Tuesday, Jan 23rd

Headlines:

इतर

सुरेश प्रभू ः विद्वत्ता आणि दूरदृष्टी लाभलेले कोकणचे सुपुत्र!

E-mail Print PDF
सुरेश प्रभू यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रहपूर्वक मंत्रिमंडळात समावेश करून त्यांच्याकडे रेल्वेमंत्री पद सोपविले आहे. पंचवीस वर्षानंतर महाराष्ट्राला आणि कोकणाला रेल्वेमंत्री पद लाभले आहे. जनता दलाचे नेते मधु दंडवते रेल्वेमंत्री होते. त्यानंतर आता सुरेश प्रभू यांना ते खाते लाभले आहे. सुरेश प्रभू हे आधुनिक कोकणातील एक आंतरराष्ट्रीय कीर्ति लाभलेले विद्वान आणि चतुरस्त्र कार्य असलेलेे अर्थतज्ञ आहेत. एकनाथ ठाकूर आणि सुरेश प्रभू या कोकणच्या दोन सुपुत्रानी बँकींग आणि आर्थिक क्षेत्रात अत्यंत मौलिक कार्य केले आहे. डॉ. भालचंद्र मुणगेकर हे तिसरे अर्थतज्ञ कोकणचे सुपुत्र आणि राष्ट्रीय स्तरावर कार्य केलेले आहेत. सुरेश प्रभू यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिपदाचा मान लाभला आहे. भारतात जे अगदी मोजगे अत्यंत बुद्धीमान आणि तांत्रिक ज्ञानाबरोबरच जागतिक स्तरावर गुणवत्ता सिद्ध झालेले आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील विचारवंत आहेत, त्यांना दिल्लीत प्रसारमाध्यमांच्या वर्तुळात कौतुकाने मॅन थिंग टँक म्हटले जाते.
suresh_p_prabhuबॅ. नाथ पै या समाजवादी पक्षाच्या नेत्यानी राजापूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या समाजवादी विचारांच्या क्षेत्रात त्यांच्या कार्याचे जागतिक स्तरावर कौतुक झाले. राजापूर मतदार संघाला प्रा. मधु दंडवते यांच्यासारखे समाजवादी विचारवंत प्रतिनिधी लाभले. त्यांनी कोकण रेल्वे साकार करण्याचे बॅ. नाथ पै यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. पण दुर्दैवाने त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सुरेश प्रभू यानाही राजापूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. नाथ पै आणि मधु दंडवते यांची परंपरा त्यांनी वृद्धींगत केली आहे. कोकणाला अभिमान वाटावा अशीच त्यांची कामगिरी आहे. कोकणातून विविध क्षेत्रात आपल्या प्रतिभा आणि कर्तृत्वाच्या जोरावर असाधारण कामगिरी करणार्‍या महान व्यक्तीमत्वाची जी परंपरा आहे त्यात सुरेश प्रभू आणि स्व. एकनाथ ठाकूर यांचा समावेश केला पाहिजे. सुरेश प्रभू यांचा समावेश एशियावीक या नियतकालिकाने भारताचे एक अग्रणी भावी नेते अशा शब्दात केला आहे. तर इंडिया टुडेने त्यांना अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वोत्तम कामगिरी असलेले मंत्री म्हणून गौरविले होते.
सुरेश प्रभू यांची कार्यक्षमता आणि विद्वत्ता या विषयी अत्यंत आदराची आणि विश्‍वासाची भावना राष्ट्रीय स्तरावर आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास निमंत्रण देऊन त्यांचा समावेश आपल्या मंत्रिमंडळात केला आहे. १९९६ मध्ये ते प्रथम शिवसेनेतर्फे राजापूर मतदारसंघात निवडून आले. नंतर लागोपाठ चार वेळा ते लोकसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांचा पराभव झाला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक मंत्रालयांचा कार्यभार सांभाळला. नद्या जोड प्रकल्पाच्या प्रमुखपदी त्यांची नेमणूक श्री. वाजपेयी यांनी केली होती. या विशाल प्रकल्पाचा तांत्रिक आणि अन्य सर्व पैलू विचारात घेऊन अभ्यास करण्यासाठी ती समिती नेमण्यात आली होती. श्री. प्रभू यांनी सदर समितीचा अहवाल तयार केला. त्यातही त्यांच्या सर्वस्पर्शी विद्वत्तेचे आणि व्यासंगाचे दर्शन घडले.
त्यानंतर त्यानी वने आणि पर्यावरण, रसायन आणि खत मंत्रालय, अवजड उद्योग आणि उर्जा या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी उत्तम सांभाळला. त्या खात्यांची घडी त्यांनी इतकी व्यवस्थित बसवली की पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही त्यांच्या कार्याची नंतर प्रशंसा केली होती. वाजपेयी यांच्या सरकारमध्ये विविध खात्यांचा कारभार सांभाळताना त्यांनी केलेल्या कामगिरीचा सर्वोत्तम मंत्री म्हणून इंडिया टुडेने गौरव केला होता. याच काळात त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी लाभली. जागतिक बँकेच्या संसदीय समितीवर त्यांची निवड झाली. तसेच जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया जल संसाधन समितीच्या चेअरमनपदी त्यांची नेमणूक झाली. त्यांच्या अनुभवाचा प्रभाव फार मोठा आहे. नद्या जोड प्रकल्पासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा लौकीक इतका की त्यामुळेच त्यांना दक्षिण आशियाच्या जागतिक बँकेच्या जलसंसाधन समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले.
वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केलेल्या चतुरस्त्र कार्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर खास निमंत्रण दिले. ऊर्जा मंत्रालय, रसायने आणि खते मंत्रालय आणि वादग्रस्त कोळसा मंत्रालय यांच्या कारभारात सुधारणा करण्यासाठी एक खास हायपॉवर कमिटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमली आणि त्या समितीच्या अध्यक्षपदी सुरेश प्रभू यांची नेमणूक केली होती. अशा प्रकारे सुरेश प्रभू हे मोदी सरकारमध्ये कार्यरत झालेच होते. आता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे आणि ते रेल्वे मंत्री झाले आहेत.
narendramodi31कोकण रेल्वेविषयी आता आशा उंचावल्या आहेत. आता ते कोकण रेल्वेचे रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लावतील अशी आशा आहे. त्यात तीन महत्वाचे प्रस्ताव आहे. पहिला आहे कोकण रेल्वे कोल्हापूरला आणि कराडला जोडणारे मार्ग तयार करणे, दुसरा कोकण रेल्वेच्या मार्गाची यथायोग्य दुरूस्ती करणे असे काही प्रस्ताव आहेत. ना. प्रभू ते योग्य प्रकारे मार्गी लावतील अशी अपेक्षा आहे. रेल्वे मंत्रालय गेली दहा वर्षे ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाकडे होते. नंतर त्यांचा तृणमूल कॉंग्रेस पक्ष केंद्र सरकारमधून बाहेर पडला. तेव्हा नंतर मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे ते खाते देण्यात आले. ममता बॅनर्जी यांनी भाडेवाढ टाळली. पण रेल्वेची आर्थिक स्थिती फारच ढासळली होती. अखेर मोदी सरकारने भाडेवाढ केली आहे. आता रेल्वे मंत्रालयाचा कारभार सुधारण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याचे आव्हान सुरेश प्रभू यांच्यासमोर आहे. अर्थात त्या गुंतागुंतीच्या आणि व्यापक कार्यात ते यशस्वी होतील याची खात्री तर आहेच.
