेल - विमानतळबाधित ‘त्या’ दहा गावांतील गणेशोत्सव यंदाचा शेवटचा गणेशोत्सव असणार आहे. कारण विमानतळ प्रकल्पासाठी ही गावे पावसाळ्यानंतर स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या गावांचे गावपण संपुष्टात येणार आहे. त्याचबरोबर तेथील पारंपरिक गोष्टी, उत्सव यालासुद्धा पूर्णविराम बसणार आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून या गावांत विविध सण एकत्रित साजरे केले जातात. त्यापैकी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण आहे. परंतु पुढच्या वर्षी या गावांत हा उत्सव होणार नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता पनवेलमधील चिंचपाडा, कोपर, कोल्ही, वाघिवली, वरचा ओवळा, वाघिवली वाडा, गणेशपुरी, उलवा, तरघर, कोंबडबुजे या गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे ही गावे स्थलांतरित केली जाणार आहेत. त्यामुळे या दहा गावांतील प्राचीन संस्कृती लोप पावणार आहे. आम्हाला विकास हवा होता; मात्र तो आमच्या मुळावर उठत असेल तर आम्हाला असा विकास नको, अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वडिलोपार्जित शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी, परंपरा, संस्कृती अशी एका झटक्यात लोप पावणार असेल तर हा कसला विकास, असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
या दहा गावांमध्ये आगरी, कोळी, कराडी समाज मोठ्या प्रमाणात आहे. येथे सर्व सण-उत्सव एकत्र येऊन साजरे केले जातात. यामध्ये दिवाळी, दसरा, चतुर्थी, सप्ताह अशा उत्सवांत गावे एकत्रित येतात. विशेषत: लग्नसमारंभावेळीदेखील हा समाज मोठ्या संख्येने येत असतो. मात्र ही गावे स्थलांतरित झाल्यानंतर सिमेंटच्या जंगलात आम्ही आमचे सण कसे साजरे करायचे? स्थलांतरित होणार्‍या ठिकाणी आम्हाला आमची परंपरा जपणे शक्य होईल का? आमचे गावपण हरवून त्याला शहरी वस्तीचा साज चढणार आहे. त्यामुळे आमच्या पारंपरिक उत्सवांना अप्रत्यक्षपणे प्रतिबंध लागणार असल्याची खंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित दहा गाव संघर्ष समितीचे नाथा पाटील यांनी व्यक्त केली. तुम्ही गाव का सोडत आहात? आपल्याला पैसे नको आहेत. आपले गावच चांगले आहे. या ठिकाणी झाडे, शेती, आपली घरे असताना आपण दुसरीकडे कशासाठी जायचे, असे प्रश्न आमची मुले व नातवंडे विचारत आहेत. अशावेळी आमच्याकडे त्यांना उत्तर देण्यासाठी काहीच शब्द नसतात.

