Saturday, Jan 20th

Headlines:

रायगड

धुळीमुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका

E-mail Print PDF
नवी मुंबई - नेरूळ-जेएनपीटी राष्ट्रीय महामार्गावर मातीची ने-आण करणार्‍या डम्परचालकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने दुचाकीस्वारांचे जीव धोक्यात आले आहेत. या मार्गावरून माती घेऊन जाणार्‍या डम्परवर कापडाने झाकले जात नसल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडते. ती दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जात असल्याने त्यांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन वाहतूक पोलिसांनी दिले होते; परंतु ते पाळले नसल्याने अशा डम्परचालकांचे फावले आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील उरण फाटा येथून जेएनपीटीकडे ३४८ ‘ए’ हा राष्ट्रीय महामार्ग जातो. पाम बीच मार्गावरील किल्ले गावठाण या परिसरातून हा मार्ग तरघर, उलवे, गव्हाण मार्गे जेएनपीटीकडे जात असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यात दुचाकीस्वारांचेही प्रमाण जास्त आहे. मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असून, सर्वाधिक वाहतूक डम्परची असते. महामार्गालगतच्या उलवे टेकडीवर सध्या सिडकोमार्फत विमानतळासाठी टेकडी सपाटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. सपाटीकरणाच्या कामातून निघालेली माती व दगड डम्परमधून नेली जात आहे; परंतु मातीची ने-आण करताना डम्पर कापडी अथवा प्लास्टिकने झाकले जात नसल्याने वारे आणि हादर्‍याने मोठ्या प्रमाणात धूळ उडते. ती पाठीमागून येणार्‍या दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जाते. डम्परचालकांच्या या बेदकारपणामुळे उलवे मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अशा धुळीतून वाट काढताना दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नियमानुसार मातीची डम्परमधून वाहतूक करताना ती झाकणे गरजेचे आहे; मात्र वाहतूक पोलिसांकडून अशा डम्परवर कोणतीच कारवाई करत नसल्याने माती रस्त्यावर पडते. बर्‍याचदा असे डम्पर वाहतूक पोलिसांच्या समोरून बिनधास्त जातात. त्यामुळे अपघात झाल्यावर वाहतूक विभागाला जाग येणार का, असा प्रश्‍न दुचाकीस्वार विचारत आहेत. याबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त नितीन पवार यांना विचारले असता, त्यांनी काही दिवसांतच अशा डम्परवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र ते अद्याप पाळलेले नाही.

रिक्षाला ट्रकची धडक; ४जण जखमी

E-mail Print PDF
गोरेगाव - पुढे चाललेल्या वाहनाला ओव्हरटेक करताना ट्रकची  समोरुन येणार्‍या थ्री व्हीलर रिक्षाला धडक बसून झालेल्या अपघातात रिक्षामधील चौघेजण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारच्या सुमारास माणगाव तालुक्यात घडली आहे.
तालुक्यातील मुंबई- गोवा महामार्गावरील खांडपाले येथे राहणारे थ्री  व्हीलर रिक्षाचालक मारुती विठू शिगवण हे त्यांच्या ताब्यातील रिक्षा (क्र. एमएच ०६ झेड ४०३१) ही मुंबई- गोवा हायवेने लोणेरे येथून वडपाले येथे घेऊन जात असताना खांडपाले गावच्या हद्दीत आले असता समोरुन महाड बाजूकडून येणारा ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात चौघेजण जखमी झाले.

