Tuesday, Nov 21st

Headlines:

सिंधुदुर्ग

आयशर टेम्पोतून २५ लाखाची गोवा बनावटीची दारु जप्त

E-mail Print PDF
कणकवली -ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग कणकवली यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ११.४० वा. सुमारास सापळा रचून मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथील हॉटेल शिवमच्या समोर एका आयशर टेम्पोतून वाहतूक केली जाणारी २५ लाख ६२ हजार ६०० रु. किमतीची गोवा बनावट दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या कारवाईत ९ लाखांचा टेम्पोही ताब्यात घेण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्‍विनी जोशी, विभागीय उपायुक्त संगीता दरेकर, उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्गचे अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली व समवेत राज्य उत्पादन शुल्कचे कणकवलीचे निरीक्षक अमित पाडळकर यांनी ही कारवाई केली. या कारवाईकामी दुय्यम निरीक्षक के. बी. नडे, कुडाळचे दुय्यम निरीक्षक संजय साळवे, मालवण दुय्यम निरीक्षक सुनील सावंत, कणकवलीचे  सहायक दुय्यम निरीक्षक चंद्रकांत पवार, जवान गोपाळ लक्ष्मण राणे, सूरज चौधरी, स्नेहल कुवसेकर, रणजित शिंदे, हेमंत वस्त, प्रसाद माळी यांनी सहभाग घेतला.
तन्वीर इक्बाल शेख (१९, रा. माजगाव-सावंतवाडी), समीर शब्बीर शहा (२७, रा. झाराप- खान मोहल्ला) या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

आंबोली पर्यटनाला आता ‘वेबसाईट’चे बळ

E-mail Print PDF
सावंतवाडी - वर्षा पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या आंबोली आता साहसी पर्यटनाबरोबर नाईट रायडींगसाठी विकसित केली जात आहे. वनौषधीसोबत विविध प्रजाती पाहण्याची संधी अनेक पर्यटकांना उपलब्ध होत आहे. यात भर म्हणून आंबोलीतील निर्णय राऊत या युवकाने आंबोली टुरीझम डॉट कॉम नावाची साईट तयार करुन देशासह विदेशातील पर्यटकांना पर्यटनांची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
इंटरनेटच्या एका क्लिकवर आंबोली, चौकुळ, गेळे या तिन्ही गावातील पर्यटनस्थळे तसेच वैशिष्ट्‌यांची माहिती संबंधितांना मिळणार आहे. स्थानिक युवकांना रोजगाराचे नवे दालन या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज या वेबसाईटचे उद्घाटन झाले.
जैवविविधतेने परिपूर्ण पर्यटनस्थळ म्हटले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे पर्यटनस्थळ डोळ्यासमोर येते. याठिकाणी लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. याठिकाणच्या पर्यटनातील पावसाळा हा मुख्य वर्षा पर्यटन हंगाम म्हणून ओळखला जातो. येथे या हंगामात लाखो पर्यटक फक्त आंबोलीतील नयनरम्य पर्यटनस्थळे पाहत पावसात तसेच धबधब्यांखाली भिजण्यासाठी येतात. काही येथील शुद्ध थंडगार हवेसाठी येतात. आंबोली परिसर हा जैवविविधतेने परिपूर्ण असा भरलेला असल्याने निसर्गप्रेमी पर्यटक व अभ्यासक यांची हजारोंच्या संख्येने येथे ये-जा असते. असे असूनही आंबोली, चौकुळ व गेळे परिसरातील अनेक पर्यटनस्थळे, जैवविविधतेचे ठिकाणे, नयनरम्य देखावे व गावातील लोकांचे जीवन अनुभवणे, असे विविध पर्यटनास अनुकूल असलेल्या बाबी दुर्लक्षित आहेत. त्या पर्यटकांपर्यत पोहोचविण्याचे काम या वेबसाईटच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. येथील बारमाही पर्यटनासाठी प्रयत्न आंबोली टुरिझमच्या माध्यमातून केले जाणार आहे.
हे संकेतस्थळ ऑनलाईन-ऑफलाईन उपलब्ध असून यावर तिन्ही गावांच्या माहितीबरोबरच हॉटेल बुकिंग, बेस्ट रेस्ट्रॉरन्ट, व्हिलेज टुरिझम, ट्रेकिंग, टेंट कॉंपिंग, सफारी, वाहतूक सेवा, नेचर कॅम्प, एडवेंचर स्पोर्ट, स्पेशल पॅकेज, इतर सहली आदीची माहिती आहे.
पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते या वेबसाईटचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आंबोली उपसरपंच विलास गावडे, चौकुळ माजी सरपंच विजय गावडे, गाववाले बहुउद्देशयिय पर्यटन संस्थेचे अध्यक्ष अरुण गावडे, सामाजिक कार्यकर्ते महेश पावसकर, नाना आवटे, रुपेश गावडे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. केसरकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष फक्त कणकवलीपुरता मर्यादित : विक्रांत सावंत

