Tuesday, Nov 21st

Headlines:

रत्नागिरी

पाजपंढरीतून बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह सापडला

E-mail Print PDF
दापोली, (प्रतिनिधी) ः २७ एप्रिल रोजी बेपत्ता झालेल्या पाजपंढरी येथील ९ वर्षिय परिक्षित चोगले याचा मृतदेह मिळून आला. आंजर्ले अडखळवाडी येथील सिमेंट कॉंक्रीट पिलरच्या बेसवर हा मृतदेह मिळून आला आहे. परिक्षित खेळताना अचानक गायब झाला होता. याबाबत दापोली पोलिसांना खबर देण्यात आली होती. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असल्याचे दिसत असून सहा. पोलीस उपनिरीक्ष सी. जी.कांबळे, अधिक तपास करीत आहेत.

जाब विचारण्यास गेलेल्या चौघांवर चाकू आणि कैचीने हल्ला, चौघे जखमी

E-mail Print PDF
चिपळूण (प्रतिनिधी) ः शहरातील मार्कंडी येथे झालेल्या हाणामारीत ४जण गंभीर जखमी झाले. यावेळी चाकू आणि कैचीचा वापर करण्यात आला. गंभीर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रागाने बघून शिवीगाळ करत असल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या चौघांवर हा हल्ला झाला. यामध्ये आकाश सोळंकी, नागेश सोळंकी, शाम सोळंकी, उमेश सोळंकी हे चौघेजण जखमी झाले आहेत. याबाबत वाल्मिकीनगर येथील आकाश सोळंकी (वय १९) याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
जखमी आकाश सोळंकी आणि बाबू नरडे गप्पा मारत होते. यावेळी सिध्दार्थ राजन हरदारे (रा. वाल्मिकीनगर) याने आकाशकडे रागाने पाहून शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याचा जाब विचारण्यासाठी नागेश, रावजी, उमेश, शाम हे चौघेजण सिध्दार्थ हरदारेकडे गेले. यातून बाचाबाची झाली आणि राजन हरदारे, सिध्दार्थ हरदारे, संगिता हरदारे यांनी त्या चौघांवर कैची आणि चाकूने हल्ला केला.

तवेराच्या धडकेने मोटरसायकलस्वार जखमी

E-mail Print PDF
चिपळूण (प्रतिनिधी) ः तवेरा गाडी आणि मोटरसायकलची धडक होऊन मोटरसायकलस्वार हरीश अनंत जाधव (रा. मिरजोळी) जखमी झाला आहे. हरीश मिरजोळीकडून चिपळूणकडे येत होते. त्यावेळी मुंबईकडून येणार्‍या तवेरा गाडीशी मोटरसायकलची धडक होऊन अपघात झाला. या अपघातानंतर तवेरा चालक गाडीसह पळून गेला. हरीश जाधव याच्या डोक्याला दुखापती झाल्या असून, अधिक उपचारासाठी त्याला मुंबईत हलवण्यात आले आहे.

एकाच नदीवरील खासगी बंधार्‍यात पाणी फुल्ल तर सरकारी बंधारा खडखडीत

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) ः पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शासनाकडून बंधार्‍यांसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. परंतु शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे जनतेचा पैसा कसा वाया जातोय हे तालुक्यातील निरुळ ठीकवाडीत बांधलेल्या बंधार्‍यांवरुन दिसून येत आहे. कोळंबे येथील नदीवर एका खासगी कंपनीने बांधलेला बंधारा पाण्याने तुडुंब भरलेला आहे. त्याचबरोबर जवळच निरुळ ठीकवाडी येथे जिल्हा परिषदेने १६ लाख रुपये खर्च करुन बांधलेल्या बंधार्‍यात पाणीच नसल्याचे दिसून येत आहे. या बंधार्‍याला झडपे लावली न गेल्याने पाणी अडवता आलेले नाही. त्यामुळे कंपनीच्या बंधार्‍यातून कंपनीला पुरेसे पाणी मिळते, तर निरुळ ठीकवाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

दापोलीची मैत्रेयी दांडेकर होणार सैन्यातील लेफ्टनंट अधिकारी

E-mail Print PDF
दापोली (प्रतिनिधी) ः तालुक्यातील चिखलगावची मैत्रेयी दांडेकर ही शॉर्ट सर्व्हीस कमिशन वुमन अंतर्गत महिला लष्करी अधिकारी म्हणून प्रशिक्षणासाठी पात्र झाली आहे. लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सीडीएस परीक्षेत ती राष्ट्रीय गुणवत्ता यादीत ३३व्या क्रमांकावर झळकली आहे. तिने पुण्याच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत शिक्षण घेतले आहे. बालपणापासूनच लष्करी सेेवेची ओढ असल्यामुळे वयाच्या १०व्या वर्षी ती चिखलगावातून पुण्यात शिक्षणासाठी गेली. शिक्षक व मार्गदर्शकांच्या प्रोत्साहनामुळे आपण हा पल्ला गाठू शकलो, असे मैत्रेयीने म्हटले आहेे. आता ती चेन्नईच्या लष्करी अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीत एक वर्षाचे सैनिकी प्रशिक्षण घेण्यासाठी पात्र ठरली असून, हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ती सैन्यात लेफ्टनंट पदावर कार्यरत होणार आहे.

Page 3133 of 3208