Tuesday, Nov 21st

Headlines:

रत्नागिरी

कामथे उपसरपंच निवडणुकीत एका सदस्याची मतदान चिठ्ठी गायब

E-mail Print PDF
चिपळूण (प्रतिनिधी) -  तालुक्यातील कामथे येथील उपसरपंचपदाच्या निवडणुकीत ९ सदस्यांनी मतदान केले होते. मतमोजणीवेळी प्रत्यक्षात आठ चिठ्ठ्याच मिळाल्या. गायब झालेली चिठ्ठी ही एका सदस्यानेच खाऊन गायब केली, असा गंभीर आरोप गाव विकास पॅनेलने केला आहे. ‘मतदान झालेली चिठ्ठी गायब झाल्याने उपसरपंचपदाची फेरनिवडणूक घ्यावी’, अशी मागणी गाव विकास पॅनेलने अपर जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
निवडणूक विभागाकडून संपूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. यामध्ये मतदान करतेवेळी सदस्यांच्या हालचाली टिपण्यात आल्या आहेत. एका सदस्याने चिठ्ठी खाल्ल्याने ती मतमोजणीत मिळाली नाही. मतदान करतेवेळी सर्व सदस्यांनी घेतलेला वेळ व हालचालींमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याच्या हालचाली संशयास्पद आहेत. त्यामुळे त्या सदस्याने मतदान करते वेळी आपल्याच मताची चिठ्ठी खाल्ली असावी, असा आरोप करीत उपसरपंचपदाची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी गावविकास पॅनेलतर्फे हरी कासार यांनी केली आहे.
तालुक्यातील कामथेची निवडणूक आर्थिक उलाढालीमुळे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेची बनली होती. आता उपसरपंचपदाच्या निवडणुकीत एक मत गायब झाल्याने पुन्हा एकदा कामथे चर्चेत आले आहे. येथील निवडणुकीत सुकाई पॅनेलने ९ पैकी ५ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. थेट सरपंच म्हणून सुकाई पॅनेलचे विजय माटे विजयी झाले. गाव विकास पॅनेलला ४ जागा मिळाल्या. उपसरपंच निवडीपूर्वी सुकाई पॅनेलचा एक सदस्य गाव विकास पॅनेलला मिळाला. त्यामुळे उपसरपंचपदाच्या निवडीत गाव विकास पॅनेलचे पारडे जड होते. आपल्या गोटातील ग्रामपंचायत सदस्यांना दगाफटका होऊ नये म्हणून गाव विकास पॅनेलने त्यांना अज्ञातस्थळी हलविले होते.
उपसरपंचपदाच्या निवडीसाठी रविवारी कामथे येथे निवडणूक झाली. सुकाई पॅनेलतर्फे प्रदीप उदेक आणि गाव विकास आघाडीकडून सौ. अक्षता कासार यांनी अर्ज दाखल केल्यावर निवडणुकीदरम्यान कोणताही गोंधळ आणि वादविवाद नको म्हणून प्रत्यक्ष मतदानाने उपसरपंच निवड करण्याचे ठरले. नऊ सदस्यांनी मतदान केले. मोजणीसाठी आठच चिठ्‌ठ्या मिळाल्या. त्यामुळे एक मत कोठे गेले, याबाबत गोंधळ सुरू झाला. कोणत्या तरी सदस्याने मतदानाच्या वेळी मतपेटीत मत टाकलेच नसावे. एखाद्याने स्वत:चेच मत खाल्ले की काय, अशी खुमासदार चर्चाही रंगली होती. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील हातमाग पुन्हा सुरु होणार

