Tuesday, Nov 21st

Headlines:

सिंधुदुर्ग

गोवा प्रवेश करातून सिंधुदुर्गमधील वाहनांना तूर्तास वगळले

E-mail Print PDF
पणजी - माल वाहतूकदारांसाठी प्रवेश कराबाबतची सवलत पास पध्दत कार्यान्वित करण्याचा गोवा सरकारचा विचार आहे. त्याविषयीचा निर्णय होईपर्यंत सिंधुदुर्गसह लगतच्या जिल्ह्यांतील वाहनांना प्रवेश कर घेतला जाणार नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीत वाहतूकदारांच्या दबावाला बळी पडून प्रवेश कराचा निर्णय मागे घेतला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. आमदारांनी शून्य तासावेळी उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी हे स्पष्टीकरण दिले. या प्रवेश कराविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनधारक- मालकांनी महामार्गावर रास्तारोको केले होते. तसेच गोव्यात विविध वस्तूंचा पुरवठा करणारी वाहनेे न पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

इन्सुली सूत गिरणीच्या ठिकाणी सुरु असलेल्या बांधकामाला ग्रामस्थांचा आक्षेप

E-mail Print PDF
इन्सुली - येथील सूत गिरणीच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामावरून आज ग्रामस्थ पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी घटनास्थळी जात काम बंद पाडले. येथील सूत गिरणीच्या ठिकाणी अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या कामाला ग्रामपंचायतीचाही आक्षेप आहे. आजही त्या ठिकाणी काम सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. सरपंच सौ. नम्रता खानोलकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गिरणी कामगार व संघर्ष समिती सदस्य, ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तेथे चालू असलेल्या कामाची पाहणी करून संबंधितांना धारेवर धरले. तेथील साहित्यही जप्त केले. त्याचा पंचनामा करण्यात आला. साहित्य ग्रामपंचायतीच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे.

गौण खनिज उत्खननाला विशेष दर्जा देण्याची सुरेश प्रभूंची मागणी

E-mail Print PDF
सावंतवाडी - सिंधुदुर्गाच्या आर्थिक व सामाजिक विकासात गौण खनिज व्यवसायाला महत्त्व आहे. त्यामुळे गौण खनिज उत्खननाची सुधारित नियमावली तयार करताना राज्याने कोकणातील पर्यावरणपूरक गौण खनिज उत्खननाला विशेष दर्जा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र माजी खासदार सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले आहे. गौण खनिज उत्खनन बंदीसंदर्भात श्री. प्रभूंनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील गौण खनिजाच्या उत्खननावर प्रशासनाने बंदी घातली आहे. यासंबंधी जनतेत हेतूपुरस्सर विपर्यस्त माहिती पसरविली जाते. डॉ. माधव गाडगीळ अहवालाचा संबंध गौण खनिज बंदीशी जोडून आगपाखड केली गेली. दोन्ही जिल्हे पर्यावरणदृष्ट्‌या संवेदनशील आहेत. फलोत्पादनातून रत्नागिरी व पर्यटनातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच रासायनिक व अपायकारक उद्योगांना जिल्ह्यात बंदी घालून शासनाने चांगले निर्णय घेतले आहे.

आचरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी गाव विकास आघाडीचे मंगेश टेमकर यांची निवड

E-mail Print PDF
मालवण - आचरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आचरा गाव विकास आघाडीचे मंगेश टेमकर यांची निवड झाली. सरपंचपदाच्या आज झालेल्या निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार अवधूत हळदणकर यांचा सातविरुद्ध सहा अशा मतांनी पराभव केला. उपसरपंच म्हणून साक्षी ठाकूर यांची निवड झाली. आचरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा निवडणूक कार्यक्रम आज ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केला होता. सरपंचपदासाठी कॉंग्रेसकडून श्री. हळदणकर, तर आचरा गाव विकास आघाडीतून श्री. टेमकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. छाननीमध्ये दोन्ही अर्ज वैध ठरले; मात्र उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सरपंचपदासाठी निवडणूक झाली. यात गाव विकास आघाडीचे उमेदवार श्री. टेमकर यांना सात, तर श्री. हळदणकर यांना सहा मते मिळाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक महाडिक यांनी सरपंच म्हणून श्री. टेमकर यांची निवड जाहीर करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

अपहार प्रकरणी पडेल ग्रामसेवकासह पाचजणांवर गुन्हे दाखल

E-mail Print PDF
देवगड - दप्तरी नोंद न करताच लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पडेल ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व ग्रामसेवकांसह पाचजणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ग्रामसेवक अनिल वासुदेव कांबळे यांनी धनादेशांवर पडेल ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच रुपाली देवेंद्र तानवडे यांच्या सह्या घेऊन ते धनादेश सईद होलसेकर, विश्‍वनाथ मिठबावकर व तिथिले यांच्या खात्यावर जमा करुन रक्कम काढून घेतली. देवगड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांनी या प्रकरणी विजयदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. ही घटना ३० ऑगस्ट २०११ ते ३० नोव्हेंबर २०११ या कालावधीत घडली होती. ग्रामपंचायत प्रशासनातील ग्रामनिधी तसेच तेरावा वित्त आयोग निधीतील रुपये ५ लाख ८ हजार एवढ्या रकमेचा अपहार झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Page 653 of 668