Saturday, Jan 20th

Headlines:

रायगड

खारघरमधील वाढत्या प्रदुषणामुळे कर्करोगाचा वाढता धोका

E-mail Print PDF
पनवेल - वाढत्या प्रदूषणाच्या पाश्वभूमीवर खारघरवासीयांवर कर्करोगाची टांगती तलवार आहे. फॉर्मलडिहाइड या वायूचे प्रमाण खारघर परिसरात सामान्य पातळीच्या अडीच पट असल्याचे तेथील रहिवाशांच्या पुढाकाराने ‘इक्विनॉक्स लॅब’ ने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या वायूमुळे कर्करोग होऊ शकतो, असे ‘डिसीज कंट्रोल ऍण्ड प्रिव्हेन्शन’ आणि ‘अन्न औषध प्रशासना’चे म्हणणे आहे. या परिसरात पीएम २.५ आणि १० या प्रकारातील धूलिकणांचे प्रमाणही मोठे आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र हा अहवाल चुकीचा वाटतो, असे म्हटले आहे.
खारघर परिसराच्या जवळच तळोजा औद्योगिक वसाहत आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा आहे. त्यामुळे येथे प्रदूषणाची समस्या तीव्र आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे खारघरवासीयांनी स्वतच पुढाकार घेऊन इक्विनॉक्स प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांच्या मदतीने हवेचे नमुने घेतले. त्यात आढळलेल्या वायूंमुळे कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या अहवालानुसार खारघरमध्ये रात्री ‘फार्मलडायहाइड’ची पातळी सामान्य पातळीच्या अडीच पट असते. अशा हवेत सतत राहिल्यास कर्करोग होऊ शकतो, असा दावा ‘डिसीज कंट्रोल ऍण्ड प्रिव्हेन्शन’ या संस्थेने केला आहे. वायू कोणत्या कारखान्यातून येतो, हे स्पष्ट झालेले नाही.

पनवेलमध्येही कचरा वर्गीकरण सक्ती

E-mail Print PDF
पनवेल - महापालिकेच्या हद्दीतील सर्व सोसायटयांनी ३० डिसेंबरच्या आत ओल्या व सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण करण्यास सुरुवात करावी. त्यानंतर ज्या सोसायटया वर्गीकरण करणार नाहीत, त्यांचा कचरा उचलण्यात येणार नाही, असा इशारा पनवेल महापालिकेने बुधवारी दिला. वासुदेव बळवंत फडके नाटयगृहात कचरा व्यवस्थापनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पनवेलवासीयांना कचरा व्यवस्थापन आणि आरोग्यसेवा हस्तांतराच्या मुद्दयावर सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असा सामना पाहायला मिळाला.
पनवेल महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणात पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. पालिका क्षेत्रातील अडीच लाख मालमत्ताधारकांना स्वच्छ पनवेल अभियानात सहभागी करून घेण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या प्रबोधनाशिवाय हे शक्य नसल्याने पालिकेने बुधवारी पालिका व जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक, व्यापारी, गृहनिर्माण सोसायटयांचे प्रतिनिधी, हॉटेलचालक, मॉलचे व्यवस्थापक व दिवसाला १०० किलोग्रॅमपेक्षा अधिक कचरा निर्माण करणार्‍या उद्योगांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. उपस्थितांना २० लघुचित्रपटांतून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. पालिका पनवेल शहरातील सुमारे १४० कचराकुंडया काढून टाकणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

कर्नाळा अभयारण्यात परदेशी पाहुणे

E-mail Print PDF
नवीन पनवेल - पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा पक्षी अभयारण्यात परदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यात पिंटेल डक, ककू, राईनेक, ब्ल्यू रॉक थ्रश, ट्रीपीपीट यांचा समावेश आहे. हिवाळ्यात या ठिकाणी येणार्‍या परदेशी पक्ष्यांची संख्या मोठी असते.
पिंटेल डक हा पक्षी युरोप, आशिया आणि अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील भागात आढळतो. थंडीच्या हंगामात दक्षिणेकडे स्थलांतर करतो. ककू हा पक्षीसुद्धा युरोपातून या काळात स्थलांतर करतो. कीटक आणि अळ्या हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. विणीचा हंगाम असल्यामुळे हे पक्षी अंडी देण्यासाठी या भागात स्थालांतरण करतात. व्रईनेक हा पक्षी युरोप आणि आशिया खंडात आढळतो.
ब्ल्यू रॉक थ्रश हा पक्षी युरोपातील दक्षिणेकडील भागात, उत्तर आफ्रिका, चीनच्या उत्तर भागात आढळतो. ब्ल्यू रॉक थ्रश दिवसाला तीन ते पाच अंडी घालतो. कीटक आणि छोटे सरपटणारे प्राणी हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. ट्रीपीपीट हा पक्षी दिसायला चिमणीसारखा दिसतो. युरोप आणि मध्य आशिया खंडांत ट्रीपीपीट आढळतो. साधारणपणे दरवर्षी दोनदा हे सर्व पक्षी येथे स्थलांतर करतात. मध्य आशिया, युरोप, उझ्बेकिस्तान, सायबेरियातून हे पक्षी येथे येतात. कर्नाळा अभयारण्यात सदाहरित, खारफुटी तसेच पानगळीची वने आढळतात. यात विविध प्रकारच्या ६०० वृक्षांच्या जाती अस्तित्त्वात आहेत. त्यामुळे पक्ष्यांना लागणारे विविध प्रकारचे खाद्य येथे उपलब्ध होते.

