Monday, Jan 22nd

Headlines:

कर्ली खाडीपात्रात शालेय विद्यार्थ्याचा मृतदेह

E-mail Print PDF
कुडाळ : तालुक्यातील नेरुरपार–नाईकवाडी येथील रोहित चंद्रशेखर नाईक (18) या शालेय विद्यार्थ्याचा मृतदेह नेरुरपार पुलानजीक कर्ली खाडीपात्रात शनिवारी दुपारी आढळला. तो शुक्रवारी सकाळपासून बेपत्ता झाला होता. त्याने त्या पुलावरून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज असून त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पोलीस तपास करत आहेत. याबाबतची खबर राघो गजानन नाईक (रा. नेरुरपार) यांनी कुडाळ पोलिसांत दिली.

रोहित मालवण तालुक्यातील काळसे येथील शिवाजी विद्यालयात बारावीत शिकत होता. शुक्रवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे विद्यालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. मात्र, दुपारनंतर पुन्हा घरी परतला नाही. तेव्हा नातेवाईकांनी शाळेत चौकशी केली असता, तो शाळेतच गेला नसल्याचे उघड झाले. नंतर ग्रामस्थांनी त्याची शोधाशोध सुरू केली. काहींनी रोहितला नेरुरपार मुख्य रस्त्यापर्यंत आल्याचे पाहिले होते. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते. मात्र, तो सापडला नव्हता. त्यामुळे शनिवारी दुपारी त्याचे वडील कुडाळ पोलिसांत तक्रार देण्यासाठी आले.

त्याची शोधाशोध सुरू असतांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राघो नाईक यांना नेरुरपार पूल खाडीपात्रात सधारण शंभर मीटर अंतरावर त्याचा मृतदेह दिसला. त्याचे दप्तर पुलापासून खाडीपात्रात साधारण पाचशे मीटर अंतरावर सापडले. तेव्हा पोलीस पाटील गणपत मेस्त्राr यांनी पोलिसांना याची कल्पना दिली. या घटनेने नेरुर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हवालदार भगवान चव्हाण व हिप्परकर यांनी पंचनामा केला. पं. स. सदस्य संदेश नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. उपनिरीक्षक शीतल पाटील व गायित्री पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनीही भेट दिली. रोहित शांत स्वभावाचा होता. त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.