Monday, Jan 22nd

Headlines:

इतर

किल्ले शिवछत्रपतींचे

E-mail Print PDF
raigadfort1शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत अनेक किल्ले नव्याने बांधले गेले. फक्त सह्याद्रीतच नव्हे तर कोकण किनार्‍यावर आणि समुद्रातही किल्ले बांधण्यात आले. सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर किल्ले बांधण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कोकण व देश यांना जोडणार्‍या घाटमार्गावर लक्ष ठेवणे, कर जमा करणे आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणे हे प्रमुख उद्देश होते.
शिवाजी महाराजांच्या उभ्या आयुष्यात त्यांचा संबंध कायमच गड किल्ल्यांशी येत होता. महाराजांचा जन्मदेखील शिवसनेरी या किल्ल्यावर आणि मृत्यूदेखील रायगड या किल्ल्यावरच झाला. या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक गडकिल्ले जिंकून घेतले. महाराजांनी जास्तीत जास्त किल्ल्यांची पुनर्बांधणी केली. बरेचसे किल्ले बेवारस पडलेले होते, त्यांची दुरूस्ती करवून स्वराज्यात सामील करून घेतले.
मोहनगड या किल्ल्याच्या दुरूस्तीच्या संदर्भात महाराजांनी अफजलखान वधाच्या अंदाजे सहा महिने आधी बाजीप्रभू देशपांडे यांना पत्र लिहिले होते. पत्रामध्ये असा उल्लेख होता की, ‘मोहनगड उर्फ जासलोडगड हा हिरडस मावळमध्ये आहे, तो ओस पडला आहे, त्याची डागडुजी करून घ्यावी, तेथे २५ माणसे ठेवावीत, किल्लेदाराला घर बांधून द्यावे’ असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सह्याद्रीतील तुंग, लोहगड, कोरिगड, यासाख्या गडकिल्ल्यांचे बांधकाम अहमदनगरची निजामशाह आणि विजापूरची आदिलशाही यांच्या काळात झाले. नंतर निजामशाहीच्या अस्तानंतर त्यांचे काही किल्ले आदिलशाहीत समाविष्ट झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी साम्राज्याचा उदय झाल्यावर त्यांनी निजामशाही व आदिलशाहीतील अनेक किल्ले जिंकून घेतले. तसेच जे किल्ले बेवारस पडलेले होते त्यांचा स्वराज्यात समावेश केला. याच किल्ल्यांनी छत्रपतींना अनेक लढ्यांमध्ये मोलाची साथ दिली.rajgad-fort
स्वराज्याची राजधानी
शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या लढ्याची सुरूवात करण्यापूर्वी शहाजीराजांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर असे चार परगणे होते. शिवाजी महाराजांनी प्रथम बारा मावळाचा प्रदेश व तेथील किल्ले घेण्यास सुरूवात केली. या दरम्यान गुंजण मावळातील राजगड हा महत्वाचा किल्ला महाराजांनी घेतला. याच किल्ल्यांची त्यांनी स्वराज्याच्या राजधानीसाठी निवड केली. राजगडावर तीन माच्या व अनेक दरवाजे बांधून घेतले. आज जेव्हा आपण या किल्ल्यांचा अभ्यास करतो तेव्हा हे कळून येते की महाराजांनी किल्ले बांधताना तेथील भूरचना व त्याचे संरक्षण या दृष्टीने असलेले महत्व याचा निश्‍चितच अभ्यास केलेला होता.
रायगड
जावळीच्या मोर्‍यांचा पराभव केल्यानंतर महाराजांनी जावळी परिसरात किल्ला बांधण्याचे निश्‍चित केले. पार या गावाजवळ भोरप्या नावाचा एक उंच डोंगर होता. मोरोपंत पिंगळे यांना त्या ठिकाणी किल्ला बांधण्याचे आदेश महाराजांनी दिले. महाराजांनी बांधलेला सर्वात उत्तम किल्ला म्हणजे रायगड. हा किल्ला बांधण्याची जबाबदारी महाराजांनी हिरोजी इंदुलकर यांना दिली होती. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गडावर तलाव, सदर वाडे, दरवाजे, रस्ते यांचे बांधकाम हिरोजींनी केले. तसा उल्लेख रायगडावरील जगदीश्‍वर मंदिराबाहेरील शिलालेखात केलेला आहे. शांताराम विष्णू आवळसकर यांच्या पुस्तकामध्ये रायगडावरील बांधकामांची माहिती असलेला शिलालेख आहे.
