Saturday, Sep 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

आंबोलीतील पर्यटन स्थळांवर १४४ कलमान्वये मनाई आदेश लागू

E-mail Print PDF
सिंधुदुर्गनगरी - आंबोली येथील पर्यटन स्थळांवरील मद्यपींचा धुडगुस व त्यामुळे होणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी १४४ कलमान्वये मनाई आदेश लागू केले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली.
आंबोली या जिल्हयाच्या प्रमुख पर्यटनस्थळी महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील पर्यटक भेट देतात. मात्र यापैकी काही पर्यटकांकडून मद्य प्राशन करून इतर पर्यटकांना त्रास देण्याचे प्रकार वाढत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी आंबोली येथील विविध पर्यटनस्थळांवरील मद्यपींचा धुडगूस थांबविण्यासाठी मनाई आदेश लागू करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱयांकडे सादर केला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱयांनी मान्यता दिली असून आंबोली मुख्य धबधब्याच्या सभोवतालचा २०० मीटर त्रिज्येचा परिसर, महादेवगड पॉईंट, नांगरतास धबधबा, कावळेसाद पॉईंट व कडयाच्या १०० मीटर त्रिज्येच्या परिसरात मनाई आदेश लागू झाला आहे.
ही ठिकाणे मद्य व अंमली पदार्थ निषिद्ध क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या क्षेत्र परिसरात मद्य प्राशन करणे, अमली पदार्थांचे सेवन करणे, मद्य व अंमली पदार्थ स्वत:जवळ बाळगणे, मद्य प्राशन करून व अंमली पदार्थ सेवन करून प्रवेश करणे इत्यादीसाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. या मनाई आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून उल्लंघन करणार्‍या पर्यटकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. इतर महत्वाच्या पर्यटनस्थळीही असे प्रकार रोखण्यासाठीही प्रस्ताव सादर केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चार नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी १० कोटी रुपये मंजूर

E-mail Print PDF
कणकवली - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी, ओढे, नाले यामधील गाळ काढणे, त्यांचे सरळीकरण आणि खोलीकरण करून पुनरूज्जीवन करण्याचा कार्यक्रम राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने हाती घेतला आहे. यामध्ये कोकणातील चार नद्यांसाठी प्रत्येकी अडीच कोटींप्रमाणे १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील महाडमधील गांधारी, रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी, राजापूर तालुक्यताील अर्जुना आणि सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील जानवली या नद्यांचा समावेश आहे. जानवली नदीच्या पुनरूज्जीवनासाठी माजी आ.प्रमोद जठार यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला हे यश आले आहे.
राज्यात भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आल्यानंतर जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले. या अभियानांतर्गत नदी,नाले, ओढ्यातील गाळ काढून ते खोल करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला. याच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोकणातील नद्यांचे पुनरूज्जीवन करण्यात यावे, यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. प्रमोद जठार यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार १६ मार्चला जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकही झाली होती. या बैठकीत या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली होती. जलयुक्त शिवार अभियान ही शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून नदी पुनरूज्जीवन कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे.
या अभियानांतर्गत आता नद्यांचे पुनरूज्जीवन होणार असून कणकवली तालुक्यातील जानवली नदीचे पुनरूज्जीवन झाल्यास, त्यात बारमाही पाणी राहू शकते. अर्थात पुनर्जीवनाचे हे काम किती प्रभावी होते यावरच ते अवलंबून आहे. मात्र या नदीचे पुनरूज्जीवन झाल्यानंतर या नदीच्या काठावरील गावांच्या नळयोजनांच्या पाण्यांचे स्त्रोत बळकट होणार हे निश्‍चित.

