Monday, Sep 25th

Headlines:

रत्नागिरी

दोन दिवसांपूर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - शहरानजीकच्या टीआरपी येथे दोन दिवसांपूर्वी टेम्पो ट्रॅव्हलर व दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला होता. यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सुरेश खांडेकर (कुवारबाव, रत्नागिरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी जयदीप जयराम डोळे (२८, कुवारबाव) या टेम्पो ट्रॅव्हलर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० सप्टेेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. शहर पोलीस याविषयी अधिक तपास करत आहेत.

विषारी औषध प्राशन केल्याने विवाहितेचा मृत्यू

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - विषारी औषधाचे प्राशन केल्याने लांजा तालुक्यातील मोडकवाडी येथील विवाहितेचा मृत्यू झाला आहे. औषध प्राशनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तिर्था राजेंद्र मोडक (२१, लांजा, मोडकवाडी, रत्नागिरी) असे या मृत विवाहितेचे नाव आहे. २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तिने विषारी औषध प्राशन केले. यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने पतीने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. लांजा पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भोंदूबाबाच्या झरेवाडी येथील आश्रमाला ठोकले टाळे

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - झरेवाडीतील भोंदूबाबाच्या आश्रमाला पोलिसांनी टाळं ठोकलं आहे. श्रीकृष्ण पाटील बाबा सध्या २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहे. मात्र पोलिसांनी काल रात्री त्याला सोबत घेऊन आश्रमाची झाडाझडती घेतली. बाबानेच या आश्रमातला कोपरा न कोपरा पोलिसांना दाखवला. महत्वाचं म्हणजे रात्री उशिरा ही झाडाझडती घेतली गेली, तेव्हाही या मठात बाबाच्या समर्थकांची मोठी गर्दी होती.
अश्लील शिव्या देऊन हा बाबा आपल्याला रोगमुक्त करतो, अशी इथल्या अनेक लोकांची धारणा आहे.  याच अश्लील शिवीगाळाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाबाविरोधात जादूदोणा विरोधी कायद्यातर्ंगत कारवाई करण्यात आली आहे. श्रीकृष्ण पाटील असं या बाबाचं नाव आहे. त्याच्या लीला रोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रत्नागिरीतील झरेवाडीमध्ये या बाबाचा मठ आहे, तर दर गुरुवारी बाबाची वारी देखील असते.
बाबा श्रीकृष्ण पाटीलला पोलिसांनी काल रात्री मठात आणलं. आपण कुठे बसतो, कुठून आदेश करतो, या सगळ्या ठिकाणांपासून कपडे बदलायची खोली, हे सर्व बाबाने दाखवलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकी मोठी कारवाई होत असतानाही बाबाच्या मठातील भक्तांची उपस्थिती कमी नव्हती. या भक्तांच्या भावना खूप तीव्र होत्या, पण त्यांच्याच उपस्थितीत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी बाबाच्या मठाला कुलूप लावत त्याचा ताबा घेतला.
कुणीही कसलाही विरोध करायचा नाही, पोलीस जे मागतील ते तपासासाठी त्यांना उपलब्ध करून द्या, असे आदेश बाबाने भक्तांना दिले होते.

