Wednesday, Feb 21st

Headlines:

रत्नागिरी

पालीत भीषण आगीत गॅरेजसह हार्डवेअरचे गोडावून खाक

E-mail Print PDF
पाली ः रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील पाली तिठ्यानजिक असलेल्या एका मोटार गॅरेजला लागलेल्या भीषण आगीत या मोटार गॅरेजसह हार्डवेअरचे गोडावून जळून खाक झाले असून, या दोन्ही दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग सोमवारी रात्री १२ वा. च्या सुमारास लागली. मात्र पालीतील शेकडो तरूणांनी प्रसंगावधान राखून या आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अथर्न टळला.

ग्रामस्थांसह शिवसेनेचा विरोध धुडकावत रिफायनरी प्रकल्प रेटण्याच्या हालचाली?

E-mail Print PDF
रत्नागिरी ः शिवसेना आणि स्थानिक ग्रामस्थांचा विरोध डावलून रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये नाणार परिसरात जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्याचे वृत्त एका प्रसारवाहिनीने दिले आहे. चारच दिवसांपूर्वी स्थानिक जनतेचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यानी दिल्याचे शिवसेना सांगत असतानाच मुंबईत होत असलेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणूक परिषद रिफायनरीचा स्टॉल लागल्याचे पहायला मिळत आहे. जो प्रकल्प करायचाच नाही त्याचा स्टॉल कशासाठी? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर परिसरातील नाणार आणि आसपासच्या गावांमध्ये तसेच सिंधुदुर्गातील देवगडमधील गिर्ये आणि रामेश्‍वर या गावांमध्ये जगातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प (ऑईल रिफायनरी) उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेतल्यापासून ग्रामस्थांनी या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला आहे. लोकशाही मार्गाने अनेकवेळा आंदोलने करून स्थानिक लोकांनी प्रकल्प रद्द करा, असे साकडे सरकारकडे घातले आहे.

बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा निर्णय

E-mail Print PDF
रत्नागिरी ः शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लेखी आश्‍वासन देेवूनही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत कोणताही लेखी आदेश दिला नाही. त्यामुळे २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी घेतल्याची माहिती संघटनेतर्फे पत्रकाद्वारे देण्यात आली. २०१२ पासून शिक्षक मान्यता, पायाभूत पदांना मान्यता, मान्यताप्राप्त शिक्षकांचे शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करून वेतन देणे, मुल्यांकनप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांची अनुदानासह यादी जाहीर करणे, स्वतंत्र प्रशासन सरसकट निवड श्रेणीसह ३२ मागण्यांचे निवेदन संघटनेने शासनाकडे पाठवले आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यानी लेखी आश्‍वासन देवूनही अद्याप मागण्यांच्या पूर्ततेबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. या मागण्यांचे गांभीर्य शासनाला कळावे यासाठी मोर्चे, राज्यभर कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवून जेलभरो आंदोलन करण्यात आले होते. तरीही शासन दखल घेण्यास तयार नाही. मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश २० फेब्रुवारीपर्यंत काढले नाहीत तर उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार अटळ राहिल असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.

मंगलवाद्याच्या पवित्र वातावरणात पाच पुण्यवंतांनी घेतली जैन धर्माची दीक्षा

E-mail Print PDF
रत्नागिरी ः मंगल वाद्यांच्या गजरात आणि पवित्र वातावरणात सोमवारी रत्नागिरीत पाच पुण्यवंतांनी अतिशय गांभीर्याने जैन धर्माची दीक्षा घेतली. दीक्षा विधी आटोपताच या पाचही पुण्यवंतांनी आपल्या संन्यासी जीवनाला प्रारंभ करत कोल्हापूर, विजयवाड्याकडे प्रस्थान केले. या सर्व मुनीवरांना निरोप देण्यासाठी रत्नागिरीतील शेकडो जैनबांधव आणि नागरिक उपस्थित होते.
रत्नागिरीतील प्रसिद्ध जे. लालचंद सराफ ऍण्ड सन्स या सुवर्णपेढीचे मालक भरतकुमार लालचंद भंडारी, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सपनाबेन भंडारी, कन्या पूर्वी भरतकुमार भंडारी आणि प्रकाश जैन हे सर्वसंगपरित्याग करून जैन धर्माची दीक्षा स्वीकारणार असल्याने गेले आठवडाभर जैन बांधवांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

आजपासून शिमग्याला सुरूवात, १० गावांमध्ये बंदीचे सावट

E-mail Print PDF
रत्नागिरी ः कोकणवासियांचा लाडका शिमगा आजपासून सुरू होत असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान या कालावधीत ११६१ सार्वजनिक तर २८०० खाजगी होळ्या उभ्या राहणार असून ७४८ ग्रामदेवतांच्या पालख्या वाजत गाजत ग्रामदक्षिणांना बाहेर पडणार आहेत. दरम्यान जिल्ह्यातील दहा गावांमध्ये शिमगोत्सवाचा वाद अजून धुमसत असून या गावांमधील शिमगोत्सव बंदीच्या सावटाखाली आहे.
आजपासून कोकणातील शिमगोत्सवाला सुरूवात होत आहे. या शिमगोत्सवाच्या कालावधीत ग्रामदेवतांच्या पालख्या मंदिरातून बाहेर पडतात. घरोघरी जातात यामुळे देव घरी आल्याचा आनंद भक्तांना मिळतो. दोन देवतांच्या पालख्यांची गळाभेट देखील या कालावधीत होते. त्यामुळे शिमगोत्सवाला फार मोठे महत्व प्राप्त होते.

Page 2 of 3279