Monday, Jan 22nd

Headlines:

तिलारी घाटात सडलेले दोन मृतदेह

E-mail Print PDF
दोडामार्ग- दोडामार्ग व चंदगड तालुक्याला जोडणाऱया तिलारी घाटात अर्धवट सडलेल्या अवस्थेतील दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. एका मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केल्याचे निदर्शनास आले असून दुसऱयाचा सांगाडा सापडला आहे. यामागे घातपात असल्याचा संशय आहे. एक मृतदेह 30 ते 35 वयोगटातील तर दुसरा 40-42 वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. चंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. बी. पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. सदर मृतदेह कोणाचे व ते तिलारी घाटात कसे आले, याचा शोध घेण्याचे आव्हान चंदगड पोलिसांसमोर आहे.

दोडामार्ग, गोवा व चंदगड तालुक्याला जोडण्याचे काम हा तिलारी घाटमार्ग करतो. या रस्त्यात भरदिवसा रहदारी असते. मात्र, महिनाभरापूर्वी हा घाटरस्ता दुरुस्तीसाठी वाहतुकीस बंद केला होता. सध्या चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे काम सुरू आहे. सदर काम योग्यप्रकारे सुरू आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी मोर्ले गावचे माजी सरपंच गोपाळ गवस व मनसेचे तालुका उपाध्यक्ष मायकल लोबो व त्यांचे अन्य सहकारी तिलारी घाटात गेले होते. त्यावेळी त्यांना दरीतून कुजल्याचा वास आल्याने दरीत उतरून पाहणी केली. तेव्हा  हा वास एका मृतदेहाचा असल्याचे निदर्शनास आले. साधारण 100 फूट खोल दरीत हा मृतदेह निदर्शनास आला. याबाबत चंदगड पोलिसांना माहिती देताच सायंकाळी उशिरा हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाच्या बाजूला मोठा दगड होता व त्या दगडाला रक्ताचे डाग होते. मृतदेह कुजल्याने व चेहरा विद्रुप झाल्याने ओळख पटलेली नाही. या घटनेचा चंदगड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

गुरुवारी सापडलेल्या मृतदेहाच्या तपासासाठी शुक्रवारी दुपारी पोलीस पुन्हा घटनास्थळी गेले होते. तेथे काही धागेदोरे सापडतात का, याचा शोध सुरू असतांनाच पोलिसांना तेथूनच 50 मीटर अंतरावर दुसरा एक सांगाडा सापडला. पोलिसांनी हा सांगाडा ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविला. सदरचा मृतदेह सुमारे 40 वर्षीय तरुणाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही मृतदेह सारख्याच अवस्थेत असल्याने एकाचवेळी घातपात झाल्याचा संशय आहे.