Monday, Jan 22nd

Headlines:

महाराष्ट्र बंद ; ठाण्यात जमावबंदी,औरंगाबादमध्ये इंटरनेट बंद

E-mail Print PDF

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेने संयम बाळगावा अस; आवाहनही आंबेडकर यांनी केले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नगर या शहरांत दगडफेक, रास्ता रोको, तोडफोडीचे काही प्रकार घडले. औरंगाबादामध्ये इंटरनेट बंद ठेवण्यात आला आहे. पूर्व द्रुतगती मार्गासह ठिकठिकाणी रास्ता रोको, गोवंडी-चेंबूर येथे रेल रोको घडल्याने मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली. आंबेडकरी जनतेचा प्रभाव असलेल्या घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप, वरळीसह अन्य उपनगरांमधील दुकाने, व्यवहार, व्यवसाय बंद पाडण्यात आला. अनेक ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली. शहरात सर्वात जास्त तणाव चेंबूर आणि घाटकोपरमध्ये होता. या भ्याड हल्ल्यामागे असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंसह अन्य आरोपींविरोधात गुन्हा नोंद होत नाही, त्यांना अटक होत नाही तोवर रस्ता मोकळा करणार नाही, अशी भूमिका घाटकोपर रमाबाई नगर, कामराज नगरातील आंबेडकरी जनतेने घेतली होती. अशाच प्रकारचा रास्तारोको विक्रोळीच्या कन्नमवार नगरात करण्यात आला. चेंबूरमधील आंदोलकांनी चेंबूर नाका येथे सायन-पनवेल मार्ग रोखून धरला. पवईत आयआयटी संकुलासमोर चक्का जाम करण्यात आला. गोवंडी, चेंबूर रेल्वे स्थानकांमध्ये लोकल रोखण्यात आल्या. शहरात मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, गोवंडी, मानखुर्द, पवई या भागांमध्ये बेस्ट बसेस, खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी वाहनांच्या टायरमधील हवा काढण्यात आली.