गणपतीचे विसर्जन करताना बुडणार्‍या ७जणांना जीवरक्षकांनी वाचवले

E-mail Print PDF
श्रीवर्धन - श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील कोळीवाडा भागाच्या समुद्रकिनारी बोर्ली पंचतन येथील गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बोर्ली पंचतन येथील सात तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे किनारी उभ्या असलेल्या दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना समजले. त्यांनी तत्काळ समुद्रकिनाजयावर हजर असलेल्या जीवरक्षक प्रीतम भुसाणे व सागरी रक्षक लाया चोगले, मनोहर रघुवीर यांना सांगितले. त्यावर या तिघांनीही कोणताही विचार न करता बुडत असलेल्या सात जणांना सुखरूप बाहेर काढले. जीवरक्षक प्रीतम भुसाणे व सागरी रक्षक लाया चोगले, मनोहर रघुवीर या तिघांचेही सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
बोर्ली पंचतन येथील गणपती विसर्जन हे काही वर्षांपासून दिवेअगार कोळीवाडा भागातील समुद्रकिनारी करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन सुरक्षित पार पडल्यानंतर गुरुवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यासाठी सायंकाळी ५ नंतर बोर्ली पंचतन येथून जवळपास ५०० गणेशमूर्ती दिवेआगर समुद्रकिनारी पोहचल्या. मागील काही दिवस पावसाने कहर केल्याने समुद्रामध्ये वादळाचे वातावरण होते. गणेश विसर्जनाच्या वेळी देखील समुद्र थोडा खवळलेल्या स्थितीमध्ये होता. येथील स्थानिक मच्छीमारांच्या अंदाजानुसार समुद्र शांत झालेला नसल्याचे सांगण्यात आले. विसर्जनस्थळी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाजयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
बोर्ली पंचतन येथे गणपतीचे समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी संदेश म्हसकर, दिनेश म्हसकर, केशव गायकर, ओमकार गायकर, यशवंत गायकर, गजानन गायकर, विनोद धनावडे असे सात जण गेले. समुद्राच्या आलेल्या लाटेने त्यांना आत खेचून घेतले व त्यांची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू झाली . हे पाहून दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कृष्णा जागडे व उपस्थित काहींनी तत्काळ समुद्रकिनारी असणाजया प्रीतम भुसाणे या जीवरक्षकास व सागरी रक्षक मनोहर गोपाळ रघुवीर व लाया लखमा चोगले यांना बोलाविले. त्यांनी क्षणात आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्याचा अंदाज घेत सर्व सात जणांना सुरक्षित बाहेर काढले. संदेश म्हसकर व दिनेश म्हसकर यांना डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

फुटबॉल स्पर्धेसाठी महामार्ग पालिकेकडे?

E-mail Print PDF
नवी मुंबई - शहरात ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या १७ वर्षांखालील ‘फिफा’ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी देश विदेशातील लाखो प्रेक्षक येणार आहेत, या पाश्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावरील पंचतारांकित हॉटेल्समधील मद्यगृहे सुरू ठेवता यावीत, यासाठी शीव-पनवेल व सीबीडी-उरण या मार्गाचे आरक्षण बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नवी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेने या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून, आरक्षण बदलासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला दिल्याचे समजते.
देशातील राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावरील मद्यगृहे बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आठ महिन्यांपूर्वी दिला. त्यामुळे शीव-पनवेल महामार्ग, शीळफाटा मुंब्रा मार्ग, सीबीडी उरण आम्रमार्ग या राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील १३० मद्यगृहांना टाळे लागले आहे. राज्यात काही ठिकाणी सरकारने राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे आरक्षण रद्द (डी नोटीफिकेशन) केले आहे. ते रस्ते स्थानिक प्राधिकरणांच्या ताब्यात दिले आहेत. त्यामुळे येथील हॉटेल उद्योग अबाधित आहे. महामार्गाचे आरक्षणच बदलून टाकण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश या रस्त्यांना लागू होणार नाही. नवी मुंबईत ६ ऑक्टोबरपासून १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक होत आहे. त्यातील उपांत्य सामना नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर होणार असून सराव सामने वाशी, नेरुळ व सीबीडी येथे होणार आहेत. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या स्पर्धेच्या तयारीसाठी आढावा बैठकीवर भर दिला आहे. देश-विदेशांतील दीड ते दोन लाख प्रेक्षक नवी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांत राहणार आहेत.

