Saturday, Sep 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

बेकायदेशीर दारु विकणार्‍या दोघांना अटक

E-mail Print PDF
कणकवली - १५ ऑगस्ट ड्राय डे असताना शहरात बेकायदेशीर दारू विकणार्‍या दोघा बंधूंना पोलिसांनी आज रंगेहाथ पकडले. वैभव आरोलकर व नारायण आरोलकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत
कणकवली येथील तेली आळीतील  वैभव आरोलकर व नारायण आरोलकर हे दोघे आज ड्राय डे असूनदेखील महाराष्ट्रीयन बनावटीची बेकायदेशीर दारू विकत होते. यासंबंधी पोलिसांना माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी या दोघा बंधूना ताब्यात घेतले. तर त्यांच्याकडून दारुसह कार जप्त केली.
संशयितांविरुद्ध कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच  संशयितांच्या सोडवणूकीसाठी राजकीय पुढार्‍यांची धावाधाव चालली होती. मात्र या दोघावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खोत यांनी दिली.

सावंतवाडी तालुक्यात स्वाईन फ्ल्यूसदृश्य १७ रुग्ण

E-mail Print PDF
सावंतवाडी - स्वाईन फ्लूसदृश एन्फ्लूएन्झा व्हायरसचे १७ रुग्ण सावंतवाडी तालुक्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे. बांद्यात सर्वाधिक १४ रुग्ण सापडले आहेत. सोमवारी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांनी याबाबतची माहिती दिली. एन्फ्लूएन्झा व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने संबंधित भागात आवश्यक ती खबरदारी घेण्याची सूचना सभापती रवींद्र मडगावकर यांनी केली.
सध्या स्वाईन फ्लूसदृश एन्फ्लूएन्झाच्या एच-१, एन-१ या व्हायरसने देशभरात धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसने अनेकांचा मृत्यू झाला आहे. सावंतवाडी तालुक्यात या तापाचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. बांदा परिसरात या व्हायरसचा सर्वाधिक प्रकोप आहे. तेथे १४ रुग्ण सापडले आहेत.त्यांना बांदा प्राथमिक केंद्रात दाखल करण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा शिरोडकर यांनी सांगितले. या व्हायरसची लक्षणे सामान्य तापासारखीच आहेत. सध्या आरोग्य कर्मचार्‌यांना संबंधित भागात खबरदारी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित गावांचा सर्व्हे केला जात असल्याचे डॉ. शिरोडकर यांनी सांगितले.

महामार्गावरील खड्डे न बुजवल्यास ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकणार : पालकमंत्री केसरकर

E-mail Print PDF
सिंधुदुर्गनगरी -मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे ५ ऑगस्टपर्यंत बुजविणे अपेक्षित होते. मात्र, आता १५ तारीख आली तरी ते पूर्णपणे बुजविले गेलेले नाहीत. ठेकेदार संस्थेला नीट खड्डे बुजवता येत नसतील तर ती कंपनी चौपदरीकरणाचे काम काय करणार? असा संतप्त सवाल करत संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करणार आहेे, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
गतवर्षी बुजविलेले खड्डे यावर्षी उखडल्याने संबंधित ठेकेदाराची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले.१५ ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा राष्ट्रीय सण असून यादिवशी जनतेने आपल्या मागण्यांसाठी उपोषणे, आंदोलन आदी करू नये तर स्वतंत्र सणाचा आनंद लुटावा. यासाठी १५ ऑगस्ट यादिवशी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण वा आंदोलने करण्यासाठी ग्रामपंचायत ते जिल्हास्तरापर्यंत निवेदने दिलेल्या लोकांची पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी येथील जिल्हा नियोजन सभागृहात बैठक घेतली. या बैठकीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महामार्गावरील खड्‌ड्यांसंदर्भात लक्ष वेधले असता ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री केसरकर म्हणाले, गणेशोत्सव कालावधीत कोकणात येणार्‌या चाकरमान्यांची संख्या पाहता वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व चाकरमान्यांसाठी टोल माफ करण्यात आला आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुुंबई आदी ठिकाणी गाड्यांवर शिक्के मारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा वापर सर्वांनी करावा, असे आवाहन केले. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून यासंदर्भात संबंधित मंत्र्यांशी आपली चर्चा झाली होती. यानंतर बैठक होवून या महामार्गावरील खड्डे ५ ऑगस्टपर्यंत बुजविण्याचे मान्य केले होते. हे काम महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या संस्थेकडून करण्यात येणार आहे. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत जुन्या रस्त्याची डागडुजी करणे हे काम त्याच ठेकेदार कंपनीचे आहे. मात्र, अद्यापही हे खड्डे बुजविले गेले नाहीत. त्यामुळे आपण उद्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांची बैठक घेणार आहे.