देशातील सर्वात मोठ्या सहकारी क्षेत्रात अग्रणी असलेल्या सारस्वत बँकेचे ते दीर्घकाळ चेअरमन होते. या काळात त्यांनी  सदर बँकेला सुस्थिर केले. तिला प्रगतीपथावर नेले. त्यांनी यशाचा पाया यचला आणि एकनाथ ठाकूर यांनी चेअरमन या नात्याने त्या बँकेच्या यशोमंदिरावर सोन्याचा कळस चढविला.
सुरेश प्रभू यांनी राजापूर मतदार संघाचे खासदार झाल्यानंतर मानव साधन विकास संस्था ही स्वयंसेवी संस्था सुरू केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागात संगणक प्रशिक्षण बालकांना देण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला. बांदा, देवबाग, शिरगाव, तळवडे आदि गावांमध्ये ग्रामीण ज्ञान योजनेतून हे संगणक प्रशिक्षण सुरु केले. ज्ञानदा आणि ग्रामीण ज्ञान योजनेतून सिंधुदुर्गात ग्रामीण भागात संगणक प्रशिक्षण देण्याचे कार्य आजदेखील जोमाने सुरू आहे. मानव साधन विकास संस्थेतर्फे त्यांनी मासेमार, महिला, युवक यांना व्यवसाय शिक्षण, आरोग्यविषयक प्रशिक्षण आदि उपक्रमानाही चालना दिली आहे. त्यांनी सिंधुदुर्गातील शैक्षणिक संस्थानादेखील आधार दिला आहे.
सुरेश प्रभू मुळचे मालवणचे आहेत. मात्र त्यांचे सारे कुटुंब मुंबईतच स्थलांतरित झाले होते. त्यांचा जन्मदेखील मुंबईत झाला. ते चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. त्यांची पत्नी सौ. उमा या पत्रकार म्हणून टाइम्समध्ये कार्यरत होत्या. त्यांचा अमेय नावाचा एक पुत्र आहे.
श्री. प्रभू यांनी शिवसेनेतर्फे खासदारकी चार वेळा केली. पण आता सेना-भाजपाचा जो काही वाद सुरू आहे त्यात सुरेश प्रभू यांचे नाव शिवसेनेकडून मंत्रिपदासाठी सुचविले जात नव्हते. कारण प्रभू सध्या शिवसेनेत कार्यरत नाहीत. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा त्यांचा निर्णय योग्यच आहे. त्यांच्या असाधारण कर्तृत्वाचा लाभ देशाला झाला पाहिजे.
सुरेश प्रभू यांनी केवळ रेल्वे पुरतीच जबाबदारी घ्यावी अशी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची अपेक्षा नाही. यामुळे अनेक खात्यांच्या फेररचनेसाठी आणि सुधारणेसाठीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी कोकणच्या अनेक महत्वाच्या समस्यादेखील मांडाव्या अशी अपेक्षा आहे. कोकणच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी त्यांनी खास योजना आखायला लावावी. तर कोकणच्या सागरी महामार्गासाठी निधी केंद्राकडून मिळवून द्यावा. कोकणात माहिती तंत्रज्ञानावर आधारित उद्योग यावेत यासाठी त्यांनी पाठपुरावा करावा अशी अपेक्षा आहे.
-भालचंद्र दिवाडकर, (ज्येष्ठ पत्रकार)
मोबा. ९८२२९८१२९०

आदरणीय श्री. उदयदादा लाड

E-mail Print PDF
10-may-uday-ladकोकणातल्या चिपळूणचे सुपुत्र, माजी कबड्डीपटू, नामवंत गझलकार सोमनाथ प्रकाशनचे प्रकाशक आणि यु.आर.एल. फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. उदयदादा राजाराम लाड यांनी २९ मेला ७१ व्या वर्षात पदार्पण केलं. त्याच दिवशी मुंबईत त्यांच्या संकल्पनेतून साकारलेला आणि गेली १३ वर्ष आयोजिला जाणारा यु.आर.एल. फाऊंडेशनचा यंदाचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार समारंभ संपन्न झाला. या पार्श्‍वभूमीवर जयु भाटकर यांनी त्यांना लिहिलेलं अभिनंदनपर स्नेह-शुभेच्छा पत्र!
 

आदरणीय उदयदादा,
सस्नेह नमस्कार,
सर्वप्रथम ७१ व्या वर्षाच्या पदार्पणासाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा!
दादा, गुरूवारी २९ मे ला मुंबईत दादरच्या यशवंत नाट्यसंकुलात यु.आर.एल. फाऊंडेशनच्या १४ व्या सामाजिक कृतज्ञता पुरस्कार समारंभाच्या व्यासपीठावर संयोजक म्हणून आपण बोलायला उभे राहिलात आणि तुमच्या व्यक्तीगत जीवनातल्या कष्टमय भूतकाळाच्या आठवणी तुमच्या ओठावर आल्या. अपार कष्ट आणि अजोड मेहनत यांच्या दुहेरी संगमातून आज सर्व सुखसंपन्न वातावरण असतानाही समाजाबद्दल माझे काही देणं आहे. म्हणूनच कृतज्ञतेच्या भावनेपोटी दरवर्षी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार द्यावे असं तुम्ही ठरवलंत. हे सांगताना तुमचं गत आयुष्य तुमच्यासमोर थुई थुई नाचू लागलं
मुंबईत भायखळ्यात रमणानंद कोंगाट्याच्या छोट्याशा हॉटेलमध्ये टेबल साफसफाईचं काम करून आपल्या वडिलांनी स्व. राजारामशेठ लाडांनी वयाच्या ६ व्या वर्षी आपलं बालपण कष्टांच्या दुनियेत झोकून दिलं. बालपणापासून पुजाअर्चा, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम या विचार संस्कारांचं स्फुलिंग लाभलेल्या छोट्या राजारामचा प्रवास पुढे स्वकर्तृत्वाने राजारामशेठ लाड असा झाला. पानपट्टी चालविण्यापासून हॉटेल, हॉटेलबार, टॅक्सी व्यवसाय, स्टेशन वॅगन बस, गणपतीच्या मूर्तीचा कारखाना या कष्टकरी उद्योग समुहाचे राजारामशेठ लाड, आपले वडील हा आपला जीवन आदर्श. त्यांच्या कष्टाने लाभलेल्या वैभवी कुटुंब सुखाला नियतीच्या कालचक्रात ग्रहण लागलं. व्यवसायात खोट आली. ज्यांच्यावर विश्‍वास ठेवला त्यांनीच दगाफटका केला आणि परिस्थितीचा बिकट डोंगर आडवा आला. दादा, आपण तेव्हा रत्नागिरीच्या पॉलिटेक्निकमध्ये शिकत होता. घरच्या दारूण परिस्थितीचं दर्शन देणारं आपल्या आईचं-माऊलीचं पत्र तुमच्या हाती पडलं आणि क्षणाचाही विचार न करता अभियांत्रिकी शिक्षणाकडे पाठ फिरवून तुम्ही मुंबईची बस पकडली. दादरला सकीना मॅन्शनमध्ये परतलात. तुमच्या दोन्ही आयांच्या गळ्यातील नसणारी मंगळसूत्र पाहून अस्वस्थ झालात. घरच्या हलाखीच्या परिस्थितीत ती गहाणवट पडली होती. इथूनच तुमच्या पुढच्या जीवन वाटचालीचा खडतर प्रवास सुरू झाला. घरखर्चाचा मेळ जमण्यासाठी आपली बहिण चंपाताई शिकवण्या घेतेय हे पाहून विषण्ण होवूनही तुम्ही प्रसंगी मुंबईत टॅक्सीही चालविलीत. काही झालं तरी कष्टाचा, घामाचा पैसा कमावून स्व. राजारामशेठ लाडांचं-वडिलांचं गतवैभव पुन्हा लाडांच्या घरात- सकीना मॅन्शनमध्ये आणायचं हेच तुमचं जीवनध्येय ठरलं. राजारामशेठ लाड इस्टेट पुन्हा दिमाखात उभी करायची हीच तुमची महत्वाकांक्षा ठरली. पुढे मेहनत आणि कष्टाच्या धावपळीत हॉटेल, हॉटेलबार व्यवसायात स्वतःला विसरून गेलात. परिस्थितीला पर्याय नव्हता. तरीही तुमच्यातला माणूस आणि माणुसकीचा ओलावा कायम टिकवून ठेवलात.
