Monday, Jan 22nd

Headlines:

सावंतवाडी टर्मिनसचे काम थांबू देणार नाही - सुरेश प्रभू

E-mail Print PDF

सावंतवाडी - जिल्ह्याला आदर्श ठरणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असे आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी येथे दिली. ज्या प्रभूंनी कधीही होऊ न शकणारे टर्मिनस या ठिकाणी विशेष मान्यता घेऊन आणले आणि आपल्या मंत्री कोकण रेल्वेचा विकास केला त्यांच्यावर टीका होणे, दुर्दैवी आहे, असेही तेली यांनी सांगितले.

तालुका शिवसेनेच्यावतीने येथे पत्रकार परिषद घेवून प्रभू यांच्यावर टीका केली होती. त्याला श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेवून उत्तर दिले. श्री. तेली म्हणाले, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत कोकण रेल्वेकडे कोणीच लक्ष दिला नसताना सुरेश प्रभू यांच्या रूपाने कोकण रेल्वेत मोठा आमूलाग्र बदल पाहायला मिळाला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसही त्यांच्यामुळे होत आहे. या आधीचे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होणार नसल्याची भूमिका घेतली होती; मात्र श्री. प्रभू रेल्वे मंत्री होताच टर्मिनस मंजूर करून त्याचे कामही सुरू केले. हे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्याबाबत आपण प्रभूंचे लक्ष वेधले असता प्रभूंनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल.’’