Tuesday, Nov 21st

Headlines:

रत्नागिरी

शेजार्‍याच्या अंगणात फटाके लावणार्‍या तरुणावर कारवाई

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - शेजार्‍याच्या अंगणात फटाके  लावल्याप्रकरणी कामथे येथील एका तरुणावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
कामथे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सुकाई पॅनलचा उमेदवार विजयी झाल्याने नितीन शंकर लटके या तरुणाने शेजारी राहणार्‍या करुणा कृष्णा माटे यांच्या अंगणात फटाके लावले. त्यांनी नितीनला माझ्या अंगणात फटाके लावू नका, असे सांगितले. त्यावरुन नितीन त्यांच्या अंगावर धावून गेला. या प्रकरणी पोलिसांनी नितीन याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करुन ताब्यात घेतले. या प्रकरणी श्री. विभुते अधिक तपास करीत आहेत.

मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून ४५ हजाराचा ऐवज असलेल्या पर्सची चोरी

E-mail Print PDF
चिपळूण (प्रतिनिधी) - मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या महिलेची चोरट्याने पर्स लांबवल्याची घटना उघडकीस आली असून, चोरट्याने तीन मोबाईलसह रोख रक्कम असा सुमारे ४५ हजाराचा ऐवज लांबवला. या प्रकरणी चिपळूण पोलीस अधिक तपास करत आहेत.
कर्नाटक उडपी येथील रेवती सदानंद सुवर्णा (६५) या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून प्रवास करीत होत्या. गाडीमध्ये त्या झोपल्या होत्या. चिपळूण रेल्वे स्थानकावर त्या जाग्या झाल्या असता, सीटजवळील हुकाला लावण्यात आलेली पर्स चोरट्याने लांबवल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात रोख २६ हजार व तीन मोबाईल होते.

कोतवडेच्या लाचखोर तलाठ्याला सक्तमजुरी

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - दोन वर्षांपूर्वी जमिनीची नोंद करून ७/१२ मिळवून देण्यासाठी अर्जदाराकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील सुनील गंगाराम मोहिते या तलाठ्याला न्यायालयाने ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
प्रमोद दिनकर डांगे (रा. पुणे सातारा रोड, मु. पो. नीरा ता. पुरंंदर) यांनी तक्रार दिली होती. डांगे यांंनी कोतवडे येथे जागा खरेदी केली होती. तिची नोंद करून ७/१२ मिळवण्यासाठी तलाठी सुनील मोहिते यांच्याकडे अर्ज केला होता. यासाठी मोहिते यांनी डांगे यांच्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच मागितल्यावर डांगे यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. त्यात २२ जुलै २०१५ रोजी  मोहिते २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. त्याच्यावर गुन्हा दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधकचे उपअधीक्षक सतीश गुरव यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.

बिअर शॉपी बंद करण्यासाठी महिलांचे तहसीलदारांना निवेदन

E-mail Print PDF
चिपळूण (प्रतिनिधी) - मार्गताम्हाने हायस्कूल व ग्रामपंचायतींजवळ असलेली बिअरशॉपी बंद करण्यात यावी, अशी मागणी पालशेतकरवाडीतील चर्मकार महिला समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.
मार्गताम्हाने बौध्दवाडी व चांभारवाडी येथे येणार्‍या रस्त्यालगत बिअरशॉपी आहे. बिअरशॉपीमध्ये येणारी मुले त्याचठिकाणी उभे राहून महिलांना लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करीत असतात. रस्त्यालगत गाड्या पार्किंग करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. त्यामुळे बिअर शॉपीची परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलीस स्थानक व तहसीलदारांना देण्यात आले. यावर सौ. संगिता पालशेतकर, सौ. शुभांगी पालशेतकर, संजना पालशेतकर, सौ. रा.रा. पालशेतकर यांच्यासह सुमारे ३७ महिलांच्या स्वाक्षर्‍या आहेत. सोमवारी दुपारी याबाबतचे निवेदन तहसीलदार जीवन देसाई यांना देण्यात आले.

बेवारस दूरध्वनी कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे

E-mail Print PDF
गुहागर (प्रतिनिधी) - दूरध्वनी खात्याचे गुहागरात तीनतेरा वाजले आहेत. टेलिफोन व मोबाईलची खंडित सेवा आणि तक्रारींसाठी कार्यालयात एकही जबाबदार कर्मचारी नसल्याने शृंगारतळीतील संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी बेवारसपणे उघड्या असलेल्या येथील दूरध्वनी कार्यालयाला टाळे ठोकले. दरम्यान, या कार्यालयात लाखो रुपयांची यंत्रसामुग्री असताना नेहमी कार्यालयात एकही कर्मचारी दिसून येत नसून येथील बेजबाबदार कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Page 9 of 3208