Tuesday, Jan 23rd

Headlines:

इतर

विठ्ठलाची सुटका

E-mail Print PDF

‘‘तंटामुक्ती सामाजिक स्वास्थ्याचा ओनामा...!’’

E-mail Print PDF
dr.-dilip-pakhareसहजीवनाचे जल आणि विकासाचा प्रवाह यासाठी सामाजिक स्वास्थ्याची गंगा सातत्याने प्रवाहीत असावी लागते. यात भांडण, तंटे, व्यसने, हेवेदावे, गुन्हे, मारामारी आणि ऐक्यास बाधक असा कचरा जमायला लागला तर ही जीवनदायीनी स्वस्थ गंगा सामाजिक असंतोष आणि विकासाचा प्रवाह थांबवणारं प्रदूषण करते. हे प्रदूषण घातक असतं.
महात्मा गांधी म्हणायचे, ‘खेड्यात चला’ खेड्यात देश जगतो. आज खेडी शहराकडे धावताहेत. खेडी ओस पडू लागली आहेत. त्याची अनेकविध कारणे आहेत.
मात्र खेड्यातच विकासाचे स्वास्थ्य लाभले तर! ‘तंटामुक्त गाव’ हा एक त्यातला महत्वाचा घटक आहे. दुवा आहे. अलिकडेच ‘माय जर्नी-ट्रान्सफॉमिंग ड्रीम्स इन टू ऍक्शन’ हे ए.पी.जे. अब्दुल कलाम आपले शास्त्रज्ञ संशोधक आणि माजी राष्ट्रपती यांच्या आयुष्यावरील ओझरता चरित्रात्मक प्रवास वाचला. त्यांनी त्यात आपल्या लहानपणची आठवण सांगितली. त्यांचे वडील जैनुलबदीन स्थानिक मशिदीत इमाम होते. त्यांचे गावातील जवळचे मित्र लक्ष्मणशास्त्री हे ऐतिहासिक रामनाथन मंदिराचे पुजारी होते. तसेच फादर बोडेन यांच्याशी त्यांची मैत्री होती. अनेक विषयांवर या तिघांचा संवाद चाले. त्यामुळे गावात एखादी समस्या निर्माण झाली तर त्यांचे तातडीने निराकरण होत असे. अशी आठवण सांगताना गावामध्ये सलोखा राहण्यासाठी संवादाची कशी गरज आहे, हे मा. कलामसाहेब यांनी अधोरेखित केले आहे.
उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार माणूस हा समूहप्रिय प्राणी आहे. ‘‘संस्कार आणि संस्कृती’’ यामुळे तो प्रगत होत गेला. विज्ञानाची साथ लाभली. तो मानव झाला. बुद्धीची अफाट शक्ती, कर्तव्यपूर्ती, निर्मिती आणि चिंतन यातून हे घडलं. सामाजिक बंधनाचा ओलावा ही त्यांची मानसिक मुलभूत प्रेरणा त्याला सातत्याने या बंधनाची जाणीव करून देत राहिली.
तंटामुक्तीची ही संकल्पना, प्रत्यक्ष कृतीची ही विधायक प्रेरणा, मानशास्त्रीय सहिष्णुता, करूणा आणि सहजीवनाच्या प्रेरकांनी भरलेली आहे. मा. ना. श्री. आर. आर. पाटील आणि त्यांचे सहकारी ज्यांनी ही संकल्पना प्र्रत्यक्षात आणण्यास, ती घडविण्यास हातभार आणि बुद्धीभार लावला, त्यांना या निमित्ताने नमस्कार. संपूर्ण देश कालांतराने ही संकल्पना राबवेल. आताच काही देश ही संकल्पना उचलणार आहेत, असे वाचले.
‘संपूर्ण आरोग्याची’ जागतिक आरोग्य संघटनेने एक व्याख्या केली आहे. ‘‘शारिरीक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्य म्हणजेच संपूर्ण आरोग्य. ‘‘मानसिक स्वारस्थाच्या प्रेरकातून’’ सामाजिक स्वास्थ्याची गंगा उगम पावत असते. तंटामुक्तीच्या मुलभूत संकल्पना ह्याची रूजुवात मानसिक स्वास्थ्यातून होत असते. एका व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य संपूर्ण समूहाच्या सामाजिक स्वास्थ्याची प्रेरक गंगोत्री ठरत असते.