शोरूमवर मध्यरात्री दरोडा, कामगारांना मारहाण करून अडीच लाखांची लूट

E-mail Print PDF
अलिबाग - पोलीस असल्याची बतावणी करीत महामार्गावरील इसाने कांबळे गावानजीक एका कपडे आणि कापडी साहित्याच्या शोरूमवर सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकून कामगारांना मारहाण करून दोन लाख ५२ हजार रुपयांची रोख रक्कम लुटून नेली. मंगळवारी मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास हा दरोडा टाकण्यात आला.
इसाने कांबळे गावानजीक सत्य महासेल बाजार हा तयार कपडे त्याचप्रमाणे चादरी, पडदे वगैरे कापडी साहित्याचे शोरूम आहे. मध्यरात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास सहा जणांचे एक टोळके या शोरूमच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीत घुसले. येथे राहणारा एक कामगार नैसर्गिक विधीसाठी बाहेर गेला असल्यामुळे खोलीचा दरवाजा उघडाच होता. आत गेल्यानंतर आम्ही पोलीस असल्याचे सांगत या टोळक्याने मॅनेजर अनिलकुमार जिंदाल, सेल्समन इतियास अब्दुल रज्जाक मुकादम आणि वॉचमन सहदेव शिंदे या तिघांना मारहाण करीत त्यांच्याजवळ असलेले २५ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्यांना घेऊन ते गोदामात असलेल्या मालकाच्या रूममध्ये गेले. मालकाच्या खोलीतील कपाटाची चावी या तिघांकडून जबरदस्तीने घेत त्यांनी या कपाटातील १ लाख १० हजार आणि १ लाख १७ हजार रुपयांची रक्कम घेत या तिघांनाही बांधून ठेवत पोबारा केला. या प्रकरणी इलियास अब्दुल रज्जाक मुकादम याने एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच रायगडचे पोलीस अधीक्षक पारसकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील, महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली.

अलिबाग तालुका राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये पदवाटपावरुन खडाजंगी

E-mail Print PDF
अलिबाग - तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये पदवाटपावरून मंगळवारी चांगलीच खडाजंगी झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ यांनी कार्यकारिणीची नावे जाहीर केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा संघटक ऋषिकांत भगत यांचे समर्थक प्रकाश थळे यांना कार्यकारिणीमध्ये स्थान न दिल्याने ते संतप्त झाले होते. मात्र भगत यांचे बंधू तथा वाडगावचे सरपंच जयेंद्र भगत यांनीच थळे यांच्या नावाला आक्षेप घेतल्याने विकोपाला गेलेला वाद काही क्षणातच मावळला.
अलिबाग तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काही नव्याने पदाधिकारी नेमायचे होेते, तर काहींना बढती मिळणार होती. मनोज धुमाळ यांनी अलिबाग तालुक्यासाठी तीन नवीन तालुकाध्यक्ष नेमले. त्यामध्ये सुनील गुरव, सचिन धुमाळ आणि दिगंबर गायकवाड यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी सरचिटणीसपदी उमेश पाटील, चिटणीसपदी संदीप ठाकूर, समीर म्हात्रे यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. अलिबाग तालुका समन्वयकपदी हेमनाथ खरसंबळे यांना पुन्हा संधी देण्यात आली, तर लवेश नाईक यांची अलिबाग तालुका संघटकपदी निवड करण्यात आली. थळ विभाग अध्यक्षपदी मनीष पाटील, मापगाव विभाग अध्यक्ष विजय कडवे, कुर्डूस मुरलीधर पाटील, चौल-रेवदंडा महेश कवळे, रामराज संतोष म्हात्रे, शहापूर जनार्दन मोकल यांची विभाग अध्यक्षपदी नेमणूक केली. चेंढरे विभाग अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता ढवळे यांचे समर्थक मनोज शिर्के यांचे नाव धुमाळ यांनी जाहीर केले. या पदावर आधी ऋषिकांत भगत यांचे समर्थक प्रकाश थळे होते. त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपवावी, अशी भगत यांची इच्छा होती. मात्र, तालुकाध्यक्षांनी जाणूनबुजून थळे यांच्या नावावर काट मारल्याची धारणा भगत यांची झाली. थळे हे सक्रि य नाहीत, त्यांनी कोणत्याही निवडणुकीत पक्षाचे काम केले नसल्याचा आक्षेप दत्ता ढवळे यांनी घेत शिर्के हे काम करतात त्यांच्या निवडीने पक्षाला फायदा होईल अशी बाजू मांडली. त्यानंतर वाद चांगलाच विकोपाला गेला. शाब्दिक चकमकीत कोणीच माघार घ्यायला तयार नव्हते. त्यानंतर वाडगावचे सरपंच तथा जिल्हा संघटक ऋ षिकांत भगत यांचे बंधू जयेंद्र भगत यांनी थळे यांच्याच नावाला आक्षेप घेतला. थळे हे पक्ष विरोधी कारवाया करीत असल्याचे बैठकीत सांगितले.

