Tuesday, Nov 21st

Headlines:

रत्नागिरी

रेल्वेच्या धडकेत इसम ठार

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) - कोकण रेल्वेच्या धडकेत एक इसम ठार झाल्याची घटना कोरे मार्गावरील कोतवली दरम्यान घडल्याचे सकाळी ८ वाजता निदर्शनास आले. दशरथ पांडुरंग जुवळे (४५, रा. कोतवली भोईवाडी) असे मयत इसमाचे नाव आहे. मयत दशरथ जुवळे हा मुका व बहिरा असल्याने त्याला ऐकू येत नव्हते. त्यामुळे कोरे मार्गावरुन चालत असताना रेल्वे आवाज त्याला ऐकू आला नसावा. त्या तंद्रीतच रेल्वेची धडक बसून तो जागीच ठार झाला असावा.

वेेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय झेप!

E-mail Print PDF
गुहागर (प्रतिनिधी) - ब्राझीलमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात विद्या प्रसारक मंडळाच्या वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील साहील कदम व ऋषिकेश भावे या दोन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पास विशेष मानांकनाचा प्रकल्प म्हणून पुरस्कार मिळाला.
ब्राझीलमधील नामांकित आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन भरवणारी शैक्षणिक संस्थेंतर्गत गेल्या ३२ वर्षापासून आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन भरवले जाते. या विज्ञान प्रदर्शनात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया, कझाकिस्तान, अर्जेटिना, पेरू, जर्मनी अशा वीस देशांचे मिळून ७००हून अधिक प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले होते. हे विज्ञान प्रदर्शन शालेय, पदविका व पदवी अशा विविध स्तरावर घेण्यात आले. प्रकल्पाची अचूकता व गुण वैशिष्टये जाणून घेण्यासाठी पाच तज्ञांच्या समितीद्वारे मूल्यमापन करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील या दोन विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राला उपयुक्त ठरणारे ‘ऍग्रीकल्चर विड रिमुव्हर’ हे यंत्र तयार केले. भारतात विशेषतः महाराष्ट्रात शेती करताना शेतमजुरांची समस्या मोठया प्रमाणात भेडसावते. त्यामुळे मळणी, कापणी, खुरपणी यांसारख्या क्रियांचे यांत्रिकीकरण होणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून यांत्रिक पद्धतीने बागायती, शेतीमधील वाढलेल्या तणांची कापणी तसेच जमीन भुसभुशीत करण्यासाठी या यंत्राची निर्मिती केली गेली आहे. हे यंत्र पूर्णतः महाविद्यालयात बनवण्यात आले असून जवळपासच्या शेतकऱयांच्या भातशेतीत त्याचे प्रात्याक्षिक करून पाहण्यात आले होते. या प्रकल्पामुळे निश्चितच शेतीसाठी मानवी संसाधन अत्यंत अल्प प्रमाणात लागणार आहे.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थी साहील कदम व ऋषिकेश भावे यांनी विद्यार्थीदशेतच आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात देशाचे नेतृत्व करण्याचा मान आम्हाला मिळाला. याचाच आम्हाला अभिमान वाटतो, असे उद्गार पत्रकार परिषदेत काढले.

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी पेन्शनपासून वंचित

E-mail Print PDF
संगमेश्‍वर (प्रतिनिधी) - संगमेश्‍वर तालुक्यातील सुमारे ६ हजारपेक्षा अधिक निराधारांना गेले दोन महिने संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळाली नसल्याने या पेन्शनधारकांकडून शासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पेन्शनबाबत देवरुख आणि संगमेश्‍वर पोस्ट कार्यालय आणि संजय गांधी निराधार योजना विभाग यांच्याकडे लाभार्थ्यांनी संपर्क साधला असता दोन्ही विभाग एकमेकांकडे बोटे दाखविण्याचे काम करीत असल्याने  लाभार्थी मात्र चिंतेत पडले आहेत.
तालुक्यात जवळपास सहा हजारपेक्षा अधिक निराधार या योजनेचे लाभार्थी आहेत. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून या निराधारांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळाला नसल्याने आपला उदरनिर्वाह करायचा कसा? या चिंतेत सर्व लाभार्थी पडले आहेत.

थंडीला प्रारंभ झाल्याने बागायतदारांत उत्साह

E-mail Print PDF
चिपळूण (प्रतिनिधी) - गेले चारपाच दिवस पडणार्‍या थंडीमुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कडाक्याची थंडी पडायला लागल्यावर आंबा कलमांना मोहोर येण्यास प्रारंभ होतो.
गेले तीन चार दिवस सकाळच्या वेळी दाट धुके पडत असून, थंडीचा कडाकाही हळूहळू वाढत आहे. दिवसाही हवेत गारवा जाणवत आहे. असे वातावरण आंबा झाडांना मोहोर येण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे आंबा बागायतदारांत उत्साहाचे वातावरण आहे. आंबा बागायतीतील काही कलमे पालवली असून, काही कलमे पालवलेली नाहीत. त्यामुळे पालवलेल्या काळ्याभोर कलमांना मोहोर येण्याची शक्यता बागायतदारांतून व्यक्त होत आहे.

दुचाकीची वृध्दाला धडक; तरुणाविरुध्द गुन्हा दाखल

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - बेदरकारपणे दुचाकी चालवून वृध्दाला धडक देत जखमी केल्याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना सायंकाळी ४.३० वा. हातखंबा गणेशनगर येथे घडली.
जवानीलाल चोखालाल गाडी (२१, रा. हातखंबा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातात चिंतामणी केशव देसाई (८०, रा. शेवणेवाडी, हातखंबा, रत्नागिरी) हे किरकोळ जखमी झाले. जवानीलाल गाडी हे आपल्या ताब्यातील ऍक्टिव्हा दुचाकी घेऊन रत्नागिरी ते हातखंबा असे जात होते. त्याच सुमारास रस्त्याकडे चालत जाणार्‍या देसाईंच्या हातातील काठीला गाडीच्या दुचाकीची धडक बसली. त्यामुळे देसाई रस्त्यावर उताणी पडल्याने त्यांच्या डोक्याला मागील बाजूस किरकोळ दुखापत  झाली. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Page 7 of 3208