Tuesday, Nov 21st

Headlines:

सिंधुदुर्ग

नारळ दरवाढीने जेवण महागले

E-mail Print PDF
सावंतवाडी - जिल्ह्यात नारळाचे दर वाढल्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांच्या खाद्यपदार्थ व जेवणाच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ काही ठिकाणी ५ ते १० रुपयांनी झाली आहे. नारळाच्या उत्पन्नात झालेली मोठी घट याला सर्वांत महत्त्वाची कारणीभूत ठरली आहे.
जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नारळाच्या बागायती आहेत. गेल्या महिन्याभरापासून नारळाचा तुटवडा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामात सुरवातीला २० नंतर २५ तर आता नारळाचा दर ३० ते ३२ रुपयांपर्यंत पोचला आहे. शहरातील, गावातील स्थानिक तसेच रास्त दुकानातही हे नारळ २५ च्या पुढेच उपलब्ध झाल्याचे चित्र आहे. याचा परिणाम आता गावासोबत शहरातील हॉटेल व्यवसायावर होताना दिसून येत आहे.नारळाच्या खेरीदीसाठी अधिक रुपये मोजावे लागत असल्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांना फायदा व आर्थिक समतोल साधण्यासाठी जेवण व खाद्यपदार्थांच्या दरात वाढ केला आहे.
सर्वच ठिकाणी नसली तरी शहर व ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी ही स्थिती निर्माण झाली आहे. एरवी सर्वसाधारणपणे चांगल्या मोठ्या आकाराचा २० ते २२ रुपयांपर्यत सहज उपलब्ध होणारा नारळाचा यंदाच दरात विक्रमी वाढला आहे.
चतुर्थीपर्यंत वीस रुपयांपर्यंत पोचलेला नारळ आता तिशीच्या पुढे गेला आहे. केरळ, कर्नाटकमधून दरवर्षी नारळाची आवक होते. यातही घट झाल्यामुळे यंदा स्थानिक नारळ बागायतदार विक्रेत्याच्या उत्पन्नावर बाजारपेठ अवलंबून होता. यंदा नारळाचे पीक खूपच कमी झाले आहे. साधारण दिवाळीनंतर स्थिती बदलेल अशी आशा होती मात्र अद्यापही तीच गत नाराळाच्या दराची आहे.
नारळ काढणीचा हंगाम झाल्यावरही स्थिती सुधारली नाही. परिणामी ग्रामीण भागाकडून नारळाची आवक घटल्याने आता शहरातील हॉटेल व्यावसायाकडून ५ ते १० रुपयांनी मोठ्या खाद्यपदार्थ व जेवणाचे दर वाढविण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे शहरात दाखल होणारा ग्राहक तसेच पर्यटकाला अधिक पैसे मोजण्याची वेळ आली आहे.

