Sunday, Feb 18th

Headlines:

सिंधुदुर्ग

सावंतवाडी टर्मिनसचे काम थांबू देणार नाही - सुरेश प्रभू

E-mail Print PDF

सावंतवाडी - जिल्ह्याला आदर्श ठरणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असे आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी येथे दिली. ज्या प्रभूंनी कधीही होऊ न शकणारे टर्मिनस या ठिकाणी विशेष मान्यता घेऊन आणले आणि आपल्या मंत्री कोकण रेल्वेचा विकास केला त्यांच्यावर टीका होणे, दुर्दैवी आहे, असेही तेली यांनी सांगितले.

तालुका शिवसेनेच्यावतीने येथे पत्रकार परिषद घेवून प्रभू यांच्यावर टीका केली होती. त्याला श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेवून उत्तर दिले. श्री. तेली म्हणाले, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत कोकण रेल्वेकडे कोणीच लक्ष दिला नसताना सुरेश प्रभू यांच्या रूपाने कोकण रेल्वेत मोठा आमूलाग्र बदल पाहायला मिळाला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसही त्यांच्यामुळे होत आहे. या आधीचे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होणार नसल्याची भूमिका घेतली होती; मात्र श्री. प्रभू रेल्वे मंत्री होताच टर्मिनस मंजूर करून त्याचे कामही सुरू केले. हे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्याबाबत आपण प्रभूंचे लक्ष वेधले असता प्रभूंनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल.’’

सिंधुदुर्गात आज दीपक केसरकर, नारायण राणे एकाच मंचावर

E-mail Print PDF

सिंधुदुर्ग : राज्यभरातले सुमारे दीड लाख शिक्षक आज सिंधुदुर्गात एकत्र आलेत. आजपासून सिंधुदुर्गात राजस्तरिय शिक्षक परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात एक अनोखा योगायोग बघायला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत. तळकोकणात राणे-केसरकरांचं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रृत आहे. राणेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी कधी लागणार याविषय़ी अजूनही संभ्रमाचं वातवरण आहे.

राणे-मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट

आता आज मुख्यमंत्री स्वतःच राणेंची पुन्हा एकदा भेट होतेय. आणखी एक योगायोग म्हणजे राणे-मुख्यमंत्र्यांची याआधीची भेट नागपुरात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शहरात झाली. तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंच्या शहरात येत आहेत.

वाहतूक नियंत्रणासाठी ‘कॅनव्हास मिरर’

E-mail Print PDF

मालवण : अरुंद रस्त्यामुळे वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यात रस्त्यालगत वाढलेली झाडीमुळे पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेल्या देवबागमध्ये येणाऱया पर्यटकांना त्रासदायक प्रवास करावा लागत होता. रस्ता रुंदीकरणाची शक्यता तूर्त तरी कमी असल्याने वाहन चालकांना सोयीसाठी निर्मल सागर तट अभियानांतर्गत देवबाग ग्रामपंचायतीने या मार्गावर दहा ठिकाणी ‘कॅनव्हास मिरर’ बसविले आहेत. हे मिरर बसविण्यासाठी ग्रामसेवक युवराज चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले होते.
वारंवार पाठपुरावा करुनही बांधकाम विभागाकडून रस्त्यालगत वाढलेली झाडी साफ न केल्याने ग्रामस्थांनी श्रमदानातून झाडी साफ केली होती. मात्र, रस्त्याला अनेक ठिकाणी वळणे असल्याने पर्यटकांना समोरुन येणाऱया वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघात व वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण होत होती. या समस्या टाळण्यासाठी देवबाग ग्रा. पं.ने रस्त्यावर दहा ठिकाणी मिरर बसविले आहेत.
देवबाग मधील रस्ते अरुंद आहेत. यामुळे निर्मल सागरतट अभियान राबविताना उपलब्ध झालेल्या निधीतून हे मिरर बसविण्यात आले. या मिररचे उद्घाटन उद्घाटन काशिनाथ केळुसकर व रमेश कद्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच तमास फर्नांडिस, नवनिर्वाचित सरपंच जान्हवी खोबरेकर, माजी सरपंच उल्हास तांडेल, ग्रामसेवक युवराज चव्हाण, प्रादेशिक बंदर अधिकारी श्री. टोपणो, पं. स. सदस्या मधुरा चोपडेकर, मनोज खोबरेकर, भानुदास येरागी, रमेश कद्रेकर, बंदर अधिकारी अनंत गोसावी उपस्थित होते. बहिर्गोल मिरर स्टेनलेस स्टीलमध्ये बनवले जातात. वाहतूक आणि वाहतुकीसाठी बाहेरील भागाची माहिती चालकांना उपयुक्त असते. अचूक रहदारीचे आणि उच्च दृश्यमानता असणारे हे मिरर आहेत. या मिररमुळे वाहने कशी जात आहेत, याची माहिती समोरील वाहनचालकांना मिळते. या मिररमुळे वाहन चालकाला डाव्या आणि उजव्या या दोन्ही बाजूंना पाहता येते. त्यामुळे भविष्यात देवबाग येथील अपघात व वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