नेरळ गावच्या अडीच कोटीच्या बायपास रस्त्याचे डांबर गेले वाहून

E-mail Print PDF
कर्जत - नेरळ विकास प्राधिकरणामधून नेरळ गावाला बायपास ठरेल अशा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. दोन साकव आणि दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी साडेचार कोटींचा निधी खर्च करण्यात आला होता. या रस्त्याची अवस्था पाहून पहिल्याच पावसात रस्त्यावर केलेला खर्च पाण्यात गेला असल्याचे दिसून येत आहे.
नेरळ, ममदापूर आणि कोल्हारे या तीन ग्रामपंचायतींचा मिळून नेरळ विकास प्राधिकरण निर्माण झाला आहे. या प्राधिकरण हद्दीतील नागरी विकासाला महत्त्वपूर्ण ठरणार म्हणून जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी पुढाकार घेऊन कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील पेशवाई रस्ता कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याला जोडण्यासाठी निधी मंजूर केला. दोन साकव आणि दोन किलोमीटर लांबीच्या अंतराचा रस्ता तयार करण्यासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यातून कल्याण-कर्जत रस्त्याने दामत रेल्वे गेट आणि पुढे पेशवाई रस्त्याने नेरळ-कळंब जिल्हा मार्ग रस्त्यावरील साई मंदिर असे दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण नेरळ विकास प्राधिकरणाने मंजूर केलेल्या निधीतून करण्यात आले. त्यातील साईमंदिर ते दामत नाला हा रस्ता मे २०१६ मध्ये डांबरीकरण करण्यात आला होता. तर डिसेंबर २०१७ मध्ये दामत गेट आणि पुढे कल्याण रस्त्यापर्यंत डांबरीकरण पूर्ण करण्यात आले होते. या डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर मार्च २०१७ मध्ये कार्पेट डांबरीकरण केले होते.
या रस्त्याची अवस्था दोन महिन्यात कोसळलेल्या पावसाने फार बिकट करून ठेवली आहे. या रस्त्यावर कर्जत-कल्याण रोड ते दामत रेल्वे गेट या रस्त्यात तर अगणित मोठे खड्डे आहेत. बायपास रस्ता असल्याने वाहनचालक गाडी घुसवतात, परंतु रस्त्यावर स्वागत करणारा खड्डा एवढा मोठा आहे की तेथून गाडी पुढे नेताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. तर पुढे पहिल्या साकव पुलापर्यंत खड्डेच स्वागत करीत असतात. त्या रस्त्यातील जुन्या झालेल्या साई मंदिरपासून पहिल्या पुलापर्यंत देखील खड्डे चुकविताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे दोन कोटी खर्चून डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याची अवस्था अशी होणार असेल तर जनतेने कशी सहनशीलता दाखवायची?असा प्रश्न आहे. दुसरीकडे अडीच कोटी खर्चून दोन पूल बांधले आहेत. त्या पुलावर टाकलेले डांबर कधीच वाहून गेले असून पुलासाठी टाकलेल्या स्लॅबचे सिमेंट देखील बाहेर पडू लागले आहे. दोन्ही पुलावर पडलेले खड्डे पाहिले की नेरळ प्राधिकरणाने केलेला खर्च हा बिनकामाचा ठरत आहे.

रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस; बारापाडा गावात डोंगर खचला

