Monday, Jan 22nd

Headlines:

दशावतारी नाटयमहोत्सवाचे उदघाटन

E-mail Print PDF
परुळे: दशावतारी नाटकात नुसता पुराणाचा अभ्यास असून चालत नाही, तर त्याला समयसूचकतेची सांगड असावी लागते. ‘मालकांनू, तीच समयसूचकता माज्या अंगात भिनली हा. तुम्ही काळजी करू नको. मी नाटक पडाक देवचय नाय’, असे सांगून कै. वसंत परुळेकर रंगमंचावर प्रवेश करायचे आणि क्षणार्धात माहोल उभे करायचे. त्या माहोलात रसिक देहभान विसरून जायचे. अशा बावनकशी अभिनय सम्राटाच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार मला देऊन सन्मानित करण्यात आले हे माझे भाग्य समजतो. या पुरस्काराने माझी दशावतारी कारकीर्द सार्थकी लागली, असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ दशावतारी कलाकार जयसिंग राणे यांनी येथे काढले.

येथील संस्कृती कला प्रतिष्ठान आयोजित शामसुंदर श्रीपाद सामंत स्मृती राज्यस्तरीय दशावतारी नाटय़महोत्सवादरम्यान देण्यात येणारा व दशावतारी क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱया, दशावतारी नटसम्राट वसंत परुळेकर यांच्या नावाने देण्यात येणाऱया पुरस्काराने राणे यांना गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत दशावतारी नाटय़ महोत्सवाचे उद्घाटन झाले. हा कार्यक्रम येथील आदिनारायण मंदिराच्या रंगमंचावर झाला.