‘‘हे बघ बाबा- टू पेग्ज अ डे, कीप्स डॉक्टर अवे’’ हे येणार्‍या गिर्‍हाईकाला तुम्ही सांगायला विसरलात नाहीत. हॉटेल बारचा मालकच येणार्‍या गिर्‍हाईकांना ‘‘मर्यादित आनंद घ्या’’ असे सांगतो. हा या व्यवसायातला विरोधाभास तुम्ही लिलया पचवलात. सकीना मॅन्शनपासून दादर परिसरात तुमच्यातला हॉटेल व्यावसायिक आणि अन्यायाच्या विरूद्ध उभा राहणारा त्यावेळचा रांगडा दादा तिथल्या समाज जीवनानं अनुभवला. मात्र स्वैराचारानं दादागिरी करणं हा तुमचा स्वभाव नव्हता. मात्र अरे ला का रे म्हणणे हा तुमचा विचारभाव होता. आक्रमकता आणि चपळाई या गुणांची अनुवंशिकता तुम्हाला तुमच्या वडिलांकडून लाभली असे तुमच्या बोलण्यातून नेहमी जाणवलं. त्याचा प्रत्यय तुमच्या उमेदिच्या दिवसांनी पाहिला. रत्नागिरीच्या राधाकृष्ण मंदिरातल्या हुतुतूच्या स्पर्धा असोत किंवा लालबाग परळच्या मुंबईच्या कबड्डीच्या मैदानावर कामगार वस्तीतल्या कबड्डीच्या स्पर्धेतून तुमच्यातला भारदस्त शरीरयष्टीचा लोकप्रिय कबड्डीपट्टू तेव्हाच्या कबड्डी शौकीनांनी अनुभवला.
शालेय दिवसात मॅट्रीकच्या परीक्षेत पहिल्यांदा नापास झाल्यावर वडिलांना झालेल्या अतीव दुःखाने तुम्ही अस्वस्थ झालात. मात्र जिद्दीनं पुन्हा परीक्षा देवून मॅट्रीक पास होवून वडिलांना आनंदाचा पेढा वाटायचा क्षण त्यांना अनुभवायला दिलात. जे जे अशक्य ते ते शक्य करून दाखविण्याची तुमची जिद्द हीच तुमची जीवनशक्ती. जे जे चांगलं ते ते घ्यावं ही तुमची विचारभक्ती. कष्टांच्या भाऊगर्दीत रांगड्या पंचवीशीत तुम्ही घाम गाळायला कधी मागे राहिला नाहीत. मित्र राजू आशरच्या मदतीनं तुमच्या पडत्या काळात मुंबईत येणार्‍या बंदरात उभ्या राहणार्‍या बोटींना खाद्यपदार्थ पुरविण्याचं कामही केलंत. इतकच काय दादर-माहिम परिसरात परिस्थितीमुळे मटण पुरविण्याचा जिकिरीचा व्यवसायही केलात. कष्टांच्या भाकरीची चव विलक्षण असते हे तुमचं वाक्य तुम्ही सहज बोलून जाता. मला वाटतं तुमच्या जीवन वाटचालीचा तो यशस्वी महामंत्र आहे.
पुढे कबड्डीपटू आणि हॉटेलवाला या समाजशिक्क्यांनी तुमच्या लग्न ठरविण्याच्या दिवसात तुमच्यासमोर अडचण निर्माण झाली. योगायोगानं पंचवीशीच्या त्याच कालखंडात तुमचं तिरूपतीला जाणं झालं. तिथल्या देवदर्शनाच्या रांगेत उभ्या असणार्‍या पूर्वाश्रमीच्या राधा रेड्डी या युवतीशी तुमची नजरानजर झाली आणि तिथंच तुम्हा दोघांचं मनोमिलन झालं. मनाला हुरहूर लावणारं नवं आयुष्य तुम्हाला तिथं गवसलं. लाड कुटुंबाची वैश्यवाणी समाजचौकट, शिस्त, दृष्टीकोन यांना लिलया पाठिवर घेवून काही दिवसांनी तुम्ही गुंटूर जिल्ह्यातल्या छोट्याशा खेड्यात जावून आपल्या भावी जीवनसाथीला बरोबर घेवून लग्न केलंत. दोघेही मुंबईत आलात. मात्र वर्षभर बहीण चंपाताई व्यतिरिक्त कुणालाही आपल्या या वैवाहिक मोहिमेचा घरी तुम्ही थांगपत्ताही लागू दिला नाहीत. सुरूवातीला तुमचा नवा संसार सकीना मॅन्शनच्या -घराजवळच्या हाकेच्या अंतरावर असणार्‍या हॉटेलमध्ये सुरू झाला. पुढे तो घाटकोपरच्या बैठ्या चाळीत स्थिरावला. वर्षभर ही संसारिक कसरत अर्थात गोपनीयता तुम्ही सांभाळीत. घाटकोपरच्या संसारिक जीवनात तुम्हाला कन्यारत्न झालं. तुमच्या जीवनात लेक बेलू आली आणि मग एके दिवशी धाडसानं चंपाताईच्या पुढाकारानं आईला घेवून घाटकोपरला आलात. आईला तो आश्‍चर्याचा धक्का होता. मात्र पुत्रप्रेम आणि नातीचा चेहरा पाहून ती माऊली आनंदी झाली. काळाच्या ओघात धर्मपत्नी राधा वहिनींचं निधन झालं. तुम्ही कोलमडलात. पत्नीशोकाच्या त्या विचित्र कालखंडात तुमचे बेछूट दिवस सुरू झाले. अर्थात ही परिस्थिती काही दिवसच राहिली. त्याला कुणीही अपवाद नाही. तुमच्या मोठ्या लेकीनं तुम्हाला नवा विचार दिला. आणि तुम्ही नव्या दिवसांना सामोरे गेलात. चिपळूणच्या पूर्वाश्रमीच्या निता पाटणेंशी तुम्ही पुन्हा विवाहबद्ध झालात. न म्हणजे नन्हाचा पाढा. या तुमच्या भावनिक श्रद्धेमुळे तुम्ही त्यांचं, सौ. नीता वहिनींचं  नामकरण मम असं करून टाकलंत. त्यातही निता हे नाव जावून सुधारीका झालं. कारण तुमचा सिगारेटच्या व्यसनापासून खाण्यापिण्याच्या सोईपर्यंत सर्व बदल हे पत्नी सौ. सुधारीका वहिनींमुळे आले हे तुम्ही न संकोचता अभिमानाने सांगता. त्यामुळेच सुधारीका वहिनींना तुम्ही मम नावाने संबोधणं हे ऐकणं आणि पाहणं हा स्त्री सन्मानाचा एक अनोखा आनंद आहे. हॉटेल व्यवसायाबरोबर आपण रिअल इस्टेटमध्ये उतरलात, स्थिरावलात, यशस्वी झालात. आपल्याला मिळणार्‍या धनात समाजाचा वाटा असतो. या वडिलांच्या संस्कार शिदोरीमुळे कबड्डीच्या वेडापाई आणि आनंद पालव कबड्डी स्पर्धेच्या कृतज्ञतेपोटी तुम्ही दरवर्षी राजारामशेठ लाड राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा सुरू केलीत. आदरणीय शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन झालं. अलबेला फेम भगवानदादा पालव त्या दिवशी स्टेजवर नाचतच गेले. महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या कबड्डी विश्‍वात प्रचार आणि प्रसाराच्या रूपाने तुम्ही एका दर्जेदार कबड्डी स्पर्धेला सुरूवात केली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कबड्डी विश्‍वात एक नवी पाऊलवाट तुमच्यामुळे सुरू झाली. पुढे तंत्राच्या युगात कबड्डीच्या मैदानावर गुणफलकाच्या जागी इलेक्ट्रॉनिक गुणफलक आणण्याचं धाडस तुम्हीच केलत. काळाच्या ओघात पुढे इतर सर्व स्पर्धा संयोजकांनी त्याचे अनुकरण केले.