या शिलालेखावरून रायगड किल्ल्यावर कोणकोणती बांधकामे केली गेली होती याची माहिती मिळते. रायगड बांधताना आणि इतर किल्ले उभे करताना महाराजांनी निश्‍चितच वेगवेगळा विचार केला असावा. कारण रायगड हे राजधानीचे ठिकाण असल्याने त्याला नैसर्गिक आणि कृत्रिम असे दोन्ही प्रकारचे संरक्षण असणे गरजेचे होते. याशिवाय तेथे सदर, अंबरखाना, कोठारे, वसाहती, मंत्र्यांचे वाडे, धार्मिक वास्तू, तलाव, मनोरे इ. बांधकामे करणे आवश्यक होते. पण इतर किल्ल्यांवर एवढ्या प्रकारच्या वास्तूंची गरज नव्हती. त्यामुणे इतर किल्ल्यांवर तेथील गरजांनुसार वास्तू उभ्या केल्या गेल्या. उदाहरणार्थ लिंगाणा, सोनगड, वासोटा, भैरवगड यासारख्या किल्ल्यांवर कैदी ठेवले जायचे. त्यामुळे तेथील वास्तू व बांधकामे भव्य नव्हती. सोनगिरी, मडागड, शिवगड, नृसिंहगड, कावळ्या हे अगदी छोटे आणि चौकी नाक्याचे किल्ले होते.
त्या परिसरातील हालचालींवर नजर ठेवायला आणि तेथील लोकांना संरक्षण देण्यासाठी हे किल्ले बांधले होते. त्यामुळे साहजिकच या किल्ल्यांवर तटबंदी व दरवाजे वगळता पक्की बांधकामे नव्हती.
वैशिष्ट्यपूर्ण जलदुर्ग
महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम हे जलदुर्गाचे होते. त्यांनी कुरटे, कासा, खांदेरी या बेटांवर अनुक्रमे सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग व खांदेरी हे किल्ले बांधले. हे किल्ले बांधत असताना त्यांच्याकडे अशा प्रकारे बेटांवर किल्ले बांधण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरी देखील त्यांनी बांधलेले किल्ले आज ३५० वर्षानंतरदेखील समुद्राशी झुंज देत उभे आहेत.
शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत बांधलेल्या किल्ल्यांची यादी सभासद बखरीमध्ये दिलेली आहे. पण त्या यादीमध्ये एकाच किल्ल्याची तीन वेगवेगळी नावे येतात. तसेच इतर ऐतिहासिक कागदपत्रातील नोंदीनुसार काही किल्ले पूर्वीच अस्तित्वात होते अशी माहिती मिळते. तरीदेखील महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत अंदाजे १०० किल्ले बांधले असण्याची शक्यता जास्त आहे. हे सर्व किल्ले बांधताना त्यांनी अवास्तव खर्च करून किल्ल्यांची उभारणी केली नाही. किल्ल्यावर ज्या ठिकाणी कातळकडे आहेत तेथे त्यांनी तटबंदी बांधलेली नाही. ज्या उतारावर किल्ला बांधायचे निश्‍चित केले त्या डोंगराच्या घळी, उतार, कातळकडे, नाळ, पाण्याच्या वाटा यांचा पुरेपूर वापर करून ते किल्ले अभेद्य बनविले. गोमुखी किंवा एडक्याच्या शिंगासारख्या आकाराच्या दरवाजाची बांधणी हे या दुर्गबांधणीचे वैशिष्ट्य ठरले.
