Wednesday, Feb 21st

Headlines:

मुंबई नर्सिंग कायद्याचे डॉ. पावसकर हॉस्पिटलकडून उल्लंघन

E-mail Print PDF
रत्नागिरी ः पत्रकार प्रणव पोळेकर यांची पत्नी ज्ञानदा यांना प्रसुतीनंतर सहाव्या दिवशी जीव गमवावा लागला. पावसकर हॉस्पीटलच्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवकर यांनी दखल घेत नर्सिंग होम परवाना निलंबित केला आहे. दरम्यान यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत हॉस्पिटलमध्ये अनेक त्रुटी व नियमभंग आढळून आल्याची माहिती डॉ. देवकर यांनी दिली.
ज्ञानदा प्रणव पोळेकर यांची सिझरद्वारे प्रसुती झाल्यानंतर डॉ. दिपा व डॉ. संजीव पावसकर कॉन्फरन्सच्या निमित्ताने बाहेर गेले होते. हॉस्पीटलमध्ये एकही डॉक्टर नसताना परिचारिकांनी रूग्णांना ऍडमिट करून घेणे हा मोठा गुन्हा आहे. ज्ञानदा यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला, मात्र शनिवारी पुन्हा त्रास होवू लागल्याने पावसकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पीटलमध्ये डॉक्टर नसल्याची कल्पना न देताच नर्सिंग स्टाफने त्यांना दाखल करून घेतले. जेव्हा ज्ञानदा यांची प्रकृती अतिशय नाजूक झाली तेव्हा नातेवाईकांनीच पुढाकाराने दुसरीकडे हलविण्याचा निर्णय घेतला.
हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे ज्ञानदा यांचा नाहक बळी गेला. आमदार उदय सामंत आणि राजन साळवी यांनी ज्ञानदा यांची उपचाराची फाईल नर्सकडे मागितले असता फाईल डॉक्टरांच्या कपाटात असल्याचे सांगितले. मात्र ऍडमिट करताना डॉक्टर पुण्याला होते मग फाईल त्यांच्या कपाटात कशी? असा संतप्त सवाल आमदारांनी विचारला असता एक कागद परिचारीकेच्या घरात सापडला. एकंदरीत आपला निष्काळजीपणा बाहेर पडू नये यासाठी डॉ. पावसकर यांनी फोनाफोनी करून परिचारिकांना मॅनेज केले होते हेदेखील सिध्द झाले आहे.
सोमवारी रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवकर यांची भेट घेवून कारवाईसंदर्भात माहिती घेतली. यावेळी डॉ. देवकर यांनी हॉस्पीटलमध्ये अनेक अनधिकृत बाबी आढळल्याचे सांगितले. एका विवाहितेचा केवळ हलगर्जीपणामुळे नाहक बळी गेल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले असले तरी मॅटर्निटी डेथ रेव्हयू कमिटी मार्फत दोन दिवसात याबाबत सखोल चौकशी करण्यात येईल असे डॉ. देवकर यांनी सांगितले.