धार्मिक स्थळांवरील कारवाई प्रकरणी खारघर बंदला चांगला प्रतिसाद

E-mail Print PDF
खारघर - खारघरमधील धार्मिक स्थळांवर सिडकोच्या अतिक्रमणविरोधी विभागाकडून सोमवारी होणार्‍या कारवाईच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी रविवारी पुकारलेल्या ‘खारघर बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. संपात भाजीविक्रेते, रिक्षा, टेम्पो चालक-मालक संघटनाही सहभागी झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
खारघर परिसरात सिडकोच्या भूखंडावर २००९ नंतर उभारण्यात आलेली धार्मिक स्थळे बेकायदा असल्याची नोटीस सिडकोने बजावली. त्यानंतर शुक्रवारी कळंबोलीतील धार्मिक स्थळांवर कारवाई केली. सिडकोने सोमवारी खारघरमधील १६ धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी खारघर पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केल्याची माहिती मिळताच खारघरमधील सर्व राजकीय पक्षांनी शनिवारी सायंकाळी बैठक घेऊन रविवारी खारघर बंदची हाक दिली होती. सकाळी काही दुकानदारांना याची माहिती नसल्यामुळे दुकाने सुरू केली. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बंद पाळण्यास सांगितले. रुग्णालय, औषधाची दुकाने वगळता खारघरमधील डी मार्ट, लिटिल वर्ल्ड मॉल, अपना बाजार, डेली बाजार आदी मॉलही बंद होते. डेली बाजारकडून चेरोबा मंदिर आणि डी मार्टच्या रांगेतील काही दुकाने सुरू होती. मात्र त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. बंदमध्ये खारघर व्यापारी असोसिएशन, रिक्षाचालक संघटना, टेम्पो चालक-मालक संघटना, भाजीविक्रेते सहभागी झाले होते. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खारघर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. डी मार्ट आणि लिटिल वर्ल्ड मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्यांना बंदमुळे माघारी फिरावे लागले. अचानक बंदमध्ये रिक्षा सहभागी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. या बंदविषयी खारघर एकता व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले की, आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. परंतु सिडकोने नागरिकांची बाजू ऐकून घेतली नाही. नागरिकांच्या भावना दुखावल्यामुळे बंद पाळण्यात आला. त्यास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
धार्मिक स्थळांविरोधात सिडकोच्या कारवाईच्या निषेधार्थ कामोठ्यात बंद पाळण्याबाबत रात्री उशिरापर्यंत सर्वपक्षीय बैठक सुरु होती.

नवी मुंबईच्या महापौरपदी राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता

E-mail Print PDF
नवी मुंबई - नवी मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेचे तगडे दावेदार मानले जाणारे विरोधी पक्षनेते विजय चौगुले मैदानातच न उतरल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी ही शर्यत सोपी झाली आहे. मात्र १० सदस्य असलेल्या कॉंग्रेसच्या दोन उमेदवारांनी उपमहापौरपदासाठी अर्ज केल्यामुळे निवडणुकीतील रंजकता कायम आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जयवंत सुतार व शिवसेनेच्या वतीने सोमनाथ वास्कर यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज भरले. उपमहापौरपदासाठी कॉंग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज भरला, मात्र त्याच वेळी कॉंग्रेसचे नाराज जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी त्यांच्या पत्नी वैजयंती भगत यांचाही अर्ज भरला. महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ९ नोव्हेंबरला होणार आहे. महापौरपद मिळवण्यासाठी ५६चा आकडा गाठणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीचे ५२ नगसेवक, ५ अपक्ष आणि १० कॉंग्रेस नगरसेवकांच्या जोरावर हा आकडा गाठण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे.
राज्यातील शिवसेना-भाजपमधील शीतयुद्धाची झळ आणि कॉंग्रेसच्या १० नगरसेवकांतील दुफळी यामुळे नवी मुंबई महापालिकेचे महापौरपद राखण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मार्ग खुला झाला आहे. या पदासाठी गेले तीन महिने शक्य ते सर्व डावपेच खेळणारे शिवसेनेचे विजय चौगुले यांची गणिते चुकल्यामुळे त्यांनी शुक्रवारी या पदासाठी अर्ज भरला नाही. अडीच वर्षांपूर्वी पाच अपक्ष व दहा कॉंग्रेस नगरसेवकांच्या जोरावर नवी मुंबई पालिकेतील सत्ता टिकविण्यात यशस्वी ठरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हातातून यंदा महापौरपद जाते की काय, असे चित्र निर्माण झाले होते, मात्र सेना-भाजपमधील राज्याच्या स्तरावरील कटुता राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली आणि त्यांचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला. गेली अडीच वर्षे महापौरपदी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होता, मात्र पुढील अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी मिळणार आहे.