दक्षिणेतील किल्ले
शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयादरम्यान कर्नाटक, तामिळनाडू या प्रांतातदेखील काही गड वसविले. सातारा, गोजरा या किल्ल्यांव्यतिरिक्त शाारंगगड, मदोन्मत्तगड, कृष्णगिरी असे ७९ किल्ले महाराजांनी बांधल्याचा सभासद बखरीत उल्लेख आहे. या बखरीमध्ये नोंदीप्रमाणे महाजारांच्या कारकिर्दीत त्यांनी जिंकलेले किल्ले व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व तामिळनाडू या भागात बांधलेले किल्ले यांची संख्या २४० आहे. प्रत्यक्षात ही संख्या ३०० च्या आसपास असावी असे इतर बखरी व शिवकालीन पत्रव्यवहारावरून लक्षात येते.
शिवाजीमहाराजांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एवढे किल्ले बांधूनही कधीही कोणत्याही किल्ल्यांवर आपले नाव लिहून ठेवले नाही. महाराजांनी नव्याने बांधलेल्या, जिंकलेल्या आणि दुरूस्त केलेल्या अनेक किल्ल्यांचा वापर जवळजवळ पुढे ५० वर्षे झाला. याच गडकिल्ल्यांच्या आधारावर मराठी साम्राज्य उभे राहिले.
-डॉ. सचिन जोशी
(लोकराज्यच्या सौजन्याने)

नशिबाने साथ दिली आता अपेक्षा आहे कर्तृत्व सिद्ध करण्याची

E-mail Print PDF
vinayak-rautराजकारणात पुढे येण्यासाठी राजकीय पार्श्‍वभूमी, आर्थिक पाठिंबा, सामाजिक कार्य आणि किमान बर्‍यापैकी वक्तृत्व या गोष्टी आवश्यक म्हटल्या जातात. पण इतके असले म्हणजे यश नक्की असे नाही. इथे सर्वात महत्वाचा भाग असतो नशीबाचा. नशीब जोरावर असेल तर बाकी काही नसले तरी चालते. थोडक्यात सांगायचं तर नशीबाची साथ रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांना मिळाली. या नशीबाने दिलेला खासदारकीला सव्वा वर्ष उलटले आहे. पण सव्वा वर्षानंतरही त्यांनी केलेल्या कामाचा विचार करायचा झाल्यास तर ती पाटी सध्या तरी कोरीच दिसत आहे.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश प्रभू यांच्यासारख्या उमेदवाराचा पराभव झाला. एका अभ्यासू, समाजवाद्यांच्या पसंतीला उतरलेल्या उमेदवाराचा पराभव आश्‍चर्यकारक होता. या निवडणुकीत शिवसेना सोडून कॉंग्रेसवासी झालेला नारायण राणे यांचा प्रभाव निर्णायक ठरला. त्याचा फायदा निलेश राणे या नव्या चेहर्‍याला झाला. ५ वर्षात पुलाखालून बरेच पाण गेले. कॉंग्र्रेसला ग्रहण लागले. राणेंचा प्रभाव ओसरला गेला. अशा वेळी प्रभूनी लढाईच्या आधीच शस्त्र टाकली आणि राऊतांचे नशीब फळफळले. खरतर हे राऊत तेव्हा सर्वसामान्य मतदाराला काय शिवसैनिकांनाही ठाऊक नव्हते. पण राणेंच्या सोबत त्यांचे समर्थक शिवसेनेतून निघून गेल्यावर निर्माण झालेली पोकळी त्यांच्या फायद्याची ठरली. शिवसेनेत ते सचिव झाले.
पक्षाचे पदाधिकारी होणे वेगळे आणि निवडणुकीसाठी उमेदवार ठरणे वेगळे. कारण राऊत यांच्याकडे लोकनेते होण्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्वगुण दिसलेले नव्हते. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय इतकीच त्यांची ओळख होती. मात्र त्यामुळेच त्यांच्या नावाला विरोध करण्याचे धाडस कुणी केले नाही हेही तितकेच खरे. तरीही दोन वेळा मुंबईतून मनपा निवडणुकीत ते पराभूत झाल्याने त्यांची डाळ इथे कितपत शिजेल याबाबत साशंकता होतीच. राऊतांनी मतदार संघात संपर्क सुरू केला. राणेंना विरोध वाढला होता. मोदींची जादू पसरली होती आणि उद्धव ठाकरेंची कृपादृष्टी झाली होती. या सर्वांचा परिणाम म्हणून शिवसेनेचे राऊत नाम नाणे नुसते चालले नाही तर चांगलेच धावले.