जिल्ह्यात हजारो चाकरमानी दाखल

E-mail Print PDF
कणकवली - गणेशोत्सव सण उत्साहात साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गात चाकरमान्यांचा ओघ सुरू झाला आहे. आज दिवसभरात सहा गणेशोत्सव विशेष गाड्यांसह इतर नियमित रेल्वे गाड्यातून हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले. खासगी गाड्यांतूनही चाकरमानी दाखल होत असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
चाकरमान्यांच्या आगमनामुळे रेंगाळलेला वाहतूक व्यवसाय तेजीत आला आहे. तसेच गावोगावी चाकरमानी दाखल होत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठांतील वर्दळ वाढली आहे. पुढील दोन दिवसांत चाकरमान्यांचा ओढ आणखी वाढणार आहे. कोकणात येणार्‍या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने यंदा २४० विशेष गाड्यांची व्यवस्था केली असून १९ ऑगस्ट पासून या जादा गाड्या धावू लागल्या आहेत. याखेरीज एस.टी. बसेसच्या माध्यमातूनही चाकरमानी जिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत. मुंबईहून सिंधुदुर्गात येण्यासाठी सुमारे दोनशे बसेसचे बुकिंग झाले आहे.  
आज दुपारपर्यंत अहमदाबाद-करमळी, सीएसटी-करमळी, दादर-सावंतवाडी स्पेशल, मनमाड-करमळी स्पेशल, पुणे-सावंतवाडी स्पेशल, बांद्रा टर्मिनस-सावंतवाडी स्पेशल  अशा सहा गणेशोत्सव विशेष गाड्या दाखल झाल्या यातून हजारो चाकरमान्यांनी मुंबईतून आणलेल्या साहित्यासह आपल्या गावाकडे धाव घेतली होती. याखेरीज नियमित धावणारी मांडवी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, दिवा पॅसेंजर, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांतून देखील हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल झाले.
कोकणात यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले आहे. तसेच कोकण रेल्वे प्रशासनाच्या दक्षतेमुळे रेल्वे मार्ग निर्धोक राहिला आहे.  कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी आहे. यात नियमित गाड्यांसह गणेशोत्सव विशेष गाड्यांचा भार असल्याने सर्वच रेल्वे गाड्या सध्या दीड ते दोन तास विलंबाने धावत आहेत.
रेल्वे वाहतुकीबरोबर खासगी वाहनांतूनही मुंबईकर चाकरमानी जिल्ह्यात येत असल्याने त्याचा ताण मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आला आहे. यात शहरांच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार होत आहेत. ही कोंडी टाळण्यासाठी महामार्गावर जादा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. शहरात पटवर्धन चौक ते बसस्थानक आणि पटवर्धन चौक ते पोलिस ठाणे या भागात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जादा पोलिस बंदोबस्त आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून चाकरमानी येण्यास सुरवात झाली असली तरी आजपासून येणार्‍या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठांनाही चालना मिळाली आहे. पूर्वी गणेशोत्सवाची मोठी खरेदी मुंबईतूनच होत असे. मात्र आता गावाकडच्या दरात फारशी तफावत नसल्याने मोठी खरेदी गावातच केली जाते. चाकरमान्यांच्या आगमनामुळे आज बाजारपेठाही गजबजू लागल्या आहेत. तसेच रिक्षा, टेम्पो आदी वाहतूक व्यवसायालाही चालना मिळाली आहे.

