Tuesday, Nov 21st

Headlines:

रत्नागिरी

राजकीय नेते, कार्यकर्त्यांना विकत घेण्याची भाजपची भाषा : सुप्रिया सुळे

E-mail Print PDF
खेड (प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकता राहिली नाही. भारतीय जनता पक्षाचे सगळेच नेते कमोडिटी पद्धतीने सार्‍याच पक्षांच्या लोकांकडे बघत आहेत. हा महाराष्ट्रातील समस्त जनतेचा अपमान आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला फटकारले.
आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने खेड येथे त्या आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात कार्यक्रमादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस बाबाजी जाधव आदी उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या की, रत्नागिरीतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जनतेच्या मुळावर कोण येणार असेल, तर सरकार खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा दिलेला इशारा हास्यास्पद आहे. मी लाभार्थीं’च्या जाहिरातीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे; परंतु कर्जमाफीसाठी नाही. तीन वर्षे सरकार शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहे.
कोकणातील शेतकर्‍यांच्या शेती, बागायतींच्या नुकसानीचे पंचनामे करूनही नुकसानभरपाई मिळत नाही. हा युती शासनाच्या तीन वर्षांच्या काळात अन्याय झाला आहे. आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने कोकणात फिरताना अनेकांची याबाबत निवेदने माझ्याकडे आली. यापुढे राष्ट्रवादी कोकणातील शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कम उभी राहील, असेही सुळे म्हणाल्या.
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी राज्यातील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजवतो, असे सांगितले आहे. खड्डे भरल्यास त्यांचा मी सत्कार करेन, भरले नाहीतर त्यांना शांत बसू देणार नाही. राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात आक्रोश मोर्चांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

रिफायनरीला शिवसेनेचा विरोधच : उध्दव ठाकरे

E-mail Print PDF
राजापूर - शिवसेनने सुरुवातीपासूनच जनभावनांचा आदर राखत रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेतली असून जनतेवर कोणताही प्रकल्प लादू देणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
येथील शिवस्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शिवसेना ही कायमच जनतेसोबत राहिली आहे. त्यामुळे जर एखादा प्रकल्प जनतेला नको असेल तर आम्ही जनभावनांचाच आदर राखून निर्णय घेऊ. मग ते सरकार कुणाचे का असेना, त्याची अजिबात पर्वा करणार नाही. त्यासाठी सुरू केलेली लढाई शेवटपर्यंत ठेवा व आपल्या मतावर ठाम रहा, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत आपली जाहीर केली.
राजापूरमधील शिवस्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित राजापुरात आलेल्या शिवसेना पक्षप्रमुखांना रिफायनरी प्रकल्पविरोधी जनतेच्या वतीने निवेदन सादर करून हा प्रकल्प रद्द करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली रोखठोक भूमिका जाहीरपणाने मांडली. शिवसेनेने विकासाला प्राधान्य देताना नेहमी जनभावनांचा आदर केला आहे. आमची बांधीलकी जनतेशी आहे. जो प्रकल्प जनतेला नको आहे, त्याला शिवसेनेने जोरदार विरोध केला आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला आमचा  असलेला आमचा विरोध आजही असल्याचे सेना पक्षप्रमुखांनी स्पष्ट केले.
शिवसेना सत्तेत असली तरी एखाद्या खटकणार्‌या मुद्द्यावर आम्ही प्रखरपणे विरोध करीत आलो आहोत. मग सरकारला काय हवे त्याची आम्ही अजिबात पर्वा केलेली नाही, अशा शब्दात त्यांनी जनतेचा विरोध असतानाही रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करणार्‌या शासनावर टीका केली .

जनताविरोधी सरकारला खाली खेचणार : उध्दव ठाकरे

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) -  भाजप सरकार सर्वच पातळ्यांवर फेल ठरल्याची टीका करत अशा जनताविरोधी सरकारला खाली खेचण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रत्नागिरीत दिला. शिवसेनेच्या कोकणातील बालेकिल्ला शिरकाव करणे अशक्य झालेल्या भाजपने आता उसनी माणसे अंगावर सोडण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, अशा लोकांचा शिवसेना खात्मा करेल असा टोला त्यांनी लगावला.
सरकार फक्त घोषणा करत आहे पण अंमलबजावणी नाही. ‘अच्छे दिन आलेत, पण ते दिसत नाहीत. नोटबंदी पाठोपाठ जीएसटीही फेल.. शेतकरी कर्जमुक्ती कागदावरच. कोकणात भाजपला भोपळा मिळाल्याने विकासनिधीलाच कात्री. हे सरकार गोरगरिबाच्या मुळावर येत असेल तर या सरकारला सत्तेवरून खाली खेचणार. एवढेच नव्हे तर अंगावर आलेल्या ‘उसन्यां’चाही खात्मा करणारच. त्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचे सांगत ठाकरे यांनी भाजपा सरकारवर शरसंधान साधले.
उध्दव ठाकरे यांच्याहस्ते रत्नागिरीत बहुचर्चित ‘स्कॉयवॉक’चा लोकार्पण सोहळा व खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी पार पडले. यानंतर स्वा.वि.दा.सावरकर नाटयगृहात झालेल्या शिवसेना मार्गदर्शन मेळाव्यात ठाकरे यांनी भाजपा सरकारवर जोरदार शरसंधान केले. सरकारच्या दुटप्पी धोरणाचा त्यांनी आपल्या भाषणात खरपूस समाचार घेतला. या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र वायकर, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, सचिन कदम, जि.प.अध्यक्षा स्नेहा सावंत, महिला आघाडीप्रमुख दर्शना महाडिक, शिल्पा सुर्वे, नगराध्यक्ष राहुल पंडित, तालुकाप्रमुख बंडया साळवी आदी उपस्थित होते.
कोकणी जनतेने भाजपाच्या हातात भोपळा दिला म्हणून सुड उगवण्याचे धोरण भाजपा सरकारने आखल्याचा आरोप उध्दव ठाकरे यांनी केला. येथील जिल्हा परिषदेला निधी दिला जात नाही. कोटयवधींच्यां जाहिरातींना पैसा आहे पण विकासकामांच्या निधीला कात्री लावली जातेय. छ. शिवाजी महाराजांना आपण दैवत मानतो. देव पाहिला नाही पण तो होऊन गेला. मात्र त्याची कुठेही जाहीरात पाहिली नाही. आताच्या सरकारच्या ‘व्हय मी लाभार्थी आहे’ सारख्या फालतू जाहीरातीतून कोणाचा लाभ झाला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळेंच्या संवाद यात्रेत निकम- जाधव यांच्यामध्ये चकमक