मानसिक स्वास्थ्य, व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावर कार्यरत असते. तंटामुक्तीची ध्येयधोरणे ह्याच गोष्टीकडे अंगुलीनिर्देश करते. उदाहरणार्थ दिवाणी खटले, यात स्थावर मालमत्तेचे मालकी हक्क येतात. वारसा हक्क येतो. मालमत्तेची खरेदीविक्री येते. हस्तांतरण येते. गहाणवटी, कर्जे, पोटगी, इत्यादी अनेक घटक येतात. एखाद्याच्या मनाला हे पटलं. एखाद्यानं समजून घेतलं की मार्ग सुकर झाला असं समजावं. पुढील वाटचाल सुलभ. यासाठी माणसाच्या मनात सतत विचार सुरू असतात. ते घातक असू शकतील किंवा विधायक म्हणजेच समेटाचेही असू शकतील. अशा विधायक समेटाचे विचार यांना तंटामुक्ती समितीची गाव पातळीवरील मनःशक्ती असलेली, मनस्वास्थ्य असलेली मंडळी जी या अभियानाची कार्यकारिणी असेल किंवा असते, त्यांच्या समोर आणेल.
मग वैचारिक प्र्रक्रिया, विचारांची देवाण घेवाण, क्वचित आरोप प्रत्यारोपही, पण त्यातून समेट. संपन्न तंटामुक्ती, आरोपी-प्रत्त्यारोपी यांच्या मनात विधायक समेटाचे बीज रूजवतील. फुलतील आणि फुलवतील. त्यातून मानसिक सकारात्मक विचारांचं फुल बहरेल. परिणाम सर्वांना शांती, सर्वांचं समाधान. एका कुटुंबातील शेजार्‍या पाजार्‍यातील अनेक प्रश्‍न, समस्या, ज्यातून तंट्याचं सामाजिक स्वास्थ्यचं रूप विद्रुप होईल अशा घटना तिथल्या तिथे आटोक्यात येतील.
वर्षानुवर्षे भांडणे, व्यसने, एकमेकांवरील कुरघोडी यातून कुठलं आलं हो मानसिक स्वास्थ्य. एका माथेफिरूचं मानसिक अनारोग्य किंवा त्याची विघातक मानसिक प्रक्रिया संपूर्ण समाजाला विद्रूप करून टाकते. भावनेच्या भरात हे कळत नाही. जेव्हा कळते, तेव्हा वेळ गेलेली असते. म्हणून गावातील लोकांनी असे तंटे आणि विघातक प्र्रक्रिया सरळ आपल्या गावच्या कार्यकारिणी मंडळात त्यात पोलीस पाटीलही असतात. गेलं तर कार्य नक्की सुलभ होईल. तंटामुक्तीचा मार्ग प्रज्वलीत होईल. एक कुटुंब सुखी होईल. त्यांच्या कटकटीमुळे शेजार्‍यांना त्रास, म्हणून त्यांना सुटकेचा श्‍वास घेता येईल. सडक्या आंब्याच्या टोपलीसारखी व्यथा आणि कथा घडणार नाही.
तसं बघायला गेलं तर सर्वांनाच शांती हवी असते. मात्र एखाद्या प्रक्रियेत एखाद्याला आपला दोष दिसत नसतो. विघातक प्रक्रिया घडताना तीन पातळीवर माणसांचे मन कार्यरत असतं. इंग्रजीत त्याला ईद, ईगो आणि सुपर ईगो असं म्हणतात. जे समजून घेत नाहीत. त्यांचा अहंकार आडवा येत असतो. ही माणसे ईद आणि ईगोच्या पातळीवर काम करीत असतात. समाजात हीच माणसे उलट्या काळजाची असतात. सुपरईगो म्हणजेच सदसदविवेक बुद्धी असणारे समंजस व्यक्तीमत्व ही माणसे विधायक, निर्मितीक्षम, चिंतनक्षम आणि कार्यकुशलता जपणारी असतात. अशीच माणसे ह्या कार्यकारिणीवर निमंत्रक म्हणून असावीत. वशिलेबाजीचा घोडा सर्वांच्या भल्यासाठी शक्यतो टाळावा. अशी माणसे मग आपलं माणूस जागवणारं माणूसपण फारशी कटुता न येवू देता पणाला लावतात.
कुठलाही गुन्हा मग ते साधं तंबाखूचं किंवा दारूचं व्यसन असो किंवा विद्यार्थ्याला शिक्षकाने  शिवी देणं असो, त्याची एक ठराविक विघातक मानसिक प्रक्रिया अशा ईद, ईगो या पातळीवर घडते. हे एखाद्या समुहाच्या मनातही घडते. ह्या माणसांच्या मनात विघातक विकारांचे विचार प्रबळ ठरतात. तो विचार विकृत असतो. तंटामुक्ती मोहीम अशा विकारक मुद्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. ही मोहीम सनदशीर वैचारिक असते. एक वेळ अशी येते की, ह्या विकारांना विचार मात देते. माणसाच्या मनात एक समंजस संवेदना जपणारं हृदय नेहमी कार्यरत असतं. सत्वशील बुद्धी कार्यरत असते. त्यालाच विवेक म्हणतात. हा विकार विचार आणि विवेक या पायर्‍यांवर आणतानाच खरी कसोटी या पायर्‍यांवर आणतानाच खरी कसोटी असते. हा विवेक जागृत झाला की विधायक बदल घडू लागतात. तंटामुक्ती अभियान हे गावात विवेक जागृती करण्याचं महत्वाचं विशाल कार्य करते. गाव तंटामुक्त होते.