वागदे येथे दोन लाखांचा बनावट खवा जप्त

E-mail Print PDF
कणकवली - अखाद्य स्वरुपाचा खवा पकडण्याची कारवाई सोमवारी दुपारी १.३० ते २.३० या वेळेत कणकवली पोलिसांनी केली. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मिठाई, बर्फीसाठी खव्याची मोठी मागणी असते. त्यामुळे अशा बनावट खव्याची विक्री करणारे हात धुवून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातीलच हा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आहे. सोमवारी दुपारी कणकवली पोलिसांना या बनावट खव्याबाबत टीप मिळाल्यानंतर कणकवलीचे पोलिस निरिक्षक शशिकांत खोत, पोलिस हवालदार सूर्याजी नाईक, उत्तम पवार, पोलिस नाईक भगत, वाहतूक पोलिस प्रकाश गवस यांच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचला. अहमदाबादवरून दोने कारमधून अखाद्य स्वरूपाच्या बनावट खव्याची वाहतूक गोव्याकडे होत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी दुपारी या दोन  कारचा वागदे-गणेश मंदिरापर्यंत पाठलाग करून या कारना अडवले.
या कारमध्ये प्रत्येकी ३० किलो खवा असलेल्या ५८ पिशव्या आढळून आल्या. या खव्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता अहमदाबादहून गोव्याकडे जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, खरेदी-विक्री संदर्भात कोणतेही कागदपत्र त्यांच्याकडे आढळून आले नाहीत.त्यामुळे प्रथमदर्शनी हा खवा बनावट असल्याचा संशय पोलिसांना आहे.

फोंडाघाटात तोतया पोलिसांना अटक

E-mail Print PDF
कणकवली (प्रतिनिधी) - फोंडाघाटमध्ये वाहनांना अडवणार्‍या दोघांना ताब्यात घेतले .त्यांची चौकशी केली असता ते पोलिस नसल्याचे निष्पन्न झाले. चालक देसाई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर फोंडाघाट येथून संजय आग्रे, विजय हळदिवे, नीलेश भोगले हे फोंडाघाटातील सावरखुट येथे निघाले. त्याच दरम्यान चालक देसाई यांनी दिलेल्या माहितीची कार फोंडाघाट बाजारपेठेच्या दिशेने गेल्याचे त्यांना दिसून आले. संजय आग्रे यांनी याची माहिती फोंडाघाट पोलिस चेकपोस्टला दिली. चेकपोस्टवर त्यावेळी डयुटीवर असलेले पोलिस दिलीप खोत व संदीप दीक्षित यांनी नाकाबंदी करत ती मारूती कार अडविली. गाडीतील व्यक्तींची चौकशी केली असता ते पोलिस नसल्याचे निष्पन्न झाले. या प्रकाराची माहिती फोंडाघाटमध्ये समजल्यानंतर नागरिकांनी चेकपोस्टकडे धाव घेतली. संतापलेल्या नागरिकांकडून या तोतया पोलिसांना चांगलाच प्रसाद देण्यात आला. याची माहिती मिळाल्यानंतर कणकवलीचे पोलिस निरिक्षक शशिकांत खोत, उपनिरिक्षक सागर वरूठे, फोंडाघाट दूरक्षेत्रचे हे.कॉ. दयानंद चव्हाण,  पोलिस नाईक सूर्याजी नाईक यांनी तातडीने फोंंडाघाट येथे जात त्या तोतया पोलिसांची चौेकशी करत त्यांना ताब्यात घेतले. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सागर वरूठे करत आहेत.
कारमध्ये कच्चे मटण व दारूच्या बाटल्या कागल येथून आपण श्रीभराडी देवीच्या दर्शनासाठी सिंधुदुर्गात येत होतो, असे त्या तोतया पोलिसांनी सांगितले. कागल-बेलवळे खुर्द येथील दयानंद पवार हे आपली कार घेवून सोबत तानाजी पाटील व इतर तीन मित्रांना घेवून ते सर्वजण फोंडाघाटच्या दिशेने येत होते. त्यांच्या गाडीत कच्चे मटण व दारूच्या बाटल्या आढळून आल्याने ते हौसमौज करण्यासाठी सिंधुदुर्गात येत होते हे निष्पन्न झाले. खर्चासाठी डंपर, ट्रकचालकांकडून पैसे उकळण्याची लढविलेली शक्कल त्यांच्या अंगाशी आली. डंपर चालक देसाई यांना दयानंद पवार व तानाजी पाटील यांनी धमकावले असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. उर्वरीत तिघेजण हे गाडीतच बसून होते. मात्र, ट्रकचालक आणि फोंडाघाटमधील नागरिकांच्या जागरूकतेमुळे त्यांचा पैसे उकळण्याचा बेत फसला.

Page 8 of 655