Saturday, Sep 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर पोलिसांनी जप्त केली गोवा बनावटीची दारु; तिघांना अटक

E-mail Print PDF
सावंतवाडी - गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स गाडीतून उतरविताना पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या मालपे ग्रामस्थांनी  दारू वाहतूक करणार्‍या कारच्या काचा फोडल्या. ही घटना मालपे- गावठणवाडी येथे सोमवारी सकाळी ६ वा.च्या सुमारास घडली. नागरिकांचा उद्रेक पाहून चालक विलास हुन्नरे यांनी तेथून पळ काढला. मात्र, विजयदुर्ग पोलिसांनी त्याला कणकवली येथून ताब्यात घेतले.  दरम्यान, गोवा दारूचे बॉक्स घेणार्‍या शंकर समजीसकर या दाम्पत्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर मारुती ओम्नी व सुमारे ४० हजार रुपयेकिमतीची गोवा  दारू जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कणकवली येथील विलास रामचंद्र हुन्नरे (वय ६४) हा त्याचा मालकीच्या गाडीने सोमवारी सकाळी गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स घेऊन मालपे येथे गेला होता. सकाळी ६ वा. च्या सुमारास मालपे - गावठणवाडी येथे तेथीलच शंकर लक्ष्मण समजीसकर (५०) व त्यांची पत्नी स्वाती शंकर समजीसकर (४५) हे दोघे जण त्याचा गाडीतील दारूचे बॉक्स उतरवून घेत असताना लोकांनी पाहिले. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या लोकांनी तेथे जात कारच्या काचा फोडल्या. यावेळी ओम्नीचालक विलास हुन्नरे हा लोकांच्या उद्रेकाने घाबरून तेथून पळाला.
त्यानंतर लोकांनी मालपे पोलिस पाटील विलास गोपाळ सुतार यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील यांनी विजयदुर्ग पोलिस स्टेशनला कळविल्यानंतर पोलिस नाईक आगा, गुणिजन, महिला कॉं. मिठबांवकर, चालक कदम यांनी घटनास्थळी जावून मारूती ओमनी ताब्यात घेतली.
गाडीमध्ये गोवा बनावटीच्या हनी गाईड ब्रँडीचे १३ बॉक्स व १९३ बॉटल अशी ४० हजार रुपये किंमतीची दारू ताब्यात घेतली. विजयदुर्ग पोलिसांनी ओमनी गाडी व दारूसहीत सुमारे १ लाख ९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणातील पळून गेलेला संशयित विलास हुन्नरे याला विजयदुर्ग पोलिसांनी कणकवली येथून तर शंकर समजीसकर व त्यांच्या पत्नीला मालपे तिठा येथून ताब्यात घेतले आहे.
बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची दारूची वाहतूक करणे, दारू ताब्यात बाळगणे व विक्री करणे याप्रकरणी विलास हुन्नरे, शंकर समजीसकर, स्वाती समजीस्कर या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तपास स.पो. निरिक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.

पर्यावरणाचे जतन करुनच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास व्हावा : अभिनेते जॅकी श्रॉफ

E-mail Print PDF
सावंतवाडी - जिल्हा विकासाचे व्हिजन ठेवून काम सुरू असल्याने सिंधुदुर्ग बदलतोय. येथील निसर्ग, पर्यावरण, जैवविविधता, हस्तकला, म्युझियम्स, स्पोर्ट्समध्ये काम करून त्यांचे मार्केटिंग झाल्यास जिल्ह्याचा आर्थिक विकास होईल, असे सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ यांनी म्हटले आहे. पालकमंत्री दीपक केसरकर चांगले व्हिजन ठेवून काम करीत आहेत. त्यांना साथ देण्याचेदेखील जॅकी श्रॉफ यांनी स्पष्ट केले. दीपक केसरकर यांच्यासमवेत यशवंतगड किल्ला, आरोंदा किरणपाणी बंदर जलविहार, रेडी, सावंतवाडी राजवाडा व हस्तकला, शिल्पग्राम, म्युझियम्स, एम्पोरियम प्रकल्पांना त्यांनी भेट दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण अनेक वर्षे येत आहोत. आता सिंधुदुर्ग बदलतोय, असे सांगून जॅकी श्रॉफ म्हणाले, यापूर्वी मला उद्धव ठाकरे यांनी पाठविले होते. आज पालकमंत्री केसरकर यांच्यासमवेत आलो आहे. केसरकर यांनी आपणास आज दाखविलेली पर्यटनस्थळे आणि मी यापूर्वी यशवंतगड ते विजयदुर्गपर्यंत पाहिलेल्या अथांग, स्वच्छ व सुंदर सागरी किनार्‍याचे पर्यटनदृष्टया मार्केटिंग करण्यासाठी माझा उपयोग करून घेतल्यास किंवा ब्रॅण्ड ऍम्बेसिडरची जबाबदारी माझ्यावर टाकल्यास ती मी आनंदाने स्वीकारीन, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

