Tuesday, Jan 23rd

Headlines:

इतर

‘‘अंधश्रद्धेच्या गटारगंगेचे शुद्धिकरण, त्यासाठी...!

E-mail Print PDF
dr.-dilip-pakhare२० ऑगस्ट २०१३ ही सकाळ. एका चळवळीच्या आधारस्तंभ व्यक्तीमत्वाची काळ ठरली. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच अर्ध्वयु डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा पुण्यात खून झाला. पण मारेकर्‍यांना हे उमगले नाही की डॉ. दाभोळकर हे एका विचारनिष्ठ संस्थेचे अधिपती होते. व्यक्तिनिष्ठ नाही, विचारनिष्ठ संघटनेत स्वावलंबी कार्यकर्ते असतात. ते कृतीचे विचार पुढे नेत असतात. याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिनांक २६ ऑगस्ट २०१३ रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष, अनिष्ठ व अघोरी प्रथा जादूटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा हा अध्यादेश काढला.
भयापोटी, असुरक्षितता, लोभ, द्वेष आणि सत्ता, आकांक्षा या पायी लोक असुरी आकांक्षा असणार्‍या लबाड आणि धूर्त लोकांच्या पद्धतशीर अघोरी विचार प्रणालीला बळी पडत असतात. स्वार्थ हाच या लोकांचा देव असतो. अज्ञानी, भयभीत आणि असुरक्षित साधी भोळी माणसे अशा विचारसरणीला शरण जातात. अंधश्रद्धा वाढीस लागते. वस्तुतः देवाला शुद्ध आणि पवित्र मनाची आर्त प्रार्थना पुरेशी असते. देवाला नवस वगैरे नको असतो. पण स्वार्थांध पिपासू संकटात सापडलेल्या किंवा नडलेल्या गरजवंतांना बरोबर हेरतात. मग दुष्टचक्र सुरू होते. अंधश्रद्धा फोफावते. एका पद्धतशीर भोळ्या भाबड्या भक्ताची फौज या कामी लागते. गंमत म्हणजे बर्‍याच या भोळ्याभाबड्या भक्तांनाही याची जाण नसते. त्यांना वाटत असते, आपण एक चांगलं काम करीत आहोत. तर अशा या फौजेच्या बळावर लोभी आणि सत्ता पिपासू यांचे पोट भरते. त्यांचे इमले उभे राहतात. तर गरजवंत कर्जात आणि दुःखात बुडत जातात. ही मनावरची अश्रद्ध पकड इतकी जबरदस्त असते की इथे विचार आणि विवेक खुंटतो. अंधश्रद्धेची विषवेल त्याची साखळी अशी फोफावते.
वस्तुतः ज्या गोष्टीतून, कृतीतून आणि क्रियेतून मानसिक, शारिरीक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि अध्यात्मिक नुकसान होते, प्रसंगी मृत्यूही होतो, त्याला अंधश्रद्धा असे म्हणतात.
हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा अध्यादेश कुठल्याही धार्मिक, आध्यात्मिक, पंथ, जात आणि परंपरा याला विरोध करत नाही. तर ज्या अनिष्ठ प्रथा किंवा घृणास्पद कृतीमुळे माणसाचे किंवा माणूस या समूहाचे नुकसान होते, अशाच पद्धतीला या विधेयकाचा विरोध आहे. वारकरी, पंथ, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्‍वर आणि संत एकनाथ यांच्या ओव्यातूनही माणसाने अंधश्रद्धेेला आणि अनिष्ठ प्रथांना बळी पडू नये असे भाष्य आहे. प्रा. शाम मानव एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, अध्यक्ष आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे विचारवंत आपल्या अभ्यासातून सातत्याने हे सांगत असतात.
