Tuesday, Jan 23rd

Headlines:

इतर

अपंगांसाठी हक्काचं माहेरघर आधार माया -पुस्तकाचे परिक्षण

E-mail Print PDF
dr.-dilip-pakhareअंतःकरणाची भाषा माणुसकी जगवते. श्री. माधवराव गोरे निवृत्त झाले. आपले काम करतानाच ते विविध सामाजिक कार्य आणि त्या संबंधित संस्थांशी जोडले गेले होते. मुंबईतील चिल्ड्रन एड सोसायटीमध्ये ते चाळीस वर्षे कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा अनाथ, अपंग, बाल गुन्हेगार आणि मतिमंदांशी सतत संबंध येत होता. दुःखाची, प्रचंड उपेक्षेची ही गाठोडी वाहून नेणार्‍या व्यक्तींना ते दररोज पाहत होते. तेव्हा या गाठोड्यांच्या गाठी कशा बरे सोडविता येतील. अशा विचारात ते गर्क असत. त्यातूनच ते सक्र्रीय झाले.
एके दिवशी त्यांना एक बातमी वाचावयास मिळाली. ती बातमी होती ‘एका सत्तर वर्षीय वृद्धेने आपल्या ४५ वर्षाच्या मतिमंद मुलाची. आपल्यानंतर याचे कसे होणार या काळजीतून हत्या केली होती. अवघ्या ३/४ ओळीच्या या बातमीने ते अस्वस्थ झाले. हा प्रश्‍न केवढा भयंकर आहे याची बोच त्यांना छळू लागली.
अशाच विचारांच्या आवर्तनात त्या काळात एका मित्राने त्यांना म्हटले होते, ‘‘मलाही एक मतिमंद मुलगी आहे. ती ३५ वर्षाची आहे. मी सत्तर वर्षांचा आहे. बायको वारली आहे. या मुलीचे माझ्या मागे कोण करील? तू इतकी वर्षे सामाजिक संस्थांमध्ये काम करतोस, या मुलीचं भविष्य मी कुणावर सोपवाव?’’ पुन्हा ते व्याकुळले. पालकांच्या बैठकीत हेच विचार, यावर मंथन. नेमका अंतर्मुख करणारा प्रश्‍न. त्यापैकी एकाला माधवराव गोरे यांनी उत्तर दिल, ‘‘मी करणार, प्रौढ मतिमंदांच्या निवासाची व्यवस्था!’’
दुसर्‍याच दिवशी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मुलीने उपचारासाठी इंग्लंडला नेले. भारतात आल्याबरोबर माधवराव कामाला भिडले. १९९० ते १९९९ पर्यंत माधवराव गोर्‍यांच्या कर्तृत्वाने एका प्रचंड वृक्षाची घनदाट सावली ‘आधार’ संस्थेच्या कपात धारण करून फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावून त्याला मजबूत करण्याचा प्रयत्न, त्याची यशोगाथा, त्यांच्या समस्या, त्यांची कार्यशाळा, त्यांची राहण्या-जेवणाची व्यवस्था, त्यांचे उपचार, त्यांचे कार्यकर्ते, पगारी सेवक, ह्या सर्वांचा प्रवाही आढावा नेमक्या हृदयस्पर्शी पुस्तकात, ‘आधार माया’ या पुस्तकात डॉ. शुभा चिटणीस यांनी वेध घेतला आहे. समाजातील तीन टक्के मतिमंद, पण त्यांच्या पुनर्वसनाची व्याप्ती प्रचंड, न पेलणारी या विषयाला वाहिलेल्या एका जिद्दी माणसाच्या निर्मितीची कथा. त्याच्या नंतर त्यांच्या मुलाने श्री. विश्‍वासराव गोरे, त्यांच्या पत्नी, त्यांची डॉक्टर बहिण आणि असे अनेक समविचारी देणगीदार आणि समविचारी कार्यकर्ते, आरोग्य सेवक यांच्या अंतःकरणापासूनच्या सेवेची ही कहाणी आह. डॉ. शुभा चिटणीस यात, या कथनात शंभर टक्के यशस्वी झाल्या आहेत. कारण अंतःकरणाची गावा माणुसकी जगवते.