पाच लाखाची लाच घेतांना मुख्याध्यापकासह दोघे जाळयात

E-mail Print PDF
देवगड - शिक्षकाला नोकरीमध्ये कायमस्वरुपी करण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱयांकडे पाठविण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच घेणार्‍या तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सदाशिव संतराम पाटील (५७, तळेबाजार साईनगर) व त्याचा साथीदार संतोष बापू वरेरकर (५०, वरेरी- बौद्धवाडी) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मुख्याध्यापक पाटील याच्याच निवासस्थानी करण्यात आली. संशयित वरेरकर हा प्रशालेचा खजिनदारही आहे. आरोंदा येथील तलाठ्याला लाचप्रकरणी पकडण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सलग दुसर्‍या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तळेबाजारमध्ये केलेल्या कारवाईमुळे जिल्हयात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिर ही सरकारी अनुदानित शाळा आहे. या विद्यामंदिरमध्ये सुरुवातीला हंगामी शिक्षक म्हणून रुजू झालेले शिक्षक एम. आर. चव्हाण हे सन २०१२ पासून सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते. चव्हाण यांनी आपल्याला सेवेत कायमस्वरुपी करण्याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल चव्हाण यांच्या बाजूने लागला. या निकालाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून तो शिक्षणाधिकारी यांच्याकडे मान्यतेला पाठविण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील याने चव्हाण यांच्याकडे तब्बल दहा लाख रुपयांची मागणी केली. यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्यास मुख्याध्यापक पाटील याने चव्हाण यांना सांगितले. त्यानंतर शिक्षक चव्हाण यांनी मुख्याध्यापक पाटील याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली.
चव्हाण यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ व ८ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापक पाटील व चव्हाण यांच्यातील संभाषणाची पडताळणी केली. या संभाषणात मुख्याध्यापक पाटील याने पाच लाखाचा पहिला हप्ता मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संग्रामसिंह निशानदार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग पोलीस उपअधीक्षक शंकर चिंदरकर, पोलीस निरीक्षक एम. एम. केणी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फाले, पोलीस नाईक परब, पोलीस शिपाई दळवी, जामदार, पोतनीस, पालकर, महिला पोलीस नाईक प्रभू, चालक पोलीस नाईक पेडणेकर यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास तळेबाजार साईनगर येथे मुख्याध्यापकाच्या निवासस्थानी सापळा रचला.
शिक्षक चव्हाण यांनी मुख्याध्यापक पाटील याच्या निवासस्थानी जात पाच लाखाची रक्कम देऊ केली. ही रक्कम वरेरकर याने स्वीकारली. या संपूर्ण रकमेमध्ये दोन हजाराच्या चार भारतीय चलनी नोटा व इतर डमी नोटा ठेवण्यात आल्या होत्या. ही लाच स्वीकारतांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुख्याध्यापक पाटील व वरेरकर यांना रंगेहाथ पकडले.
मुख्याध्यापक पाटील व वररेकर या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम ७, १२, १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पाटील याची प्रकृती बिघडल्याने त्याला सोमवारी अटक करण्यात येणार आहे. तर संशयित वरेरकर याला ओरोस जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, सरकारी कामासाठी लाच देणे व देणे हा गुन्हा आहे. जनतेने जागरुक राहावे. लाच देणारा किंवा घेणारा याबाबत माहिती मिळाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसमध्ये अंतर्गत संघर्षाला सुरुवात