जिल्ह्यातील महामार्गांवरील अपघातप्रवण क्षेत्रांची नव्याने निश्‍चिती होणार

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांची नव्याने निश्‍चिती केली जाणार आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी भीषण अपघात झाले आहेत, अशा ठिकाणांना डोळ्यांसमोर ठेवून त्यातील ३० अपघातप्रवण क्षेत्रांची (ब्लॅक स्पॉट) कच्ची यादी बनविण्यात आली आहे. आता येत्या शनिवारी, रविवारी सार्वजनिक बांधकामच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व वाहतूक पोलिस संयुक्तपणे पाहणी करून अंतिम यादी निश्‍चित करणार आहेत.
अपघातप्रवण क्षेत्रांची अंतिम यादी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या अपर पोलिस महासंचालकांना अहवाल सादर केला जाणार आहेत. येथून हा अहवाल तपासून उपाययोजनांच्या शिफारशींसह राष्ट्रीय महामार्गाचा अहवाल केंद्र शासन आणि राज्य महामार्गचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. नुकतीच महामार्ग वाहतूक पोलिस अधिकारी, शहर वाहतूक नियंत्रण पोलिस अधिकार्‌यांनी सा.बां.च्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‌यांशी चर्चा केली. यामध्ये शनिवारी, रविवारी संयुक्त पाहणी करण्याचे ठरविण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कशेडीतून सुरू होऊन राजापुरात संपतो. एकूण २७५ कि.मी.च्या राष्ट्रीय महामार्गातील ५० कि.मी. लांबीचा महामार्ग खेड तालुक्यातून जातो. चिपळुणातून ३७ कि.मी., रत्नागिरीतून ५६ कि.मी., संगमेश्‍वरातून ७२ कि.मी., लांजातून २५, तर राजापुरातून ३५ कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग जातो. राज्य महामार्गामध्ये रत्नागिरी ते कोल्हापूर ७३ कि.मी. व  गुहागर ते कराड ७३ कि.मी. लांबीचा समावेश आहे. या दोन्ही महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्र निश्‍चित होणार आहेत. त्यासाठी गेल्या ५ वर्षांतील अपघातांचा आधार घेतला जाणार आहे. आवश्यक त्या उपाययोजनांसह हा अहवाल राज्याच्या अपर पोलिस महासंचालकांना दिला जाणार आहे. येथून तो केंद्र व राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे.

राजन देसाई यांचा राजीनामा

E-mail Print PDF
लांजा (प्रतिनिधी) - मागील विधानसभेमध्ये लांजा-राजापूर मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे विधानसभा निवडणूक लढविलेले राजन देसाई यांनी आ. नारायण राणे यांच्या पाठोपाठ कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
राजन देसाई यांच्यासारख्या नेत्याच्या राजीनाम्यामुळे लांजा, राजापूर व संगमेश्‍वरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण जिल्हाभरात अन्य मतदारसंघात कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना तीन ते चार हजार मते मिळत असताना राजापूर विधानसभा मतदारसंघात मात्र राजन देसाई यांनी कॉंग्रेसविरोधी लाट असतानाही तब्बल चाळीस हजारांचे मतदान घेतले होते.
परखड व्यक्तिमत्त्व, उत्तम संघटक व व्हिजन असलेले नेतृत्व कॉंग्रेस पक्षातून बाहेर पडल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी हा धक्का समजला जातो. राजन देसाई गेली ३५ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये कार्यरत होते. छगन भुजबळ, सुधीर सावंत यांच्यानंतर नारायण राणे यांचे ते खंदे समर्थक समजले जात होते. माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाचा देसाई यांच्यावर मोठा प्रभाव आहे. कॉंग्रेस पक्ष संघटनेसाठी नीलेश राणे यांनी खासदार म्हणून केलेले काम व पक्ष संघटनेसाठी त्यांनी घेतलेली मेहनत याबाबत राजन देसाई त्यांचे कडवट, निष्ठावान समर्थक बनले होते.
दरम्यान, नारायण राणे यांनी गुरुवारी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर राजन देसाई यांनीही राणे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत स्वत:ही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे. जनतेच्या अपेक्षांना भिडणारा व सर्वसामान्यांत देसाई यांचा राबता होता. देसाई आता राणे यांच्यासोबत राजकीय सोबत करणार असल्याने नारायण राणे व नीलेश राणे यांना लांजा, राजापूर, संगमेश्‍वर तालुक्यात उत्तम जनाधार असलेला नेता मिळाल्याने राणे समर्थकांत उत्साहाची भावना आहे. दरम्यान, यांच्या कर्तृत्व व नेतृत्वाचा कॉंग्रेस पक्षाने फायदा करून घेतला नाही, अशी खंत देसाई यांनी बोलताना व्यक्त केली. कोकणातच नव्हे तर राज्यभरात कॉंग्रेसला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. राणे यांचा जर राज्यभरात कॉंग्रेसने उपयोग करून घेतला असता तर महाराष्ट्रात कॉंग्रेसने गतवैभव मिळवले असते, असा दावाही त्यांनी केला.

Page 4 of 3147