मराठी साहित्य, त्यातही  गझल हा तुमचा आवडता विषय. तुमच्या माय मराठीच्या प्रेमापोटी सोमनाथ प्रकाशन तुम्ही अस्तित्वात आणलंत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील सह्याद्रीच्या कड्याकपारीतील साहित्यचेहर्‍यांना-गझलकारांना -तुम्ही नावारूपाला आणलंत. समाजासमोर त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित करून त्यांना सन्मानानं उभं केलंत. मराठी गझलसम्राट सुरेश भट्टांच्या पश्‍चात गझलकार मित्र सुरेशकुमार वैराळेंच्या मदतीनं महाराष्ट्रात सर्वत्र मराठी गझल जिवंत रहावी म्हणून आपण गझल मुशाहिराचे कार्यक्रम आयोजित केलेत.
‘‘दादा, सूर्यास मावळू द्या नादान काजव्यांनो,
मिरवू नका बुडाच्या ठिणग्या भल्या दुपारी
नैवेद्य पाहिल्यावर बेचैन भूक होते
नाही म्हणून झालो देवा तुझा पुजारी’’

हा सतिश दराडेंचा शेर ऐकून तुमच्या अस्वस्थ मनानं आणि गझल रसिकांना त्याचा श्‍वासांच्या समिधा हा गझलसंग्रह प्रकाशित केला. आजपर्यंत इलाही जमादार, विजय आव्हाड, दिपक अंगेवार, मनोहर रणपिसे, अरूण सांगोळे, रमण रणदीवे, सदानंद डबीर, ललिता डबीर, ललिता बांठिया, संध्या पाटील या सर्वांचं साहित्य आपल्या सोमनाथ प्रकाशनमुळे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात पोहोचले हीच खरी तुमची मायमराठीची साहित्यसेवा.  दादा तुमच्या वडिलांनी स्व. राजारामशेठनी त्यांच्या बालवयात मुंबापुरीत विड्या वळल्या. पानपट्टी लावली. पानपट्टीचे दुकानचालक टॅक्सीव्यवसाय, हॉटेल व्यवसाय, हॉटेल मालक अशी वाटचाल करत  पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्य चळवळीत बुलेटीन पोहोचविण्यापासून स्वातंत्र्यसैनिकांना आपल्या घरात भूमिगत ठेवण्यापर्यंतचं राष्ट्रकार्य केलंत ते बाळकडू तुम्हालाही लाभलं. जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि प्रखर राष्ट्रप्रेम याबाबतचे तुमचे विचार वर्तमान राजकारण्यांना विचार करायला लावणारे आहेत. या सगळ्या धावपळीत तुम्ही रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारधनाचे पाईक झालात. तुमचा सुर्योदय होतो तो घरातल्या, देवघरातल्या या महामानवाला वंदन करून. दादा तुमच्या घरातल्या देवघरात आणखी एका फोटोला सर्वोच्च आदरार्थी स्थान आहे. ती व्यक्ती म्हणजे आपल्या वडिलांचे परममित्र, खटाव मिलमध्ये काम करणारे त्रिंबक रामचंद्र काळे काका. बिल्डींग इस्टेटीच्या खरेदी व्यवहाराच्या अडचणीच्यावेळी या भल्या गृहस्थानं क्षणाचाही विचार न करता आपला संपूर्ण प्रॉव्हीडंड फंड तुमच्या हवाली केला आणि तुमच्या यशस्वी आर्थिक जीवनाचा कायापालट झाला. तुमचे भले दिवस सुरू झाले. त्यामुळेच आईवडिलांइतकेच काळे काका तुम्हाला वंदनीय ठरले. थोरामोठ्यांच्या विचारांची शिदोरी हेच आपलं धन असं तुम्ही मानत असल्याने तुम्ही स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीनं प्रभावीत झालात. या विचारसरणीचे साधक झालात. इतके की पुढे हॉटेलबार व्यवसायाला रामराम ठोकून तुम्ही नव्या उमेदीने हॉटेल विवेकानंद उभारलंत. दादा, वडिलांचं मराठी चित्रपट काढायचं राहिलेलं स्वप्न तुम्ही पूर्ण केलंत. सोमनाथ चित्र या बॅनरच्या माध्यमातून मराठी चित्रपट विश्‍वात तुमची ओळख निर्माते उदयदादा लाड अशी झाली. मराठी रंगभूमीच्या प्रेमापोटी नाट्यनिर्मितीच्या अनोख्या विश्‍वाचा तुम्ही आनंद घेतलात. भलेबुरे अनुभव घेतलेत. कोकण साहित्य परिषद, जागतिक मराठी अकादमी या संस्थांच्या प्रत्येक उपक्रमात तुमच्या मदतीसह त्यात सक्रीय सहभाग हे तुमचं वर्तमान उपक्रमांचं विश्‍व. याच्याच जोडीला आपल्याला मिळणार्‍या पैशापैकी काही धनाचा अधिकार हा माझ्या समाजाचा आहे. याच जाणीवेतून तुम्ही कर्तृत्ववान व्यक्ती आणि खेळाडूंचा गौरव करावा या हेतूनं गेली १४ वर्ष यु.आर.एल. फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कृतज्ञता पुरस्कार समाजातल्या असामान्य व्यक्तींना देत आलात. यंदाचा चौदावा यु.आर.एल. फाऊंडेशनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार समारंभ नुकताच गुरूवारी २९ मे ला मुंबईत यशवंत नाट्यसंकुलात संपन्न झाला. तुमच्या प्रेमापोटी चित्रपट दिग्दर्शक राज दत्तांपासून डॉ. श्रीखंडेंपर्यंत डॉ. रवि बापटांपासून पद्मश्री मधु मंगेश कर्णिकांपर्यंत, मराठी सारस्वतातील ही दिग्गज मंडळी रसिक प्रेक्षक म्हणून उपस्थित होती. अभिनेते विक्रम गोखले, माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, नाटककार प्र. ल. मयेकर, जयवंत कोंडविलकर, अनिसचे कार्यकर्ते संजय बनसोडे आणि श्रीमती सुशिला मुंडे हे यंदाचे पुरस्कार मानकरी. त्यांचा गौरव करताना थोर समाजसेवक प्रकाश आमटे म्हणाले, ‘‘स्व. बाबा आमटेंच्या एका भेटीनं उदयदादांना कृतज्ञतेची अतीव जाणीव झाली आणि त्यातून हा पुरस्कार गौरव महाराष्ट्रात साकार झाला ही खरी कृतज्ञता’’ प्रकाश आमटेंच्या या कौतुकभरल्या शब्दांनी यशवंत नाट्यसंकुलात उपस्थित रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांचा पाऊस पाडला. यजमान संयोजक म्हणून आपल्या प्रास्ताविकपर भाषणात तुम्ही आपल्या वडिलांचा आदरपूर्वक उल्लेख केलात. ८९ साली एका जीवघेण्या अपघातातून वाचल्यावर पुढच्या वर्षी मित्रांच्या आग्रहाखातर करावयाच्या वाढदिवसाचं स्वरूप कृतज्ञता पुरस्काराचं आयोजन करून करावं असं सांगताना तुम्ही थोडे गहिवरलात. मात्र त्याचवेळी याचा मलाच काय पण माझ्या पुढच्या पिढीलाही गर्व तर सोडाच पण अभिमानही नाही असं प्रामाणिकपणे सांगितलं. तेव्हा रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