नीला सत्यनारायण, आय.ए.एस. आपल्या निवडणूक आयुक्त आणि कार्यशील विचारवंत यांनी या आधारमाया पुस्तकाला ‘आधाराचा हात adharmayaया अंतर्गत शुभेच्छा दिल्या आहेत. त्या या पुस्तकात लिहितात, ‘स्वतःची मुलगी गमावल्यानंतर चिटणीस दांपत्याने आपले सर्व लक्ष सामाजिक प्रश्‍नांवर केंद्रीत केले. जगतो कशासाठी याचा अर्थ प्रत्यक्ष आचरणात आणून अनेक सामाजिक कार्ये हातात घेतली. ‘आधारमाया’ हे पुस्तक मतिमंदांच्या संपूर्ण पुनर्वसनाच्या उपक्रमावर आधारित ‘आधार’ या विषयांतर्गत आधारित आहे.
त्या या पुस्तकाच्या निमित्ताने लिहितात ‘मी एक मतिमंद मुलाची आई असल्याच्या अधिकार भूमिकेतून पालकांना नम्र विनंती करेन की या मुलांशी सामान्य मुलांप्रमाणेच जरूर वागा. परंतु कुठल्याही प्रकारची हिंसक शिक्षा या मुलांना देण्याचे कटाक्षाने टाळा. या मुलांमध्ये निरागस प्रेम भरलेले असते. आधार संस्थेच्या संस्थापकांना माझा सलाम. तिथे कार्यरत असलेल्या प्रत्येक स्त्री पुरूषांना माझे धन्यवाद. या पुस्तकाला जास्तीत जास्त वाचक मिळोत, हीच ईश्‍वराचरणी प्रार्थना.’
श्री. माधवराव गोरे आणि त्यांचे सुपुत्र श्री. विश्‍वास गोरे सी.ए. झालेले. गोदरेजच्या नामवंत लॉकीम कंपनीत कामावर. शिवाय कोकणात २००० साली उत्सव नावाचे हॉटेल चालवायचे. ४ ऑक्टोबर १९९९ दिवशी आधारमायेची सावली श्री. माधवराव यांची प्राणज्योत मालवली. मुख्य आधारवड कोसळल्यावर कुटुंबाची काय अवस्था होते, हे मी सांगायला नकोच. अशावेळी ३९ वर्षांचे विश्‍वासराव, त्यांचा मुलगा पारंबीच्या ताकदीने या पुनर्वसन केंद्रात पाय रोऊन उभा राहिला. त्यांनी सर्व इंडस्ट्रीजना विश्‍वासात घेतले. काम जोमाने सुरू केले. २००२ साली त्यांना हृदयावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली. इतक्या तीव्र स्वरूपाच्या हृदयविकाराला त्यांना सामोरे जावे लागले. बायपास सर्जरी झाली. उत्सव हॉटेल बंद केले. १५ वर्षे वयाचा एकुलता एक मुलगा सोहन कर्करोगाने दगावला. कमकुवत हृदयावर असे अनेक हल्ले झाले. तरीही विश्‍वासराव डगमगले नाहीत. त्यांनी आधारला उचलून धरले.
सौ. शुभा चिटणीस आणि श्री. चिटणीस त्यांचे पती यांनी स्वतःच्या वेदनेचा मलम, त्यांची स्वतःची मुलगी गमावली. पण समाजकार्यात त्यांनी आपल्या मुलीचा श्‍वास शोधला. त्या ‘आधार’मध्ये सातत्याने येत. त्यांनी हे काम प्रत्यक्ष बघितलं. निरिक्षण केलं. संवेदनशील मनाला जाणवलं. २००६ साली वय वर्षे १८ ते ७८ या वयोगटातील मतिमंद १२१ मुले आणि ४३ मतिमंद मुली यांनी आधारमध्ये छत्र मिळवलं. २०१० सालापर्यंत ४०० पालक आणि २०० प्रौढ मतिमंद याचं हे मायेचं घर ठरलं. १२५ जणांचा स्टाफ तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहे. या संस्थेत ७० वर्षापर्यंतच्या भिन्नमती व्यक्ती महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताच्या विविध भागातून इथे येवून विसावल्या आहेत.
चार निवासी संकुले, एक प्रशिक्षण केंद्र, स्वतंत्र अत्याधुनिक स्वयंपाकघर, स्पेशर केअर युनिट, रूग्णवाहिका, बहुपयोगी सभागृह, काळजीवाहक, हाऊस मास्टर्स, विशेष शिक्षक, नर्सेस, डॉक्टर्स, मनोविकारतज्ञ असे ९६ केअर टेकर्स व्यक्ती या मतिमंद मुलांच्या निवासी आणि दिवसरात्रच्या विविधांगी सकारात्मक लाईफस्टाईल साकारण्यासाठी तैनात आहे. सोबत वॉटर रिसायकलींग आणि विंड अँड सोलर एनर्जी हे प्रकल्पही यशस्वीरित्या सुरू आहेत.
