Monday, Jan 22nd

Headlines:

राजापूर नगराध्यक्ष काझींचे पद पुन्हा एकदा धोक्यात

E-mail Print PDF
राजापूर ः राजापुरचे नगराध्यक्ष हनीफ मुसा काझी यांचे नगराध्यक्षपद पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविताना काझी यांनी सादर केलेला मच्छीमार दालदी समाजाचा दाखला जिल्हा जात पडताळणी समितीने फेरतपासणीमध्येही अवैध ठरवून तो जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, निर्णयाविरोधात काझी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्ष हनिफ काझी यांनी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवताना मच्छीमार दालदी समाजाचा दाखला सादर केला होता. मात्र याबाबत स्विकृत नगरसेवक अनिल कुडाळी व नगराध्यक्षपदाचे सेनेचे पराभूत उमेदवार अभय मेळेकर यांनी जोरदार आक्षेप घेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने चौकशी करून काझी यांना उपविभागिय अधिकारी राजापूर यांनी वितरीत केलेला मच्छिमार या जातीचा दाखला अवैध ठरविला होता. त्यानंतर काझी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अपिल दाखल केले होते. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयाला स्थगिती देत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिताला फेरतपासणी करण्याचे आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याप्रकरणी फेरतपासणी करून आदेश जारी केला आहे. यामध्ये कागदोपत्री पुरावे, पोलीस दक्षता पथकाचे अहवाल, अर्जदार हनिफ काझी तर्फे विधीज्ञ, तक्रारदार अभय मेळेकर, अनिल कुडाळी व त्यांच्यातर्फे विधीज्ञ यांनी मांडलेले म्हणणे व युक्तीवाद विचारात घेता अर्जदार हनिफ काझी यांची जात मच्छीमार (दालदी) इतर मागासवर्ग असल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे अर्जदार काझी यांना उपविभागिय अधिकारी राजापूर यांनी वितरीत केलेला मच्छिमार या जातीचा दाखला क्र २१६०/ १६ निर्गम दि.१८/१०/२०१६ हा अवैध ठरविण्यात येऊन रद्द व जप्त करण्यात येत आहे. असा फेर निकाल दिला आहे. या निकालाने शहरातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.