दादा तुमची आजपर्यंतची वाटचाल म्हणजे गदिमांच्या भाषेत बोलायचं झालं तर
छिन्नी हातोड्याचा घाव
करी दगडाचा देव
खाई दैवाचे तडाखे
त्याचं माणूस हे नाव

गदिमांच्या या अजरामर ओळी तुमच्या व्यक्तीमत्वाचं निरीक्षण करताना वारंवार आठवतात. या सगळ्या धावपळीत कोलाहालात तुम्ही राजकारण आणि राजकारण्यांच्या सावलीपासून लांब राहिलात याचं अप्रूप वाटतं. गेल्या ७० वर्षाच्या जीवन वाटचालीत अनेक भल्याबुर्‍या प्रसंगांना तुम्ही सामोरे गेलात. लाड कुटुंबाचा त्यावेळचा २२ माणसांचा कुटुंबकबिला सांभाळताना काही वेळा तुमची दमछाक झाली. पण हसर्‍या चेहर्‍यावर तणावाची सावली आणायची नाही आणि प्रत्येक प्रसंगात नवं शिकण्यासारखं असतं हा तुमचा विचार या आजच्या नव्या पिढीला जीवन जगण्याची कॅचलाईन आहे.
दादा, आज सुखाचे चांगले दिवस तुमच्या कुटुंबाला असताना जग सोडून गेलेली बहीण चंपाताई आणि मोठी मुलगी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काही निधी उभारून गोरगरीबांना मदत करण्याची तुमची वृत्ती ही इतरांनीही स्विकारण्यासारखी आहे. उजव्या हातानं दिलेलं डाव्या हातालाही कळू नये या तुमच्या वृत्तीतून आजपर्यंत असंख्य तरूणांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. आज ते जगाच्या पाठिवर कर्तृत्ववान बनले आहेत. रायगडमधल्या माणगांव परिसरातल्या कित्येकांची लग्न तुम्ही लावून दिलीत हे फार कमीजणांना माहित आहे. दादा, मला वाटतं हीच तुमची खरी पुण्याई! गुरूवारी कृतज्ञता पुरस्काराच्या त्या सुंदर संध्याकाळी सुप्रसिद्ध निवेदिका दिपाली केळकर आणि समीरा गुजर यांनी सर्व पुरस्कारकर्त्यांना बोलतं केलं. पुरस्कार मानकरी अभिनेते विक्रम गोखले, माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये, नाटककार प्र. ल. मयेकर, जयवंत कोंडविलकर, अनिसचे कार्यकर्ते संजय बनसोडे आणि श्रीमती सुशिला मुंडे सगळ्यांच्याच बोलण्यात मनस्वी कृतार्थता होती. याच वातावरणात स्व. नरेंद्र दाभोळकरांची कन्या मुक्ता आणि मुलगा हमीद दाभोळकर व्यासपीठावर आले. आणि मुक्ता बोलून गेली ‘‘बाबांच्या खूनानंतर आज यु.आर.एल.ने अनिसच्या दोन कार्यकर्त्यांना पर्यायानं अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या चळवळीला गौरवलंय’’, दादा तुमची ही कृतज्ञता आमचं बळ वाढवेल. आम्ही जोमानं अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करू. मुक्ताच्या या भावभरल्या बोलण्यानं क्षणभर प्र्रेक्षकांत आदरयुक्त शांतता झाली. त्याचवेळी माझ्या मनात आलं  पैसा, संपत्ती याच्या वलयात धुंदीत राहणारे, मस्तीत जगणारे आणि कैफात बेहोश होणारे असंख्य अगणित असतात पण ज्या समाजात आपण माणूस म्हणून जन्माला आलो त्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो या भावनेतून या कृतार्थ विचारातून तुम्ही कृतज्ञता पुरस्कार देवून समाजातल्या असामान्यांना मोठं करताय हीच मोठी कृतज्ञतेची ही अनोखी विचारधारा जपणारे फार कमीजण असतात. दादा त्यापैकी तुम्ही एक. तुमच्या कृतज्ञता विचारांचा वसा आणि वारसा संत-महंतांच्या या महाराष्ट्र भूमीत इतरांनीही घ्यावा अशीच मनोमन परमेश्‍वरचरणी प्रार्थना.
दादा आता सत्तरी ओलांडताना तुमच्या मनातली करायची राहून गेलेली गोष्ट म्हणजे तुमच्या चिपळूणच्या परिसरात स्वकष्टार्जित जागेवर तुम्हाला शिक्षण संकुल उभारायचंय. तुमच्या जिद्दी स्वभावाला अशक्य हा शब्द माहित नाही. त्यामुळे तुमचे प्रयत्न आणि पराकाष्ठा या दुहेरी बळावर लवकरच यु.आर.एल. फाऊंडेशनचे एक भव्यदिव्य शिक्षण संकुल भगवान परशुरामाच्या भूमीत चिपळूण परिसरात कोकणच्या या निसर्गरम्य प्रदेशात लवकरच साकारावं. ज्यामुळे इथली भावी पिढी शिक्षणांने सुसंस्कारीत होईल. जाताजाता शेवटी तुमच्या एका आणखी विचारपैलूची इथं आठवण होतेय तो म्हणजे तुम्ही नेहमी सांगता दुसर्‍याला फसवण्याच्या धंद्यापेक्षा गोरगरीबाला हसवण्याचा छंद जगण्याची नवी उमेद देतो.  यासाठी समाजाप्रती कृतज्ञता हवी. त्यासाठी प्रत्येकानं ‘‘आपल्या कुवतीप्रमाणे आपली अर्धी भाकरी समोरच्याला द्यावी’’ तुमचा हा विचार आजच्या कलीयुगात प्रत्येकानं आपल्या ओंजळीत घेवून जगायला हवा.