E-mail Print PDF
चिपळूण (प्रतिनिधी) - राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवाद दौऱयातच माजी मंत्री व जिल्हा प्रभारी भास्कर जाधव आणि जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्यातील विसंवाद उघड झाला. सुप्रिया ताईंच्या उपस्थितीतच दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दीक चकमक झडल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस चव्हाटयावर आली. मात्र, ताईंनी या चकमकीवर कोणतेही भाष्य करणे टाळले.
चिपळूण दौऱयावर आलेल्या खासदार सुळे यांनी बुधवारी सावर्डे येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली. स्वर्गीय गोविंदराव निकम नगरीत झालेल्या जिल्हयातील कार्यकर्त्यांशी झालेल्या संवाद कार्यक्रमात लांजा तालुकाध्यक्ष महमंद रखांगी, रत्नागिरीचे बशीर मुर्तुझा आणि प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव यांनी आपल्या मनोगतात जिल्हा प्रभारी असलेल्या जाधवांकडे जिल्ह्याची सूत्रे सोपवावीत, अशी मागणी केली. त्याचबरोबर गुहागर मतदारसंघ मजबूत असल्याने तेथे जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव यांना उभे करून जाधव यांना रत्नागिरी मतदारसंघाची जबाबदारी दिल्यास यश निश्‍चित मिळेल, असे सांगितले. याचाच धागा पकडून आमदार जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात, पक्षात आल्यापासून ते नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत कशा पध्दतीने प्रत्येकवेळी जबाबदार्‍या दिल्या आणि त्यानंतर कशा काढून घेण्यात आल्या हे कथन केले.
चिपळुणातील विषयावर बोलताना जिल्हाध्यक्षांसह युवक, महिला, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अशी अनेक पदे असल्याचे सांगत असताना त्यांना जिल्हाध्यक्ष निकम यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला विचारूनच या पदांवर नियुक्ती करण्यात आल्याचे सांगतानाच नेहमी तेच-तेच का काढले जाते. यापूर्वीचे सारे काही विसरून तुमच्या नेतृत्वाखाली सारेजण काम करताना हा प्रकार योग्य नसल्याचे सांगितले. यावर जाधव यांनी तुम्ही अस्वस्थ का होत आहात असे विचारले. व्यासपिठावर या दोघांच्या शाब्दीक चकमकीत सभागृह मात्र स्तब्ध झाले. यातच जाधव यांनी पवारसाहेबांनी आशीर्वाद दिला, तर रत्नागिरीतही यश मिळवून दाखवू असे शेवटी सांगितले.
व्यासपीठावर घडलेल्या या शाब्दीक चकमकीनंतर सुप्रियाताईंनी आपल्या मार्गदर्शनात या वादाची फारशी दखल घेतली नसली तरी कुटूंब म्हटलं की जसे भांडयाला भांडे लागते तसेच संघटनेतही चालते. ते जर लागले नाही तर परिस्थिती समजत नाही. पक्षाच्या व्यासपीठावर आपली परखड मते मांडली नाहीत तर संघटना कसली असे सांगत वेळ मारून नेली.
यावेळी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्हयाचा आढावा घेतला. तर आमदार निरंजन डावखरे, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, नलिनी भुवड, युवक जिल्हाध्यक्ष राकेश चाळके, पंचायत समिती सदस्य आबू ठसाळे, सभापती सौ. पुजा निकम, जागृती शिंदे, राज विखारे, जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर, नगरसेविका वर्षा जागृष्टे, माजी सभापती शौकत मुकादम यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी विद्यार्थी कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव, कुमार शेटये, बाप्पा सावंत, अजित यशंवतराव यांच्यासह जिल्हयातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी-दादर पॅसेंजर झाली २१ वर्षांची

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - कोकण रेल्वे मार्गावर लोकप्रिय ठरलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडीला गुरुवारी १६ नोव्हेंबरला २१ वर्षे पूर्ण होत आहेत. १९९६ च्या १६ नोव्हेंबरला पहिल्यांदा ही गाडी रत्नागिरी स्थानकावरुन दादर स्थानकाकडे रवाना झाली. यामुळे रत्नागिरी रेल्वेस्थानक पहिल्यांदा रेल्वे नकाशावर झळकले.
१६ नोव्हेंबर १९९६ ला २७२ प्रवाशांना घेऊन रत्नागिरी दादर पॅसेंजर रवाना झाली. सुरुवातीला ही गाडी दादर-चिपळूण मार्गावर धावत होती. १५ नोव्हेंबर १९९६ ला चिपळूण स्थानकावर आलेल्या गाडीच्या चालकाला ही गाडी रत्नागिरीत नेवून दुस़र्‍या दिवशी रत्नागिरी-दादर म्हणून चालवण्याच्या सूचना मिळाल्या. त्यामुळे रात्री उशिरा ही गाडी रत्नागिरी स्थानकावर पोहोचली.
त्यानंतर या गाडीवर रत्नागिरी-दादर असे फलक लावण्यात आले. इतक्या कमी कालावधीत केवळ हाताने बोर्ड रंगवणे शक्य होते. म्हणून गाडीवरील सर्व बोर्ड हाताने रंगवण्यात आले. सकाळी ही गाडी दादरसाठी रवाना झाली. ही गाडी उक्षी स्थानकावर पोहोचली तेव्हा सिग्नल यंत्रणेत दोष निर्माण झाला. त्यामुळे दहा मिनिटे ही गाडी थांबून राहिली होती. ठरलेल्या वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरा गाडी चिपळुणात पोहोचली.
या गाडीची ००००, ०००१, ०००२ या क्रमांकाच्या तिकिटांची सकाळी ५.४५ वा. विक्री झाली. गाडीचे उद्घाटन अचानक ठरल्याने एक फटक्यांची लावलेली माळ, ७०-८० जणांनी वाजवलेल्या टाळ्या, श्रीफळ वाढवताना रेल्वे इंजिनला वाहिलेली फुले आणि निरोपासाठी उंचावले गेलेले १००-१२५ हात अशा थाटात उद्घाटन सोहळा थोडक्यात उरकला.

Page 6 of 3208