श्री देव माऊलीच्या जत्रोत्सवाची तयारी सुरु

E-mail Print PDF
सावंतवाडी - सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा प्रसिद्ध जत्रोत्सव येत्या ५ नोव्हेंबरला होत आहे. या जत्रोत्सवासाठी भाविकांची होणारी गर्दी व वाहनांची संख्या लक्षात घेता पार्किंग संदर्भात येथील पोलिसांकडून मंदिर परीसराची व मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची पाहणी करण्यात आली.
लोटांगणाची जत्रा म्हणून सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव प्रसिद्ध आहे. दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणूनही ख्याती आहे. जत्रोत्सवाच्या तयारीला कोजागरी पौर्णिमेपासून गावकरी मंडळी लागली आहेत. मंदिर परिसर साफसफाईपासून इतर आवश्यक गोष्टीसाठी नियोजन झाले आहे.
पोलिस प्रशासनानेही भाविकांची गर्दी व वाहतुक कोंडीबाबत नियोजन केले असून पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्यासह कर्मचार्‍यांकडून मंदिर परिसर व आजूबाजूच्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. दरवर्षी योग्य नियोजन करूनही रात्री उशिरा वाहतुक कोंडीची समस्या उद्भवते त्याकरिता यावर उपाय काढण्यासाठी धनावडे यांनी स्वत: मंदिरास भेट देऊन गावकर्‍यांशी चर्चा केली.
माऊली मंदिराकडे जाण्यासाठी न्हावेली मार्गे सोनुर्ली, निरवडे मार्गे सोनुर्ली व वेत्ये मार्गे सोनुर्ली अशा तीन ठिकाणावरून मार्ग आहेत; मात्र तिनही मार्ग अरूंद असल्याने व आजूबाजूला जागा नसल्याने समोरासमोर दोन वाहने आल्यास मोठी समस्या निर्माण होते. गेल्यावर्षी पोलिस निरिक्षक शंकर पाटील यांनी योग्य नियोजन केल्यामुळे काही अंशी वाहतूक कोंडीवर लगाम लावला होता. न्हावेली मार्गे सोनुर्ली मंदिरकडे जाणार्‍या रस्त्यावरून फक्त एसटी बसेस सोडता इतर चार चाकी वाहनावर बंदी घातली पाहिजे. इतर मॅजिक रिक्षा व मोटारींना निरवडे मार्गे सोनुर्ली असे पाठविले पाहीजे जेणेकरून मधल्या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी यामुळे टळू शकते व निरवडे व वेत्ये रस्त्यावर जादा पोलिस कर्मचारी तैनात करणे आवश्यक आहे.
पार्किंगबाबत यावर्षी प्रश्न निर्माण होणार असून गेल्यावर्षी ज्या मोकळ्या जागेतून वाहतुक पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती त्या जागा मालकाने यावर्षी त्याठिकाणी काजू लावल्याने पार्किंगचा प्रश्न जटील बनला आहे. त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करणे सोईचे होणार आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध झाल्यास वाहतुक कोंडीचा प्रश्‍न सोडवू शकतो, असे धनावडे म्हणाले.
मंदिराकडे जाणारे अरुंद रस्ते व होणारी वाहतूक कोंडी हा प्रश्‍न जटिल आहे. तीनही रस्त्यांच्या बाजूंनी मोठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने वाहतूक कोंडी होणार आहे. ती होऊ नये यासाठी आमचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी गावकर्‍यांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक धनावडे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील ३०२ कंत्राटी कामगारांचे वेतन थकीत; आंदोलनाचा इशारा

E-mail Print PDF
कुडाळ - जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे जूनपासूनचे सुमारे १ कोटी ४५ लाख रु. वेतन थकीत आहे. महावितरणने ऑगस्टमध्ये ६० लाखांचा खोटा चेक दाखवून या कामगारांची दिशाभूल केली, असा आरोप कामगारांचा आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारपासून महावितरणचे जिल्ह्यातील ३०२ कंत्राटी कामगार कामबंद  आंदोलन  छेडणार, असा इशारा कंत्राटी कामगार संघटनेने महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांना बुधवारी चर्चेअंती दिला.
महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकीत राहिल्याने या कामगारांनी ऑगस्टमध्ये कामबंद आंदोलन छेडले होते. यावेळी महावितरणने ६० लाख रुपयांचा चेक काढल्याचे कामगारांना दाखवले होते. मात्र, प्रत्यक्षात ३२ लाखच खात्यावर जमा करण्यात आले. याचा जाब कंत्राटी कामगारांनी अधीक्षक अभियंता यांना विचारला. यावेळी  कामगारांना मेहनत घेऊन आपल्या वेतनासाठी प्रत्येक सणाला महावितरणकडे भीक मागावी लागते. जिल्ह्यात अनेक कंत्राटी कामगारांना सेवेत घेतले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना वर्कऑर्डर दिली जात नाही. महावितरणच्या वेतनाबाबतच्या या भूमिकेमुळे कामगार तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. यावेळी संघटनेचे अजय गावडे, नगरसेविका सौ. संध्या तेरसे व जिल्ह्यातील कंत्राटी कामगार उपस्थित होते.

