Sunday, Feb 18th

Headlines:

सिंधुदुर्ग

कोकणला स्वतंत्र विद्यापीठ हवे

E-mail Print PDF
सावंतवाडी: कोकण प्रांतातील विद्यार्थी हुशार आहेत, हे दहावी आणि बारावीत कोकण बोर्डाने राज्यात अव्वल स्थान पटकावून सिद्ध केले आहे. 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेल्या कोकण प्रांताला स्वतंत्र विद्यापीठ असावे, अशी अपेक्षा प्राचार्य महेंद्र नाटेकर यांनी व्यक्त केली. पंचम खेमराज महाविद्यालयात ‘स्वतंत्र कोकण विद्यापीठ’ या विषयावर त्यांचे व्याखान जिमखाना हॉल येथे आयोजित केले होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, प्रा. डी. डी. गोडकर, प्रा. सुभाष चौगुले, तसेच प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

आज कोकणला स्वतंत्र विद्यापीठाची गरज आहे. मुंबई विद्यापीठामध्ये जवळजवळ 650 महाविद्यालयाचे आठ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यापीठाचा कारभार दिवसेंदिवस खालावत आहे. पेपर तपासणीत होणाऱया दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यासाठी कोकण विद्यापीठ होणे ही काळाची गरज आहे. शासनाने या मागणीची दखल घेऊन कोकण विद्यापीठ त्वरित घोषित करावे, अशी मागणी करणारे विद्यार्थ्यांच्या सहय़ांचे निवेदन सावंतवाडी तहसीलदारांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले. तर आभार प्रा. डी. डी. गोडकर यांनी मानले.

दिल्लीत संचलनासाठी तेजस सावंतची निवड

E-mail Print PDF
सावंतवाडी : येथील पंचम खेमराज महाविद्यालयाचा बी. कॉम. चा द्वितीय वर्षाचा नेव्ही एन. सी. सी. कॅडेट तेजस संतोष सावंत याची प्रजासत्ताकदिनी दिल्ली येथे होणाऱया परेडसाठी निवड झाली आहे. सिंधुदुर्गातून निवड झालेला तो एकमेव विद्यार्थी आहे.

तेजस हा कलंबिस्तचा सुपुत्र आहे. त्याने कलंबिस्त हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीत असतांना नेव्ही एनसीसीमध्ये सहभाग घेतला होता. पदवीचे शिक्षण पंचम खेमराज महाविद्यालयात बी. कॉम. शाखेत घेत आहे. पंचम खेमराज महाविद्यालयात गेली दोन वर्षे नेव्ही एन. सी. सी. कॅडेट म्हणून तो कार्यरत आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, अहमदनगर या ठिकाणी बेस्ट कॅडेट म्हणून त्याची निवड झाली. महाराष्ट्र नेव्ही एन. सी. सी. बेस्ट कॅडेट म्हणून प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱया एनसीसी परेडसाठी त्याची निवड झाली आहे. तेजस याला महाविद्यालयाचे एनसीसी शिक्षक विशाल अपराज याचे मार्गदर्शन लाभले.

सावंतवाडी डंपिंग ग्राऊंडला आग

E-mail Print PDF

 सावंतवाडी : जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वणवे लागण्याचे सत्र सुरू असतानाच आता शहरातही वणवे लागू लागले आहेत. सावंतवाडी पालिकेच्या आंबोली-बेळगाव मार्गावरील लाडाची बाग जवळील डंपिंग ग्राऊंडला (कचरा डेपो) अज्ञाताने मंगळवारी आग लावली. ही आग विझविण्याचे प्रयत्न पालिका प्रशासन करीत होते.

