Tuesday, Jan 23rd

Headlines:

युवा रोजगार

‘अन्नपूर्णे’चा साक्षात्कार ः केळकर उपाहारगृह!

E-mail Print PDF
आहारशास्त्रात सात्विक आहार सर्वश्रेष्ठ मानला जातो. अन्नातून सर्व रसाचं सेवन व्हावं जेणेकरून निरोगी, सुदृढ शरीर कमावता येईल असं आपलं आहारशास्त्र सांगतं. अन्नदेवता म्हणून ‘अन्नपूर्णा देवी’ची घरोघरी पूजा होते. ज्या घरात कोणीही विन्मुख परत जात नाही त्या ठिकाणी ‘अन्नपूर्णा’ प्रसन्न आहे असंही म्हणतात. याच अन्नपूर्णेचा साक्षात्कार येथील ‘राजा केळकर उपाहारगृहात’ अनुभवायला मिळतो.00_ku
‘खाण्यासाठी जन्म आपुला’ असला तरी चविष्ट अन् रूचकर भोजनाची प्रत्येकाला आवड असते. पण हे अन्न बनवताना गृहिणींचा जो मूड असेल तसा अन्नाला स्वाद येतो असं आपले पूर्वज सांगतात. म्हणजेच प्रेमाने, आपुलकीने, आनंदाने अन्न शिजवलं तर तेच अन्न अधिक चवदार लागते. पण काही कारणाने राग, संताप, तिरस्कार या भावना अन्न शिजवताना असतील तर ते अन्नही बेचव लागतं. जे घरात तेच उपाहारगृहात. हा स्वभावधर्म लक्षात घेऊन केळकर उपाहारगृहात मिळणारे पदार्थ नेहमीच ‘अन्नपूर्णे’ची आठवण करून देतात.
केळकर दांपत्य आपल्या सहकार्‍यांसमवेत मारूती मंदिर येथे उपाहारगृह चालवतात. यातून पैसा मिळवणं हा दृष्टीकोन असला तरी येणार्‍या ग्राहकांचं जेवल्यानंतरचं चेहर्‍यावरील समाधान त्यांना अधिक बळ देतं. ‘तृप्तीची ढेकर’ त्यांच्यासाठी मोलाची ठरते. ज्याच्यासाठी करायचं तो समाधानी झाला तर यशाची चव गोड लागते असं म्हणतात.
जागा लहान असली तरी सकाळ-संध्याकाळ नाष्टा अन् दोन्ही वेळचं जेवण अशी उपाहारगृहाची विभागणी सांगता येईल. शिरा, पोहे, वडा, मिसळ, इडली हे नेहमीचे नाष्ट्याचे पदार्थ इथेही आहेत. पण इडलीवडा आणि कोथिंबीर वडा हे दोन पदार्थ त्यांचं वैशिष्ट्य आहे. चवीच्या बाबतीत बोलायलाच नको. एकदा ही डीश खाल्ल्यावर परत परत खावीशी वाटेल अशी ह्याची खासियत आहे.
जे नाष्ट्याचं तेच जेवणाच्या बाबतीत. म्हणजे ‘राईस प्लेट’चा पर्याय जसा ओ तसंच पार्सल स्वरूपात पोळी भाजीही आहे. पण ‘अस्सल घरगुती’ टच त्यांनी मनापासून जपलाय. ऋतुमानानुसार मिळणार्‍या सर्व भाज्या ‘राईस प्लेट’मध्ये पहायला मिळतात. म्हणजे सर्व प्रकारच्या पालेभाज्या देताना एकाच पद्धतीत येणार नाहीत हे पाहिलं जातं. म्हणजे कधी ताकातला पालक तर कधी अळूची पातळ भाजी, कधी डाळीचं पीठ पेरून मुळ्याची भाजी असं ज्याप्रकारे घरी बनवतो तोच पायंडा त्यांनी या ठिकाणी सुरू केला. याशिवाय एकाच चवीची आमटी देण्याऐवजी कधी कढी, टोमॅटोचं सार, पिठलं असे घरगुती पदार्थ आवर्जुन हजेरी लावतात.
उन्हाळ्यात कैरीची डाळ, फणसाची भाजी, सोलकढी यांनी जेवणाची लज्जत वाढवली जाते. सणावारानुसार गोड पदार्थ तर ठरलेलेच. पुरणपोळी, मोदक, आमरस या पदार्थांना मानाचं स्थान दिलं जातं. घरी पाहुणा आल्यावर म्हणा किंवा चवीत बदल म्हणून आपण ताट सजवण्यासाठी जसं वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी ठेवणे त्याच पद्धतीने इथेही घरच्या पदार्थांना समाविष्ट केलं जातं. जेणेकरून ग्राहकाचं समाधान होईल हे पाहिलं जातं.
खाद्यपदार्थात जसा अस्सल शाकाहारी कोकणी ठसा दिसतो तोच बाणा पेयपदार्थातही जाणवतो. म्हणजे या ठिकाणी थंड पेयांमध्ये ताक, कोकम, आवळा, संत्र, सरबत आणि कैरीचं पन्ह मिळतं. पेप्सी कोकाकोलासारखी ‘क्रेझी’ पेय या ठिकाणी दिसत नाहीत. इथल्या मातीतली ही पेय आणि प्रकृतीच्यादृष्टीनेही गुणकारी हा एक दृष्टिकोन. त्याचबरोबर इथल्या उद्योगाला चालना आणि मार्केट मिळवून देण्यासाठी त्यांच्यापरीने उचललेल्या सहकार्याचा वाटा असं म्हणतात येईल. पालक आणि लहान मुलं दोघांनाही या पेयाची ‘क्रेझ’ निर्माण करणं हा जाणीवपूर्वक केलेला हा प्रयत्न नक्कीच सुखावणारा आहे. केवळ पैसा मिळवणं हे उद्दिष्ट नसून गुणवत्ता जपणं आणि आपल्याच माणसांना पुढे आणणं जसा दुहेरी हेतूही साध्य होताना दिसतो आहे.
ग्राहकदिन जपताना केळकरद्वयींनी आपल्याबरोबर काम करणार्‍या माणसांना आपल्या कुटुंबाप्रमाणे सामावून घेतलं आहे. त्यांच्यावर ठेवलेला विश्‍वास आणि त्यांच्या श्रमाची कदर त्यांनी ठेवल्यामुळेच सर्वजण मिळून हे उपाहारगृह चालवतात. वेळप्रसंगी कर्मचार्‍यांवर उपाहारगृह सोपवलं जाते. पण विश्‍वासाचं नातं इतकं दृढ आहे की शंका घेण्यास जागाच रहात नाही. आपुलकीची भावना जपल्यामुळे शिमग्याच्या काळातही हे उपाहारगृह दिवसभर सुरू ठेवणं शक्य झालं. एकमेकांची अडचण समजून घेणं हाच तर कुटुंबाचा आधार या ठिकाणी पहायला मिळतो. यामुळेच दिवसभरात ४०० हून अधिक चपात्या कराव्या लागल्या तरी चेहर्‍यावर दमल्याची छाया नसते.
राजा केळकर हे नाव कलाकार म्हणून रत्नागिरीकरांना परिचित आहे. ‘पखवाज वादक’ ही त्यांची ओळख. आजही कलेचा वारसा जपताना रत्नागिरीकरांना अस्सल घरगुती पदार्थ खिलवल्याची किमयाही त्यांनी साध्य केली आहे. यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीचीही साथ लाभली. दोघंही उत्तमप्रकारे पदार्थ बनवतात अन् सर्वांना खिलवतात. घरगुती स्वरूपात पदार्थ बनवले जायचे. आता उपाहारगृह सुरू करून रत्नागिरीकरांना ‘अन्नपुर्णे’चा साक्षात्कार घडवत आहेत.
लाल तांदुळाचा मऊ भात, साजूक तूप, मेतकूट, लोणचं असा कोकणातला न्याहरीचा पायंडा पूर्वापार चालत आलेला आहे. तीच परंपरा केळकर दांपत्य या ठिकाणी सुरू करू इच्छित आहेत. पुरेसा लाल तांदूळ मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. ते शक्य झाले की न्याहारीची ही ‘कोकणी डीश’ रत्नागिरीकरांच्या सेवेत रूजू होऊ शकेल!
-संगीता करंबेळकर