खरा परमार्थ, अध्यात्म हा सत्यमेव जयतेचा मार्ग असतो. तो अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला थारा देत नसतो. चिन्मय मिशनचे श्री. पुरूषोत्तमानंद सरस्वती यांचा गीता ज्ञान यज्ञ समिती निमित्त माझा संबंध आला. मी तीन चार वर्षे अध्यक्ष होतो. त्यांनी गीता ज्ञानाचा आध्यात्मिक आरोग्य आणि उन्नती या निमित्ताने प्रचार प्रसार केला. ते म्हणत, ‘मी चमत्कार करत नाही’ असाच एक प्रसंग, एका रूग्णाला आणि घरच्या लोकांना ईश्‍वरावर आणि डॉक्टरांवर विश्‍वास ठेवून उपचार करत रहा असे सांगितले. सोबत अध्यात्मिक आरोग्याच्या बाबत मार्गदर्शन केले. कुठलीही बिदागी घेतली नाही. तरीही त्या बाईने दक्षिणा दिली. काही दिवसांनी चिन्मय मिशनची रितसर इन्कमटॅक्स क्रमांकासह पावती आली.
या प्रसंगावरून खर्‍या अध्यात्मिक आरोग्यात चमत्कारांना थारा नसतो. तर मनापासून केलेली प्रार्थना आत्मिक ऊर्जा आणि बळ देते, हेच सिद्ध होते. आजही चिन्मय मिशनचं कार्य अव्याहत याच चिंतनावर सुरू आहे.
    न्या. राम केशव रानडे लिखित जीवन गीताच्या चौथ्या भागात अंधश्रद्धेबाबतच्या उत्तरात त्यांनी एक सत्यकथा सांगितली. अंधश्रद्धा यामुळे घडलेल्याnarendra-dabholkar1 निष्ठूर खूनाची ही सत्य घटना अंतःकरण हादरवून सोडणारी आहे. अशा अनेक घटना घडल्या आहेत. घडत आहेत. या २०१३ सालीही घडत आहेत.
त्यांनी सांगितलेली ही कथा. हा खून १४ जानेवारी १९७५ चा आहे. पण घटना आजही अशीच घडते. मकरसंक्रांतीची रात्र. विजया सोहनी नाशिक येथे नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होती. ती अविवाहित होती. तिच्या अंगात मिरावली बाबांचा संचार होत असे, अशी समजूत. तिचा भाऊ अशोक सोहनी एस.टी.त मेकॅनिक. जून १९७३ मध्ये त्याचा शुभांगीशी विवाह झाला. त्यांना जान्हवी नावाची मुलगी. गुहागर ह्या तिच्या माहेरहून तिने लाकडी साप आणि कापडी हत्ती ही या मुलीसाठी खेळणी आणली होती. त्या खेळण्यावरून लाकडी साप आणि कापडी हत्ती ही चेटूक करण्याची साधने आहेत असे विजया, तिची नणंद म्हणू लागली. १४ जानवारी रात्री दहा वजता तिच्या अंगात हे मिरगळ बाबा शिरले. त्यांच्या कथनावरून तिच्या नवर्‍याने अशोकने आणि विजयाने तिचा छळ सुरू केला. तिच्या अंगावर काठीचे सपासप वार ते दोघेही करू लागले. ती किंकाळ्या मारून ओरडत होती. रडत होती, ‘या चेटकाचा मणी दे’ असे विजया म्हणत होती. पण मणी तसनाना शुभांगी मणी कसा देणार? शुभांगीने पाणी मागितले. ते म्हणाले, ‘आधी मणी आणि मग पाणी’ मारामुळे शुभांगी मेली. (इथे मी सायकोसोशल प्रोसेस बद्दल विस्तारभयामुळे भाष्य करीत नाही, हिस्टेरीकल एवढेच सध्या सांगतो.)
सकाळी अशोकने आजारामुळे मृत्यू अशी खोटी नोंद करून व एका डॉक्टरला बोलावून तिचा अंत्यसंस्कार उरकून घेतला. जेव्हा सेशन्स कोर्टात हा खटला सुरू झाला. तेव्हा गर्दीने उच्चांक मोडला. गर्दीवर नियंत्रणासाठी पोलीस कुमक ठेवावी लागली. अशोक आणि विजया यांना सेशन कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. पुढे हायकोर्टाने ती शिक्षा कायम केली.
अंधश्रद्धेमुळे एका सुशिक्षित कुटुंबाची कशी वाताहात झाली, याची ही कथा हृदय हेलावून सोडणारी, इथे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबतचा, त्यांचा समूळ उच्चाटन करण्याचा अध्यादेश याच कार्य सुरू होते. यात बारा कलमे समाविष्ट आहेत. छोटे नामकरण जादू टोना विरोधी विधेयक असे आहे.