राऊतांना खासदारकीचा टिळा लागला. शिवसेना पक्षात कार्यकर्त्याचा केव्हाही नेता होवू शकतो. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. राऊताना निव्वळ शिवसेनेची आणि तेव्हा पर्यंत मित्रपक्ष असलेल्या भाजपचीच मते मिळाली असे नव्हे तर मतदारसंघातले राणे विरोधक सर्वपक्षीय एकवटले. त्यांनी राऊतांना कौल दिला. एक शांत, संयमी व्यक्ती म्हणून त्यांना पसंती मिळाली. इथपर्यंतचा राऊतांचाा प्रवास नशिबाच्या जोरावर पार पडला. खरंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गात शिवसेनेच्या उमेदवारांना उमेदवारी मिळाल्यावर फार काही करावे लागत नाही. सर्वसामान्य शिवसैनिकच पुढचे काम पार पाडतो. अनंत गीते, सुरेश प्रभू यांच्यावरही नशीब वारंवार मेहरबान राहिले होते. नशीब इतके जोरावर राहिले की तुल्यबळ प्रतिस्पर्धीही त्यांना लाभला नाही. पण राजकारणात सगळेच दिवस सारखे नसतात हे या दोघांनीही अनुभवले. गतवर्षीच्या निवडणुकीत गीते थोडक्यात जिंकले तर या आधीच्या निवडणुकीत प्रभूना पराभव पत्करावा लागला. तात्पर्य काय तर नशीब केव्हाही बदलू शकते याचे भान खा. राऊताना राखावे लागणार आहे.
साधारणपणे नव्या खासदाराला काम शिकण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. पण हा कालावधी सहा-आठ महिन्यांपेक्षा अधिक असता तर मात्र ते निराशाजनक ठरते. सव्वा वर्षानंतर खा. राऊतांनी काय काम केले, असा सवाल समोर आल्यावर त्यांचा आलेख खालीच दिसतो. अशाच गतीने त्यांनी काम केले तर पुढच्या निवडणुकीत ते ५ वर्षे जूने म्हणून त्यांचा विचार होईल. पण स्वतःला सिद्ध करण्याची संधी ते गमावतील. त्यातच मोदीज्वर कमी होवू लागला आहे. युतीतला बेबनाव वाढतच चालला आहे. अशा स्थितीत प्रतिस्पर्ध्यांनी आपली ताकद वाढवली तर आणखी चार वर्षानी राऊत यांचे नशीब किती साथ देईल अशी साशंकता निर्माण होवू शकते.
राजकारणात आणखी चार वर्षानी काय होईल हे आजच सांगता येणार नाही. तेव्हाच्या राजकीय स्थितीचा अंदाज आज देता येणार नाही. पण निव्वळ नशिबावरच अवलंबून नेहमी राजकारणात जिंकता येत नाही. त्यासाठी कर्तृत्वही सिद्ध करावं लागणार आहे. ते सिद्ध करता आले नाही तर नशीब केव्हाही नाराज होऊ शकते.
-राजेश मयेकर
ज्येष्ठ पत्रकार

मला भीती वाटते समाजाची...

E-mail Print PDF
shraddha-kalambateपावसाळी ढगाळ वातावरण जी.जी.पी.एस. हायस्कूलचे मोकळे प्रवेशद्वार. समोरच्या मोठ्या पटांगणात निळ्या छताखाली प्रेक्षकांसाठी केलेली बैठक व्यवस्था. आकाशात हळुहळू काळ्या ढगांची गर्दी. तशीच आवर्जून उपस्थित असलेल्या शेकडो प्रेक्षकांच्या अंतर्मनात उठलेलं असंख्य विचाराचं काहूर ....
