Wednesday, Feb 21st

Headlines:

रत्नागिरी

कोकणात रोजगार निर्मितीला सर्वाधिक प्राधान्य

E-mail Print PDF
खेड ः शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून कोकणात रोजगार निर्मितीला प्राधान्य देणार असून लवकरच जामगे येथे २ एकर जागेत शेतकऱयांसाठी पहिलावहिला प्रकल्प उभारणार आहे. हा प्रकल्प बेरोजगारांसह शेतकर्‍यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास युवासेना कोअर कमिटी राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांनी व्यक्त केला.
युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांचा १८ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त बोलताना ते म्हणाले, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी कोटयवधीचा निधी आणून तालुक्याचा कायापालट केला आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आपले कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. बेरोजगारीवर मात करण्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षण प्रणालीतून कोकणातील तरूणांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने आर्थिक विकासाला चालना देणारे अभ्यासक्रम राबवण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणातील बेरोजगारी संपुष्टात आणून शेतक़र्‍यांची आर्थिक उन्नती साधण्याकरिता शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून जामगे येथील २ एकर जागेत पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ मान्यता प्राप्त ‘व्हॅल्यू चेन’ प्रकल्प राबवण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी कोकणातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेची प्रत्यक्षात पूर्तता ‘खेड व्हॅल्यू चेन प्रकल्पा’द्वारे होणार असून कोकणातील शेतक़र्‍यांच्या हिताच्या दृष्टीने फळे व भाजीपाल्यासाठी शेतकऱयांना अधिक उत्पन्न मिळवून देण्याच्या दृष्टीने सुरूवातीला खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, गुहागर तालुक्यात हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

नाणार परिसरातील रिफायनरीबाबत मुख्यमंत्री आग्रहीच!

E-mail Print PDF
रत्नागिरी ः नाणार परिसरातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांनी ‘थंडा करके खाओ’ ची भुमिका घेतली असल्याचे गुरूवारी झालेल्या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटी दरम्यान हा प्रकल्प रद्द करण्याबाबतचे कोणतेही ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळालेले नाही. स्थानिक लोकांवर प्रकल्प लादणार नसल्याची ग्वाही देतानाच मुख्यमंत्र्यांनी जनप्रबोधन करून प्रकल्प मार्गी लावण्याचा आशवाद व्यक्त केला आहे. त्यामुळे यापुढील काळात जनतेला प्रकल्पाचे महत्व, फायदे पटवून देऊन प्रकल्प उभारणीवरच सरकारचा भर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, काही लोकांनी प्रकल्प रद्द झाल्याच्या वावडया उठवत तसे फलकही अनेक ठिकाणी लावण्यास सुरूवात केली आहे.
गुरूवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात रिफायनरी प्रकल्पाबाबत महत्वपुर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना लोकप्रतिनिधी व प्रकल्पग्रस्त प्रतिनिधीही उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प रद्दबाबत आश्वासन दिल्याचे सांगितले जात असले तरी तसे कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. उलट जनतेला समजावून प्रकल्पासाठी त्यांना राजी करण्याकडेच मुख्यमंत्र्यांचा कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प जनतेवर लादला जाणार नाही. जनतेच्या सर्व मागण्यांचा विचार करून त्यावर निर्णय घेण्यात येईल. गुजरातमध्ये अशाच प्रकारचा एक प्रकल्प आल्याने तेथील सरकारचा १० ते १२ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला होता. अशाच प्रकारचा मोठा महसूल महाराष्ट्रालाही मिळेल व त्यातून मोठया प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल यासाठी मी या प्रकल्पाचा विचार करत आहे. प्रकल्पाची वस्तुस्थिती स्थानिकांपुढे मांडली जाईल. कालांतराने त्यांना ती पटली तरची पुढची कार्यवाही करु.’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केल्याचे शिष्टमंडळातील एका सदस्याने सांगितले.

मंडणगड किनार्‍यावर होणार नवीन प्रकल्प?