संपामुळे सिंधुदुर्ग एसटीचे सव्वा कोटींचे नुकसान

E-mail Print PDF
कणकवली - सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी महाराष्ट्र  एसटी कामगार संघटना आणि इंटक या प्रमुख संघटनांसह सहभागी संघटनांनी केलेल्या संपामुळे सिंधुदुर्ग एसटी विभागाचे सुमारे सव्वाकोटीचे नुकसान झाले आहे.
चार दिवस पूर्णपणे एसटीचा संप झाला. तर पाचव्या दिवशी संप मिटल्याने सकाळपासून गाड्या सुरू झाल्या तरी अनेक फेर्‍या कर्मचारी पोहोचेपर्यंत उशीर झाल्याने रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे या पाच दिवसात सिंधुदुर्ग एसटी विभागातील १४९५ र्फेया म्हणजेच ३ लाख ८४ हजार ३९३ कि.मी.चा प्रवास रद्द झाला. सिंधुदुर्ग एसटी विभागाला दर दिवशी २९ ते ३० लाखाचे उत्पन्न मिळते. त्यामुळे संप कालावधीत या विभागाचे मोठे नुकसान झाले. १७ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग विभागाच्या २९५, १८ ऑक्टोबरला ३५६, १९ ऑक्टो. ३५७, २० ऑक्टो. ३५७, २१ ऑक्टोबरला १३० र्फेया अशा मिळून १४९५ र्फेया रद्द कराव्या लागल्या होत्या. संप कालावधीत एकही बस न सुटल्याने सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल झाले. त्यामुळे खाजगी वाहनचालकांनी त्याचा फायदा घेतला. अनेक मार्गावरील सहासीटर, खाजगी बस चालकांनी दुप्पट, तिप्पट दर लावून भाडे आकारणी केली. त्यामुळे एसटी बसेसचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

पर्यटकांकडून हॉटेल मालकास मारहाण; पर्यटकांनाही चोप

E-mail Print PDF
कणकवली - गुजरातमधून गोवा येथे पर्यटनासाठी लक्झरी बसने जात असलेल्या पर्यटकांपैकी सात ते आठ पुरुष व महिला पर्यटकांनी वागदे-गोपुरी आश्रमानजीकच्या हॉटेलचालकासह दोघांना बेदम मारहाण केली. हॉटेलमध्ये दारू पिण्यास विरोध केल्याच्या रागातून पर्यटकांनी मारहाण केल्याचे हॉटेल मालकाने तक्रारीत म्हटले आहे. स्थानिक हॉटेल मालकाला झालेल्या मारहाणीमुळे तेथे जमा झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी संतप्त होऊन मारहाण करणार्‌या पर्यटकांनाही चोपले. यात पाच पर्यटकही जखमी झाले आहेत. दरम्यान, गंभीर जखमी झालेले हॉटेल मालक राजाराम ऊर्फ सचिन भागोजी ताटे (वय ३५) आणि विजय अंकुश पांगम (३४, दोन्ही रा. वागदे-सावरवाडी) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर कणकवलीत प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ३.३० वा. च्या सुमारास घडली.
गुजरातच्या भडोज-भावनगर परिसरातील २९ पर्यटक लक्झरी बसने पर्यटनासाठी गोवा येथे निघाले होते. यामध्ये २२ मोठी माणसे, तर ७ लहान मुले आहेत. सोमवारी सायंकाळी ३.३० वा. च्या सुमारास त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे दूध डेअरीसमोर लक्झरी थांबवली.  महिला पर्यटकांनी जेवण बनविण्याचे सामान गाडीतून बाहेर काढून जेवण बनविण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही पुरुष पर्यटक हे तेथूनच शंभर फुटांवर असलेल्या पेट्रोलपंपासमोरील छोट्या हॉटेलात आले आणि त्यांनी थम्सअप घेतले व तेथील ग्लास घेऊन पीत बसले होते. मात्र, हॉटेल मालक सचिन ताटे यांना दारूचा वास आल्याने त्यांनी येथे दारू पिऊ नका, आम्ही कुणाला येथे दारू पिण्यास देत नाही, असे सांगितले. त्यानंतर ते पर्यटक तेथून जाण्यास निघाले असता ताटे यांनी त्यांना ग्लासेस धुवून ठेवण्यास सांगितले. ती पर्यटकांनी धुतलीही; मात्र त्या दरम्यान दोघांच्यात बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. पर्यटक महिलाही  झारे, बादल्या घेऊन त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनीही हॉटेल मालक व कामगाराला मारहाण करण्यास सुरुवात केली.

Page 7 of 668