E-mail Print PDF
सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष फक्त कणकवली पर्यंतच मर्यादित आहे. पक्ष स्थापन होऊन पंधरा दिवस उलटले तरी कोणी बडा नेता या पक्षात आलेला नाही. यावरून त्यांच्या प्रवृत्तीमुळे पक्षाच्या विचारांना कोणी साथ देत नाही हे दिसून आले, अशी टीका शिवसेनेचे विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांनी येथे केली.
दरम्यान, राणेंच्या पक्षाला एनडीएत प्रवेश देण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचा इतिहास तपासावा. आवश्यक असल्यास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्याकडून माहिती घ्यावी, असाही टोला या वेळी सावंत यांनी लगावला. सावंत यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले, ‘‘राणेंनी पक्ष स्थापन करण्यापूर्वी आपल्यासोबत अनेक आमदार तसेच सर्व पक्षांतील बलाढ्य पदाधिकारी असल्याचे जाहीर केले होते; मात्र ज्यादिवशी त्यांनी आपला पक्ष जाहीर केला, त्या दिवशी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासोबत संदीप कुडतरकरांना बाजूला बसवावे लागले हे त्यांचे दुर्दैव आहे. पक्ष जाहीर झाल्यानंतर अनेक पदाधिकारी प्रवेश करतील, असे त्यांनी सांगितले होते; मात्र सद्यःस्थिती लक्षात घेता कोणीही राणेंच्या पक्षात फिरकताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचा पक्ष फक्त कणकवलीपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रवृत्तीला कोणी साथ देत नाही हे आता उघड होत आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘राजकारणामुळे माजगाव विकासापासून मागे राहिले आहे. अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत; मात्र आता शिवसेनेच्या माध्यमातून गावाचा निश्‍चितच विकास केला जाणार आहे. त्या ठिकाणी देण्यात आलेले सर्व उमेदवार ग्रामस्थांशी चर्चा करुनच निवडण्यात आले आहे. सरपंचपदाचे उमेदवार दिनेश सावंत हे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आहेत. आमच्याकडे पालकमंत्री, खासदार आहेत’’
सावंत पुढे म्हणाले, ‘‘वेंगुर्ले आणि दोडामार्गची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली आहे. मात्र राणे समर्थकांचे पॅनल दुहेरी आकडा गाठू शकणार नाही तर सावंतवाडीत गाव पॅनलमधून आलेले सरपंच आपले असल्याचा दावा समर्थकांना करण्याची वेळ आली आहे.’’

सिंधुदुर्गातील निवासी भागातील फटाके विक्री दुकाने बंद

E-mail Print PDF
ओरोस - दिवाळी काही दिवसांवर आली असताना उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाक्यांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. याचा परिणाम सिंधुदुर्गातील ३५ परवानाधारक फटाके विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर होणार आहे. ही ३५ दुकाने निवासी भागात असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी होणार आहे.
सुरक्षेच्या कारणावरून निवासी भागात फटाक्यांची खुलेआम विक्री करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नियम मोडणार्‍या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. फटाक्यांची विक्री करणारे अनधिकृत स्टॉल आणि निवासी भागातील फटाक्यांचे स्टॉल यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्वतंत्र लागू करण्यात येणार आहेत. बेकायदेशीर दुकानांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे फटाके व्यावसायिक धास्तावले आहेत. फटाक्यांची जुनी दुकाने  अनेक ठिकाणी सुरू आहेत. फटाके व्यावसायिकांसमोर आर्थिक प्रश्‍न निर्माण होणार आहे.
पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि निवासी भागात फटाक्यांमुळे होणारे परिणाम व नुकसानीमुळे न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम जाणवला आहे. आतापर्यंत फटाक्यांच्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. व त्यातून लाखो रुपयांची हानीही झाली.
गणेशोत्सव, दिवाळी आणि सणासुदीत हजारो फटाक्यांच्या माळा लावल्याने प्रदूषण निर्माण होते. दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय झाल्याने परवानाधारकांना मोठी अडचण व आर्थिक परिणाम जाणवणार आहे.

तळवडे येथे सव्वा लाखाची दारू जप्त

E-mail Print PDF
बांदा - गोव्यावरुन सुझुकी कारमधून बेकायदा दारू वाहतूक करणाऱया न्हावेली-रेवटेवाडी येथील धनंजय मनोहर मयेकर (३७) याला तळवडे बाजार येथून राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ भरारी पथकाने ताब्यात घेत त्याच्याकडून एक लाख १५ हजार २०० रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या दारुसह एक लाख ८० हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरा करण्यात आली. यातील संशयितावर दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखली संजय साळवे करीत आहेत.
राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ भरारी पथकातर्फे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छुप्या पद्धतीने केल्या जाणाऱया गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कुडाळ विभागाने करडी नजर ठेवली आहे. आरोस, न्हावेलीमार्गे होणाऱया छुप्या दारू वाहतुकीबाबत पक्की खबर मिळाल्यामुळे कुडाळचे प्रभारी निरीक्षक अमित पाडळकर यांनी गस्त वाढविली होती. सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान सावंतवाडी वेगुर्ला हमरस्त्यावरील तळवडे बाजार येथे एमएच-३१ झेड, ५६८५ क्रमांकाची सुझुकी कार आली असता कारला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र कारचालक धनंजय मनोहर मयेकर (३७, रा. न्हावेली- रेवटेवाडी) याने कार त्याच गतीने पुढे नेली. त्यामुळे संबंधिताना संशय आला. कारच पाठलाग करून तळवडे बाजार येथे कार थांबऊन चेक केली असता कारमध्ये नॅशनल ब्रॅण्डी गोवा बनावटीच्या दारुचे ३६ बॅक्स सापडून आले. त्याची एकूण किंमत एक लाख १५ हजार २०० रु. व सुझुकी कार ८० हजार रु. मिळून एक लाख ८५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितावर मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय उपआयुक्त संगिता दरेकर व संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार व जिल्हा अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखली कुडाळचे प्रभारी निरीक्षक राजा पाडाळकर, दुय्यम निरीक्षक संजय साळवे, जवान प्रसाद माळी, जवान वाहन चालक हेमंत वस्त यांनी केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक साळवे करीत आहेत.

Page 9 of 668