अशा पावसात तेही निळ्या आसमंताखाली बसून पहावा असा कोणता बरं हा प्रयोग? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचलेली. मला तर एकदम मुंबईच्या ‘ओपन थिएटर’ची आठवण झाली. इतक्यात पावसाची रिमझिम सुरु झाली. प्रेक्षकांनी बसल्या बसल्या जागेवरच छत्र्या उघडल्या. बघता बघता जोरदार बरसात सुरु झाली. प्रेक्षकांनी प्रवेशद्वाराच्या व्हरांड्यात आडोसा घेतला. २०-२५ मिनिटे संततधार सुरु होती. मात्र आयोजक व प्रेक्षक यांच्या मनातील प्रयोग पाहण्याचा स्फुलिंग विझत चालला होता. परंतु दुर्दम्य इच्छाशक्तीचा एक किरण ‘प्रयोग होणारच’ अशी ग्वाही देत होता. आणि झालंही तसंच...
साचलेला दुःखावेग ओसरताच आकाश निरभ्र झालं. प्रेक्षक पुन्हा आसनस्थ झाले आणि प्रयोगाला सुरुवात झाली. ‘नमस्कार, मी संजय हळदीकर.... तुम्ही हे नाव ओळखलं असेलच. महाराष्ट्रातील आश्रमशाळा, अनाथालये, वसतिगृहे, बालगृहे, निरीक्षणगृहे यातील मुलांमध्ये मिसळून त्यांच्याशी सुसंवाद साधून कथा, कविता, नाट्य चित्रकला, अभिनय इ. च्या माध्यमातून उपेक्षित, निराधार पिडित मुलांना बोलतं करणारे, त्यांच्या नीरस, रुक्ष जीवनात आनंदाचे, हास्याचे, करमणुकीचे विश्‍व निर्माण करणारे सुप्रसिद्ध स्टेज आर्टिस्ट संजय हळदीकर...
अनाथालयातील मुलांनी लिहिलेल्या ‘भीती’ या विषयावरच्या हळदीकर यांनी संकलित केलेल्या कवितांचा संग्रह म्हणजे ‘भीती आणि भिंती’ यावर आधारित दीर्घांक सादर केला होता रमेश कीर कला ऍकॅडमीच्या मुलांनी आणि त्याची निर्मिती, दिग्दर्शन व हळदीकर साकारले होते ऍकॅडमीचे विभागप्रमुख प्रदीप शिवगण यांनी.
अनाथालय, बालगृहातील मुलांचे जीवन तिथला कर्मचारीवर्ग, (कुठे मुलांच्या भावविश्‍वाशी समरस होणारे माऊली, तर कुठे मुलांच्या वाट्याला आलेल्या उपेक्षित संस्कारशून्य जीवनाचा तिरस्कार करणारे काही) तिथलं रुक्ष, चाकोरीबद्ध, जीवन, मुलांच्या व्यथा, समस्या त्यांचे प्रश्‍न प्रदीप शिवगण यांनी या दीर्घांकामध्ये मांडण्याचा पुरेपूर प्रामाणिक प्रयत्न केला होता. यात जी.जी.पी.एस. च्या १९ मुलांनी तर ऍकॅडमीच्या ८ मुलांनी सहभाग घेतला होता. उर्वरित १५ कलाकार रंगमंचामागची सर्व व्यवस्था हाताळत होते. पावसाच्या पाण्याने चिपचिपीत झालेल्या फरशीवर प्रयोग सादर करणं ही खरोखरच जिकीरीची गोष्ट होती. परंतु हे आव्हान अजिबात विचलीत न होता बालकलाकारांनी लिलया पेललं. त्याबद्दल प्रेक्षकांनी त्याचं कौतुक तर केलचं परंतु हा प्रयोग सर्व बालगृहातून तसेच समाजासमोरही यायला हवा अशी मागणीही करण्यात आली.
वाचकहो, हा प्रयोग म्हणजे केवळ मनोरंजन नव्हते. यातून आपल्याला सामाजिक बांधिलकी म्हणून बरंच काही घेण्यासारखं, करण्यासारखं आहे. ज्यामुळे या मुलाचं जीणं थोडफार सुसह्य होऊ शकेल. या मुलांनी त्यांच्या आयुष्यातील जपलेलं वास्तवाचं भान त्यांच्याच शब्दात-
‘मला माझ्या आयुष्याची भीती वाटते
यश मिळवण्यासाठी
‘मला माझ्या समाजाची भीती वाटते
मला माझ्या गरीबीचीही भीती वाटते’
‘मला भीती वाटते सरांची
शाळेला जायची इच्छा आहे
पण शाळेत घेत नाहीत
माझा दाखला नाही’
‘भीती वाटते मला राजकारणी लोकांची
कधी कुणा गरीबाला ते चिरडून टाकतील’ इ.