नांदगाव-वाघाचीवाडी शाळा बंद करण्यास ग्रामस्थांचा विरोध

E-mail Print PDF

कणकवली : नांदगाव वाघाचीवाडी प्राथमिक शाळा बंद करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. लोकसहभागातून या शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले असून शाळेत सध्या 11 पटसंख्या आहे. त्यामुळे ही शाळा बंद केल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. ही शाळा बंद करण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवित सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांना निवेदन देत चर्चा केली. सौ. साटम यांनी या पूर्वी झालेल्या सर्व्हेनुसार या शाळेची पटसंख्या कमी दर्शविण्यात आली होती. मात्र, आता पटसंख्या वाढल्याने ही शाळा बंद करू नये, अशी शिफारस शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात येईल, असे आश्वासन साटम यांनी दिले.

नांदगाव-वाघाचीवाडी शाळेची पटसंख्या कमी असल्याने ही शाळा बंद करण्याच्या यादीत असल्याची बाब पं. स. च्या बैठकीत समोर आली होती. केंद्र प्रमुख व विस्तार अधिकाऱयांकडून मागविण्यात आलेल्या अहवालानुसार ही माहिती गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी दिली होती. मात्र, हा सर्व्हे केल्यानंतर शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली होती. शिक्षण संचालकांकडून आलेल्या आदेशानुसार या पूर्वी कमी पटसंख्येच्या शाळांबाबत सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर कमी पटसंख्येच्या यादीत येत असलेल्या वाघाचीवाडी व फोंडाघाट ब्रह्मनगरी या दोन्ही शाळांमध्ये सध्या 11 पट असल्याचे सौ. साटम यांनी सांगितले.

24 हजार शेतकऱयांना 33 कोटीची कर्जमाफी

E-mail Print PDF

सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाच्या सिद्धिसंकल्प कार्यक्रमातून सिंचनसाठी जलयुक्त शिवार योजनेमुळे 52 गावात 17 कोटी 29 लाख रुपये खर्च करून साडे चार हजार हेक्टर क्षेत्र सिंचनखाली आले आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे 24 हजार 90 शेतकऱयांना 33 कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम वाटप करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतून दोन वर्षात नऊ हजार हेक्टर क्षेत्र फळझाड लागवडीखाली आणले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिद्धिसंकल्प कार्यक्रमाची माहिती देण्याकरिता जिल्हाधिकाऱयांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक डॉ. मेधा वाके, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदीवडेकर आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्या योजनेचा झालेला फायदा आणि भविष्यातील फायदा कशा पद्धत्तीने होणार याची माहिती होण्यासाठी फायदा कशा पद्धतीने होणार? याची माहिती होण्यासाठी सिद्धी संकल्प कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत गेली तीन वर्षे जलयुक्त शिवार ही योजना राबवताना आतापर्यंत या योजनेतून 58 गावामध्ये ही योजना राबविली असून त्यापैकी 52 गावात जलयुक्तची कामे पूर्ण होऊन 17 कोटी 29 लाख रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे साडेचार हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या वर्षी आणखी 38 गावांची निवड केली असून या गावात कामे पूर्ण झाल्यावर आणखी 2900 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.

Page 6 of 678