एक गाव तंटामुक्त झाले की मग विकासाच्या गंगेतील हा अडसर दूर होऊन स्वस्थतेचा प्रवास सुरू होतो. एक गाव सुधारलं की दुसरं, मग शहर, राज्य आणि देश. गुणांकनाचे तक्ते चांगल्या गुणांनी भरू लागतात. पुरस्कार मिळतात. हिच संकल्पना तंटामुक्तीची आहे. महात्मा गांधी एके ठिकाणी म्हणाले होते, ‘‘ज्या विचाराला कृतीचे अधिष्ठान नाही, अशा विचारात मला रस नाही, आणि ज्या कृतीला विचाराचा भक्कम पाया नाही, अशा कृतीत मला स्वारस्य नाही. इथे या तंटामुक्ती संकल्पनेत सर्व काही आहे. ‘वन एन ऑल’.
पुरस्कार आणि मान सन्मानापेक्षा आपण अजून एक मोठ काम करत असतो. कुठल्याही गोष्टीचा ठराविक एक ‘बॉय प्रॉडक्ट’ असतो. अपेक्षा करा अगर करू नका. बॉय प्रॉडक्ट हमसखास असतोच. या तंटामुक्ती अभियानाचा एक अपेक्षित बॉय प्रॉडक्ट म्हणजे येणार्‍या भावी पिढीसमोर आदर्श गावाचा कृतीशील संदेश मिळेल. आजच्या कुशीत भावी पिढीची सुरक्षितता याचा विचार व्हायलाच हवा. स्वप्नातला भारत इथे घडतो.
या तंटामुक्ती अभियानातील एक गोष्ट मला भावली. सामाजिक स्वास्थ्याचे माझ्या मते ते एक बाळकडू आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजनेत ८० गुणांच्या नामांकनाची कलमे. त्यात सार्वजनिक सण, उत्सव, रचनात्मक पद्धतीने व शांततेने साजरे करणे, जातीय आणि धार्मिक सलोखा निर्माण करणे, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे संरक्षण करणे व विद्रुपीकरण रोखणे, ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यरत करणे, अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्याचं निर्मुलन करणे आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी कार्यक्रम राबविणे इत्यादी या मुख्य कलमांनाही उपमार्गदर्शक कलमे आहेत. उदा. व्यसनमुक्ती, एक गाव एक गणपती, इत्यादी ही सर्व कलमे आणि उपकलमे यात मानसिक स्वास्थ्याच्या सर्व कसोट्या पुरेपूर खर्‍या ठरणार्‍या आहेत.
‘अहिंसा’ हे तत्व शांतीचे द्योतक आहे. वैश्‍विक शांती, एकोपा, सकारात्मक, विधायक निर्मितीक्षम सामाजिक स्वास्थ्याच्या पोषणाचे तत्व त्यात दडलेले आहे. या तत्वाचा महात्मा गांधीनी पुरस्कार केला. मार्टीन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यांनी त्यावर हुकूम क्रांती घडवून आणली. जगभर हे तत्व मान्य झालं. म्हणूनच तंटामुक्त गाव मोहिमेला महात्मा गांधीचं नाव अतिशय समर्पक आणि दिशादर्शक आहे. अहिंसेचं तत्वज्ञान सामाजिक स्वास्थ्याचं, आरोग्याचे कथन करते. तंटामुक्त समाजावर भाष्य करते. फक्त त्यातलं मर्म, गाभा आणि अंतःस्थ हेतू समजून घ्यावा. पूर्वी गाव पंचायत असायची. याचंच हे अभियान आधुनिक रूप आहे. तंटामुक्त अभियान हे सामाजिक स्वास्थ्याचं अभिसरण करून विकासाच्या कृतिशील विचारांचे प्रवाह प्रवाहीत करते.
-डॉ. दिलीप पाखरे
१०२७, ॐ उत्तम लक्ष्मी, सौभाग्यनगर,
नाचणे, ता. जि. रत्नागिरी-४१५६३९
मोबा. ९९७०२०२०४९

आक्रमक राहुल!

E-mail Print PDF

Page 6 of 14