Saturday, Sep 23rd

Headlines:

रत्नागिरी

खेड-मुंबई एसटीला अपघात; वाहक जखमी

E-mail Print PDF
महाड (प्रतिनिधी) - सकाळी सव्वासहा वाजता खेड डेपोतून निघालेल्या खेड-मुंबई या एसटीला नऊच्या सुमारास महाडजवळ अपघात झाला. चालक गजानन बालाजी पवार चौदा प्रवासी घेऊन मुंबई दिशेने चालले होते. महाड शहरानजीक असणार्‌या करण स्कूल गावाच्या हद्दीत समोरून आलेल्या मोटारसायकलला वाचवताना ब्रेकफेल झाल्याने गाडी रस्त्याच्या डावी बाजूस कळल्याने अपघात झाल्याची माहिती वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी दिली आहे. या गाडीचा वाहक तारे हा जखमी झाला असून तो बेशुद्धावस्थेत आहे. या दोघांवर महाड ग्रामीण ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत असून अन्य आठ प्रवाशांना किरकोळ जखमा झाले आहेत. अन्य प्रवाशांना घेऊन पर्यायी गाडी मुंबई दिशेने रवाना झाल्याचे महाड आगाराच्यावतीने सांगण्यात आले.

उपनगराध्यक्ष राजेश सावंतांचा शिवसेनेला रामराम

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - गेल्या १७ वर्षांपासून आमदार उदय सामंत यांच्या राष्ट्रवादी ते शिवसेना अशा राजकीय प्रवासात खांदाला-खांदा लावून काम केलेले त्यांचे निकटवर्तीय व रत्नागिरी नगर परिषद उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा सादर करून येथील राजकीय खळबळ उडवून दिली. सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करायची इच्छा नव्हती, पण काहींनी दाखवलेल्या अविश्वासामुळे राजीनामा दिल्याचे सावंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान लवकरच नगरसेवक पदाचाही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राजेश सावंत नाराज असल्याची व सेनेला सोडचिठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. शुक्रवारी या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले. सावंत यांनी नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्याकडे आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. हा राजीनामा आपण कोणाच्या दबावाखाली देत नसून स्वखुशीने देत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजीनामा गणेशोत्सवावेळीच देणार होतो, पण पुढे येणार्‍या पित्रृपक्षापर्यंत त्यासाठी प्रतीक्षा केली आणि आता शिवसेना जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, माजी शहरप्रमुख यांचा मान राखूनच हा राजीनामा सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेत आल्यानंतर पक्ष पदाधिकार्‍यांनी आपल्यावर अविश्वास दाखवला नाही. आपण कोणाशी, कधीही वाईट वागलो नाही. मात्र काही मंडळींनी आपल्याला जाणूनबुजून टार्गेट केले, शिवसेनेत राहू नये, यासाठी प्रयत्न केले. याला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. शिवसेनेतील जुन्या पदाधिकार्‍यांची आपणाला आडकाठी नव्हती, असे असतानाही काहीनी आपल्यावर अविश्वास दाखवला व गैरसमज पसरवले, असे कोणाचेही नाव न घेता त्यांनी स्पष्ट केले. गेले आठ महिने आपण उपनगराध्यक्ष होतो. या काळात विकासात्मक कामांसाठी नगराध्यक्ष राहुल पंडित व सर्व नगरसेवकांनीही आपणाला पाठिंबा दर्शवला. निव्वळ शिवसेनेमुळेच आपणाला या पदावर विराजमान होण्याचा मान मिळाला. पणअविश्वासाचे वातावरण पावलोपावली जाणवू लागल्यानेच नाईलाजाने काही लोकांमुळे शिवसेना सोडावी लागल्याची खंत राजेश सावंत यांनी व्यक्त केली.

रिफायनरी प्रकल्पग्रस्तांना जमीन संपादनाच्या नोटीसा रवाना

E-mail Print PDF
राजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील नाणार परिसरात होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा कडाडून विरोध होत असताना दुसरीकडे शासन मात्र प्रकल्पासाठी आग्रही दिसून येत आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन संपादनाच्या नोटीसा बजावण्यात आल्या असून प्रकल्पग्रस्तांना म्हणणे मांडण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरासह लगतच्या १४ गावांमध्ये जगातील सर्वात मोठा ग्रीन रिफायरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १५ हजार एकर जागा संपादित होणार आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे येथील पर्यावरणासह जीवसृष्टीला धोका पोहोचणार असून येथील जनता विस्थापित होणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त व मच्छीमार बांधव विविध मार्गाने आपला विरोध दर्शवत आहेत.
स्थानिक स्तरावर प्रकल्पाला कडाडून विरोध होत असताना दुसरीकडे शासन हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी संपादित जागेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर आता अशा जमीनधारकांना भूसंपादनाच्या नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. नोटीसीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत प्रकल्पग्रस्तांनी आपले म्हणणे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नोटीशीच्या तारखेनंतर जिल्हाधिकाऱयांच्या मंजुरीशिवाय विक्री, पट्टयाने गहाण, अभिहस्तांकन, अदलाबदल किंवा कोणताही करार असल्यास तसेच जमिनीवर कोणताही खर्च किंवा सुधारणा केल्यास नुकसान भरपाईसाठी ते ग्राहय धरले जाणार नसल्याचेही या नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या बाबत व्यक्तिगत सुनावणी करण्याची इच्छा असेल तर त्यांना नोटीसच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत कामकाजाच्या वेळेत सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), रत्नागिरी यांच्याकडे हजर राहण्याच्या सूचनाही नोटीसद्वारे देण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - शहरानजीकच्या टीआरपी येथे दोन दिवसांपूर्वी टेम्पो ट्रॅव्हलर व दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला होता. यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संदीप सुरेश खांडेकर (कुवारबाव, रत्नागिरी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी जयदीप जयराम डोळे (२८, कुवारबाव) या टेम्पो ट्रॅव्हलर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० सप्टेेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला होता. शहर पोलीस याविषयी अधिक तपास करत आहेत.

विषारी औषध प्राशन केल्याने विवाहितेचा मृत्यू

E-mail Print PDF
रत्नागिरी (प्रतिनिधी) - विषारी औषधाचे प्राशन केल्याने लांजा तालुक्यातील मोडकवाडी येथील विवाहितेचा मृत्यू झाला आहे. औषध प्राशनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तिर्था राजेंद्र मोडक (२१, लांजा, मोडकवाडी, रत्नागिरी) असे या मृत विवाहितेचे नाव आहे. २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तिने विषारी औषध प्राशन केले. यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने पतीने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. लांजा पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Page 1 of 3144

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »