Saturday, Jan 20th

Headlines:

महिला बालकल्याण

शासकीय पातळीवर महिलादिनाची ‘दीनावस्था’

E-mail Print PDF
shraddh-kalambateअलिकडे आपल्या समाजता वर्षभर वेगवेगळे दिन साजरे करण्याचे एक फॅडच उदयास आलेले दिसते. मग तो महिला दिन असो वा व्हॅलेंटाईन डे, मातृदिन, पितृदिन वा बालदिन असो त्या त्या दिवशी प्रत्येक ठिकाणी संदर्भसहीत मोठा, उत्साह ओसांडून वाहताना दिसतो, नंतर मात्र कमालीची उदासीनता! जागतिक महिला दिनाची सुरूवात होऊन १०५ वर्षे उलटून गेली तरी आजही सर्वसामान्य महिलेला हा दिन आपण का साजरा करायचा हे ठाऊक नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस म्हणजे आनंदोत्सव अशी सर्वसाधारण (गोड गैर) समजूत करून घेऊन हजारो रूपयांची अक्षरशः उधळण केली जाते. तो मुळात जनतेचा पैसा असतो. याबाबत जाब विचारायला आपण कधी शिकणार आहोत? त्या त्या दिनाचं महत्व, उदद्ेश लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण स्वतः आचरण करणं हे अपेक्षित असतं. परंतु आजही आपण संगीत खुर्ची, पाककला स्पर्धा यातच धन्यता मानून आपण किती वैचारिकदृष्ट्या मागासलेले आहोत याचे दाखले देतो.
यावर्षी मला जिल्हा परिषदेच्या शासकीय कार्यक्रमात महिलांना प्रबोधन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची वेळ  होती सकाळी १० ची. मी नियोजित वेळेत कार्यक्रमस्थळी हजर झाले. संयोजक महाशय व दोन कर्मचारी महिला सोडल्यास सारा शुकशुकाट! कार्यक्रम रद्द झाला की काय अशी शंका मला आली. मी स्थानापन्न झाल्यानंतर दहा मिनिटांनी आयोजकांनी मला ‘मी कोण?’ अशी विचारणा केली व आज सर्वत्र कार्यक्रम असल्याने उपस्थितीचं काही सांगता येत नाही म्हणाले. परंतु माझ्या सुदैवाने ११-११॥ पर्यंत भला मोठा हॉल तुडुंब भरला. पावणेबारा वाजता उद्घाटनाची टोळधाड आली आणि व्यासपीठावरील पहिली रांग धाडधाड अडवून बसली. त्यानंतर आयोजकांना माझी आठवण झाली. मी शांतपणे दुसर्‍या रांगेत बसले. पहिल्या रांगेत सर्व पुरूष अधिकारी. शासकीय इतमामानुसार स्वागतसोहळा पार पडला. इतक्यात आणखी एका राजकीय पुढार्‍याचं आगमन झालं. त्यांनाही आग्रह करून वर बोलावण्यात आलं. (ही सध्याच्या राजकीय, शासकीय कार्यक्रमाची दुरावस्था) मात्र हे पुढारी खूपच सुशिक्षित, सुजाण बंधू निघाले. त्यांनी आमच्याकडे पाहून (माझ्या शेजारी राजकीय सदस्य महिला बसल्या होत्या) ‘अरे, आज महिला मागे का बसलेल्या?’ असा सवाल केला त्यावेळी पुढच्या अधिकार्‍यांना जाग आली. काही जण मागे आले. तशा माझ्या शेजारणी पटापट पुढे जाऊन बसल्या. (किती ही लाचारी!) मी मात्र माझी जागा सोडली नाही (त्यांच्या हात जोडून केलेल्या विनंतीला नम्रपणे नकार दिला) नंतर दीपप्रज्वलनासाठी पुकारण्यात आलं. पुन्हा टोळधाड सरसावली (उद्याच्या फोटोत यायला हवं ना!) सर्व पुरूष मंडळींनी दीपप्रज्वलन केल्यानंतर त्यांना आम्ही मागे उभ्या असल्याची उपरती झाली. (महिला दिनी महिलांचीच उपेक्षा!)