भुयार खोदून बँकेचे २७ लॉकर फोडले

E-mail Print PDF
कोपरखैरणे - जुईनगर सेक्टर ११ मधील बँक ऑफ बडोदावर आज दरोडा पडला. बँकेजवळच्या गाळ्यातून भुयार खोदून दरोडेखोरांनी बँकेत प्रवेश करून २७ लॉकर फोडले. यामध्ये सोन्याचे दागिने आणि महत्त्वाच्या दस्ताऐवजांची लूट झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
जुईनगर सेक्टर ११ येथील भक्ती टॉवरमध्ये बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. या बँकेपासून जवळच असलेला एक गाळा शशिकांत कोठावळे यांच्याकडून घेसाराम नावाच्या एका व्यक्तीने भाड्याने घेतला होता. त्यामध्ये त्याने श्री बालाजी नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले होते.
दरोडेखोरांनी बँकेच्या कामकाजाची माहिती घेऊन या किराणा मालाच्या दुकानातून दरोडेखोरांनी बँकेपर्यंत ५० फूट भुयार खोदले. त्यानंतर चोरट्यांनी बँकेच्या लॉकररूमपर्यंत पोचत २३७ पैकी २७ लॉकर फोडले. या लॉकरमधून ग्राहकांचे सोन्याचे दागिने, दस्तावेज आणि किमती वस्तू पळवल्या.
बँकेचा सुरक्षारक्षक सकाळी बँकेत आल्यानंतर दरोडा पडल्याचे उघड झाले. यामध्ये नेमका किती ऐवज चोरीला गेला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
बँकेत दरोडा पडल्याची बातमी वार्‍यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर ग्राहकांनी बँकेसमोर गर्दी केली. यामुळे बँकेबाहेर काही काळासाठी तणावाचे वातावरण होते. सहायक पोलिस आयुक्त किरण पाटील यांनी सांगितले, की दरोड्याच्या तपासासाठी तातडीने ६ पथके तयार केली आहेत. बँकेतील लॉकर फोडून दरोडेखोरांनी ऐवज लंपास केला असल्याने नेमका मुद्देमाल होता, हे आताच सांगता येणार नाही.

स्वतंत्र सेवारस्ते न बांधल्याने नवी मुंबईत वाहतूक कोंडी

E-mail Print PDF
नवी मुंबई - दोन आठवडयांपूर्वी राज्याच्या पोलीस महासंचालकांचे वाहन नवी मुंबईतील वाहतूक कोंडीत काही मिनिटे अडकले. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी वाहतूक विभागातील सहा पोलिसांच्या बदल्या करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामुळे प्रश्न सुटलेला नाही. महासंचालकांनी अवघ्या काही मिनिटांसाठी अनुभवलेली कोंडी नवी मुंबईकर रोज सहन करत आहेत. ‘सुनियोजित’ हे बिरुद मिरवणार्‍या नवी मुंबईत कोंडी नित्याचीच आहे. सिडकोने वसाहती जोडणारे स्वतंत्र सेवारस्ते अद्याप बांधलेले नाहीत. विकास आराखडयाकडे दुर्लक्ष केल्यास ही कोंडी वाढतच जाण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत वकिलावर प्राणघातक हल्ला

E-mail Print PDF
नवी मुंबई - जुईनगर येथील वकील अमित कटारनवरे यांच्यावर रविवारी दुपारी ३.१५ च्या सुमारास त्यांच्या कार्यालयातच धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. स्वप्नील सोनावणे हत्या प्रकरणात ते वकील म्हणून काम पाहत होते. या प्रकरणाची सोमवारी ठाणे येथे सुनावणी होणार असताना कटारनवरे यांच्यावर झालेल्या हल्ल्‌यामुळे तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.  जुईनगर सेक्टर २३ येथे कटारनवरे यांचे कार्यालय आहे. दुपारी तीनच्या सुमारास अमित यांनी कार्यालय उघडून आत प्रवेश करताच चार ते पाच जणांनी त्यांच्यावर धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेतच अमित यांनी पत्नी ममता यांना फोन करून हल्ला झाल्याचे कळवले. पत्नीने त्यांना डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपायुक्त तुषार दोशी, एसीपी किरण पाटील, नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी तात्काळ घटनास्थळी व रुग्णालयात येऊन पाहणी केली.
कटारनवरे यांच्यावर ५ सप्टेंबर रोजी सानपाडा येथे हल्ला झाला होता. त्यावेळी हल्ल्‌यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी दलित चळवळीविरोधात व दलित नेत्यांविरोधात भाष्य करतो काय, असे म्हणत हल्ला केल्याचे अमित यांनी पोलीस जबानीत सांगितले होते.