हळदीकर सरांनी पाहिलेलं स्वप्न या पुस्तकाच्या रुपाने प्रदीप शिवगण यांच्या अंतःकरणाला भिडलं आणि या दीर्घांकाच्या माध्यमातून त्यांनी ते समाजासमोर मांडलं. आजकालच्या सासू-सुनांच्या टिपिकल मालिका, प्रेमाचे त्रिकोण, कर्कश, बिभत्स रिऍलिटी शोज्‌च्या जमान्यात एका तरुणाने उपेक्षित, अनाथ निराधार मुलांच्या भावविश्‍वावर कलाकृती सादर करणं यातच त्याचं वेगळेपण सामावलेलं आहे. हे वेगळेपण त्यांनी असंच जपावं याकरता त्यांना हार्दिक शुभेच्छा! तसेच सामाजिक बांधिलकीची जाणीव असणार्‍यांनी, जपणार्‍यांनी, हळदीकराचं ‘भीती आणि भिंती’ आवर्जून वाचावं.
-श्रद्धा कळंबटे

प्र. ल. मयेकर ः अष्टपैलू नाटककार

E-mail Print PDF
prabhakar-mayekarमराठी रंगभूमीवर अनेकरंगी यशस्वी नाटकांची आरास मांडणारे गाजलेले नाटककार प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या निधनाच्या बातमीनं रसिक प्रेक्षक हळहळत आहेत. मयेकर रत्नागिरीचे सुपुत्र होते. निवृत्तीनंतरच्या काळात ते रत्नागिरी येथेच रहात होते. पण कर्करोगाने ग्रासल्यानंतर उपचारासाठी म्हणून ते मुंबईत आपल्या मुलीच्या घरी रहात होते. तेथेच त्यांनी अंतिम श्‍वास घेतला. मयेकर सिद्धहस्त नाटककारहोते. एकांकिका लिहिण्यापासून त्यांनी सुरूवात केली आणि नंतर नाट्यलेखनात रमले. त्यांनी दर्जेदार कथालेखनही केले आहे. त्यांच्या प्रतिभेला अनेक पैलू होते. यामुळे त्यांनी सामाजिक वास्तववादी, कौटुंबिक, रहस्यमय, विनोदी आणि थ्रिलर अशी सर्वच प्रकारची नाटके त्यांनी लिहिली. सुमारे तीस वर्षे ते रंगभूमीवर कार्यरत होते. प्रारंभी हौशी आणि कामगार रंगभूमीवर सुमारे एक दशक ते वावरले. नंतर ते व्यावसायिक रंगभूमीवर आले. ४ एप्रिल १९४६ रोजी त्यांचा जन्म झाला. शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते बेस्ट कंपनीत कामाला लागले. त्यांना लेखनाची आवड मात्र शालेय जीवनापासूनच होती. मसीहा हा त्यांचा कथासंग्रह १९७८ मध्ये प्रसिद्ध झाला. प्रारंभीच्या काळात त्यांनी एकांकिका लिहिल्या. त्यात कळसूत्र, अतिथी, रक्तप्रपात या एकांकिकांचा समावेश आहे. १९८५ च्या सुमारास त्यांचं अथ मनुस जगनं हे नाटक गाजलं. या नाटकातून त्यांनी मानवी स्वभावातील क्रौर्य आणि आक्रमकता यांचा शोध घेतला. आदिवासी आणि प्रगत समाजला जाणारा समाज यांच्यातील संघर्ष त्यांनी रंगवला. आदिवासीना समजून घेणारी भाषा तयार व्हायला पाहिजे हे सूत्र त्यांनी मांडले. प्रायोगिक रंगभूमीवर ते नाटक गाजले होते. नंतर मयेकर व्यावसायिक रंगभूमीकडे वळले. अनेक दमदार आणि गाजलेली नाटके त्यांनी चंद्रलेगा या प्रसिद्ध संस्थेमार्फत सादर केली. अग्निपंख हे कौटुंबिक नाटक. मा अस साब्रिन, रातराणी, पांडगो इलो रे बा इलो, दीपस्तंभ ही त्यांची गाजलेली इतर नाटके होती. रमले मी, तक्षकयाग, गंध निशिगंधाचा ही आणखी काही व्यावसायिक नाटके त्यांनी लिहिली. मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली संस्थेने त्यांचे पांडगो हे धमाल नाटक गाजविले. चंद्रलेखा या संस्थेने त्यांची नाटके सादर केली. हसू आणि आसू तसेच गोडीगुलाबी ही आणखी काही नाटके त्यांनी रंगविली. त्यांची सर्वाधिक नाटके चंद्रलेखानेच सादर कली. त्यांच्या अनेक नाटकांचे महोत्सवी प्रयोग झाले. वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर यांच्यानंतरच रंगभूमीवरचा एक आघाडीचा यशस्वी नाटककार म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्यांच्या भाषा प्रभुत्वाची विशेष चर्चा होत असे. प्रभावी व्यक्तिचित्रण, मोजक्या शब्दात अत्यंत मार्मिक संवाद लेखन, नाट्य फुलविण्याची कुशलता आणि बांधेसूद अशी नाट्यकथा यामुळे रसिकांनी त्यांच्या नाटकांना नेहमीच पसंतीची पावती दिली. प्र. ल. मयेकर स्पष्टवक्ते आणि अत्यंत शिस्तीत लेखन करणारे होते. त्यांच्या गोष्टीवेल्हाळ आणि आत्मीयतेविषयी अनेकजण सांगतात. रत्नागिरीमध्ये निवृत्तीनंतर ते राहिले होते. तेथे रमले होते. त्यांच्यामुळे रत्नागिरीतील साहित्य विश्‍वात चैतन्य निर्माण झाले होते, कोमसापच्या अनेक उपक्रमांमध्ये ते आनंदाने सहभागी होत असत. नवोदित साहित्यिकांशी गप्पा मारण्यात रमून जात. एक सच्चा माणूस आणि अष्टपैलू नाटककार हरपला याची खंत आहे. त्यांनी सुमारे दोन दशके रंगभूमीची आपल्या गुणवंत कलाकृतींच्या माध्यमातून जी सेवा केली तिची नोंद रंगभूमीच्या इतिहासात कायमची राहील.
-भालचंद्र दिवाडकर
(ज्येष्ठ पत्रकार)

कोकणच्या पदवीधरांना आता आमदार दर्शनाचा योग!

E-mail Print PDF
niranjan-davkhareकोकणच्या तमाम पदवीधरांना एक सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. पदवीधर मित्रांनो आठवतंय का?.. पावणेतीन वर्षापूर्वी आपण एका तरूणाला विधान परिषदेवर पाठवलं होतं? काय बरं नाव त्याचं? ... अं... हो... वसंतराव डावखरेंचे पुत्र निरंजन डावखरे. पदवीधरांचे आमदार. आता त्यांच्या दर्शनाचा योग तमाम मतदारांना आला आहे. कारण त्यांची त्यांच्या पक्षाने म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसने युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. आणि याच निमित्ताने त्यांचे नाव बर्‍याच दिवसांनी कानावर पडले आहे.
प्रार्थना केल्यावर देवही भेटतो. पुढच्या वर्षी लवकर या असा निरोप दिल्यावर गणपतीबाप्पाही दरवर्षी येतो, पण निवडून आल्यापासून पदवीधरांना मात्र गेल्या तीन वर्षात आ. निरंजन डावखरेंचे दर्शन काही झालेले नाही. या कालावधीत त्यांनी पदवीधरांसाठी नेमके काय काम केले हेही गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे निरंजनाचा उजेड उदबत्ती इतकाही पडला नसल्याची होणारी टीकाही रास्त वाटते. आपल्या मतदारांशीही संपर्क नसलेल्या व्यक्तींची पक्षाच्या मोठ्या पदावर झालेली निवड म्हणूनच आश्‍चर्यकारक वाटते. पक्षाने मुंबईप्रमाणे ठाणेही स्वतंत्र प्रदेश करून ते अध्यक्षपद त्यांचेकडे सोपवले की काय? असा प्रश्‍न पडतो.