यानुसार अनिष्ठ प्रथा करणार्‍यांना कमीत कमी सहा महिने कैद व पाच हजार रुपये दंड ते जास्तीत जास्त सात वर्षे कारावास आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठेवण्यात आली आहे. नव्या प्रारूप ५ नंबरचे आणि १३ वे कलम पूर्णतः काढून टाकण्यात आले आहे. ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला शारिरीक, मानसिक आणि आर्थिक बाधा पोहचत नाही असे कोणतेही धार्मिक विधी व कृत्य अंतर्भूत असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणत्याही गोष्टी लागू होत नसल्याचे या विधेयकात स्पष्ट केले आहे. मी वर्षानुवर्षे माझ्या व्यक्तीगत पातळीवर हेच सांगत आलो आहे. या लेखाच्या तिसर्‍या पॅरात याची स्पष्ट व्याख्या मी लिहिली आहे.
या अध्यादेशात नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ, अघोरी प्रथा, जादूटोणा, भूत उतरविणे, त्यासाठी त्याचा छळ करणे, उदा. साखळीने, दोरीने बांधणे, मिरचीची धुरी देणे, जबरदस्तीने लैंगिक अत्याचार, चमत्कारांचे प्रयोग, मौल्यवान वस्तू, गुप्त धन, जलस्त्रोतासाठी भानामती, करणी, जारणमारण क्रिया, भूतबाधा, एखादी व्यक्ती अपशकुनी आहे असे भासवून संशय निर्माण करणे, चेटूक, त्याच्या नावाखाली धींड काढणे, एखाद्या व्यक्तीला वैयक्तिक उपचारापासून दैवी चमत्काराच्या नावाखाली रोखणे, कुत्रा, साप, विंचू चावल्यास मंत्रतंत्राद्वारे, गंडे दोरे सारखे उपचार करणे असे अनेक समाज मन कलुषित करणारे, कुटुंबाचे व व्यक्तीचे सर्व प्रकारे शोषण करणारे, कुणालाही पटावे अशा गोष्टींवर नेमके बोट ठेवले आहे. नेमकेपणा हे या विधेयकाचे वैशिष्ट्य आहे. या कायद्याच्या निर्मितीमध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर, डॉ. शाम मानव, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, कित्येक तंत्र आणि राजकीय धुरंधर आणि शासकीय प्रज्ञावंत यांनी परिश्रम घेतले आहेत. या अध्यादेशाचे सर्वस्तरीय स्वागत व्हायलाच हवे.
संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांचा या अनुषंगाने उल्लेख आवश्यक आहे. त्यांनी सर्व सामान्यजनांशी त्यांच्याच भाषेत त्यांच्याकडूनच त्यांच्या प्र्रश्‍नांची उकल करून त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले आहे. हे विधेयक हे आणि अशा संतांनी व गाडगेबाबांनी केलेल्या कृतीपूर्ण विचारांचा परिपाक आहे. मात्र या अंधश्रद्धा निर्मूलन विचार अभिसरणात डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारख्या विचारनिष्ठ कार्यकर्त्यार्ंंचा हकनाक खून झाला. पाप अशाच कृत्यांना म्हणतात.
गीतेत एका श्‍लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘‘ईश्‍वर सर्व भूतांना हृदेशेऽर्जून तिष्ठती’’ म्हणजेच ईश्‍वर दुसरीकडे कुठेही नसून तो आपल्या अंतःकरणात आहेत. हेच चिरंतन सत्य आहे. सत्यं शिवं सुंदरम् आहे. म्हणूनच की काय हेच तत्वज्ञान ज्यावेळी महान तत्त्ववेत्ता डॉ. जोड यांनी वाचले, अनुभवले, तेव्हा हे नास्तिक तत्त्ववेत्ता जो आयुष्यभर म्हणत होते, 'GOD IS NOW WHERE' म्हणू लागले, 'GOD IS NOW HERE'.’.
हे विधेयक अशा सर्व जगातल्या चांगल्या मानवीय भावनांची कदर करते. आध्यात्मिकतेला आणि आनुषंगिक आध्यात्मिक आरोग्याच्या कुठल्याही कृतीला विरोध करत नाही, मानवीय कल्याण, समाधान, शांती, विधायक, कृतीशीलता, सुख आणि आनंद या मानसशास्त्रीय परिपक्वतेच्या कुठल्याही संकल्पनांना विरोध करत नाही, तर अंधश्रद्धेच्या गटारगंगेच्या शुद्धिकरणासाठी कृतिशील भाष्य करते.
-डॉ. दिलीप पाखरे
१०२७, ॐ उत्तम लक्ष्मी, सौभाग्यनगर,
नाचणे, ता. जि. रत्नागिरी-४१५६३९
मोबा. ९९७०२०२०४९

समलैंगिकतेला लगाम!

E-mail Print PDF

Page 7 of 14