दादा आपण ७१ व्या वर्षात पदार्पण केलंत. तुमच्यातला कृतीशील माणूस मनस्वी कृतज्ञ दादा असाच दुसर्‍यांना आनंद देणारा चैतन्यशील राहो हीच सदिच्छा. तुमच्यासोबत सावलीसारखं राहणार्‍या सौ. मम वहिनी आणि समस्त लाड कुटुंबियांना कृतार्थ नमस्कार.
जयु भाटकर
मो. ९८६९५६७८७७

हिंदू संघटनांचे राष्ट्रीय व्यासपीठ!

E-mail Print PDF
वैदिक काळापासून भारत हे हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र हे काही पावसाळ्यातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या संधीतून (तहातून) उत्पन्न झालेले नाही. तो निव्वळ कागदी खेळ नाही. ते एखाद्या मागणीप्रमाणे घडवलेले नाही अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते याच भूमीतून वर आलेले आहे आणि याच भूमीत त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला तो शोध नाही, तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे !  
9-june-hindu-janjagran-samitiहिंदु राष्ट्र ! स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाटणारे हे भक्कम सत्य स्वातंत्र्यानंतर मात्र विस्मरणात गेलेला शब्द बनला ! स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वयंभू हिंदू राष्ट्र असलेले भारतवर्ष हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले. परिणामी जगात ख्रिश्‍चनांची १५७, मुस्लिम समाजाची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र असले, तरी हिंदूंचे एकही मानाचे राष्ट्र या विश्‍वमंडळात नाही. त्यामुळेच हिंदु संस्कृती आणि सनातन धर्म यांचा वारसा सांगणारे आणि जपणारे भारतवर्ष हे हिंदु राष्ट्र म्हणून उद्घोषित व्हावे, या निखळ हेतूने गोवा येथे गेली ३ वर्षे अखिल भारतीय हिंदु अधिवेशन आयोजित केले जात आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात कार्यरत लहान-मोठ्या हिंदूंच्या संघटना आणि हिंदु धर्मातील संप्रदाय यांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित असतात. २० ते २६ जून २०१४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे सात दिवसीय तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशन पार पडणार आहे. हिंदू अधिवेशनाच्या परिघात देश-विदेशातील हिंदु संघटना !        
२०१२ आणि २०१३ या वर्षी झालेल्या प्रथम आणि द्वितीय अ.भा. हिंदू अधिवेशनांत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या हेतूने भारताच्या कानाकोपर्‍यांतून हिंदुत्वनिष्ठांनी एकत्रित येणे, हे अत्यंत आश्‍चर्यकारक आणि एखाद्या चमत्कारापेक्षा वेगळे नव्हतेे ! पहिल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १७ राज्यांतील ४० हिंदु संघटनांचे १४५, तर दुसर्‍या अधिवेशनात २० राज्यांतील ७० हिंदुत्ववादी संघटनांचे ३२० प्रतिनिधी सहभागी झाले. या अधिवेशनाला नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंका येथील हिंदु संघटनांचे प्रतिनिधीही आवर्जून उपस्थित राहिले. या वेळी २० राज्यांतून १२५ हून अधिक हिंदु संघटना आणि संप्रदाय यांच्या ३०० प्रतिनिधींची आताच नावनोंदणी झाली आहे. नावनोंदणी अद्याप चालू असल्याने यात अजून निश्‍चितच वाढ होईल. हिंदु संघटनांचा हा वाढता प्रतिसाद, ही अधिवेशनाची खरी फलनिष्पत्ती आहे.
अखिल भारतीय हिंदू अधिवेशन म्हणजे हौशागौशांचे संमेलन नाही, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतभरातून आलेले हिंदु राष्ट्रप्रेमींचे एकत्रीकरण आहे. साधारणतः लौकिकार्थाने विविध विषयांवरील संमेलने ही हौशी रसिकवर्गासाठी असतात. विविध विषयांवर होणार्‍या परिषदा या त्या क्षेत्राशी संबंधित तज्ञ किंवा कार्यकर्ते यांसाठी असतात. अधिवेशन हे मात्र विशिष्ट व्यक्तीद्वारे वा संघटनेद्वारे नियुक्त प्रतिनिधींचे असते. संसदीय अधिवेशन हे लोकनियुक्त प्रतिनिधींचे अर्थात खासदारांचे असते. अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हेही संघटना आणि संप्रदाय नियुक्त प्रतिनिधींचे आहे. भारताची २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश येथे कार्यरत प्रांतस्तरीय हिंदू संघटनांना या अधिवेशनाचे आमंत्रण असते. या संघटना आपले मुख्य २-३ प्रतिनिधी या अधिवेशनासाठी नियुक्त करतात. जैन, शीख, लिंगायत आदी पंथसंप्रदाय, तसेच वारकरी, शैव आदी धर्मसंप्रदाय आणि भारत स्वाभिमान, योग वेदान्त समिती, या विविध संतांनी लोककल्याणार्थ आणि आध्यात्मिक कार्याच्या हेतूने स्थापलेल्या संस्था यांचेही १-२ प्रतिनिधी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला आवर्जून उपस्थित रहतात, हे येथे नमूद करावेसे वाटते.     तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला हिंदु संघटनांच्या वाढत्या सहभागामागील कारणेही तशी महत्त्वाची आहेत. आज अनेक हिंदु संघटनांना कार्य करण्याची इच्छा आहे; मात्र त्यांच्याकडे दिशा नाही. काही संघटनांकडे दिशा आहे; मात्र मनुष्यबळाचा अभाव आहे. काही हिंदु संघटनांकडे कार्यकर्ते आहेत; मात्र त्यांच्याकडून लोकाभिमुख कार्य होत नाही. काही संघटनांकडे उत्तम व्यवस्थापनकौशल्य नाही. अशा सर्व संघटना एका व्यासपिठावर आल्याने विचारांचे आणि अनुभवांचे आदानप्रदान होते. गोहत्या रोखणे, धर्मांतर रोखणे, संस्कृतीरक्षण, मंदिर-संवर्धन अशा हिंदू संघटनांच्या पारंपरिक चळवळी अधिक प्रभावीपणे कशा राबवता येतील, याविषयी विचारमंथन होते. या विचारमंथनातून आपल्याला भागात कार्य करण्याची नवी प्रेरणा आणि दिशा मिळते. अधिवेशनाच्या निमित्ताने विविध राज्यांतील हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख पाच-सात दिवस एकत्र राहिल्याने परस्परांमध्ये जवळीक निर्माण होते. प्रत्येक संघटना जेथे थांबली असते, तेथे तिला चालना मिळून ती पुढे जाते. संघटना प्ाुढे जाते, याचा अर्थ हिंदुत्वाच्या कार्यालाच गती मिळते. आज जरी या अधिवेशनाचे लाभ संघटनात्मक पातळीवर जास्त दिसून येत असले, तरी भविष्यातील संकटकाळात हिंदु समाजालाही याचा लाभ नक्कीच जाणवेल. उत्तराखंड येथील आपत्तीत अ.भा. हिंदू अधिवेशनाने सर्व राज्यांच्या समन्वयातून केलेले साहाय्य, हा त्याचा प्ाुरावा आहे.
