Tuesday, Nov 21st

Headlines:

सिंधुदुर्ग

मुंबई-गोवा मार्गावर बसला अपघात; २६ जखमी

E-mail Print PDF
कणकवली - मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण-संभाजी नगर येथे विशाल ट्रॅव्हल्स या खासगी बसला अपघात झाला. रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान झालेल्या अपघातात बसमधील २६ प्रवासी जखमी झाले आहेत.
खारेपाटण मध्ये सलग दुसर्‍या दिवशी अपघात झाला. शनिवारी रामेश्वर ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाले होते. त्यामुळे बस प्रवाशांमध्ये खबराट पसरली आहे.
परेल-मुंबई येथून ही बस सावंतवाडी-बांदा येथे चाललेली होती. खारेपाटन प्रा. आ. केंद्रात जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले. गंभीर ७ जखमी प्रवाशांना कणकवली येथील ग्रामीण रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

कोकणातही समुद्र किनार्‍यावर शॅक उभारण्याचा निर्णय

E-mail Print PDF
सावंतवाडी - गोव्यात ज्याप्रमाणे समुद्र किनार्‍यावर पर्यटकांना आराम करण्यासाठी किंवा बसण्यासाठी आरामखुर्ची व शॅक उपलब्ध असतात त्याचप्रमाणे कोकणातील ७२० किलोमीटर समुद्र किनार्‍यावर शॅक उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील किनारपट्टीनजीक असलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
समुद्र किनार्‍यावर छोट्याशा झोपड्यात आराम खुर्चीत निवांत बसून विविध पदार्थांचा आस्वाद घेतात. त्यामुळे पार्टी किंवा पिकनिकसाठी पर्यटक गोव्याला जाणे पसंत करतात. याच धर्तीवर लवकरच महाराष्ट्रातील समुद्र किनार्‍यांवरही एमटीडीसीने ‘बीच शॅक’ धोरणाचा मसुदा तयार केला आहे.  किनार्‍यावर गोव्याच्या धर्तीवर ‘बीच शॅक्स’ सुरू करण्यासाठी एमटीडीसीचा परवाना बंधनकारक आहे. त्यासाठी व्यावसायिकांना अनेक नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल. या ठिकाणी परदेशी नागरिकांना शॅक्सचा परवाना मिळणार नसल्याचे समजते. कोकणातील किनार्‍यावर किती शॅक असतील ते या धोरणाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर समजणार आहे.  दरम्यान, नागरिकांच्या काही सूचना असल्यास ५ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन केले आहे.

देवगड हापूसला पेटंट मानांकन मिळण्याच्या अडचणाीत वाढ

E-mail Print PDF
देवगड - देवगड हापूसला पेटंट (जी. आय.) मानांकन मिळण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. देवगड हापूसचा दर्जा, वैशिष्टे व गुणवत्ता याचे वेगळेपण सांगणार्‍या अहवालावर सुनावणी झाल्यानंतर मानांकन मिळण्याच्या अंतिम टप्प्यात आलेल्या प्रस्तावाला रत्नागिरी येथील एका बागायतदाराने हरकत घेतल्यामुळे याबाबतचा निर्णय आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील आंबा बागायतदारांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया असल्याची माहिती देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांनी आज जामसंडे येथे पत्रकार परिषदेत दिली.
संस्था कार्यालयात ऍड. गोगटे यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. या वेळी देवगड तालुका आंबा बागायतदार व व्यापारी संघाचे अध्यक्ष पु. ज. ओगले, उपाध्यक्ष डी. बी. बलवान, राजेंद्र शेट्ये, सदाशिव भुजबळ आदी उपस्थित होते.
श्री. गोगटे म्हणाले, निर्णयाच्या अंतिम टप्प्यात आलेल्या प्रस्तावाला हरकत घेतली गेल्यामुळे बागायतदार नाराज आहेत. देवगड आणि रत्नागिरी आंब्याला मिळणार्‍या जीआय’ मानांकनाला विरोध दर्शवला आहे. सर्व ठिकाणचा हापूस एकच असून, देवगड, रत्नागिरीसह अन्य ठिकाणी उत्पादित होणार्‍या हापूस आंब्यामध्ये काहीच फरक नाही, असा अजब कांगावा याचिकाकर्त्याने केला आहे. त्यामुळे देवगड हापूस’ आणि रत्नागिरी हापूस’ या दोन्ही आंब्यांना मान्य झालेल्या जी.आय. मानांकनाला परत खीळ बसली आहे. २००८ पासून प्रलंबित असलेल्या मानांकन प्रकरणामध्ये एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या अखेरच्या सुनावणीत देवगड व रत्नागिरी हापूसला स्वतंत्र मानांकन देण्याचे जीआय रजिस्ट्रीने मान्य केले होते. तसा अध्यादेश काढण्याबाबतची रितसर जाहिरात त्यांनी काढली होती. त्यानुसार २३ जूनला देवगडच्या अर्जाला प्रसिध्दी देण्यात आली. त्यानंतर याबाबत कोणाच्या काही हरकती असल्यास त्या पुढील चार महिन्यांत नोंदवायच्या होत्या, मात्र हरकतीची मुदत संपण्याच्या अखेरीसच रत्नागिरी येथील एका प्रगतिशील बागायतदाराने चेन्नई येथील मानांकन बोर्डाकडे आपली हरकत नोंदवल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. हरकतीमध्ये त्यांनी रत्नागिरीबरोबरच देवगड हापूसच्या प्रस्तावालाही हरकत घेतल्याने येथील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी हापूस मानांकनाबाबत त्यांच्या काही अडचणी असतील, तर त्यांनी रत्नागिरीपुरती हरकत नोंदवणे अपेक्षित होते; मात्र तसे न करता त्यांनी देवगड हापूसलाही हरकत घेतल्याने कोकणातील आंबा बागायतदारच अडचणीत सापडला आहे. हा कोकणातील बागायतदारांचा विश्‍वासघात असून, त्याचा बागायतदार निषेध व्यक्त करीत आहेत.
ते म्हणाले, कोकणातील सर्व आंबा एकाच ब्रँडखाली आणण्याच्या प्रयत्नाला येथून विरोध होता. कोकणपासून कर्नाटकपर्यंत सर्वच आंबा एकच असल्याचे म्हटल्यास देवगड हापूसचे वेगळेपण राहणार नाही. येथील शेतकर्‍यांच्या दृष्टीने मानांकन मिळणे महत्त्वाचे आहे. देवगड हापूसचे बाजारात प्रस्तापित नाव असल्यामुळे तसेच त्याच्या एकूणच गुणधर्माचा विचार करता देवगड हापूसला स्वतंत्र जीआय मानांकन मिळू शकते, ही बाब तज्ज्ञांसोबत झालेल्या चर्चेत पुढे आल्यानंतरच याबाबत पुढे पाऊल उचलण्यात आले होते. त्याला यश आले असताना आता हरकतीमुळे ते लांबणीवर पडले आहे.’’