E-mail Print PDF
पनवेल  - अनेक दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने शनिवारी रायगड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बारापाडा गावात डोंगर खचल्याने घराचे मोठे नुकसान झाले.
गावातील अनेक घरांना डोंगर खचण्याच्या प्रकारामुळे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे माळीणसारखी घटना पनवेल तालुक्यातील डोलघरमध्येही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुक्र वारी मध्यरात्री ३ वाजल्यापासून सुरू झालेला पावसाचा वेग शनिवारीही कायम होता. त्यामुळे बारपाडा गावात पाणी घुसले.
दुपारनंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली. येथील रहिवासी महादेव म्हात्रे यांच्या घरात मातीमिश्रीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. घरातील सदस्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, घराजवळील डोंगराचा काही भाग खचल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर गावकजयांच्या मदतीने घरातील सामान सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ही घटना दिवसा घडल्याने म्हात्रे कुटुंबीयांना त्वरित मदत मिळाली.
घटनेची माहिती मिळताच, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सर्कल व तलाठी यांना घटनास्थळी पाठविले. या वेळी परिस्थिती नियंत्रणात आली होती. बारापाडा गावची लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास आहे. गावात आग्रीपाडा या ठिकाणी ही घटना घडली असून, गावात एकूण २५० घरे आहेत. विशेष म्हणजे, यापैकी जवळ जवळ ३० ते ४० घरांना अशाप्रकारे डोंगर खचण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे डोलघर-बारापाडा गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क रात्रीपासून तुटला होता. डोलघर गाव उंचीवर असल्याने त्या गावात पुराचे पाणी शिरले नसले तरी बारापाडा, आग्रीपाडा गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. गावातील अनेक घरांत पाणी साचल्याने धान्य तसेच अनेक वस्तूंचे नुकसान झाल्याची माहिती कर्नाळा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्य निवेदिता कानडे यांनी दिली.
मोठ्या प्रमाणात सुरू झालेली अतिवृष्टी, डोंगरमाथ्यावरून येणारे पाणी आणि समुद्राला आलेली उधाण भरतीमुळे चिरनेरला पुराचा तडाखा बसला. सुमारे ८० ते १०० नागरिकांच्या घरात शिरले. मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या पावसाने चिरनेरकरांची त्रेधा तीरपिट उडाली. पुरामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मात्र, जीवितहानी झालेली नाही. आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.

रायगडमधील चिरनेरला पावसाने झोडपले

E-mail Print PDF
अलिबाग - शुक्रवारी रात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने उरण तालुक्यातील चिरनेर गावाला झोडपले. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरल्याने घरात पाणी घुसले. गावात १८८९ नंतर पहिल्यांदा असा पाऊस झाला आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यासह नवी मुंबई, पनवेल, ठाणे परिसरात पवासाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाचा फटका हार्बर मार्गाला बसला. तर मुंबई-बेलापूर लोकल सकाळी रद्द करण्यात आली. सकाळपासूनच पनवेल,कळंबोली,कामोठे, खांदेश्वर, खारखर, बेलापूर, वाशी,नेरूळ,ऐरोलीसह इतर उपनगरांमध्ये  पावसाने दमदार हजेरी लावली. सायन-पनवेल महामार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली.

प्रदूषणकारी कंपनी बंद करण्याचा आदेश

E-mail Print PDF
पनवेल  -  कंपनीतील प्रदूषणामुळे परिसरातील मानवी वस्तीबरोबरच श्‍वान- चिमण्यांसारख्या मुक्या प्राण्यांवरही विपरीत परिणाम होण्यास कारणीभूत ठरणारी तळोजा औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) डुकॉल ऑर्गेनिक्स ऍण्ड कलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बंद करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) शुक्रवारी दिला.
एमआयडीसीतील प्रदूषणामुळे श्‍वान, तसेच चिमण्यांचे रंगही निळे झाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर एमपीसीबी’ला ही कारवाई करावी लागली. २४ तासांत या कंपनीचा वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश एमपीसीबीने दिले आहेत, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे.
आशिया खंडातील सर्वांत मोठी तळोजा औद्योगिक वसाहत प्रदूषणामुळे पोखरून निघाली आहे. या प्रदूषणाचा फटका मानवाबरोबरच मुक्या जिवांनाही बसत आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही त्याची दखल घेतली होती. या पार्श्‍वभूमीवर एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी अनिल मोहेकर यांनी आज परिसराचा दौरा केला. पाहणीदरम्यान तथ्य आढळून आल्यानंतर मोहेकर यांनी कंपनी बंद करण्याचा आदेश दिला.

Page 9 of 266