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील अनेक वर्षे बंद असलेले हातमाग पुन्हा खडाडणार आहे. कारागृहात शिक्षेचे कैदी ठेवणे बंद केल्यामुळे व्यवसायाभिमुख उपक्रम बंद पडले होते. सुनावणी प्रक्रियेतील कैद्यांना काम देता येत नसल्याने व्यवसायाभिमुख उपक्रम राबवणे अशक्य झाले होते. मात्र आता कारागृह प्रशासनाच्या विनंतीवरून पुन्हा शिक्षेचे कैदी रत्नागिरीत दाखल होणार असून हातमाग, शेती व अन्य व्यवसायही सुरू होणार आहेत.
रत्नागिरी कारागृहाला विशेष कारागृह म्हणून संबोधण्यात येते. या विशेष कारागृहात सध्या केवळ शिक्षा सुनावणी प्रक्रियेतीलच कैदी आहेत. १० वर्षांपुर्वी विविध गुन्हयांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना या ठिकाणी ठेवण्यात येत होते. मात्र त्यानंतर शिक्षेचे कैदी अन्य कारागृहांमध्ये ठेवण्याचा निर्णय झाला. शिक्षेचे कैदी नसल्याने कारागृहाला प्रशासनाला कोणतेही काम व्यवसायिकदृष्टया राबवता येत नव्हाते. बंदिवानांच्या हाताला काम दिले की, त्यांचा कामात वेळ जावून त्यांनाही अर्थाजन होते. श्रमाचे मोल कळते. त्याचबरोबर या वस्तूंच्या विक्रीतून प्रशासनालाही आर्थिक बळ मिळते.
मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी फर्निचर बनविण्यापासून सर्व कामे कैदी करतात. नाशिक कारागृहात तर पैठणी बनवली जाते, तसेच टूथपेस्टही बनवली जाते यातून बंदिवानांना कारागृह प्रशासनाकडून कामाचा मोबदला दिला जातो. याच धर्तीवर रत्नागिरीत १० वर्षांपूर्वी विविध भाजीपाला लागवड मोठया प्रमाणावर केली जायचे. आता काही वर्षे हे सगळे बंद झाले आहे त्यामुळे पुन्हा नव्याने विविध उपक्रम सुरू व्हावे यासाठी जिल्हा कारागृह प्रयत्न करत होते.
याच प्रयत्नांना यश आले आहे. कारागृह प्रशासनाकडे शिक्षेच्या कैद्यांची मागणी करण्यात आली होती त्यानुसार येत्या महिनाभरात २५ कैदी रत्नागिरीत कारागृहात ठाणे, मुंबई येथून दाखल होतील आणि गेले कित्येक वर्षे बंद असलेले हातमाग पुन्हा जोमाने सुरू होणार आहे. त्यामुळे बंदिवानांच्या हाताला कामही मिळणार आहे. कारागृहातील हातमाग बनवलेल्या चादर, सतरंजी यांना यापुर्वी ग्राहकांची पसंती मिळत होती. पुन्हा हे काम सुरू झाल्यास बंदीवानांनाही वेगळी ओळख मिळू शकेल.

प्रकाशझोताद्वारे मच्छीमारी करणार्‍या नौकांवर कारवाई करण्याचे आदेश

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - प्रखर प्रकाशझोताद्वारे समुद्रात मच्छीमारी करणार्‍यास केद्र शासनाद्वारे पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी व मत्स्यव्यवसाय विभागाकडून संबंधित खात्यांना याबाबत सुचित करण्यात आले आहे. तसेच प्रकाश प्रकाशाझोताद्वारे मच्छीमारी करतांना मच्छीमार नौका आढळल्यास या मच्छीमार नौकांवर कारवाई करण्याचे आदेश तटरक्षक दलाला देण्यात आले आहेत.
शासनाकडून हा अध्यादेश १० नोव्हेंबर २०१७ रोजी काढला आहे. या आदेशांची त्वरित कार्यवाही करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे खोल समुद्रात प्रखर प्रकाशझोताद्वारे अवैध मच्छीमारी करणा़र्‍यांना चाप बसणार आहे. येथील समुद्रात मोठ्या प्रमाणावर अवैध मच्छीमारी सुरू असून याबाबत स्थानिक पारंपारिक मच्छीमारांकडून नियमित तक्रार सहाय्यक मत्स्य व्यवसाय खात्यांकडे करण्यात येत होत्या.
दरम्यान १४ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पारंपारिक मच्छीमार तसेच पर्ससीन मच्छीमार, जिल्हाधिकारी, तसेच सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी व इतर संबधित खात्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर शासनाकडून आलेला हा अध्यादेश महत्वाचा ठरणार आहे.
मात्र आता केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय कृषी व कल्याण विभागाकडून प्रखर प्रकाशझोताद्वारे मच्छीमार करण्यावर प्रतिबंध घालण्यात आल्याने तसेच अशा प्रकारे मच्छीमारी करणाऱयावर तटरक्षक दलाने कारवाई करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने अवैध मच्छीमारीला आळा बसणार आहे.