मतिमंदांच्या वागण्याच्या तर्‍हाही विविध असतात. त्या तर्‍हेवाईक समस्यांवर मात करून त्याचं जीवन सुखकर करायचं असतं. पान १०८ सेवा फक्त. या प्रकरणातील उदाहरण देतो. ५४ वर्षांची एक मतिमंद मुलगी. बुध्यांक ५७/५८ मध्यम गट मतिमंदत्व. या मुलीला पैसे समजतात. आई ८२/८३ ची. मतिमंद  चिडखोर पण मुलांवर खूप प्रेम करणारी इथे आली. सर्वांशीच भांडायची. मेसच्या बायकांनाही मारायची. दहा दहाच्या नोटा तिला भारी वाटतात. शंभराची नोट कमी पैसे. ती सर्व जगावर रागावलेली आहे. पण कनिष्ठ गटाशी तिचं छान जमतं. अशाच गोष्टी शोधून काढायच्या जबाबदारीचं भान या सर्व कर्मचार्‍यांवर असते. त्यातून त्याचं निवासी सुखकर पुनर्वसन.
राजेश जसानी ४४ वर्षांचा. तापट भरपूर ताकद आणि भरपूर उंची. मूड बिघडला की पार बिथरतो.  हातात येईल त्या वस्तूने समोरच्याला मारणार. कामगार लपून बसायचे. सर्वांच्या लक्षात आले. सर्वांनी त्याच्याकडे रागानेच हुल देणे सुरू केले. अशावेळी तो खूप शांत व्हायचा. व्यवस्थापन करणं, अशा भिन्नमती मुलांचं करणं फार जिकिरीचं नसतं. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. याचं एक वानगीदाखल उदाहरण. प्रत्यक्ष अशी अनेक त्यापैकी मी एक अनुभवलेले सांगत आहे.
हे पुस्तक माझे मित्र मानसशास्त्रज्ञ डॉ. गोलम यांनी मला पाठवले. साधारण १९७८ ते ८२ पर्यंतचा हा काळ. तुळशीराम सावंत एक भिन्नमती आणि सोबतीला मानसिक अपंगत्व. प्र्रादेशिक मनोरूग्णालयात छान पर्सेस विणायचा. हातमागावर बसायचा. खूप तापट, बिघडला, मनोरूग्णालयीन कर्मचार्‍यांच्या भाषेत गरम झाला की आवरायचा नाही. मात्र माझं आणि त्याचं छान पटायचं. एक दिवस तो खूप होस्टाईल झाला. खूप तापला. खुर्च्या, येईल ती वस्तू हातात घेवून तोडू लागला. कर्मचार्‍यांवर बडबडत फेकू लागला. हरिश्‍चंद्र पवार, मनोहर सावंत, कृष्णा चव्हाण आमच्या मनोविकारतज्ञांना म्हणाले, डॉ. पाखरे साहेबांना बोलवा. त्यांचा उग्रावतार बघून मीही धास्तावलो. पण क्षणिक मी त्याच्याशी प्रेमाने डोळ्याला डोळा भिडवून आर्त भावाने त्याच्या जवळ गेलो. त्याचे अद्वातद्वा शब्द ऐकत त्याला चुचकारले. शांत केले. त्याच्यासेलमध्ये नेवून सोडले. मग औषधोपचार इत्यादी सुरू.
अशा या भिन्नमती व्यक्तीचे जीवन व्यवस्थापन, श्री.गोरे कुटुंबिय, त्यांच्या नेतृत्वाखाली दि असोसिएशन ऑफ पेरेंटस ऑफ मेंटली रिटार्डेड चिल्ड्रेन, मुंबई यांची १० ते ८० वयोगटातील २०० मतिमंद जीवांना आजीवन संगोपनाची सावली देत आहे. बदलापूर इथे ही संस्था आहे. नाशिकला त्याचे एक्स्टेंशन केले आहे. संपूर्ण नाशिक संस्थेत श्री. पराग व सौ. आशा फडणीस हे दांपत्य अक्षरशः तन मन धन वेचून ह्या माळरानाचं नंदनवन करीत आहेत.