‘वेळ तुम्ही ठरवा; शिक्षण आम्ही देऊ!’ रंगधानी आर्ट गॅलरी!

E-mail Print PDF
कोकण आणि मुंबई हे नातं इतकं अतूट की मुंबईत काही झालं तरी त्याचे पडसाद कोकणात उमटतात. शिक्षण, नोकरी, व्यवसाय यासाठी तर मुंबईची वाट ठरलेलीच. मुंबईच्या मायानगरीत गेलेला सहसा परत घराची वाट धरत नाही. सणासुदीला घरी येईल पण कायमचं वास्तव्य खेडेगावात करणं दुर्मिळच. पण हे शक्य करून दाखवलंय कलाकार नीलेश शिळकर यांनी! रत्नागिरीत ‘रंगधानी आर्ट गॅलरी’ सुरू करून एक नवं दालन रत्नागिरीकरांसाठी सुरू केलं.00_art2
नीलेश शिळकर रत्नागिरीपासून ७/८ कि.मी. वर असलेल्या शीळचे रहिवासी. इयत्ता सहावीपासून मुंबईत वास्तव्य. शालेय शिक्षणानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश केला आणि कलेच्या प्रांतात पाय रोवले. कला क्षेत्रात ‘गोल्ड मेडल’ मिळवून शिक्षण पूर्ण केलं. पुढे काय? हा यक्ष प्रश्‍न मात्र कलाकाराला कधीच पडत नाही. मुंबईसाखं विस्तारित क्षेत्र असतानाही ते सोडून माघारी रत्नागिरीत आले. तसं पाहिलं तर शालेय वयातच इथून बाहेर पडल्यामुळे कोणीच ओळखीचं नव्हतं. ओळख, मैत्री, नाव सर्व नव्याने सुरू करायचं होतं. पण ठरवूनच रत्नागिरीत आलेले असल्याने स्वतःची ओळख निर्माण करण्याची जिद्द होती.
ड्रॉईंगचे क्लास घेण्यापासून त्यांनी सुरूवात केली. सुट्टीच्या काळात छंदवर्ग घेतले. हळुहळू मुलांचा कल वाढायला लागला. ड्रॉईंगचे क्लास घेता घेता कलेच्या इतर प्रकारातही क्लास सुरू झाले. असं करता करता आज उद्यमनगर रोडला ‘रंगधानी आर्ट गॅलरी’ सुरू झाली. ‘वेळ तुम्ही ठरवा, शिक्षण आम्ही देऊ’ असं ब्रीदवाक्य घेऊन खर्‍या अर्थाने कलेचा प्रवास सुुरू झाला.
अगदी ३/४ वर्षे वयोगटातील मुलांपासून ते अगदी नोकरदार गृहिणींपर्यंत सर्वच जे कलेची जाणीव ठेवतात असे या आर्ट गॅलरीकडे वळतात. दिवसभर विविध प्रकारचं कलेचं शिक्षण देणं सुरूच असतं. छंद वर्गामध्ये वारली पेंटींग, मधुबनी पेटींग, कॅलिग्राफ, ड्रॉईंग स्केचिंग या प्रकारचंं शिक्षण दिलं जातं. प्रत्येक प्रकारात बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स आहे. बेसिक कोर्स १५ दिवस आणि ऍडव्हान्स कोर्ससाठी ३० दिवस. अर्थात ही कला आहे. यामुळे ठराविक कालावधीत ती बांधता येऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन कागदावर जरी दिवसाचं गणित असलं तरी येणार्‍याला ती कला आत्मसात होईपर्यंत शिकवलं जातं. तासाचं बंधन नाही. वेळेचं बंधन नाही. येणार्‍याला जी वेळ सोयीची त्या वेळेत त्याने शिकावं असं मुक्त शिक्षण या आर्टगॅलरीत आहे. इथे आल्यावर कलाकाराचं मन रमतं आणि त्याच्या मनातील कल्पना चित्रातून उमटतात. तसं वातावरण मिळावं हाच तर या आर्ट गॅलरीचा उद्देश आहे.00_art3
शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, हस्तकला असेही वर्ग घेतले जातात. यामध्ये फ्री हॅण्ड ड्रॉईंग, मेमरी ड्रॉईंग, कोलार्ज याबरोबरच मातीकाम, पॉवरी पेंटींग्जही शिकवलं जातं. इथे येणारी मुलं परत जाण्याचं नाव घेत नाहीत. शेवटी अभ्यासाचं वर्ष म्हणून सक्तीने येणं कमी करण्यावर भर दिला जातो. अभ्यास प्रथम नंतर कला असं सांगण्याची वेळ येते.
एलिमेंटरी, इंटरमिजिएड ग्रेड परीक्षा २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेल्यांमध्ये ४ मुलं राज्यात गुणवत्ता यादीत चमकली. दोघांना ए+ ग्रेड मिळाली. दर्शन संजय डगळे ए+ ग्रेड राज्यात ३७ वा आला. कुणाल साळवी ए+ ग्रेड मिळवून राज्यात १९ वा आला. अक्षय अनंत मेस्त्री ए+ ग्रेड मिळवून ४० वा आणि मधुरा प्रशांत माचकर ए+ मिळवून १२ वी आली. याशिवाय अवनी नरेंद्र रेडीज आणि सूर्याली रविंद्र कोकरे यांना ए+ ग्रेड मिळाली.
कलेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळत असतानाच दिवाळीच्या दरम्यान आकाशकंदील बनवायला शिकवणं, गणपतीत मूर्तीकाम असे इतर उपक्रमही घेतले जातात. यात तयार होणार्‍या वस्तू विक्रीसाठीही उपलब्ध केल्या जातात.00_art5
नीलेश शिळकर एकीकडे मुलांना शिकवताना स्वतः पेटींग्जही करत असतात. कधी कुणाच्या मागणीनुसार, कधी स्वकल्पनेतून चितारतात. कधी कुणाच्या फोटोवरून हुबेहुब पेटींग्ज बनवून देणं यासाठीही ते तयार असतात. कुणाच्या मागणीनुसार घरी जाऊन पोट्रेट तयार करणं असो किंवा संपूर्ण भिंतीवर कलाकुसर असो जे सांगाल, जसं हवय तसं देण्याची त्यांची तयारी आहे. स्वतःची कला, छंद जोपासत अर्थार्जनही आणि नवीन कलाकार घडवण्यासाठी प्रशिक्षणही असं दुहेरी काम या ‘रंगधानी आर्ट गॅलरी’तर्फे सुरू आहे.
-संगीता करंबेळकर

