Tuesday, Jan 23rd

Headlines:

अध्यात्म

‘मी ज्याला माझा म्हटला त्याच्याबद्दल मला अपत्यप्रेम वाटते’

E-mail Print PDF
एकाने विचारले की, महाराज, आपण आमच्या कल्याणाकरिता सतत एवढे झटता. आम्हाला त्याची जाणीव नसते. आम्ही ती न ठेवता वागतो. तरी आपला आमच्याबद्दलचा आपलेपणा कसा कमी होत नाही?’ श्रीमहाराज म्हणाले, ‘एखादे सातआठ महिन्याचे सुंदर बाळसेदार मूल असते, आईच्या अंगावर ते आनंदात पीत असता आईला लाथा मारते. खरं म्हणजे मुलानं आईला लाथा मारू नयेत, पण ते आईला लाथा मारते तेव्हा आईला त्याचे आणखीनच प्रेम येते. तसे मी ज्याला माझा म्हटला त्याला त्याची जाणीव नसली तरी मला त्या आईसारखं होतं.’

भगवंताच्या स्मरणात केलेला प्रपंचच ‘नेटका’ होतो

E-mail Print PDF
दासबोधाचा अभ्यास करणारे एक साधक श्रीमहाराजांना म्हणाले, ‘आधी प्रपंच करावा नेटका! मग घ्यावे परमार्थ विवेका’ असे समर्थ सांगतात. प्रपंच नेटका करण्याच्या प्रयत्नात आमचा सारा दिवस जातो. मग भगवंताच्या स्मरणाला अवसर उरत नाही. तेव्हा प्रपंच नेटका करून परमार्थ साधायचा कसा? यावर श्रीमहाराज म्हणाले, तुम्ही प्रपंच नेटका करीत नाही, तो नेटाने करता. तो नेटाने करा असे समर्थांना म्हणायचे नाही. परमार्थ नेटाने करावा म्हणजे प्रपंच आपोआप नेटका होतो असे त्यांना म्हणावयाचे आहे. जो भगवंताच्या स्मरणात होतो तोच खरा नेटका प्रपंच होय.

नामगंगा-श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

E-mail Print PDF

दुसर्‍याच्या वासनेने बरबटलेला पैसा आपली वृत्ती बिघडवतो

एका डॉक्टरना शब्दकोडी सोडवून बक्षिसे मिळविण्याचा छंद होता. ते त्यांनी एकदा श्रीमहाराजांच्या कानावर घातले. अशा रीतीने पैसा कमवणे श्रीमहाजांना पसंत नव्हते. ते का, असे विचारता श्रीमहाराज म्हणाले, समजा कोड्याचे बक्षीस शंभर रुपये असून एक रुपया फी आहे. ज्याने ज्याने फी भरली आहे त्याची वासना त्या शंभर रुपयांत गुंतलेली असते. तुम्हाला ते बक्षीस मिळाले तर तुमचा रुपया सोडून बाकीच्या नव्याण्णव रुपयांबरोबर इतर सर्वांची वासना तुमच्याकडे येते. असा वासनांनी बरबटलेला पैसा आपल्या वृत्तीवर परिणाम केल्याशिवाय कसा राहिल? वाईट मार्गाने पैसा मिळवणार्‍यास यामुळे समाधान असत नाही.

नामगंगा-श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

E-mail Print PDF
आपण मिळविलेले वैभवही वस्तुतः रामाच्या कृपेचेच फळ होय
एक नवराबायको श्रीमहाराजांच्या दर्शनास आले. नवरा म्हणाला, ‘महाराज, माझे बस्तान चांगले बसले असून माझी मासिक प्राप्ती उत्तम आहे. श्रीमहाराज त्याला म्हणाले, ‘आपल्याला जे मिळते ते रामाच्या इच्छेने मिळते. आपण फक्त नाममात्र असतो. कितीही वैभव आलं तरी रामाला कधीही विसरू नये. हे झाल्यावर पत्नीकडे वळून श्रीमहाराज म्हणाले, ‘तुम्हाला काही विचारायचे आहे का?’ बाई पुढे सरकली व तिने बोलण्याचा दोनतीनदा प्रयत्न केला. पण तिचे डोळे पाणावले व तिच्या तोंडातून शब्द बाहेर येईना. तेव्हा श्रीमहाराज मोठ्या प्रेमाने तिला म्हणाले, ‘मालक मारतात का?’ ते ऐकून ती आणखीनच रडू लागली. श्रीमहाराज त्या नवर्‍याला म्हणाले, ‘तुझी पैशाची उन्नत्ति तुझ्या कर्तबगारीची नसून या मुलीच्या पायगुणामुळे आहे. ही लक्ष्मी म्हणूनच तुझ्या घरी आलेली आहे हे कायमचे लक्षात ठेव. इतःपर हिच्या अंगास हात लावल्यास तुझ्यावर लक्ष्मीची अवकृपा होईल. ती जर झाली तर तुझे सर्व वैभव ओसरून जाईल. तशी दुःस्थिती प्राप्त झाल्यावर मग मात्र माझ्याकडे रडत येऊ नकोस.’ श्रीमहाराज जरा त्याला बजावण्याच्या भावाने हे बोलले. त्या बाईला मग श्रीमहाराज म्हणाले, ‘बाळ, जी समस्या होती तिचा पूर्ण बंदोबस्त झाला आहे. आता नाम घेऊन आनंदात संसार करावा.’

नामगंगा-श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

E-mail Print PDF
आपण आपल्या कमाईचे अन्न खातो असे समजतो, पण तेही खरे भगवंताच्याच कृपेचे असते
श्रीमहाराज एकाला म्हणाले, ‘आज रामाचा प्रसाद घेऊन जावे.’ तो म्हणाला, ‘मला ते शक्य नाही, कारण चातुर्मासात परान्न घ्यायचे नाही असा माझा नेम आहे.’ श्रीमहाराजांनी विचारले, ‘रोज आपण घरी जेवता तेव्हा आपली काय भावना असते?’ तो म्हणाला, ‘मी आपल्या कमाईचे अन्न खातो असे वाटतं.’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘‘अशा भावनेने जर तुम्ही रोज घरी जेवत असाल तर त्यापेक्षा परान्न घेतलेले बरे.’मी माझ्या कमाईचे खातो, त्यात भगवंताच्या कृपेचा भाग नाही’ अशी भावना मनात असणे फार अपायकारक आहे. रोज आपण जे अन्न ग्रहण करतो ते त्याच्याच कृपेने व इच्छेने करतो अशीच साधकाची भावना पाहिजे.
ही भावना निर्माण होण्यासाठी असे नेम करायचे असतात. नेमाचा दुसरा उद्देश असा की कोठल्या तरी वाईट घरातील अन्न पोटात गेले तर त्याचा वृत्तीवर वाईट परिणाम होण्याचा संभव असतो. तो धोका टाळण्यासाठी हा नेम बरोबर आहे. येथील अन्न सर्वस्वी रामाच्या कृपेचे आहे, म्हणून ते अत्यंत पवित्र आहे. ते ग्रहण केल्याने तुमच्या नेमाचे उल्लंघन होणार नाही.’’ ते गृहस्थ प्रसाद घेऊन गेले.

Page 1 of 2

  • «
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  Next 
  •  End 
  • »