पैशाच्या देवघेवीवरून दोन तरुणांना मारहाण

E-mail Print PDF
मालवण - पैशाच्या देवघेवीवरून मालवणातील केबल व्यावसायिक कृष्णा शिवराम सादये (रा. मालवण दांडी) व मच्छीमार परेश अरुण वाघ (रा. मालवण दांडी)  या दोन युवकांना कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष लीलाधर बाळकृष्ण पराडकर (रा. मालवण दांडी) यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दांडी येथे घडली. या मारहाणीत कृष्णा सादये यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सादये व वाघ या दोन युवकांनी मालवण पोलिस स्थानकात स्वतंत्र तक्रार दिली असून मारहाण व धमकी प्रकरणी लीलाधर पराडकर याच्या विरुद्ध मालवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.
मालवण-दांडी येथील मच्छीमार परेश अरुण वाघ याने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष व मच्छीमार व्यावसायिक लीलाधर पराडकर यांच्याकडून पैसे घेतले होते. हे पैसे घेण्यासाठी पराडकर हा दांडी आवार येथे गेला. यावेळी वाघ याला घराकडून पैसे आणण्यासाठी थोडा वेळ लागला. याचा राग पराडकर याला आल्याने वाघ यांच्या होडीचे इंजिन काढून घेतले. यावेळी पैसे देत असताना पराडकर यांनी परेश वाघ यांना शिवीगाळ करत  मारहाण केली.
त्यानंतर पराडकर हा घरी जात असताना केबल व्यावसायिक कृष्णा उर्फ बाळा  सादये हे केबलचे पैसे मागत असल्याच्या रागातून त्यांना मारहाण केली. सादये मालवण-दांडी येथील रस्त्यावर आपल्या दुचाकीची केबल लावत असताना लीलाधर पराडकर हा आला. त्यांना लाथाने मारले असता सादये दुचाकीच्या सायलेन्सरवर धडकले. यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. सायंकाळी मारहाण झाल्याच्या कारणावरून सादये व वाघ या दोन युवकांनी मालवण पोलिस ठाण्यात लीलाधर पराडकर यांच्या विरोधात तक्रार दिली. मारहाणीच्या घटनेनंतर नगरसेवक पंकज सादये, तृप्ती मयेकर, तपस्वी मयेकर, सन्मेश परब यांनी मारहाण झालेल्या युवकांची विचारपूस केली. याबाबतचा तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन केराम करत आहेत.

वेंगुर्ले न.प. महिलांना देणार आधुनिक व्यवसाय प्रशिक्षण : पालकमंत्री केसरकर

E-mail Print PDF
वेंगुर्ले - केंद्र शासन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमअंतर्गत वेगवेगळ्या व्यवसाय प्रशिक्षणासाठी १० लाखांपर्यंत निधी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये महिलांसाठी आवश्यक असलेले ब्युटी पार्लरच्या विविध कोर्सचा समावेश असून या योजनेचा महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. वेंगुर्ले नगरपालिकेने स्किल डेव्हलपमेंट मधून एक प्लान तयार करून प्रस्ताव सादर करावा. पुढील काळात महिलांना आधुनिक व्यवसाय प्रशिक्षण न.प. मार्फत दिले जाईल, असे प्रतिपादन  पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या ब्युटी पार्लर प्रशिक्षण तसेच समारोप प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित केला होता. व्यासपीठावर नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रांताधिकारी खांडेकर, तहसीलदार शरद गोसावी, मुख्याधिकारी रामदास कोकरे, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता राऊळ, उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, नगरसेविका सौ. सुमन निकम, नगरसेवक संदेश निकम, तुषार सापळे, धर्मराज कांबळी आदी उपस्थित होते.
ना. केसरकर म्हणाले, महिलांसाठी शासन वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण सुविधा देत आहे. महिलांच्या हाताना काम मिळावे त्यांना रोजगार मिळावा याकरिता केंद्र शासनाने स्किल डेव्हलपमेंट योजना तयार केली असून त्या माध्यमातून महिलांसाठी आधुनिक कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वेंगुर्ले पालिकेने  कॉमन फॅसिलिटी सेंटर सुरू करून या सेंटरच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात आवश्यक  व्यवसाय प्रशिक्षण महिलांना द्यावे.
नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी वेंगुर्ले नगरपालिकेला महिलांसाठी अनेक कोर्सचे प्रशिक्षण उपलब्ध करून द्यायचे आहेत. पालिकेच्या या प्रशिक्षणाला १०० टक्के महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे वर्षाला किमान दोन कोर्सचे प्रशिक्षण देण्याचा पालिकेचा उद्देश आहे. पालकमंत्री केसरकर यांनी व्यवसाय प्रशिक्षणासाठी जिल्हा नियोजनमध्ये निधीची तरतूद केली आहे. हा निधी वेंगुर्ले न.प. ला दिल्यास वेगवेगळे कोर्सेसचे प्रशिक्षण देऊ, असे आश्‍वासन दिले. आपल्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पालकमंत्री केसरकर यांचे सहकार्य मिळाले आहे. वेंगुर्ले शहरातील पत्र्याचे पूल पूर्ण खचले आहे. पावसाळा संपल्यांतर या पुलाचे काम हाती घेतले जाणार आहे. निशाण तलाव धरणाची उंची वाढवण्यासाठी १० कोटी निधी मिळाला. मात्र, अद्याप काम सुरू झालेले  नाही. त्यात ना. केसरकर यांनी लक्ष घालावे, असे आवाहन नगराध्यक्ष गिरप यांनी केले.
प्रास्ताविक मुख्याधिकारी कोकरे यांनी तर सूत्रसंचालन नगरसेवक प्रशांत आपटे यांनी केले.  ना. केसरकर यांच्या हस्ते प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

Page 10 of 655