स्वच्छ भारत अभियान कालावधीत या डंपिंग ग्राऊंडला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. दुर्गंधीपासून हा भाग मुक्त झाला आहे. गेटवर फळाफुलांची रंगबिरंगी पोस्टर्स झळकत आहेत. तसेच गांडुळ खत प्रकल्प साकारला जात आहे. याच दरम्यान अज्ञाताने लावलेल्या आगीमुळे खळबळ उडाली आहे. नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, डंपिंग ग्राऊंडच्या काही भागात आग लावण्यात आली. ही आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने खत निर्मिती प्रकल्प वाचवू शकलो. मात्र आग लावण्याचे हे कृत्य दुर्दैवी आहे.

पाळीव जनावरांना पायलागाची लागण

E-mail Print PDF
सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील कुडाळ, पावशी आणि माडय़ाचीवाडी परिसरातील दुभत्या पाळीव जनावरांना पायलाग रोगाची लागण झाली असून जिल्हय़ात प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने या साथीचा फैलाव जोरात सुरू झाला आहे. जिल्हय़ात अन्यत्र ही साथ वेगाने फैलावण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कुडाळ येथे झालेल्या कृषी महोत्सवादरम्यान या साथीचा फैलाव सुरू झाला होता. मात्र शासनाने प्रतिबंधात्मक कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे ही साथ वेगाने पसरू लागली आहे. धोकादायक गोष्ट म्हणजे ‘सिंधुसरस कृषी प्रदर्शन’  तेंडावर आले आहे. या प्रदर्शनात गुरेही आणली जातात. त्यामुळे अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून गुरांना या साथीची लागण होण्यापूर्वीच युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक लस टोचणी होणे अत्यंत आवश्यक आहे. ही साथ तीव्र वेगाने पसरणारी असल्यामुळे जिल्हाभर पसरण्यापूर्वीच तिला अटकाव करणे अत्यंत आवश्यक आहे.

दरम्यान जिल्हय़ातील उपलब्ध लसीबाबत माहिती घेतली असता जिल्हय़ात पायलाग प्रतिबंधक लसच उपलब्ध नसल्याचे समजते. आणिबाणीच्या परिस्थितीत या साथीने वेग पकडला, तर अनेक जनावरांना या साथीची बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने सिंधुसरस प्रदर्शनापूर्वीच शेतकऱयांना ही लस उपलब्ध करून देऊन साथीचा प्रतिबंध करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

रिफायनरीविरोधात गिर्येवासीय आक्रमक

E-mail Print PDF
देवगड :‘गिर्ये-रामेश्वर क्षेत्रात होणारा ग्रीन रिफायनरी प्रकल्प भाजपनेच आणला आणि तो आम्ही करणारच’, अशी ठाम भूमिका घेणाऱया भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या प्रतिक्रियेवर गिर्ये, रामेश्वरच्या ग्रामस्थांनी मंगळवारी गिर्ये कॅन्टिन येथे जठारांचा प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. हिम्मत असेल तर जठारांनी गिर्ये येथे येऊन प्रकल्पाच्या समर्थनात्मक भूमिका मांडण्याची जाहीर सभा घ्यावी, असे आव्हानही संघर्ष समिती व प्रकल्पग्रस्तांनी दिले. यावेळी जठारांविरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

रिफायनरी प्रकल्पाबाबत जनतेमधून तीव्र विरोध होत असताना भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार जठार यांनी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मत व्यक्त करीत मांडलेल्या भूमिकेचे तीव्र पडसाद गिर्ये, रामेश्वर परिसरात उमटले. मंगळवारी जठार यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन संघर्ष समिती, प्रकल्पग्रस्त व स्थानिक ग्रामस्थांनी गिर्ये कॅन्टिन येथे केले. संघर्ष समितीचे स्थानिक अध्यक्ष मुनाफ ठाकुर, उपाध्यक्ष प्रभाकर देवळेकर, बबन घाटये, शरजू घाटये, आरिफ बगदादी, जि. प. सदस्या सौ. वर्षा पवार, संदीप डोळकर, अतुल आंबेरकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

Page 3 of 678