एम.सी.ए. - एक उपयुक्त पदव्युत्तर अभ्यासक्रम

E-mail Print PDF
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एम.सी.ए. (Master of Computer) हा अनेक क्षेत्रांना उपयुक्त अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामध्ये PHP, Java सारख्या अद्ययावत प्रणालीचा आणि तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामुळे डे Software and Web Development, Banking, Insurance, Testing व्यवस्थापन क्षेत्र, सरकारी नोकरी, संगणक व्यवस्था या आणि इतर अनेक नोकरीच्या संधी निर्माण होतात.
एम.सी.ए. साठी सर्वच क्षेत्रातील पदवीधर प्रवेश घेऊ शकतात. संगणकशास्त्र, व्यवस्थापन आणि गणित या तीनही विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. विशेषतः व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक विषयांच्या समावेशामुळे या पदवीची उपयुक्तता वाढते. मुंबई विद्यापीठाची एम.सी.ए. पदवी ही तीन वर्षांची (६ semester) पदवी असून शेवटचे semester हे कंपनीमध्ये प्रोजेक्टसाठी राखीव असते.
१) एम.सी.ए. प्रवेशासाठी पुढील पात्रता आवश्यक आहे.
पदवी परीक्षेत ५०% गुण (खुला प्रवर्ग) तर ४५% गुण (राखीव आणि अपंग प्रवर्ग) २) १२ वी अभ्यासक्रमात गणित विषय किंवा पदवी अभ्यासक्रमात किमान एक वर्ष गणित अथवा सांखिकी विषय ३) प्रवेश परीक्षेत शून्याहून अधिक गुण.
प्रवेश परीक्षा online स्वरूपाची असून ती डी.टी.ई. (महाराष्ट्र) तर्फे ३० मार्च २०१४ रोजी आयोजित केली आहे. या परीक्षेचा अर्ज online पद्धतीने www.dtemaharashtra.gov.in/mca2014 या संकेतस्थळावर दि. १० ते २६ फेब्रुवारी २०१४ पर्यंत भरता येईल. सदर संकेतस्थळावरून डेबिट कार्ड, Online banking द्वारे परीक्षा शुल्क भरता येते. किंवा चलन प्रिंट करून Axis बँकेमध्ये परीक्षा शुल्क भरता येते. ७ एप्रिल रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर होतो. आवश्यक कागदपत्रांची छाननी १४ ते २३ मे २०१४ या काळात ARC मध्ये होईल. त्यानंतर प्रवेशासाठी online option form भरणे आवश्यक असते. सदर अभ्यासक्रम हा फिनोलेक्स ऍकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ऍण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी येथे आहे.