द्वितीय अ.भा. हिंदू अधिवेशनात हिंदू संघटनांनी एकत्र कार्य करण्यासाठी आखलेले समान कृती कार्यक्रम हे त्यांना प्ाुढील कार्यासाठी गती आणि उत्साह देणारे ठरले. गोरक्षण, मंदिररक्षण, हिंदूरक्षण आदी हिंदूंच्या समस्यांवर प्रत्येक संघटना स्वक्षमतेनुसार संघर्ष करत असते. अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामुळे या सर्व संघटना एका धाग्यात विणल्या गेल्यामुळे व्यापक दृष्टीकोन ठेवून संघशक्तीने राष्ट्रव्यापी कार्य करण्यास आरंभ झाला आहे. प्रत्येक हिंदुत्ववादी संघटना वेगवेगळे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत असल्याने त्यांच्यात एकत्र येण्यासाठी आवश्यक समान ध्येयाचे अंतर हिंदू अधिवेशनाने प्ाूर्ण केले. हे ध्येय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! या ध्येयाच्या प्रसारार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी या वर्षी आपल्या कार्यक्षेत्रातील हिंदु संघटनांना एकत्र करून प्रांतीय हिंदू अधिवेशनांचे आयोजन केले. ६ राज्यांत ३० ठिकाणी प्रांतीय हिंदू अधिवेशनांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. द्वितीय अ.भा. हिंदू अधिवेशनाने हिंदूंवरील समस्यांच्या विरोधात देशभरातील सर्व हिंदु संघटनांना महिन्यातून एकदा एकाच दिवशी रस्त्यावर येण्याची प्रेरणा दिली.
जगात सर्वत्र अल्पसंख्यांकांची संमेलने होतात. भारतात मात्र बहुसंख्यांकांचे अधिवेशन घ्यावे लागत आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे. आज जगातील सर्व राष्ट्रे प्राधान्याने बहुसंख्यांकांचे हित जपत असतांना अल्पसंख्यांकांवर अन्याय होणार नाही, याची विशिष्ट चौकटीत राहून दक्षता घेतात. भारतात मात्र बहुसंख्यांकांच्या हिताकडे लक्ष देणे लांबच; मात्र अल्पसंख्यांकांच्या हिताच्या नावाखाली बहुसंख्यांकांवर अन्याय आणि काही वेळा अत्याचारही केले जातात. बहुसंख्यांकांमध्ये फूट पाडून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधला जातो. त्यामुळेच बहुसंख्यांक हिंदूंच्या हितासाठी अधिवेशन घ्यावे लागत आहे. बहुसंख्यांक हिंदूंचे प्रतिनिधित्व करणार्‍या हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय यांना हिंदूंच्या रक्षणासाठी कृतीप्रवण व्हावे लागत आहे. अशाच हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय यांचे हे अधिवेशन आहे. सर्वसामान्य हिंदूंच्या दृष्टीनेही हे अधिवेशन खूप महत्त्वाचे आहे; कारण त्यांच्या समस्या, त्यांच्या मनातील उद्रेक या अधिवेशनात मांडला जाणार आहे. इतकेच नव्हे, तर या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठीही हे अधिवेशन कटिबद्ध रहाणार आहे. तात्पर्य, अ.भा. हिंदू अधिवेशन हे केवळ हिंदु राष्ट्र स्थापनेचा यज्ञकुंड नाही, तर हिंदूहिताचे मंथन करणारे व्यासपीठ आहे. या अधिवेशनांची ही शृंखला भविष्यातील एका नव्या इतिहासाला निश्‍चित वळण देईल.   
देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१३ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असतांना द्वितीय अ.भा. हिंदू अधिवेशनाचे शुभेच्छापत्र पाठवून अभिनंदन केलेे होते. त्या पत्रात श्री. मोदी म्हणालेे होते की, जीवनपद्धती, सिद्धांत आणि मानवता यांमध्ये संबंध ठेवणारी हिंदु संस्कृती विश्‍वात सर्वश्रेष्ठ आहे. धर्म, संस्कृती, परंपरा यांसाठी केली जाणारी जागृती, हा निरंतर चालणारा यज्ञ आहे.
- श्री. अरविंद पानसरे,
प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती. (संपर्क : ९४०४९५६५३४)

‘‘कर्तृत्वशाली सौंदर्याचा साक्षात्कार घडविणारी गाथा- दादा महाराष्ट्राचा...!’’

E-mail Print PDF
गौरव ग्रंथ, चरित्र आणि आत्मचरित्र यात एक समान धागा असतो, तो धागा म्हणजे स्तुतीचा. विविधांगी परिस्थितीत तो कसा तगला, निभागून गेला, याचं स्वकौतुक किंवा इतरांनी केलेलं कौतुक असतं. कर्म प्रशंसा असते. मात्र पद्म प्रताप पाटील सारखा तरूण उच्च शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे कॉलेजमध्ये ‘ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट’मध्ये प्रवेश घेतो. दुसर्‍या वर्षात २०१० मध्ये कन्याकुमारी ते दिल्ली अशी ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या संदर्भातील मोटार सायकलवरून जनजागरण रॅलीची जबाबदारी स्विकारतो. त्या काळात मा. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, यांना भेटण्याचा त्याला दहा-बारा वेळा योग येतो. दादांचा स्पष्टवक्तेपणा, निर्णयक्षमता, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती व कार्यकर्त्याला शक्ती देण्याची कृती पाहून तो प्रभावित होतो. तेव्हा त्याचे पुढार्‍यांबद्दलचे मत चांगले नसतानाही नेता असावा तर असा असे त्याचे ठाम मत बनते. त्यांचे खरे स्वरूप लोकांपर्यंत पोहचायचे यावर त्याचं मन आश्‍वासतं. मुक्तरंगचे महारूद्र मंगनाळे यांची त्यासाठी मदत घेतो. कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता, जाहिराती न घेता मग हा तरूण पद्म प्रताप पाटील या मा. महारूदासोबत संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत करतो.
dada-maharashtrachaमहाराष्ट्राच्या ३० जिल्ह्यात जावून अगदी छोट्या खेड्यापर्यंत हा तरूण ‘पद्म’ या अजितदादांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्वाचा वेध घेतो. एकूण १०३ छोट्या मोठ्या मुलाखती आणि ५९ विविध क्षेत्रातील कार्यरत राजकीय पक्षांचे कार्यकर्ते. स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, साहित्य, शिक्षण, कृषी, उद्योग, सहकार, नाट्य, सांस्कृतिक, सेवाभाव, पत्रकारिता व प्रशासनातील मान्यवर यांना बोलते करतो, लिहिते करतो. व्हिडिओ आणि कॅमेर्‍याच्या सहाय्याने एक ठोस साक्षीत ताळेबंद तयार करतो. मुक्तरंगचे महारूद मंगनाळे त्याने जशा मुलाखती घेतल्या. तसाच लेखा जोखा ‘दादा महाराष्ट्रा’चा या पुस्तकात संपादीत करतात. या पुस्तकात मग घडतो कर्तृत्वशील सौंदर्याचा साक्षात्कार. साक्षात मा. अजितदादा पवार यांच्याबाबतच रंजकतेने सहज सहज मुलाखती आणि लेख एक कर्तृत्वशाली व्यक्तीमत्वाचा परिचर घडवतात. पारदर्शीपणा हे या पुस्तकाचे सौंदर्यस्थळ आहेच पण मा. दादा पवारांच्या मनस्वी कर्तृत्ववान संवेदनशील पारदर्शी वैशिष्ट्यांचा यात वेध घेतला जातो. हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. इथे चरित्र, आत्मचरित्र किंवा गौरव ग्रंथातील स्तूतीचा स्पर्शही नसतो. म्हणूनच हे संपादीत पुस्तक एक आदर्श गाथा आहे, संपादनाची, लेखनाची,व्यक्तीमत्वाचा वेध घेण्याचीही आणि व्यक्तीमत्वाची. कारण यामुळेच तर ग्रंथ घडतो.
