Wednesday, Feb 21st

Headlines:

खारघर व शिरढोण येथे गुटखा विक्रीच्या गोदामावर छापे विक्रेत्यांनी संघर्ष समितीचा घेतला धसका

E-mail Print PDF
पनवेल  -पनवेल संघर्ष समितीने ‘गुटखा मुक्त, पनवेल, गुटखा मुक्त रायगड’ची हाक देत अन्न व औषध प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर त्यांनी तात्काळ धडक मोहिम हाती घेतली आहे. खारघर आणि शिरढोण येथील गोदामांवर छापे टाकून धडक कारवाई करण्यात आली आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातल्यानंतर प्रथमच अन्न व औषध प्रशासनाने इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाईचे हत्यार उगारले आहे. त्यातच दुकाने सील करण्याची कारवाई प्रथमच होताना दिसत आहे.
नव्या वर्षाच्या प्रारंभीच पनवेल येथील बहुचर्चित संघर्ष समितीने  ‘गुटखा मुक्त, पनवेल, गुटखा मुक्त रायगड’चा संकल्प केला असून तो अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. रायगड जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाला सोबतीला घेवून पनवेलसह रायगडात गुटखा विक्री करणार्‍या घाऊक व किरकोल विक्रेत्यांच्या नाड्या आवळण्यासाठी छापे टाकले जात आहेत.
काल, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने खारघर येथील नासिर अब्दुल गफर पटेल व पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील गुप्ता पान शॉपच्या दुकानावर छापे घालून हजारो रूपयांचा गुटखा ताब्यात घेतला. त्यांचे दुकान आणि गोदाम सील करण्यात आले आहे.
या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगताप, बालाजी शिंदे व राम भरकाड आदींनी सहभाग घेतला होता. त्यांनी दोन्ही ठिकाणी छापे घालून मोठी कारवाई केल्याची माहिती जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांनी दिली.