गडगडी धरणाला गळती; कालव्याच्या भिंतीखालून झिरपतेय पाणी

E-mail Print PDF
देवरुख (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील वाशी-बोरसुतमधील गडगडी धरणाच्या कलव्यामधून गेले काही दिवस गढूळ पाणी येत असून धरणाखाली गळती लागल्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे धरणाखालील ३० गावे भीतीच्या छायेखाली असून पाटबंधारे विभागाने मात्र ही गळती फार मोठी नसून धरणाला धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसऱया बाजूला ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी धरण गळतीचा मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करत आहेत. त्यामुळे परिसरातील ३० गावांमध्ये संभ्रमाचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडगडी हे धरण वाशी व बोरसुत या खोऱयात बांधण्यात आले आहे. १९८२ साली या धरणाला अंतिम मंजुरी मिळाली मात्र प्रत्यक्षात १९८७ मध्ये या धरणाचे काम सुरु झाले. २००७ साली एकुण ६० कोटी रुपये खर्च झाले. मात्र त्यानंतर हळूहळू ही रक्कम वाढतच गेली असून आतापर्यंत सुमारे १२० कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही काही काम अपुर्ण आहे. प्रामुख्याने कालव्याचे काम अपुर्ण असल्याने याचा लाभ शेतकऱयांना घेता येत नाही.
मुख्य धरणाचे काम मात्र पुर्ण असून या धरणात १३.५२६ दलघमी (टीएमसी) एवढया पाणी साठयाची क्षमता आहे. धरणाची भिंत ३३ मीटर उंच असून त्यात दोन वर्षापुर्वी थोडी वाढ करण्यात आली आहे. धरणाचा उजवा कालवा १५ कि.मी. चा तर डावा कालवा ८ कि.मी. चा आहे. मात्र या दोन्ही कालव्याची कामे अपुर्णच आहे. यातून ९१६ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार होते. मात्र कामच पुर्ण नसल्याने याचा एकही थेंब शेतकऱयापर्यंत पोचलाच नाही.
धरणाचा मुख्य कालवा आहे. तिथून काही दिवसापुर्वी पाणी झिरपत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. आता या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून ते पुर्णपणे गढूळ आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार भिंतीच्या खालून पाणी झिरपत आहे. यावर त्यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे. पाणी झिरपत असल्याने परिसरातील गावांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील ३० गावांना याचा धोका निर्माण झाला आहे.

गणपतीपुळ्याच्या ‘श्रीं’चे आता लाईव्ह दर्शन!

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच गोष्टी इंटरनेटशी जोडल्या जात आहेत. अगदी ‘बाप्पा’चे दर्शनही घरबसल्या होऊ लागले आहे. काही देवतांचे दर्शन दूरचित्र वाहिन्यांच्या माध्यमातून तर काहींचे दर्शन लाईव्ह स्ट्रीमींगच्या माध्यमातूनही उपलब्ध आहे. जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळेच्या बाप्पाचे दर्शनही आता घरबसल्या उपलब्ध होणार असून देवस्थान समितीकडून ऍपच्या माध्यमातून लवकरच ही सेवा निशुल्क स्वरूपात उपलब होणार आहे.
गणपतीपुळेच्या देवस्थान समितीकडून विशेष ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. हे ऍप सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्धही आहे. मात्र सध्या त्यामध्ये थेट आरती दर्शन उपलब्ध नाही. हे ऍप अपडेट करून त्यामध्ये श्रींच्या दुपारी १२ व सायंकाळी ७ वाजता होणाऱया आरतींचे लाईव्ह स्ट्रीमींग उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने ऍपमध्ये बदल करणे व त्याच्या चाचण्या घेण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. या ऍपच्या माध्यमातून रोज दोनदा गणपतीपुळेच्या बाप्पाचे थेट दर्शन घेतानाच दोन्ही आरत्यांचाही थेट लाभ घेता येणार आहे. आरतीमध्ये प्रत्यक्ष नसले तरी ऑनलाईन सहभागी होता येणार आहे. आणि विशेष म्हणजे ही सेवा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या सुधारित ऍपचा शुभारंभ येत्या काही दिवसातच होणार आहे. याबाबत गणपतीपुळे देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ऍपचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले. तसेच देवस्थानच्या वतीने कोकणची सर्वांगिण ओळख व्हावी यासाठी अन्य एका उपक्रमाचे कामकाजही सुरु असल्याचे व हे दोन्ही उपक्रम लवकरच भक्तांच्या सेवेत रूजू होतील, असे सांगितले.

Page 10 of 3208