पावणेतीन वर्षाच्या आमदारकीनंतरही निरंजन डावखरेंची अद्यापही ओळख वसंतरावांचे पुत्र अशीच आहे. कारण या कालावधीत त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माणच केलेले नाही. असेल तर केवळ ते ठाण्यापुरतेच राहिले आहे. अशा नेत्याकडे संपूर्ण राज्याची जबाबदारी सोपवून पक्षाने फार मोठे धाडस केले आहे. किमान त्या निमित्ताने ते ठाण्याबाहेर फिरतील अशी पक्षाच्या नेतृत्वाची अपेक्षा असू शकते. वसंतरावांचे पुत्र म्हणून नेता होता येवू शकते पण तो नेता व्हायचे असेल तर त्यांना आता आपले कर्तृत्व दाखवून देण्याची वेळ आली आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची मोठी पडझड झाली. या पक्षाला स्थापनेपासूनच आपणच नंबरवन आहोत, अशी स्वप्ने पडत आली आहेत. या स्वप्नातून जागे होवून वास्तवाकडे पाहण्याचे प्रयत्न कधी राज्य, जिल्हा, तालुका पातळीवरच्या नेत्यांनी केले नाहीत. त्यातच राष्ट्रवादी हा कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचा मोठा भरणा असलेला पक्ष. नेत्यांचे वारसदारही मोठ्या संख्येने पक्षात कार्यरत झाले. यामुळे तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्याला पुढे संधी राहिली नाही. या पैकीच एक निरंजन डावखरे. वडिलांनी त्यांना तिकिट मिळवून दिले. निवडणुकीत त्यांनी पदवीधर तरूणाईला छान छान स्वप्न दाखवली. निवडून आल्यावर त्यांनी मतदारांकडे पाठ फिरवली. त्यांच्या विजयात तळ कोकणच्या मतदारांचा मोठा वाटा आहे. खरं तर शिवसेनेशी जोडल्या गेलेल्या इथल्या तरूणाईने त्यांना कौल दिला होता.
लोकप्रतिनिधी म्हणून पूर्णतः अपयशी ठरलेल्या या युवा नेत्याकडे प्रदेशातल्या युवकांना राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याची जबाबदारी सोपविली गेली आहे. आता त्यांना राज्यभर दौरे करावे लागणार आहेत त्यात त्यांना कोकणातही यावे लागेल. आणि ज्या मतदारांनी निवडून दिले त्यांनाही दर्शन द्यावे लागेल. या सर्वांची सवयच नसल्यामुळे हे काम त्यांच्यासमोर आव्हानात्मक असेल. आज राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती बेताचीच आहे. कोकणातही फारसे वेगळे चित्र नाही. अशा वेळी नव्याने पक्ष उभारणी करता युवा शक्ती पक्षाकडे वळण्याची फार मोठी जबाबदारी नेतृत्वाकडे असेल. खरं तर पक्षाने या पदावर एखादा सक्षम, बोलका, कार्यतत्पर आणि संघटनात्मक कौशल्य असलेला नेता देण्याची गरज होती. अशा वेळी हे चित्र बदलण्याचे काम कोकण आणि राज्यात ते करू शकतात का? ती कुवत त्यांच्याकडे आहे का? याबाबत शंका आहे.
आज पक्षाकडे सत्ता नाही. त्या स्थितीत त्यांना काम करावे लागणार आहे. सर्व प्रथम फसलेल्या मतदारांची माफी त्यांना मागावी लागणार आहे, निव्वळ वरिष्ठ नेते इथे आल्यावर व्यासपीठावरची खुर्ची सजवण्यापलिकडे आजवर त्यांची मजल गेलेली नाही. आता व्यासपीठावरून खाली उतरून लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये त्यांना मिसळावे लागणार आहे.
-राजेश मयेकर
ज्येष्ठ पत्रकार

Page 2 of 14