नारायण राणे यांनी मंत्रीपद मिळणार नाही; दीपक केसरकर यांचा दावा

E-mail Print PDF
सावंतवाडी - नारायण राणे यांची मनी लॉंडरिंग प्रकरणात इडी’कडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांना कुणी कितीही मंत्रिपद देण्यास इच्छुक असले; तरी ते त्यांना मिळणे शक्य नाही. न्यायालयाने त्यांच्याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश इडीला दिले आहेत,’ असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य अभियानात गोवा-बांबुळीच्या इस्पितळाचा (गोमॅको) समावेश करण्यात येणार असल्याने एक डिसेंबरपूर्वी जिल्ह्यातील रुग्णांच्या मोफत आरोग्य उपचारांचा प्रश्‍न सुटणार आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहनही श्री. केसरकर यांनी केले.
जिल्हा दौर्‍यावर असलेल्या श्री. केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मागील पत्रकार परिषदेत ईश्‍वरी संकेत असल्यामुळे राणेंना मंत्रिपद मिळणार नाही असे वक्तव्य केले होते. याबाबत छेडले असता ते म्हणाले,मनी लॉंडरिंग प्रकरणात राणेंची इडीमार्फत चौकशी सुरू आहे. संबंधित अहवाल तत्काळ सादर करा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तीन वेळा यावर सुनावणी झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारे आरोप असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद मिळणे कठीण आहे. भाजप हा चांगल्या लोकांचा पक्ष आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपची आतापर्यंतची वाटचाल आहे. त्यामुळे कोणी कितीही राणेंना मंत्रिपद देणार असे जाहीर केले असले; तरी कोर्टाने त्यांना हिरवा कंदील दाखविल्याशिवाय ते मंत्रिपद मिळवूच शकत नाहीत, हेच इश्‍वरी संकेत आहेत.’’
शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, स्वबळावर निवडणुका लढविणार; तसे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यांबाबत श्री. केसरकर यांना विचारले असता आगामी काळात निवडणुका आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्या घटनेचा राणेंच्या मंत्रिपदाशी कोणताही संबंध नाही असा दावा त्यांनी केला.

कोकण रेल्वेतून दारू जप्त

E-mail Print PDF
कणकवली - कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‌या गोवा संपर्क क्रांती व कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये आढळलेल्या बेवारस बॅगमधून दारू जप्त करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत कणकवली स्टेशन दरम्यान दोन्ही गाडयांमधून ही दारू जप्त करण्यात आली.
कोकण रेल्वेतून होत असलेली दारू वाहतूक रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस उपनिरिक्षक मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल राजेश कांदळकर व भूषण कोचरेकर यांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत मडगाववरून मुंबईच्या दिशेने जाणार्‌या गोवा संपर्क क्रांती व कोकण कन्या एक्सप्रेसमधून ही दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या बॅगामध्ये गोवा बनावटीच्या १८० मिलीच्या १९५ बॉटल तर  एक लिटरच्या १६ बॉटल आहेत. जप्त केलेली दारू रेल्वे पोलिसांकडून उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आली.

Page 5 of 668