या पुस्तकातील सौ. शुभा चिटणीस यांची एक गोष्ट मला फार भावली. सहसा निर्मात्यांचा खूप उदो उदो होतो. पण त्यांच्या सावलीत तन-मन एकत्र करून प्रसंगी मानसिक ताण सहन करून कौटुंबिक अडी अडचणी बाजूला ठेवून जे सर्व स्तरीय कर्मचारी अशा धाडसी कार्यात कार्यरत असतात, त्यांची नोंद कुठेच नसते. सौ. शुभा चिटणीस यांनी प्रत्येक कर्मचार्‍याचे कामाचे स्वरूप, ते कर्मचारी किंवा संबंधित यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. त्या त्यांच्या सकारात्मक कार्याचा समरसून आपल्या शब्दांनी वेध घेतात. हे या पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य. मग त्या गोरेंच्या मानसकन्या शोभना असोत की वनश्री आणि वैधराज, या प्रकरणातील सुचित्रा घारपुरे असोत. फ्रॅक्चर झालेल्या अभिनेत्री शारदा असोत की संजय भगत, याला त्यांनी पावनखिंड लढविणार्‍या बाजी प्रभूची त्याच्या कामाचे स्वरूप पाहून उपमा दिली आहे. असे जवळजवळ सर्व कर्मचारी इथे आणि मेहता सारखे देणगीदार भेटतात, त्यांचे वर्णन जागोजागी समरसून करतात.
अशा या संस्थेला २००७ साली सामाजिक न्याय मंत्रालयाने देशभरातील ८२५ संस्थांमधून सर्वोत्कृष्ट पालक संघटना म्हणून सामाजिक न्याय मंत्री मीराकुमार यांच्या हस्ते ५० हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरविले आहे. मानसिक क्षमता ७० ते ५०, दुसरा मॉडरेट, तिसरा सिव्हियर आणि चौथा प्रोफाऊंड असे गट असतात. ३५ ते २० आणि त्याखालचा गट या सर्वांची इथे व्यवस्था आहे. शासनाची कुठलीही मदत नाही. मतिमंद मुलांना कायमचा आधार देवून त्यांच्या पालकांना चिंतामुक्त करून, त्यांच्या दैनंदिन गरजा पुरवून त्यांचा सर्वांगीण विकास हे कार्य आधारचं कल्पनातीत आहे.
ज्येष्ठ पत्रकार मी मधुकर भावे, माजी संपादक दै. लोकमत या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात ‘‘मतिमंद मुलांचे पालक होणे, ज्यांच्या वाट्याला आले त्या भूमिकेत शिरल्याशिवाय हे दुःख कळायचे नाही. लांबून पहाणार्‍याचा हा विषय नाही. डॉ. शुभा चिटणीस यांचा हा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्यातली एक ग्रथाची भर नव्हे तर अशा संस्थांच्या आवश्यकतेची त्यांनी समाजाला करून दिलेली एक फार मोठी जाणीव या प्रत्येक पानावर चितारलेली आहे. अशी जाणीव होण्याकरिता सुद्धा एक व्यापक सामाजिक मन आणि भान असावे लागते’’.
अजून एक या पुस्तकाचं मला भावलेलं वैशिष्ट्य म्हणजे सौ. शुभा चिटणीस यांनी कुठल्याही साहित्यिकाचा बडेजाव न दाखवता जे अनुभवले तेच लिहिले. म्हणून लेखन खूपच वास्तववादी असलेले वाचकाला भिडते.
सौ. शुभा चिटणीस यांनी आधारकाठी कशासाठी यात भारतातील २०११ सालची ३ टक्के लोकसंख्येची आकडेवारी दिली आहे. समाजाने आदरान या मुलांशी सामान्य मुलाप्रमाणेच वागावे. या नीला सत्यनारायणन यांच्या वाक्यानुसार समारोप करतो. अवश्य सर्वांनी वाचावे. शक्य असल्यास अशा संस्थांना आर्थिक मदत करावी, कारण अजूनही यांची आर्थिक गरज खूप मोठी आहे. नाशिकचे विस्तारीकरण झालेले आहे.
पुस्तकाचे नाव ः आधारमाया
लेखिका ः डॉ.शुभा चिटणीस
प्रकाशक ः व्यास क्रिएशन, नौपाडा ठाणे, ट्र. क्र. ०२२-२५४४७०३८/ २५४५२५७२, भ्रमणध्वनी-९९६७८३९५१०,
किंमत ः रुपये २००/-
एकूण पाने-१९२
आधार संस्थेचा पत्ता-मूळगाव, ठाकूरवाडी, बदलापूर, जिल्हा ठाणे.
-डॉ. दिलीप पाखरे

Page 5 of 14