यानंतर प्रत्येकाचं मनोगत (अर्थातच कार्यक्रम पत्रिका वाचून दाखविल्यासारखं) त्यानंतर चहापाणी आलंच. परंतु यावेळेस नुस्ता चहा नव्हता तर सोबत काजू, बदाम, बेदाणे यांनी भरलेल्या डिशचा शाही खुराक! आजवर मी शेकडो कार्यक्रमांना उपस्थिती लावली. अगदी राष्ट्रीय परिषदेपर्यंत. परंतु असा शाही पाहुणचार पाहिला नव्हता. नुकताच अध्यक्षांनी महिलांच्या कुपोषणाचा उल्लेख केला होता. (खुराक मात्र व्यासपीठापुरताच, समोरील महिला उपाशी!) अर्थातच मी नाकारला अगदी चहासुध्दा!
तब्बल दोन तास कार्यक्रम उशीरा सुरू होऊनही उद्घाटन सोहळा एक तास चालला. माझ्यासह सर्व उपस्थित महिला समुदाय कंटाळून त्रासिक मुद्रेने केविलवाणा झालेला. पहिलं सत्र माझं असल्याने मी माईक हातात आल्या आल्या वरील सर्व समाचार घेतला. (व्यासपीठ स्तब्ध! हॉलमध्ये महिलांचा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट, चेहर्‍यावर कमालीची उत्सुकता आणि समाधान- त्याचं मनोगत मी व्यक्त केल्याबद्दल) मानसिक कोंडमार्‍याला अशातर्‍हेने वाट मोकळी झाल्याने माझ्या चर्चासत्रात (महिलांवरील अत्याचार) महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
वाचकहो, सध्या बहुसंख्य शासकीय, राजकीय व्यासपीठावर हे चित्र सर्रास पहायला मिळतं. समाजातील प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक घरात महिलांना गृहीत धरलं जातं. तिचं गौण स्थान गृहीत धरून तिला दुय्यम वागणूक दिली जाते. ही शेकडो वर्षांची पुरूषी मानसिकता महिलादिनाच्या दिवशी तरी कशी बदलणार? परंतु काळ बदलतोय. महिलांना परिवर्तन हवंय. हे आम्हाला गावोगावच्या बैठकीवरून जाणवतंय. आता महिला गप्प बसणार नाहीत. परंतु अजूनही त्यांना आमच्यासारख्या संस्थांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आधार हवाय.
काही आशादायी अनुभवांचा इथे जरूर उल्लेख करायला हवा. रत्नागिरी जिल्ह्याचे सन्मा. जिल्हाधिकारी राजीव जाधव यांची सर्वसामान्य नागरिकांना मिळणारी वागणूक खरोखरच उल्लेखनीय आहे. स्वतःचं काम बाजूला ठेवून ते नागरिकांना प्राधान्य देतात. परंतु त्यांचे पी.ए. व इतर कर्मचारी मात्र अनेक कारणं सांगून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरतात. राजकारणी, पुढारी यांना मात्र लगेच हिरवा कंदील! तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. शेख जे. एस. कोणत्याही कार्यक्रमात वेळेचं बंधन पाळतात. तक्रारदारांचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतात. सर्व राजकीय, शासकीय अधिकार्‍यानी स्वतःचं आत्मपरिक्षण करावं. कारण प्रत्येक जिल्ह्यात अन्याय, अत्याचाराची प्रकरणं महिला उघडं करू लागल्या आहेत. महिला मग ती गृहीणी असो वा कर्मचारी किंवा करिअरिस्ट तिने पुढे येऊन अन्यायाला वाचा फोडावी तरच खर्‍या अर्थानं ‘महिलादिन’ साजरा झाला असं अभिमानानं म्हणता येईल तो ही वर्षभर!
श्रद्धा कळंबटे
संपर्क ः हेल्पलाईन स्वयंसेतू
९४२२४३०३६२
Website : www.swayamsetu.org
email id : This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

Page 5 of 5