विविधांगी शिर्षकांच्या अनुक्रमणिकेतून ‘अष्टपैलू नेतृत्व’ पान ८७, लेखक श्रीनिवास पाटील, माजी आय.ए.एस. अधिकारी व माजी लोकसभा सदस्य, कराड यांचा त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध, कार्यानिमित्त हे लिहितात. प्रत्येक गोष्ट समजावून घेणं, ज्यांना माहिती आहे, त्यांना विचरून घेणं, त्याचा अभ्यास करणं हा दादांचा गुण आहे. मंत्रीमंडळात होणार्‍या निर्णयांची अंमलबजावणी करून घेण्याचे काम दादाच करतात. सामान्यांच्या हिताचे निर्णय राबविताना प्रसंगी कठोर भाषेत आदेश देतात. सांगितलेले काम झाले की नाही, याचा ते पाठपुरावा करतात. केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर विदर्भ, कोकण व मराठवाडा येथील सर्व कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेवून ते निर्णय राबवतात. दादा जे बोलतात ते करून दाखवतात.
दादांची कामाची गती विलक्षण आहे. ते सकाळी मुंबईला, दुपारी मराठवाड्यात तर दुसर्‍या दिवशी कोकणात असतात. अनेक बैठकांना ते संबोधित करतात. सगळ्यांचे विचार ऐकून घेतात व स्वतःचा ठाम निर्णय मोजक्या शब्दात सांगतात. तो राबवतात. हे त्यांचे खास वैशिष्ट्य.
ते आपल्या लेखात पुढे म्हणतात. ‘पृथ्वीवरील हरीतकवच वाढले तर पावसाचे प्रमाण वाढेल. कार्बनडाय ऑक्साईड हवेत अमिसरीत व्हावा. ओझोनला पडणार्‍या मर्यादा संपाव्यात यासाठी अधिकाधिक झाडे लावण्याची गरज आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हा दादांचा आवडता कार्यक्रम आहे. ग्रामीण भाग स्वच्छ रहावा, गाव हागणदारीमुक्त व्हावे, सर्वांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी झोकून देवून काम करणारे दादा आहेत. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, म. फुले जलसंधारण अभियान, लेक वाचवा मोहीम, ग्रामीण आरोग्य योजना, सामान्य कुटुंबातील मुलांसाठी शिक्षणाच्या सुविधा, मुलींसाठी स्वच्छतागृहे अशा कितीतरी योजना अजितदादा राज्य शासनकर्ते राबवून घेत आहेत. एखादी गोष्ट आवडली नाही तर ‘नाही’ म्हणून सांगण्याचे धाडस दादांकडे आहे. दादांच्या काम करण्याच्या वृत्तीमुळे जनमानसात त्यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद निर्माण झाला आहे.
जनतेच्या सकारात्मक निर्मितीक्षम कामांना ते खूप अग्रक्रम देतात. याचे उत्तम उदाहरण कोकणचे भाग्यविधाते या श्री. शेखर निकम लिखित लेखात अनुभवायस मिळते. पान नं. १११ वर श्री. शेखर निकम लिहितात- ‘लोकांशी संबंधित काम असेल तर दहा दहा मंत्र्यांच्या उपस्थितीतही दादा काम करण्याचा प्रयत्न करणारच. रोजगार निर्मितीची, उद्योगाबाबतची, पाझर तलावाची, पाणी पुरवठ्याची, वीजे संबंधीची अशी कितीतरी कामे दादांमुळे मार्गी लागली आहेत. कोकणात काजू व आंब्यावर प्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत, अशी दादांची प्रखर इच्छा आहे. दादांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंधरा वीस काजू उत्पादकांनी कारखाने सुरू केले. मात्र सरकारने काजूवर साडेबारा टक्के व्हॅट लावल्याने हे कारखाने अडचणीत आले. या सगळ्या कारखानदारांना घेऊन मी एके सकाळी दादांच्या बंगल्यावर गेलो. काजूवर साडेबारा टक्के व्हॅट लावल्यामुळे ब्लॅकचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे शेतकर्‍यांना पैसा मिळत नसल्याचं आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनी लगेच कमिशनरला फोन केला. आमच्यासोबत त्यांचा पी.ए. देवून आम्हाला कमिशनर ऑफिसला पाठवले. त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी दादांकडे एक टिप्णी पाठवली. दादांनी दुसर्‍या दिवशी सभागृहात काजूवरील साडेबारा टक्के व्हॅट पाच टक्के केल्याचा निर्णय जाहीर केला. शेतकर्‍यांशी, जनतेशी संबंधित निर्णय असेल तर ते किती तातडीने घेतात, हेच यातून सिद्ध होते.
भावी मुख्यमंत्री या लेखात चित्राताई लुंगारे यांचा अनुभव खूप बोलका आहे. (पान १२७) त्या कृषि उत्पन्न बाजार समिती मुंबईच्या सदस्या आहेत. त्यांचे वडील केशवराव धोंडगे हे कंधार मतदारसंघाचे ३५ वर्षे कार्यकर्ते. पण मुलीचा प्रचार करणार नाही असा त्यांचा बाणा. अशावेळी हे दादा त्यांच्या मदतीला धावून आले. तिला बहिण मानले. आपल्या भाषणात तिचा बहिण म्हणून आवर्जुन उल्लेख करतात. एक अत्यंत भावूक स्थितीत या तुंगारे लिंबोटी धरणाच्या पाणी पुजनालादादांना त्यांच्या वडिलांनी धरणाची मुहूर्तमेढ रोवली. याचा उल्लेख व्हावा, याची चिठ्ठी पाठवतात. दादा त्याचा आवर्जुन उल्लेख करतात. असेही अनेक प्रसंग एकूण २३८ पानी पुस्तकाची पाने सजवतात. यात कर्तृत्वाचे सौंदर्य असते. भावनांचा सुरेख मिलाफ असतो. सुसंवादाची मैफल असते. प्रसंगी कठोर निर्णयाची झलक दिसते. कधी निर्मितीच्या उत्कट भावुकतेची बांधिलकी दिसते. असं एकही क्षेत्र नाही, ज्यात या दादांनी आपला एक शासनाचा विश्‍वस्त पदाधिकारी म्हणून स्पष्ट ठसा उमटवला नाही, या सर्वांची गाथा, कथा या विविधांगी लेखात येतात. व्यक्तीमत्वाला किती कॅलेडिओस्कोपिक कंगोरे असू शकतात. याचे सुंदर दर्शन संपादक महारूद मंगनाळे आणि मुलाखतकार तरूण लेखक श्री. पद्म प्रताप पाटील यांनी या ‘दादा महाराष्ट्रा’चा या पुस्तकात दिले आहे. सर्वांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचावे, आपल्या संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे चरित्र वाचक यांना पुढील काळासाठी शुभेच्छा आणि या तरूणाचे खास अभिनंदन!
पुस्तकाचे नाव- दादा महाराष्ट्राचा, एकूण पाने-२३८
संपादक-पद्म प्रताप पाटील, कार्यकारी संपादक महारूद मंगनाळे.
प्रकाशक व वितरक-मुक्तरंग प्रकाशन, लातूर.
मुल्य-३००/- रुपये
दूरध्वनी ः (०२३८२) २४४६६०, मोबा. ९४२२४६९३३९.

Page 4 of 14