प्रदुषण करणार्‍या १५ कारखान्यांवर कारवाई

E-mail Print PDF
तळोजा - गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील हवेचा दर्जा बिघडविणार्‍या तळोजातील ‘धूर’खान्यांवर  कारवाई करण्यात आली आहे. १५ कारखान्यांच्या प्रतिनिधींवर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनेक वेळा ताकीद देऊनही प्रदूषणाची मात्रा कमी होत नसल्याने पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राला (सीईटीपी) गुरुवारी भेट दिली. त्यांनी रात्री उशिरा तळोजा पोलीस ठाण्यात सीईटीपी केंद्रचालक व संचालक मंडळावर पर्यावरणाची हानी केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी तळोजा सीईटीपीचालक व कार्यकारिणीचे सदस्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. उत्पादन निर्मितीनंतर निघणारे सांडपाणी प्रक्रिया करून थेट नदीत सोडण्याची प्रक्रिया होणे सीईटीपी केंद्रात अपेक्षित आहे. मात्र गुरुवारी सायंकाळी चार वाजता एमपीसीबीच्या अधिकार्‍यांना न कळू देता मंत्री कदम यांनी भेट दिल्यावर दोन प्रकल्पांपैकी १२ एमएलडी क्षमतेचा एक प्रकल्प बंद अवस्थेत दिसला. तसेच सीईटीपी केंद्रातून खाडीपात्रामध्ये पंपाने केंद्रचालक पाणी सोडत असल्यामुळे खाडीपात्र प्रदूषित होत असल्याचे दिसल्यामुळे ही फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. सीईटीपीच्या संचालकांचे स्वत:चे कारखाने आहेत, तर काही सदस्य कारखान्यांचे व्यवस्थापन सांभाळतात.

एटीएममध्ये भरणा करावयाच्या रक्कमेचा अपहार

E-mail Print PDF
पनवेल - एटीएम’मध्ये भरण्यासाठी दिलेल्या रकमेपैकी ३४ लाख रुपयांचा अपहार करणार्‍या दोन कर्मचार्‍यांना पनवेल शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दीपक जाधव व रोहित गायकवाड अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. सिक्युरीट्रन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी विविध बँकांच्या एटीएम’मध्ये पैसे भरण्याचे  काम पाहते. तक्का येथे असलेल्या एटीएम’मध्ये या कंपनीतर्फे कॅश लोडिंग ऑफिसर दीपक जाधव (वय २४) व रोहित गायकवाड (२३) हे दोघे पैसे भरत असत. दोघांनीही संगनमत करून सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येकवेळी रक्कम एटीएम’मध्ये न भरता काही रक्कम स्वतःकडे काढून ठेवली होती.

नवी मुंबईच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे जयवंत सुतार, उपमहापौरपदी मंदाकिनी म्हात्रे

E-mail Print PDF
नवी मुंबई - नवी मुंबई महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत सुतार यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज (गुरूवार) निवडणूक झाली. या निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयवंत सुतार यांनी बाजी मारली आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ वास्कर यांचा पराभव केला. तर, उपमहापौरपदी कॉंग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे यांची निवड झाली. सुतार यांना ६७ तर वास्कर यांना ३८ मते मिळाली. यावेळी भाजपचे सहा नगरसेवक अनुपस्थित होते. अपक्षांसह कॉंग्रेसची मते राष्ट्रवादीला मिळाली. नवी मुंबई महानगरपालिकेचे १३ वे महापौर म्हणून जयवंत सुतार विराजमान होणार आहेत.
उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मंदाकिनी म्हात्रे यांना ६४ मते मिळाली, तर शिवसेनेचे उमेदवार द्वारकानाथ भोईर यांना ३८ मते मिळाली. कॉंग्रेसच्या बंडखोर उमेदवार वैजयंती भगत यांना अवघे तीन मते मिळाली. सर्वपक्षीयांनी नगरसेवकांना व्हिप जारी केले होते. महापौरपद मिळवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले होते. परंतु भाजपने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने विजय चौगुले यांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीतील चुरस संपुष्टात आली होती. कॉंग्रेसमध्ये उपमहापौर पदावरून मतभेद होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेली नाराजी, कॉंग्रेसच्या दहा नगरसेवकांनी दिलेले पाठिंब्याचे आश्वासन, मित्रपक्ष भाजपची गृहीत धरलेली साथ आणि पाच अपक्ष नगरसेवकांतील दोन नगरसेवकांनी सोबत राहण्याचे दिलेले वचन या बळावर महापौरपद जिंकण्याचे मनसुबे शिवसेनेने आखले होते. ठाण्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांनी गेले दोन महिने मोर्चेबांधणी केली होती. मात्र भाजपने शिवसेनेला साथ न देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेचे अवसानच गळून पडले.

Page 3 of 266