प्रदुषित धूर थेट हवेत सोडणार्‍या कारखान्यांमुळे नवी मुंबईतील नागरिक त्रस्त

E-mail Print PDF
नवी मुंबई - हिवाळ्यात पडणारे धुके आणि पावसाळ्यात वाहणारे झरे यांचा वापर आपल्या कारखान्यातील धूर आणि सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता वातावरणात सोडण्यासाठी करणार्‍या उद्योजकांमुळे नवी मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुक्याचा गैरफायदा घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचा डोळा चुकवून नायट्रोजन डायऑक्साइड हवेत सोडून देणार्‍या रंग उत्पादक कारखान्यांमुळे सध्या शहरात सर्वत्र धुरके पसरले आहे. त्यामुळे येथील नागरी वसाहतीतील रहिवाशांना मळमळणे, अस्वस्थ वाटणे यासारखे त्रास होऊ लागले आहेत.
नवी मुंबईतील तळोजा या टीटीसी औद्योगिक वसाहतीत बाराही महिने जल व वायुप्रदूषण करणार्‍या रंग उत्पादन कारखान्यांतून नायट्रोजन डायऑक्साइड थेट हवेत सोडण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. औद्योगिक वसाहतीसमोरच असलेल्या नागरी वसाहतीला याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या किती कारखान्यांना गेल्या वर्षभरात नोटिसा बजावण्यात आल्या, याची आकडेवारीही महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध नाही. ही माहिती तात्काळ देता येणे शक्य नाही, असे सांगून मंडळाने हात झटकले आहेत.
नवी मुंबईतील दिघा, रबाळे, महापे, खैरणे, पावणे, तुर्भे, शिरवणे आणि तळोजा या औद्योगिक वसाहतींतील साडेतीन हजार कारखान्यांपैकी ४० टक्के कारखान्यांत रासायनिक प्रक्रिया केल्या जात. या भागात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची संख्या वाढल्यामुळे या कारखान्यांनी येथील गाशा गुंडाळून कारखान्यांच्या जमिनी विकून टाकल्या. त्यामुळे हे प्रमाण आता २० टक्क्‌यांवर आले आहे. या २० टक्केरासायिनिक कारखान्यांपैकी बडे कारखाने आपल्या कारखान्यातून निघणार्‍या सांडपाण्यावर आणि प्रदूषित वायूंवर स्वत:च प्रक्रिया करतात. त्यासाठी त्यांनी कारखान्याच्या आवारातच प्रक्रिया केंद्रे उभारली आहेत. छोटे कारखाने मात्र दूषित पाणी आणि हवा कोणतीही प्रक्रिया न करता बाहेर सोडून देतात.

नेरुळ रेल्वे स्थानकातील वाइन शॉप हटवण्याची मागणी

E-mail Print PDF
नवी मुंबई - नेरुळ रेल्वे स्थानकात असलेल्या दारू विक्रीच्या दुकानाबाहेर खुलेआम मद्यपान करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. हे मद्यपी महिलांविषयी अश्लील शेरेबाजी करत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानकातील सिडकोचे सुरक्षारक्षक, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि पोलीस कारवाई करत नसल्यामुळे फेरीवाल्यांबरोबरच स्थानकातील दारूचे दुकान हटवण्याची मागणी होऊ लागली आहे.
हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील बहुतांश रेल्वे स्थानकांत रेल्वेने व्यावसायिक गाळे बांधले आहेत. त्यांपैकी काही गाळ्यांची विक्री करण्यात आली आहे, तर काही भाडेतत्त्वावर दिले आहेत. नेरुळ रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूंना मोठी लोकवस्ती आहे शिवाय मोठी शैक्षणिक संकुले व रुग्णालये आहेत. त्यामुळे या स्थानकात नेहमीच गर्दी असते. या स्थानकात पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोर पुलाच्या पायर्‍यांजवळच राजन वाइन शॉप हे दारूविक्रीचे दुकान आहे. दुकानाबाहेरच बुर्जी आणि अन्य पदार्थाची बेकायदा विक्री केली जाते. दारूच्या दुकानातूनच प्लास्टिकचे ग्लास विकले जातात. त्यामुळे अनेक जण दुकानातून दारू  आणि ग्लास खरेदी करून आणि आजूबाजूच्या बेकायदा स्टॉल्सवरून खाद्यपदार्थ खरेदी करून तिथेच खात-पीत बसतात.
स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच हे दुकान असल्यामुळे तिथून हजारो रेल्वे प्रवासी ये-जा करतात. त्यांना दारूचा दर्प सहन करत ये-जा करावी लागते. प्रवाशांत महिलांची संख्याही मोठी असते. मद्यपी या महिला आणि मुलींकडे पाहून अश्लील हावभाव करतात. अर्वाच्य शेरेबाजी करतात, धक्के मारतात. नेरुळ स्थानकात सिडकोने बारा सुरक्षारक्षक ठेवले आहेत; परंतु त्यांना हटकण्यास गेलेल्या सुरक्षारक्षकांनाच शिवीगाळ व दमदाटी केली जाते. स्थानिक पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस हे फलाटापर्यंतच्याच परिसरात कारवाई करू शकतात. रेल्वे व सिडकोने या गैरप्रकारांना चाप लावावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