E-mail Print PDF
मंडणगड ः मंडणगड तालुक्यातील सागरी किनारपट्टीलगतच्या गावावरुन गेल्या चार दिवसांपासून हेलिकॉप्टर घिरटया घालत असल्याने किनारपट्टी भागात नवीन प्रकल्प येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यातच काहींना प्रकल्पाची कुणकुण लागल्याने खारी, जावळे, साखरी, आंबवली या किनारपट्टीवरील गावांमध्ये जमीन खरेदीसाठी दलालांची पावले वळू लागल्याने या चर्चेला बळकटी मिळू लागली आहे.
मंडणगड तालुक्यातील खारी, साखरी, जावळे, आंबवली या खाडी व समुद्र किनाऱयालगत असलेल्या गावांमध्ये हेलिकॉप्टरच्या घिरटया सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून हे हेलिकॉप्टरने गुगल मॅपिंग व वेगवेगळ्या प्रकारच्या उपग्रहाच्या माध्यमातून अभ्यास करण्यासाठी या गावांवरून सातत्याने जमिनीच्या शक्य तेवढया जवळ येऊन घोघांवत आहे. त्यामुळे किनारपट्टी परिसरात एखादा नवा प्रकल्प येणार असल्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
दुसरीकडे सध्या स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे चर्चेत असलेला राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाशी पुरक काही भागासाठी मंडणगडची चाचपणी सुरू असल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे. या संदर्भात कोणताही अधिकृत दुजोरा मिळत नसला तरी सागरी मार्गाने राजापूरपासून मंडणगड जवळ असल्याने ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही.

गुहागरातील वणव्यात पाच गोठे, बारा उडव्या बेचिराख

E-mail Print PDF
तवसाळ ः गुहागर तालुक्यातील नरवण येथे नागेश्वर मंदिर परिसरात २ दिवसांपूर्वी लागलेल्या प्रलयकारी वणव्यात ५ गोठे, १२ भाताच्या उडव्या, २३५ आंबा कलमे, १३८ काजू कलमे खाक झाली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठया प्रमाणात होऊन शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, हा वणवा लागला की लावला गेला, या बाबत उलटसुलट चर्चा नरवण गावात सुरु आहेत.
नरवण नागेश्वर मंदिर, केळपाट, पंघरवणे, मुसलोंडी या ३ कि.मी.च्या परिसरात १४ फेब्रुवारीला वणव्याने ही आग लागली. या परिसरात केळपाट येथील शेतकऱयांचे गुरांचे गोठे व भाताच्या उडव्या होत्या. तसेच आंबा कलम व काजू कलमाच्या बागाही होत्या. या भागात हा वणवा पसरला. हा वणवा दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लागल्याने त्याची आग वाऱयासारखी पसरली आणि सर्व काही उद्ध्वस्त झाले. वणव्याने आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी येथे येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. रात्री ११ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत गोठे, उडव्या, कलमे बेचिराख झाली होती.
या आगीत एकनाथ लक्ष्मण गोताड, मारुती गोताड, रामचंद्र मासकर, संदीप घडशी, महादेव वणे, अमोल गोताड यांचे गुरांचे गोठे व भाताच्या उडव्या जळाल्या. गोठयांमधील गुरांना बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. तर भरत वणे, सुलोचना, आग्रे, अशोक वणे, रुक्मिणी जोगळे, सुमित्रा जोगळे, विठोबा रसाळ, सीताराम गोताड, सुधाकर गोताड, राजाराम गोताड, आनंदा फटकरे, तुकाराम मांडवकर, दत्ताराम मांडवकर, भिकाजी पाष्टे यांच्या भाताच्या उडव्या जळून खाक झाल्या तर नारायण नरवणकर, प्रमोद शिरकर, शंकर नरवणकर, प्रतिक्षा तिवरेकर, सीमा भुवड, नेहा वैद्य यांची आंबा व काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

स्थानिक शिक्षक भरतीसाठी डीएड, बीएड बेरोजगार आक्रमक

E-mail Print PDF
रत्नागिरी ः तलाठी, ग्रामसेवक यांच्यासारख्या अनेक नोकर भरतीच्या प्रक्रिया जिल्हा स्तरावर होतात मग शिक्षक भरती राज्यस्तरावरून करण्याचा हट्ट कशासाठी? असा संतप्त सवाल करत आगामी शिक्षक भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावरून करावी आणि स्थानिक बेरोजगारीची, शिक्षक जिल्हा बदल्यांची समस्या संपुष्टात आणावी, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील डीएड, बीएड बेरोजगार संघटना आक्रमक झाली आहे. सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याचा निर्णय भावी शिक्षकांनी घेतला आहे. तसे निवेदन संबंधित शासनाला दिले आहे.

Page 5 of 3279