E-mail Print PDF
कणकवली - कॉंग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने याची गंभीर दखल घेत सिंधुदुर्गात कॉंग्रेस संघटना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा प्रयत्न सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस अंतर्गत संघर्ष सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. नारायण राणे यांना डावलून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खा. हुसेन दलवाई यांनी सावंतवाडीत येवून बैठक घेतली. राणे यांनी या संदर्भात हुसेन दलवाई यांच्या भूमिकेवर टीका करत सिंधुदुर्ग कॉंग्रेस आणि हुसेन दलवाई यांचा काही संबंध आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. दरम्यान, आ.नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह सावंतवाडीत दलवाई यांनी बोलविलेल्या बैठकीत जावून त्यांना धारेवर धरले.
गेले पंधरा-वीस दिवस राणे यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाल्याच्या बातम्या बाहेर पडत होत्या. परंतु प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. तोवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने राणे भाजपमध्ये प्रवेशले तर कॉंग्रेस संघटना वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांना संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खा.दलवाई आणि  कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, आ. विश्‍वनाथ पाटील यांनी सावंतवाडीत शुक्रवारी बैठक घेतली. जिल्हा पातळीवर कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य आणि जिल्हा बँकेचे संचालक विकास सावंत यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि या बैठकीला कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र या बैठकीत कॉंग्रेस नेते  नारायण राणे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते.

चौके येथे चिरे वाहतूक करणारा डंपर उलटला

E-mail Print PDF
मालवण - चिर्‍यांची वाहतूक करणार्‍या डंपरवरील चालकाचा ताबा सुटून डंपर रस्त्याच्या बाजूला पलटी होऊन अपघात झाला. यात चालकासह पाच जण जखमी झाले. यातील दोघांना गंभीर दुखापत झाली. त्यांना मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात  शुक्रवारी सकाळी ११ वा. च्या दरम्यान  चौके येथे सागर दर्शन पॉंईटच्या तीव्र उतार व वळणावर झाला.
मालवण येथील राजन वरवडेकर यांच्या मालकीचा डंपर (एम. एच. ०७. सी. ६३८६) चौके येथून चिरे भरून डंपर चालक अमोल बाळकृष्ण कोकरे हा मालवण येथे येत होता. चौके सागरदर्शन येथे तीव्र उतार व वळण असलेल्या रस्त्यावर त्याचा डंपरवरील ताबा सुटला आणि डंपर रस्त्याच्या बाजूला जात पलटी झाला. या अपघातात डंपरच्या हौद्यामध्ये बसलेले कामगार आशिष सुरेश करंजेकर व बाबूराव लक्ष्मण झोरे या दोघांच्या अंगावर चिरे पडल्याने  ते गंभीर जखमी झाले. तर डंपरचालक अमोल बाळकृष्ण कोकरे सह बाबूराव धुळाजी बुटे, जानू विठ्ठल खरवते हे किरकोळ जखमी झाले. या अपघातात डंपरच्या दर्शनी भागाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.जेसीबीच्या मदतीने डंपर मधील चिरे बाजूला करण्यात आले.त्यानंतर जेसीबीच्या सहायाने पलटी झालेला डंपर सरळ करण्यात आला.डंपर पलटी झालेला समजताच घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
या अपघाताची माहिती मिळताच आंबेरीचे  सरपंच उदय केळुसकर, नितीन गावडे, विजय गावडे, प्रभाकर गावडे, बाळा दळवी, बबन झोरे, विनोद दळवी, संतोष गावडे यांनी घटनास्थळी धाव घेत चिर्‌याखाली सापडलेल्या दोन्ही कामगारांना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  चौके सरपंच राजा गावडे, बिजेंद्र गावडे, पापा मालंडकर, सचिन आंबेरकर, पपु वराडकर, सागर गोवेकर तसेच अन्य लोकांनी सहकार्य केले.
अपघातात जखमी आशिष सुरेश करंजेकर (रा.कुंभारमाठ), बाबूराव लक्ष्मण झोरे (रा. कुंभारमाठ), बाबूराव धुळाजी बुटे (रा.आनंदव्हाळ), जानू विठ्ठल खरवते (रा.कातवड) या जखमींना उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जखमींंवर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील,डॉ.अजित लिमये, डॉ. सुरेश पांचाळ, डॉ. अनिरुद्ध मेहेंदळे यांनी उपचार केले. गंभीर जखमी झालेल्या आशिष करंजेकर यांच्या डोक्यास मार बसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. जखमींची गणेश कुडाळकर, नगरसेवक गणेश कुशे यांनी ग्रामीण रुग्णालयात जात विचारपूस केली.

Page 4 of 655