कामोठेतील अनधिकृत मार्केट जमीनदोस्त

E-mail Print PDF
रायगड - नवी मुंबईतील कामोठेमध्ये सिडकोने अनधिकृत मार्केट जमीनदोस्त केले आहे. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. सिडकोकडून जमीनदोस्त करण्यात आलेले मार्केट साधारणत: ५ ते ७ वर्षे जुने होते. दोन एकरांवर पसरलेले हे मार्केट आज सकाळी तोडण्यात आले. या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिकांचे स्टॉल्स होते.
कामोठेमधील परिसरातील खुल्या जागा मोकळ्या करुन देण्याची मागणी पनवेल महापालिकेने सिडकोकडे केली होती. त्यामुळेच सिडकोने आज सकाळी सेक्टर ३४ मधील मार्केट जमीनदोस्त केले. कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली. या मार्केटमध्ये भाजीपाल्यासह कपड्यांची दुकाने होती. सेक्टर ३४ नंतर सेक्टर ५ मधील मार्केटदेखील तोडण्यात येणार आहे. हेदेखील मार्केट अनधिकृत आहे. कामोठेमध्ये अशी ४-५ मार्केट आहेत.
कामोठेच्या ३४ सेक्टरमधील मार्केट तोडताना सिडकोला स्थानिकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी स्थानिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रकार केला. विशेष म्हणजे या कारवाईबद्दल सिडकोने अतिशय गुप्तता पाळली होती. या कारवाईसाठी बंदोबस्त आवश्यक असल्याची माहिती आज सकाळीच पोलिसांनी देण्यात आली. यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात मार्केट जमीनदोस्त करण्यात आले.

रोहा ते वीर रेल्वेमार्गाचे दुपदरीकरणाचे काम सुरु

E-mail Print PDF
रायगड - कोकण रेल्वेच्या ७४० किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी १५७ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात रोहा ते  वीर या ५० किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यासाठी एक हजार कोटी रुपये तर उर्वरित मार्गासाठी चार हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. तसा चार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला असून तो मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे कोकण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. दुपदरीकरणानंतर कोकण रेल्वे मार्गावर २१ नवी स्टेशन उभी राहणार असून कोकण रेल्वे मार्गावरील स्टेशनांची संख्या ८७ होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्री असतांना गती दिली. दुपदरीकरणाचे कामही सुरू झाले. मात्र, प्रभू यांचे खाते बदलण्यात आल्याने दुपदरीकरणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल काय, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. परंतु प्रवासी संख्या वाढत असूनही या मार्गावर दुपदरीकरणाअभावी जादा गाडया सोडणे शक्य होत नाही. जादा गाडया सोडल्या तरी विलंबाने धावतात. त्याचा त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे या मार्गाने दुपदरीकरण करण्यात येत आहे. पूर्ण मार्गाचे दुपदरीकरण करायचे झाल्यास १५ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १५७ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार असून ठराविक ठिकाणी हे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पाच हजार कोटी रुपये अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात ५० कि. मी. लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर आहेत. तर उर्वरित मार्गासाठी ४ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव कधी मंजूर होतो, यावर दुपदरीकरणाच्या कामाचे भवितव्य अवलंबून आहे. साधारणत: सात वर्षात दुपदरीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. निधी वेळेत न मिळाल्यास दुपदरीकरणाचे काम लांबणीवर पडणार आहे.

कुरिअरच्या बहाण्याचे घरात घुसून २ कोटीचा ऐवज लंपास

E-mail Print PDF
नवी मुंबई - वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) भाजीपाल्याचे व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या वाशीतील घरी शुक्रवारी भरदिवसा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कुरिअरच्या बहाण्याने दिवाळीचे आलेले गिफ्ट दाखवून सहा अज्ञात इसमांनी रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकून सुमारे २ कोटी ९ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तर घटनेला ४८ तास उलटूनही पोलिसांला आरोपी शोधण्यात अपयश आले आहे.
एपीएमसीमधील भाजीपाल्याचे व्यापारी अरुण मेनकुदळे हे वाशी सेक्टर-१७ मधील कुसुम अपार्टमेंटमध्ये राहतात. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांच्या घराची बेल वाजल्याने मेनकुदळे यांच्या पत्नीने दरवाजा उघडला असता दरवाजाबाहेर एक महिला उभी असल्याचे दिसले. त्यांनी त्या महिलेकडे विचारणा केली असता कुरिअरद्वारे गिफ्ट आले असल्याचे त्या महिलेने सांगितल्यावर त्यांनी दरवाजा उघडला असता, त्या महिलेच्या पाठोपाठ आणखी पाच इसम त्यांच्या घरात घुसले. त्यांनी रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवत अरुण मेनकुदळे यांची पत्नी व मुलीला गप्प राहण्यास सांगितले. त्यानंतर या चोरटयांनी घरात सगळीकडे शोधाशोध करून सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांची रोकड तसेच सुमारे २५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ कोटी ९ लाख ३६ हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला.
सदर घटनेनंतर घरात डांबून ठेवलेल्या मेनकुदळे यांच्या पत्नी व मुलीने आरडाओरड केल्यानंतर त्यांचे शेजारी धावून आले व त्यांनी त्यांची सुटका केली. या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांसह नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Page 4 of 266