Monday, Jan 22nd

Headlines:

भीमा कोरेगावप्रकरणी अत्याचार निवारण शक्तीकडून निषेध

E-mail Print PDF
ओरोस : भीमा कोरेगाव व वढबुद्रुक येथे झालेल्या दगडफेक व तोडफोडीच्या घटनेचा राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती सिंधुदुर्गने जाहीर निषेध केला आहे. संबंधित दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणारे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे सादर केले.

भीमा कोरेगाव क्रांती स्तंभास अभिवादन करण्यासाठी जमलेल्या समाजबांधवांच्या गाडय़ा पेटविण्यात आल्या होत्या. तसेच वढबुद्रूक येथील गायकवाड यांच्या समाधीची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांच्या विरुद्ध अनिता साळवे आणि वामन मेश्राम यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. गोविंद गायकवाड यांची समाधी पूर्ववत बांधण्यात यावी. गाडय़ा जाळल्या जात असतांना बघ्याची भूमिका घेणाऱया पोलिसांवर कारवाई करण्यात यावी. दगडफेकीत मृत्यू पावलेल्या राहुल फटांगडे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी व एकाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे. ज्या कंपनीकडून मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली तसेच हॉटेल्स व दुकाने बंद ठेवण्यात आली, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदीप कदम व जिल्हा प्रभारी एस. व्ही. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हय़ातील बहुजन समाज संघटनांनी निषेध व्यक्त केला. यामध्ये जि. प. सदस्य अंकुश जाधव, प्रकाश जाधव, वाय. जी. जाधव, चर्मकार उन्नती मंडळाचे अध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर आदी सहभागी झाले होते.