Tuesday, Nov 21st

Headlines:

रत्नागिरी

बलात्काराला विरोध करणार्‍या महिलेला पेटवले

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) - घरात एकट्याच राहणार्‍या विवाहितेने तिच्यावर होणारा बलात्काराचा प्रयत्न निर्धाराने उधळून लावताच चिडलेल्या तरुणाने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत पेटवल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून, संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
खेड पोलिसांनी याबाबत सांगितले की, ही विवाहिता तिच्या घरात एकटीच राहते. त्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्याचा केलेला प्रयत्न या महिलेने उधळून लावला. यामुळे चिडलेल्या या तरुणाने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. पेटवल्यानंतर तिला तिच्याच घरात कोंडून ठेवले. तब्बल २० तास ही महिला भाजलेल्या अवस्थेत घरात पडून होती. दुसर्‍या दिवशी तिला नातेवाईक भेटण्यासाठी घरी आला असता हा प्रकार उघडकीस आला. लोकांनी या महिलेला उपचारासाठी कळंबणी रुग्णालयात दाखल केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लोकार्पण सोहळ्याला प्रारंभ

E-mail Print PDF
राजापूर (प्रतिनिधी) - राजापूर शहराचा मानबिंदू ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळयाला मंगळवारी झोकात प्रारंभ करण्यात आला. गिरनार, रामेश्वरम सह काशी, गंगा, जमुना, नर्मदा, कृष्णा, राजापूरची गंगा आदी जलाने शिवछत्रपती महाराजांच्या मूर्तीला मांगल्यस्नान घालण्यात आले. आज बुधवारी शिवस्मारकाचा लोकार्पण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजापूर नगरीत आज बुधवारी सकाळी १० वाजता शिवस्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. या सोहळयाची शिवस्मारकाला सुवासिक जलाने मांगल्यस्नान घालून खऱया अर्थाने सुरूवात करण्यात आली. या मांगल्यस्नानासाठी काशी, गंगा, यमुना, सरस्वती, वरूणा, नर्मदा, कृष्णा, गोमती, गिरनार, रामेश्वरम, अयोध्येत प्रभू श्रीराम बंधू भरत ज्या विहिरीवर स्नान करत होते, त्या विहिरीचे जल, राजापूरचे गंगाजल, प्रयागक्षेत्र आणि रामेश्वरमधील समुद्रतीर्थ तसेच त्या मंदिरातील २२ कुंडांमधील गोडया पाण्याचे तीर्थ आदी तिर्थांचा समावेश करण्यात आला होता.
मंगळवारी सकाळी ७.३० वाजता शिवछत्रपतींच्या मूर्तीला सुवासिक पवित्र जलाने स्नान घालण्यात आले. हे शिवमांगल्य स्नान व समंत्रक पंचामृत अभिषेक आमदार राजन साळवी व त्यांच्या पत्नी अनुजा साळवी यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश ऊर्फ बबन नकाशे, शहरप्रमुख संजय पवार, अनिल कुडाळी, शिवस्मारक वास्तू जीर्णोध्दार समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर, राजाभाऊ रसाळ, शिवसेना उपतालुकाप्रमुख रामचंद्र तथा तात्या सरवणकर, माजी नगरसेवक अभय मेळेकर, पं. स. सदस्य अभिजित तेली, नगरसेविका पूजा मयेकर, प्रतिक्षा खडपे, मनीषा मराठे, शुभांगी सोलगावकर, माजी नगराध्यक्षा अपूर्वा मराठे तसेच अनेक शिवप्रेमी नागरिक, शिवसैनिक व महिला वर्ग उपस्थित होता.

खरेदीखताची नोंद सातबाराला करण्यासाठी लाच घेताना मंडळ अधिकार्‍याला अटक

E-mail Print PDF
राजापूर (प्रतिनिधी) -  खरेदीखताची नोंद सातबाराला करण्यासाठी १० हजार रूपये लाच स्वीकारताना जैतापूर मंडळ अधिकारी एकनाथ सीताराम बावीसकर व उपळे तलाठी ज्ञानेश्वर रावसाहेब वाडकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या घटनेने राजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
राजापूर तालुक्यातील गोठीवरे येथे तक्रारदाराने जमीन खरेदी केली असून खरेदीखतही झाले आहे. या खरेदीखताची नोंद सातबाराला होवून त्याप्रमाणे सातबारा मिळावा, यासाठी त्यांनी गोठीवरे गावचे तलाठी यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार तलाठी यांनी ही नोंद मंजूर करण्यासाठी हे प्रकरण जैतापूर मंडळ अधिकारी एकनाथ बावीसकर यांच्याकडे पाठवल्याचे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी मंडळ अधिकारी बावीसकर यांची भेट घेतली असता त्यांनी खरेदीखताप्रमाणे सातबाराची नोंद मंजूर करण्यासाठी १० हजार रूपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून ५ हजार रूपये देण्याचे निश्चित झाले.
या प्रकरणी तक्रारदार यांनी रत्नागिरी येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने मंगळवारी सापळा रचला. मंगळवारी बावीसकर यांनी तक्रारदार यांना लाचेची रक्कम तलाठी ज्ञानेश्वर वाडकर यांच्याकडे देण्यास सांगितली. त्यानुसार दुपारी १२.२५ वाजण्याच्या सुमारास राजापूर प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात तलाठी वाडकर यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर मंडळ अधिकारी बावीसकर यांनाही ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, बी. ए. तळेकर, सहकारी पोलीस हवालदार, कोळेकर, सुपल, ओगले, हरचकर, पोलीस नाईक वीर यांनी ही कारवाई केली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

खासगी जागांतील बेकायदा बांधकामांन लाखो रुपयांची भरपाई

E-mail Print PDF
देवरुख (प्रतिनिधी) - कशेडी ते हातखंबादरम्यान काही खासगी जागेत जमीनमालकांकडून परवानगी न घेताच बांधकामे उभी करण्यात आली. या बांधकामांचे मोजमाप करून त्यांचे लाखो रुपये अशा बेकायदा बांधकामे करणार्‍यांना देण्यात आल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आक्षेप जमीनमालकांचा आहे.
कशेडी ते हातखंबा दरम्यान ज्यांच्या मालमत्तांचे चुकीचे सर्वेक्षण करण्यात आले, त्या जमीनमालकांनी रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागून फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. मात्र यासंदर्भात फार विलंब लागत असल्याने जमीनमालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. काही जमीनमालकांनी केलेल्या फेरसर्वेक्षणाच्या मागणीबाबत निर्णय अजून प्रलंबित असल्याने चौपदरीकरणाचे काम आणखी वर्षभर रखडण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत लवकर निकाल न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे.
शासकीय जमिनीवर अतिक्रमणे केलेल्या बांधकामांचा मोबदला प्रशासनाने चुकता केला आहे. तसेच बांधकामाचे असेसमेंट नसतानाही संशयितरीत्या लाखो रुपयांचे वाटप करण्यात आल्याने मोबदला वाटपही संशयाच्या फेर्‍यात सापडले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी संपादित जमिनीचे मोबदला वाटप योग्यरीतीने होत असल्याचा दावा भूसंपादन विभागाने केला असला, तरी प्रत्यक्षात कागदपत्रांची पूर्तता करूनही संगमेश्‍वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे दरम्यानच्या अनेकांना त्यांचा मोबदला मिळालेला नाही.

कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय शेवटचा : माजी आमदार रमेश कदम

E-mail Print PDF
चिपळूण (प्रतिनिधी) - कॉंग्रेसमध्ये जाण्याचा माझा निर्णय शेवटचा असेल. त्यानंतर घरी बसेन; पण कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्पष्ट केले.
भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी श्री. कदम यांनी येथील ब्राह्मण सहायक संघाच्या सभागृहात मेळाव्याचे आयोजन केले होते.
रमेश कदम म्हणाले की, ‘‘मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार इतर पक्षात प्रवेश केला होता; परंतु भाजपमध्ये गेल्यानंतर तेथे माझा मानसन्मान झाला नाही. पक्षाच्या बैठकांचे निमंत्रण नाही. कोणतीही जबाबदारी दिली गेली नाही. तरीही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातून २० हजार मते मी मिळवून दिली. उसाचा रसासाठी वापर करायचा आणि चोथा झाल्यावर फेकून द्यायचा ही भाजपची संस्कृती आहे. माझ्यासह कार्यकर्त्यांचीही निराशा झाली. कार्यकर्ते माझ्याशी आपल्या वेदना सांगू लागले. त्यामुळे मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
मी मूळ कॉंग्रेसचा. कॉंग्रेसच्या संस्कृतीमध्ये वाढलो. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी पुन्हा या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात मी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. जिल्ह्यात पक्ष वाढविला. जिल्ह्यात सध्या कॉंग्रेसची ताकद फारशी नाही; मात्र या पक्षात मी गेल्यानंतर पुन्हा कॉंग्रेसला अच्छे दिन येतील. यात शंका नाही. कारण शून्यातून विश्‍व निर्माण करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. माझ्या प्रकृतीबद्दल कुणीही चिंता करण्याचे कारण नाही. भविष्यात किमान ३० वर्षे मी सक्रिय राजकारणात असेन.’’

Page 8 of 3208